त्या दोघी
सविता किरनाळे
सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
अपूर्वा आणि अनुष्काची मुळी भेट झालीच ती कोसळत्या पावसात. एका संध्याकाळी दोघी हातातील पर्स, छत्री सावरत येणाऱ्या रिक्षांना थांबण्यासाठी हात करत होत्या. पण एकही रिक्षा किंवा टॅक्सी थांबायला तयार नव्हती. मुंबईमध्ये भर पावसात रिक्षा मिळायला पुर्वजन्माचे संचित असावे लागते. आज दोघींचीही मोठी परीक्षा चालू होती. त्यांच्या प्रयत्नाचे फळ म्हणून एक रिक्षावाला बाजूला येवून थांबला आणि दोघीही एकदमच विरुद्ध दिशेने आत बसल्या. आत बसताच आधी आश्चर्याने आणि मग रागाने एकमेकींकडे पाहू लागल्या.
"हॅलो, ही रिक्षा मी थांबवली आहे. चल उतर खाली." अनुष्का गुरगुरली.
"मॅडम तुमचा काही तरी गैरसमज होतोय, रिक्षा मी थांबवली आहे. म्हणून तुम्ही खाली उतरा." अपूर्वाने उत्तर दिले.
दोघी वादविवाद करु लागल्या. बिचारा रिक्षावाला भांबावून पाहत होता. शेवटी त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि तो ओरडला.
"एक मिनिट, का भांडताय तुम्ही? आधी कुठे जायचे ते तरी सांगा म्हणजे मी सांगेन कोण उतरायचं ते."
"CSMT", दोघी एकदमच म्हणाल्या. आणि क्षणात हसत सुटल्या. रिक्षावालाही त्यांना सामील झाला आणि रिक्षा धावू लागली.
"किती हा मूर्खपणा ग आपला," अपूर्वा हसतच म्हणाली.
"हो ना, नाहीतर काय. पाच मिनिट वाया घालवली आपण त्यापायी." अनुष्काने दुजोरा दिला. त्या काही मिनिटांच्या रिक्षा प्रवासात दोघींची ओळख झाली. बोलता बोलता त्यांच्या लक्षात आलं की दोघी रोज एकाच ट्रेनने ये जा करतात. त्या दिवशी दोघी ट्रेनच्या एकाच डब्यात चढल्या. या ट्रेनच्या प्रवासामुळे दोघींची छान ओळख झाली. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.
अनुष्का आणि अपूर्वा चर्चगेटला आजूबाजूला असलेल्या दोन वेगवेगळ्या ऑफिसात काम करत होत्या. अनुष्का ठाण्याला राहायची तर अपूर्वा डोंबिवलीमध्ये. एकाच ट्रेनने येणे जाणे होत असल्याने काही महिन्यातच दोघींची अगदी घट्ट मैत्री झाली. सुट्टीच्या दिवशीही एकत्र फिरणे, भरपूर गप्पा मारणे हे त्यांचे रूटीन झाले. दोघींची छान मैत्री असली तरी त्यांचे स्वभाव मात्र परस्पर विरोधी होते. अपूर्वा शांत, मनातल्या गोष्टी फारशा शेअर न करणारी, भिडस्त स्वभावाची, शक्य तेवढी इतरांना मदत करणारी होती. जरी आपल्या अडचणी शक्यतो ती कुणाला सांगत नसली तरी इतरांच्या लक्षपूर्वक ऐकून, त्यांनी विचारला तर योग्य सल्लाही देत असे.
अनुष्का मात्र थोडी बालिश होती. मनात येईल ते भडाभड बोलून मोकळे व्हावे असा तिचा खाक्या. अपूर्वाच्या बाबतीत ती थोडीशी पझेसिव होती. 'मी तुझ्यासाठी प्रायोरिटी असली पाहिजे.' असे तिचे म्हणणे होते. अनुष्काला ते पटत नसे. कधी कधी ती अनुष्काची समजूत काढायची किंवा वैतागून दुर्लक्ष करायची. पण हीच लहानशी गोष्ट मोठी बनणार आहे याची दोघींना कल्पना नव्हती.
नोकरीसाठी मावशीकडे राहत असलेल्या अपूर्वाला एक दिवस भल्या पहाटे फोन आला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. गावी राहणाऱ्या तिच्या आईचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दुःखात बुडून गेलेली अपूर्वा लगेच मावशीबरोबर गावी जायला निघाली. अशा दुःखद प्रसंगी तिला अनुष्काचा विसर पडणे स्वाभाविक होते.
गावी पोहोचून अंत्यविधी वगैरे झाल्यावर अपूर्वाला मोबाईलची आठवण आली. गडबडीने तो मुंबईला विसरून आली होती. तातडीने निघाल्याने तिने ऑफिसमध्येही सुट्टीची सूचना दिली नव्हती. लक्षात आल्यावर तिने चुलतभावाच्या लॅपटॉपवरुन ऑफिसला ईमेल करून रजेचे कारण आणि अजून दोन आठवड्याची रजा हवी असल्याने कळवले.
दोन आठवड्यांनी अपूर्वा मुंबईला परतली. तिचा मोबाईल बॅटरी संपल्याने बंद झाला होता. चार्ज करुन तिने तो चालू केला तर त्यावर अनुष्काचे कित्येक मिस्ड कॉल आणि शेकडो मेसेजेस होते. अनुष्का अपूर्वावर भयंकर चिडली होती.
झाले असे होते, की ज्या दिवशी अपूर्वा गावी गेली त्यादिवशी अनुष्काने स्टेशनवर तिची वाट पाहत चार पाच ट्रेन सोडल्या होत्या. शेवटी बराच वेळ वाट पाहून तिने एक ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे ती तुडुंब भरून आली होती. कशीबशी उभी राहून अनुष्काने अपूर्वाला पुन्हा एकदा कॉल केला जो तिने उचलला नाही. रागारागाने फोन पर्समध्ये ठेवून अनुष्का उभी होती तेवढ्यात कुठलेतरी स्टेशन आल्याने बायकांचा लोंढा खाली उतरण्यासाठी धकाबुक्की करू लागला. विचाराच्या नादात बेसावध असलेल्या अनुष्काचा रॉड वरील हात सुटून ती प्लॅटफॉर्मवर पडली. काही जणी तिला तुडवून पुढे गेल्या तर दोन मुलींनी तिला चटकन उठवून उभं केलं. अनुष्का घाबरून थरथरत होती. काही वेळाने ती ऑफिसला कळवून घरी निघून गेली. झाल्या प्रकारामुळे तिला मानसिक धक्का बसला होता शिवाय मुका मारही बसला होता. कहर म्हणजे अजून ही अपूर्वाचा फोन किंवा मेसेज नव्हता.
आज अचानक फोनच्या स्क्रीनवर अपूर्वाचे नाव पाहून अनुष्काचा संताप उफाळून आला. तिने झटक्यात कॉल रिसिव्ह करून अपुर्वाला ओरडायला सुरुवात केली.
"कुठे मेली होतीस ग, तुला माहीत आहे का तुझ्यामुळे मी मरता मरता वाचले. जिथे उलथली होतीस तिथे सांगून तरी जायचं मग मी कशाला वाट पाहत बसले असते." आरडाओरड करतच, अपूर्वाला काही एक बोलू न देता अनुष्काने अपघाताबद्दल सांगीतले.
"ओह खूप वाईट झाले. अगं माझ्यावर प्रसंगच तसा ओढवला होता म्हणून डोक्यात नाही आलं. बरं आता कशी आहेस?" दुःखाचा घोट गिळत अपुर्वाने प्रश्न केला.
"कशीही असो तुला काय त्याचे," अनुष्काने फटकारले आणि फोन ठेवून दिला.
बिचारी अपूर्वा... तिला तिच्या प्रिय मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडायचे होते, दुःख हलके करायचे होते पण इथे तर उलटाच कारभार होता. तिने डोळे पुसत शांतपणे अनुष्काला आपली आई वारल्याने गावी गेलं असल्याचे आणि मोबाईल विसरुन गेल्याने कॉल रिसिव्ह नाही करु शकल्याचे मेसेज करून कळवून टाकले. अनुष्काने तो मेसेज पाहिला आणि वाईट वाटल्याचे उलट मेसेज करून कळवले.
अपूर्वाला धक्का बसला. तिला वाटले होते निदान हा मेसेज पाहून तरी अनुष्का कॉल करून चौकशी करेल पण तिचा भ्रमनिरास झाला होता.
थोड्या वेळाने अनुष्काचा पुन्हा एक मेसेज आला, "अपूर्वा तुझ्या आईबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. झालं गेलं आपण काय करू शकतो... Stay strong... तू फोन विसरून गेली होतीस तर निदान फेसबुकवर तर मला कळवायचे होते. तू स्वतःला माझी बेस्ट फ्रेंड म्हणवतेस आणि एवढी मोठी बातमीही तू मला सांगितली नाहीस. I am hurt."
आता मात्र हद्द झाली होती. अनुष्का बालिश आहे हे मान्य असले तरी इतकी आत्मकेंद्री असेल असे अपूर्वाला वाटले नव्हते.
दुसऱ्या दिवशी अपूर्वा ऑफिसला गेली तेव्हा ट्रेनमध्ये तिला अनुष्का भेटली नाही. तिने ट्रेन बदलली होती. काही दिवसांनी लक्षात आले, की अनुष्काने अपुर्वाचा नंबर ब्लॉक केला होता. सोशल मीडियावरही संपर्क तोडला होता.
दिवस उलटत गेले. अपुर्वाचे लग्न झाले. ती कायमस्वरूपी अहमदाबादला सेटल झाली. मूल बाळ, नोकरी यात ती अनुष्काला पार विसरून गेली. फोन नंबर मात्र अजूनही तोच ठेवला होता.
एका रविवारी दुपारी अपूर्वाचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता.
"हॅलो अपूर्वा, मी अनुष्का बोलतेय. ओळखलास का? कशी आहेस? खूप दिवसांपासून तुला कॉल करावा म्हणते जमतच नाही. ए सॉरी यार, मी तुझ्यासोबत तशी वागले. पण मी तरी काय करु, मला रागच तेवढा आला होता. तू ही मला मनवण्याचा प्रयत्न केला नाहीस. ओह सॉरी मीच तुला ब्लॉक केलं होतं नाही का... बरं ते जाऊ दे मी तुला म्हणत होते, की आपण भेटूया ना एकदा, मला तुझा सल्ला हवा आहे एका प्रॉब्लेमवर. हा माझा नवीन नंबर सेव्ह कर हां."
समोरुन धबधब्यासारखी अनुष्का बोलत होती आणि अपुर्वाच्या मनात राग गोळा होत होता.
अशी कशी ही... हिला लाज वगैरे काही वाटत नसेल का... इतक्या वर्षांनी फोन केला ते ही तिला काही अडचण आली म्हणून. सॉरी तर म्हणाली पण शब्दात ती भावना तर अजिबातच जाणवत नाही... उगीच म्हणायचं म्हणून सॉरी म्हणून टाकलं... काय अर्थ आहे अशा सॉरीला आणि मैत्रीला.... कोणतं ही नातं दुतर्फा असावं... देणारा देतच जातोय आणि घेणाऱ्याला तो आपला हक्कच आहे असं वाटायला लागलं तर चूक देणाऱ्याचीच म्हणावी लागेल... शेवटी कुणाला आपला किती फायदा घेऊ द्यायचा ते आपल्यालाच ठरवावं लागतं.
अपूर्वाने शांतपणे कॉल लॉगमधून तो नंबर काढला आणि ब्लॉक केला, कायमसाठी.
© सविता किरनाळे
वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.
तुम्हाला ही कथा ही वाचायला आवडेल
👇