ह्या जगण्यावर भाग अंतिम

  ह्या जगण्यावर भाग ४

बीना बाचल


भाग तीन

👇

भाग तीन

आजचा रविवार फारच वेगळा होता राधासाठी. आजचा वाढदिवस  इतर कोणासाठी नसला तरी राधासाठी विशेषच होता. तिनं आज सकाळीच लवकर उठून आवरलं. घरात कोणालाही तिच्या वाढदिवसाचे कौतुक नव्हते,तिने तिकडे विशेष लक्ष दिले नाही. सुजय ही रविवार असल्यामुळे निवांत लोळत पडला होता. राधाची त्याच्याकडे बघून उगाचच चिडचिड होत होती.त्याने अंथरुणावर लोळतच राधा ला हाक मारली" राधा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा." राधाला तेवढंच बरं वाटलं किमान ह्याने आपल्याला शुभेच्छा तरी दिल्या आठवणीने.

थोड्या वेळाने सुजय ने आवरून घेतले आणि राधाला विचारले" राधा अग जेवणात काय करणार आहेस विशेष?श्रीखंड पुरी कर आणि हो  कांदा भजी तर हवीतच!!"

राधा मनोमन म्हणत होती" किमान मला काय हवंय हे तरी विचाराचे होतेस रे, स्वतः ला काय हवंय सांगून मोकळा झालास !"

कितीही नाही म्हटले तरी राधाच्या मनावर निराशेचे मळभ दाटून येतच होते.

तेवढ्यात तिच्या फोनवर मेसेज आला " आज संध्याकाळी सहा वाजता बागेतल्या गणपती मंदिराजवळ भेट, प्लीज नक्की ये."

राधाचा पुरता गोंधळ उडाला होता, काय करावे ,जावे का त्या अनोळखी व्यक्ती ला भेटायला? संध्याकाळी सहा म्हणजे फार उशीर नाहीये,बाहेर अंधारात ही नाही म्हणजे भीतीचे काही कारण नाही, अगदीच काही वाटले तर लगेचच तिथून निघून येऊ" राधाने मनाशी ठरवले संध्याकाळी त्या अनोळखी व्यक्ती ला भेटायचेच!

ठरवल्याप्रमाणे ती संध्याकाळी तयार होऊ लागली. ती कपडे बदलून बाहेर आली, तोवर सुजय कुठेतरी बाहेर निघून गेला होता. "आपल्याला  कुठे बाहेर घेऊन जाऊ यात असेही वाटू नये ह्याला!" राधा उगाच बडबडली,पण नंतर ती स्वतः च स्वतः ला म्हणाली", सुजय नाही म्हणाला तरी हरकत नाही, मी माझा वाढदिवस छान साजरा करणार आहे, अगदी एकटी असेन तरीही"

राधा बरोबर सहा वाजता बागेत पोहोचली. तिच्या हृदयात थोडी धडधड होत होती. ती इकडे तिकडे पाहत होती पण कोणी दिसत नव्हते आसपास , असाच अर्धा तास गेला. राधाला वाटले ' कोणीतरी आपली थट्टा केलेली दिसतेय.इथे कोणी येणार नाहीये.आपण इथे येऊन अगदीच मूर्खपणा केलाय' राधा फार वाईट वाटलं.पण आता इथपर्यंत आलोच आहोत तर गणपतीचे दर्शन घेऊन मग घरी जाऊ असे म्हणत तिनं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि ती घरी जायला निघाली, तर तिचं लक्ष बागेतल्या कोपऱ्यात गेलं. तिथे सुजय आणि सावी एका बाकावर बसले होते. राधा ला हे पाहून अतिशय संताप आला .आज तिनं त्या दोघांनाही जाब विचारायचं ठरवलं आणि त्याच तिरमिरीत ती तडक त्या दोघांसमोर उभी येऊन ठाकली. ती त्या दोघांना काही बोलणार तेव्हाच सावी उठून उभी राहिली " सुजय बघ मी म्हटलं होतं ना तुला, ती आज नक्की येणार इथे,बघ आली की नाही!!"

सुजय ही म्हणाला" सावी ,मानलं बरं का तुला! तू म्हणालीस अगदी तसंच झालं बघ." 

राधाला हे दोघे काय बोलताहेत काहीच समजेना" एक मिनिट, हे काय चाललंय कळेल का मला, तुम्ही दोघे इथे काय करताय? आणि तुमची ओळख तरी कशी झाली, आणि तीही इतकी की बागेत येऊन भेटाल ? गेल्या वेळी मॉल ह्यावेळी बाग, छान चाललंय अगदी!!" राधाचा संताप अगदी अनावर झाला होता.

सुजय आणि सावी दोघे ही तिला शांत करत होते, पण ती काही ऐकून घेईना.

अखेर सुजय ने तिला दंडाला घट्ट पकडले आणि बाकावर बसवले" राधा जरा ऐकून घेशील का?"

मला जरा सविस्तर बोलू देत.तुझा बराच गैरसमज झालाय अग!

सुजय ने सुरुवात केली" ऐक राधा,गेले कित्येक महिने पाहतोय तुला, ही रोजची कामाची धावपळ, घरातल्या समस्या, ऑफिस चं टेन्शन ह्या सगळ्या गोष्टींमुळे तू इतकी त्रासून गेली होतीस की तू आनंदाने जगायचेच विसरायला लागली होतीस, छोट्या छोट्या गोष्टींचा ही तू किती त्रास करून घेत होतीस. मी पण तुझी तूच समजून घेशील असे मानून ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो,पण तू ट्रेन मध्येही मला टाळून लेडीज डब्यातून जायला लागलीस तेव्हा मात्र मी हादरलो.तुला माझ्यापासून असं दूर जाताना बघून मी अस्वस्थ झालो होतो. तुला मला त्याच जुन्या हसत्या खेळत्या रुपात पाहायचं होतं. अग ह्या महानगरात एक तरी माणूस सापडेल का ज्याला काही समस्या नाहीत? पण म्हणून कोणी जगायचं सोडलंय का? पण तू मात्र नको तेच करू पाहत होतीस.समस्येला तोंड देण्याऐवजी त्यापासून लांब धावत होतीस. मी सतत तुझ्या काळजीत असायचो, तेव्हाच आमच्या ऑफिस मध्ये stress management workshop झाले आणि ते सावीने conduct केले होते. तिनं ते workshop इतकं छान घेतलं की मी तिच्याकडे जाऊन तुझी अवस्था सांगितली.सावीनेही मला खूप छान समजून घेतले आणि मला नक्की मदत करायचे मान्य केले, तिला ऑफिसला जाताना आपल्या रूटचीच ट्रेन हवी असायची त्यामुळे तिचे काम अजूनच सोपे झाले, तिनं मुद्दामच तुझ्याशी मैत्री केली. तुझ्यातला आत्मविश्वास जागावला, आणि 

तो  'मेसेज' प्रकार ही ह्याच गोष्टीतला एक भाग होता, त्या मेसेजेस ने तुला स्वतः कडे लक्ष द्यायला भाग पाडले, आणि स्वतःच्या आनंदासाठी तू इतर कोणाकडे न बघता तो स्वतःतच शोधलास! सावीने फार प्रयत्न केलेत तुला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी. तुझ्या वाढदिवसाचे planning करण्यासाठी गेल्या रविवारी आम्ही भेटलो पण नेमके तेव्हा तू आम्हाला पाहिलेस आणि तुझा गैरसमज झाला. त्यामुळे आम्हाला तुझ्याशी खोटे बोलावे लागले." 

सुजय बोलायचे थांबला ,राधाला कसे react व्हावे तेच कळेना.तिला इतके दिवस वाटत होते की ह्या माझ्या खडतर आयुष्यात मी एकटीच लढतेय, तोंड देतेय ,पण सुजय अप्रत्यक्ष पणे तिची ढाल बनू पाहत होता, त्याला आपल्याला आनंदी पाहायचं होतं, आपण जर आपली दुःख,आपली चिडचिड अगदी मोकळ्या मनाने सुजय शी बोललो असतो तर....तर हे सगळं घडलं च नसतं. उगाच आपण सुजय आणि सावी वर संशय घेतला, ते तर माझ्यासाठीच झटत होते.राधा ला आता रडू येऊ लागलं. सुजय ने तिला जवळ घेत म्हटलं" अग राधे ,तुझ्या वाढदिवसासाठी किती तयारी केलीये माहितेय का तुला? सकाळपासून तुझ्याशी खोटं बोलत सगळा प्लॅन केलाय तो काय असा रडवून वाया घालवणार आहेस का? चल उठ ,छान फ्रेश हो,आपल्याला candle light dinner साठी जायचंय आणि पूर्ण संध्याकाळ मजेत घालवायची आहे"

राधा ह्या सुखद धक्क्याने आनंदली. तिने डोळे पुसत सावीचे ही आभार मानले.

मग सुजय आणि राधा ने अगदी मजेत ती संध्याकाळ घालवली.उद्यापासून ह्या जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा आणि ह्या जगण्यावर  भरभरून प्रेम करायचं असं ठरवून राधा सुजय च्या मिठीत विसावली.

समाप्त.

सौ बीना समीर बाचल.

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


तुम्हाला ही कथा ही वाचायला आवडेल.

प्रेमाचा सोहळा

Post a Comment (0)
Previous Post Next Post