ह्या जगण्यावर भाग तीन


 ह्या जगण्यावर भाग ३

बीना बाचल


भाग दोन

👇

भाग दोन


राधाला हे दृश्य पाहून खूप धक्का बसला. हे दोघेही एकमेकांना ओळखतात?? अर्थात मी सतत दोघांना एकमेकांविषयी सांगत असते इतकंच पण असे प्रत्यक्ष भेटण्या इतपत ह्यांची ओळख आहे? आणि असेल तर दोघांपैकी एकानेही मला तसे कधीच का नाही सांगितले? आणि आज दोघेही माझ्याशी खोटं बोलले आहेत ह्याचा अर्थ काय? तिच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली.ती तिथेच थिजून उभी होती, पण तिला असे वाटले की बहुदा सुजय ने आपल्याला पाहिले. ती चटकन त्या मॉल मधून बाहेर पडली. तिला खरं तर कुठे तरी शांत बसावेसे वाटत होते. डोळे भरून येत होते , कोणीतरी आपला विश्वासघात केलाय ह्याचं फार फार वाईट वाटत होतं.

'सावी आणि सुजय चं काही प्रकरण .....?'बाप रे तिला तिच्या विचारांची च लाज वाटली.

तिनं ठरवलं की आपणहून ह्या दोघांना ही काहीच विचारायचे नाही. बघू ते आपल्याला काही सांगतात का? 

राधा घरी जाण्यासाठी निघाली. वाटेत तिचा फोन टीवटीवला.तिनं पाहिलं तर " राधा तू फार आवडतेस ग मला!" असा मेसेज.

हे काय आता?म्हणून वैतागली ती. आता खरं तर तिचा ह्या मेसेज चा आणि त्या अनोळखी पाठवणाऱ्याचा विचार ही करावासा वाटत नव्हता. आधीच आयुष्य कमी अवघड होते का त्यात 'ही' भर!!

राधा वैतागून घरी आली, संध्याकाळचा स्वयंपाक करेपर्यंत सुजय हातात फुलं घेऊन हजर! 

एरवी राधाला तिची आवडती फुलं पाहून फार छान वाटलं असतं पण आता तिची मनस्थिती च वेगळी होती, तिचा विचार सुरू असतानाच सुजय फुलं घेऊन थेट स्वयंपाक घरातच आला." राधे, तुला आवडतात ना गुलाब म्हणून खास तुझ्यासाठी आणलेत बघ!"

आज किती दिवसांनी हा आपल्याला 'राधे' म्हणून हाक मारतोय ,पण हे जर मनापासून असतं तर आज कोण आनंद झाला असता आपल्याला पण दुर्दैवानं हा चक्क खोटं बोलतोय! मगाशी हीच फुलं सावीच्या हातात होती आणि म्हणतोय तुझ्यासाठी आणली आहेत!!

सावी नुसतीच त्या फुलांकडे बघतेय हे पाहून सुजय ने तिला हलवलं", अग अशी काय पाहतेस त्या गुलाबांकडे?"

राधा ची तंद्री मोडली ,तिनं सुजय ला विचारलं" सुजय अरे तू मित्रांसोबत जाणार होतास ना? मग ही फुलं वगरे मध्येच कुठे?"

सुजय थोडा गडबडला पण त्याने सावरून घेतले" अग हो आधी मित्रांना भेटलो आणि आता येताना फुलं दिसली म्हणून आणली तुझ्यासाठी !"

राधा ला हसू येत होतं," किती खोटं बोलतो आहेस रे" अर्थात सगळं मनात बोलून राधाने सर्वांना जेवायला वाढलं आणि सारं आवरून ती झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आवरावेसे वाटत नव्हते.पण तिनं च तिच्या मनाला समजावलं " आपली ह्यात काय चूक?आपण छान तयार होऊन ऑफिस ला गेलो तर काय बिघडलं, हल्लीच तर आपण स्वतःला वेळ देऊ लागलोय आता पुन्हा त्या दुःखाच्या आणि टेन्शन च्या गर्तेत नको जायला. " तिनं पटकन स्वतः चं आवरलं ,आज तिला सावीला भेटायची घाई झाली होती. ती पटकन स्टेशन वर पोहोचली तर सावी आज तिच्या आधी हजर होती!! राधाने मग उगाचच चौकशी करायची म्हणून तिला विचारले" काय ग सावी, काल इतकं काय काम होतं तुला? भेटायला ही वेळ नाही  मिळाला तुला?"

सावी बोलून गेली" अग खरं तर मलाही तुला भेटायचं होतं  पण काल घरची खूप कामं पेंडिंग होती माझी, संध्याकाळ पर्यंत माझी काम च संपली नाहीत ,खूप दमले मी काल!"

राधा ला तिच्या ह्या खोटारडेपणा चा राग आला होता, तिला जाब विचारावासा वाटत होता, पण राधा ने स्वतः ला आवरलं. " आताच नको ह्या दोघांना काही विचारायला, हे खोटं का बोलत आहेत माझ्याशी ?काही कारण असेल का? की मला जी भीती वाटतेय तसे ह्या दोघांचे काही....?"

ट्रेन आली आणि राधाच्या विचारांची साखळी तुटली. सावी काही न घडल्या प्रमाणे बडबडत होती पण आज राधाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं.

राधा ऑफिस ला पोहोचल्यानंतर तिनं सुजयला फोन केला तर तो engage लागत होता, मग का कोणास ठाऊक तिनं सावीला फोन लावला तर तिचाही फोन engage!! राधाला ह्या संशयाने अक्षरशः घेरून टाकले.

का आपल्या सरळसोट आयुष्यात असं वादळ यावं? का काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय? काय करावे? राधाचं मन नुसतं भिरभिरत होतं पण समोर कामाचा ढीग होता,मग ती कामात बुडून गेली.

ऑफिस सुटल्यानंतर तिनं पुन्हा फोन पहिला, सुजय आणि सावी दोघांनीही साधा call back ही केला नव्हता.

असो, 'नेहमीचा' मेसेज मात्र आलेला होता ज्यात तिचं खूप कौतुक केलेलं होतं.

तिला ह्या गढूळ वातावरणात आज ह्या मेसेजचा आधार वाटला. तिचं मन तिला खात होतं की ' आपण हे काय करतोय? आपल्या माणसापेक्षा हा अनोळखी कोणी आपल्याला जवळचा वाटतोय? त्याच्या ह्या गोड, धिराच्या शब्दांचा आपल्याला आधार वाटतोय!!' 

राधाच्या मनात  ह्या सगळ्याच गोष्टींचा फार गोंधळ उडाला होता.

त्या विचारातच ती घरी पोहोचली.आणि घरी आल्यावर यंत्रवत कामे करू लागली.सुजय ही घरी आला होता पण आल्यापासून तो त्याच्या फोनलाच चिकटला होता.राधा मधेच आत बाहेर करत होती ,पण सुजयचं लक्ष नव्हतं.राधाला जाऊन त्याच्या फोन मध्ये डोकवावे असे वाटत होते, पण तिने ते टाळले.

  मधे आठवडा गेला, पण हल्ली सुजय फोनवर जरा जास्तच वेळ असतो हे राधाला जाणवत होतं, पण तिच्या हाती ठोस काही लागत नव्हतं.

तिचं घर ऑफिस,ट्रेन,सावी ,गप्पा सगळे रुटीन नेहमीप्रमाणे सुरूच होते.

आज राधाला पुन्हा मेसेज आला" राधा, तुझा ह्या रविवारी वाढदिवस! मला तो साजरा करायचा आहे, तू मला भेटशील का ह्या रविवारी?"

राधा ला आश्चर्य वाटलं" आपल्याला स्वतः ला देखील लक्षात नव्हतं हे, कोण असेल ही व्यक्ती जिला आपला वाढदिवस ही माहीत आहे!! आणि आज तर ह्या व्यक्तीने भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, हे जरा जास्त होतंय, आता सुजय ला सगळं सांगायलाच हवे."

पण तिचं दुसरं मन तिला सांगू लागलं" राधा, अग तुझ्या नवऱ्याला सांगून काय उपयोग? त्याने गेल्या वेळीही तुला उडवून लावले होते, आणि त्याच्या लक्षात तरी असेल का तुझा वाढदिवस?गेली कित्येक वर्षं आपणच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी गोड धोड करतो ,झालं इतकंच काय ते त्या दिवसाचे महत्व!! त्यापेक्षा आपण ह्या वाढदिवसाला ह्या अनोळखी व्यक्ती ला भेटलो तर....काय हरकत आहे? " राधाला असं करणं म्हणजे सुजय शी प्रतारणा वाटत होती पण दुसरं मन काही वेगळं च सुचवत होतं. "जाऊ देत ,रविवारी बघू काय करायचे ते आतापासून नको डोक्याला व्याप!"असे म्हणत तिनं तो विषय च मागे टाकला. 

घरी आल्यावर तिनं सुजय च्या लक्षात आहे का की  ह्या रविवारी आपला वाढदिवस आहे, हे पाहण्यासाठी त्याला विचारलं" सुजय ह्या रविवारी काय करू यात रे?"

सुजय चटकन म्हणाला" राधा ,अग हा रविवार म्हणजे तुझा वाढदिवस! त्या दिवशी मस्त काहीतरी चमचमीत कर आणि गोडाच ही काहीतरी "

राधाचा अगदी हिरमोड झाला" ह्याला आपला वाढदिवस लक्षात आहे पण तो साजरा करायचा कसलाच उत्साह नाही!आता ह्या रविवारी मी सगळं माझ्या मनासारखं वागणार आहे, आणि हो मी त्या अनोळखी व्यक्तीला ही नक्की भेटणार!! बघू यात तरी कोणाला माझी इतकी काळजी वाटते?कोणाला आपल्यात इतका रस आहे?

तिनं मनोमन ठरवलं आणि रविवार उजाडला!!

क्रमशः

सौ बीना समीर बाचल

(कथा कशी वाटतेय जरूर कळवा)
पुढील भाग वाचण्यास निळ्या रंगावर क्लिक करा.

👇

भाग अंतिम

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post