प्रेमाचा_सोहळा
बीना बाचल
" आई शपथ सांगतो, केव्हा जातेस न घरातून त्या तारखेची वाट बघतोय मी, संपूर्ण रूम माझी होईल मग, आणि तुझी कटकट जाईल एकदाची!! आता जे नखरे करायचे न ते तिकडे; तुझ्या घरी जाऊन कर!! तू जाशील न तेव्हा एक थेंब अश्रू येणार नाही माझ्या डोळ्यातून" अनिश ची बडबड संपत नव्हती आणि " मीही तुझ्यासाठी रडेन असं वाटतं तुला!! Impossible" असं म्हणत आभा त्याला अजूनच डिवचत होती.
" आभा,अग महिन्याभरावर आलंय तुझं लग्न असं कोणी म्हणेल का ग!! काय हा बालिशपणा, तो अनिश एक पोरकट आहेच पण तुही?? अग सासरी आमचा' उद्धार' होऊ नये म्हणजे मिळवली!"इति मातोश्री..
" मी मुळीच काही केलं नाहीये आई, हा अनिश बघ ना किती वैताग आणतोय , सतत आपलं तू तुझ्या घरी जा, तिकडे नखरे कर.....किती त्रास देतोय बघ" इति आभा!!
" पुरे,पुरे करा ही तुमची भांडणं! अनिश किती कामं पडली आहेत अरे, जा त्या केटरर शी बोलून घे, हॉल तिकडे दुसऱ्या गावी ,तिकडे एक चक्कर मारून ये आणि हो येताना मंडप वाल्याला पण आठवण करून ये आणि झालं च तर ही सामानाची यादी देऊन ये बरं " आईची कामे संपेनात.
पण अनिश मात्र ढिम्म!!
" मी ह्या तायडी च्या लग्नात फक्त ऐश करणार आहे, मस्त कपडे घालून सगळीकडे थाटात वावरायचं, बस्स! आणि बाबांनी इतकी लोकं ठेवली आहेत प्रत्येक कामाला तर मला कशाला पिटाळत आहेस तू सारखी, मी हिच्यासाठी काहीही करणार नाहीये!"
" अनि,बेटा जा रे राजा, तू एकुलता एक भाऊ न आभा चा, ती गेली न की करमणार नाही घरात, रडशील मग एकटाच!! जा जा एवढी कामं कर मग आपण तुझ्या शॉपिंग साठी जाऊ यात" आईने पुन्हा लाडीगोडी लावल्यावर अनिश राजे उठले आणि कामाला निघाले.
अशी भांडणं, रुसवे फुगवे होता होता लग्न उद्यावर येऊन ठेपलं आणि घर पै पाहुण्यांनी भरून गेलं.
बरं लग्न परगावी असल्यानं गाड्या,बसेस ची सोय, सर्वांची राहण्याची व्यवस्था अशी एक न दोन ; हजार कामं डोळ्यासमोर उभी होती .
आभा च्या आई बाबाना तर उसंतच नव्हती.
आभा ही आपली बॅग, कपडे,दागिने ईतर साहित्य बॅगेत भरणं असं मैत्रिणींच्या मदतीनं करत होती.
इकडे घराच्या दारातल्या मंडपात टेबल खुर्च्या ,पंखे ,खाणं पिणं सगळं व्यवस्थित सोय असल्यानं पाहुणे मंडळी निवांत होती.
दुपारी जेवणं उरकली तशी सर्वांची लग्न स्थळी निघण्याची घाई सुरू झाली.
सगळे जण आपापलं सामान घेऊन तयार झाली तो वेळेत गाड्या ,बसेस दारात हजर!! आभा साठी तर खास गुलाबानी सजवलेली कार ही होती.
आभा घरातल्या देवांना नमस्कार आणि मोठ्यांचे आशिर्वाद घेत गाडीकडे जायला निघाली.तिची नजर अनिश ला शोधत होती, माहेरून निघताना एकदा असं शेवटचं भेटू असं वाटत होतं तिला पण कसलं काय अनिश कुठंय कोणालाच माहीत नव्हतं!" बावळट नुसता,ह्याला न भावना वगरे नाहीच कशा! असेल मित्रांबरोबर चकाट्या पिटत कुठेतरी!"
तेवढ्यात कोणीतरी निरोप आणला की ,अनिश केव्हाच त्याच्या मित्रांसोबत पुढे गेलाय!
आभा ला नुसता राग आला," वाटलंच होतं, हा असं करणार ते!"
यथावकाश वऱ्हाड मंगल कार्यालयात पोहोचलं ,तर अगदी बाहेर रस्त्यापासून ते थेट आत कार्यालयापर्यंत सुंदर मंडप,सजावट, फुलांच्या रांगोळ्या सगळा थाट अगदी बघण्या सारखा होता.
मुलाकडच्या मंडळींची तर विशेष सोय दिसत होती.
वरपक्ष हजर होताच तिकडच्या प्रत्येक माणसाकडे लक्ष द्यायला अनिची मित्र मंडळी सज्ज होती.
सगळे अनि कुठंय पाहत होते , आभा ने तर आशा च सोडली होती की हा हे दोन्ही दिवस असेच वाया घालवणार वाटतं!
तेवढ्यात त्याला कोणीतरी मागे भाजीपाला आणि इतर साहित्याचा ट्रक आला होता तिथून बोलावून आणलं, पटकन दिसेल तो कुर्ता चढवत त्यानं सर्वांचं स्वागत केलं आणि तो पुन्हा गायब झाला!
" काय धावाधाव करतोय हा पोर, तिकडून निघताना खाणं पिणं, बस सगळं कसं छान सांभाळलं अनिनं" कोणीतरी कुजबुजलं
मग मात्र पुढचे चोवीस तास तो आभाला कधी मुलाकडच्या आजीबाईंची विशेष खोलीत सोय करताना दिसला तर कधी तिकडच्या पाहुण्याच्या छोट्या बाळासाठी दूध आणताना दिसला! मध्येच' नवऱ्या मुलाच्या नावाचं spelling चुकलंय तिथे स्टेज वर' असं तिकडच्या पैकीच कोणी सुनावत असतां,' लगेच बदल करतो,काळजी करू नका' म्हणताना दिसला, तर कधी पंगतीत सर्वांना आग्रहाने वाढताना दिसला.
त्याला जी तायडी च्या लग्नात मस्त मस्त तयार होऊन ऐश करायची होती ती कुठेच दिसेना!!
तिला जाणवलं लग्न लागताना ,आहेर देणं घेणं सांभाळताना आई बाबांच्या मागेच होता तो, कोणी काही मागायचा अवकाश ;काय कुठे आणि कसं ठेवलंय हे अचूक माहिती होतं त्याला, घरात साधे स्वतःचे मोजे ही सापडत नाहीत ह्याला! हा तोच अनिश आहे का? असा प्रश्न पडला आभाला!!
आभाचे लग्न विधी सुरू होते आणि आता 'कान पिळी' चा विधी होता म्हणून भटजींनी मुलीच्या भावाला बोलावणं पाठवलं तर दोन मिनिटात हजर!!" भाऊजी, आभाची खूप काळजी घ्या हं, तिच्या डोळ्यात कधीच पाणी यायला नको म्हणताना त्याचे डोळे मात्र भरलेले दिसले" आभा त्याला जवळ बोलावणार तितक्यात हा पुन्हा गायब!!
अखेर निरोपाची वेळ आली ,आभा नं सर्वांचा साश्रू नयनांनी निरोप घेतला पण तिची नजर मात्र अनि ला शोधत होती.
आभा च्या आईच्या ते लक्षात आलं, तिनं आभा ला हाताला धरून पुन्हा स्टेज कडे नेलं, सगळी पाहुणे मंडळी ही बघत होती.
तो स्टेज च्या एका कोपऱ्यात अनि डोळे पुसताना दिसला, आभा ने जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि तिथे
स्टेजपाशी आनंद ,दुःख, इतकी वर्ष केलेली भांडणं, खोड्या अगदी हाणामाऱ्या सुद्धा अशा प्रत्येक भावनेत न्हालेल्या अश्रूंचा जणू पूरच आला!!
".......आणि म्हणे ,दोघेही एकमेकांचा निरोप घेताना एक अश्रू ही काढणार नव्हती! वेडी कुठली " आभाच्या आईचे ह्या प्रेमाच्या सोहळ्यापूढे शब्द अगदी थिटे पडले...
सौ बीना समीर बाचल©®
वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.
तुम्हाला ही कथा सुध्दा आवडेल
👇