खटकलं म्हणून सांगितलं

 खटकलं म्हणून सांगितलं

अनघा लिखिते
     
    डेपो पासून निघणारी बस हळूहळू भरत होती. मी आणि माझ्या बाजूला एक युवती बसली होती. ती आणि मी अगदी बस डेपो पासून बसलेलो. मला आणि तिला सुद्धा लास्ट स्टॉपलाच उतरायचे होते. हे तिने तिकीट काढताना कंडक्टरला तिनं सांगितलं, म्हणून कळलं. सुंदर कमनीय बांधा, गौर वर्ण, रेखीव पण पिटूकले नाक, पिंगट डोळे असलेली युवती आपल्या जवळ बसली आणि अगदी लास्ट स्टॉप पर्यंत सोबत रहाणार, या सारखा दुसरा आनंद तो काय म्हणावा. आजूबाजूच्या इतर जणांना नक्की माझा हेवा वाटत असेल. माझ्या मनात सागर पिक्चर ची धुन आपोआप वाजू लागली.

          "चेहरा है या चांद खिला हैं,
          जुल्फ घनेरी शाम हैं क्या.
          सागर जैसी आंखोवाली,
          ये तो बतां, तेरा नाम है क्या."

          तिने माझ्या कडे एक रागाचा कटाक्ष टाकला. मी आपली नजर दुसरीकडे फिरवली. तिने स्ट्रेटनींग केलेले केस मोकळे सोडले होते, त्यामुळे तिचे ते कुंतल हवेच्या झुळूकेने माझ्या आणि कधी कधी आमच्या मागच्या प्रवास्यांच्या कधी नाकपुरात तर कधी कानपूरात भ्रमंती करत होते. मागच्या महीलेला ते इरीटेट होत होतं, तर मला उगीचच गुदगुल्या करत असल्याचा भास होत होता. आपला आपला पहाण्याचा नजरीया आहे म्हणा ...

          मागची खेकसली, "ए बये... तुझे झिंज्या आवर की."

          इतक्या सुंदर मुलीच्या केसांना झिंज्या म्हणून अपमानित करणं, हे माझ्या सुसंस्कृत मनाला पटलंच नाही मुळी. मी मनात म्हणालो, "काय बायका आहेत. नेहमी एकमेकींना नीट समजावून सांगावे, तर नाही. बायकाच एकमेकांच्या विरोधात असतात. काय तं म्हणे झिंज्या !!! नीट कुंतल म्हणावं नं..."

          ती मला तेवढ्यात म्हणाली, "असं कर बाबा, तुला पुळका येतोय नं तिचा. मग सांग तिला आपले केस, अं. हं.. आपले कुंतल बांधायला."

          मी आणि बाकी पुरूष प्रवासी तिच्या कडे आश्चर्याने पाहू लागलो. मी या कारणाने की तिला माझ्या मनातले कसं कळलं आणि बाकीचे की ही बाई उगाच कशाला मला ऐकवतेय यासाठी.

          इकडे ती सुंदरी आपली मोबाईल मध्ये व्यस्त. अरे रे ! पण  कोणाशी तरी तिचं भांडण सुरू आहे. ती खुप तापली आहे. म्हणून मी सुद्धा तिला तुझे केस आवर. आम्हाला इरीटेट होतंय, असं म्हणायचं टाळलं. मी आपला हेडफोन लावून घेतला आणि खिडकीतून बाहेर पहात राहिलो. म्हणजे आता आपले नाक-कान सुरक्षित. बाहेर मस्त पाऊस पडत होता. मी माझ्या आवडती किशोर कुमारची गाणी ऐकत होतो. पण मनात विचार तिचाच, अहो म्हणजे माझ्या सहप्रवासीचा.

          "रिमझिम गिरे सावन,
          सुलग सुलग जायें मन.
          भिगे आज इस मौसम में,
          लगी कैसी ये अगन..."

          "तुम्हाला माहिती आहे आजकाल मोबाईल वापरामुळे पर्सनल गोष्टी तुम्ही स्वतः चव्हाट्यावर आणताहेत. वाद घराच्या चार भिंतीबाहेर जाऊ नये, त्यामुळे तुमची इमेज बिघडते, संस्कारांची पायमल्ली होते.", असं मी तिला मनातल्या मनात तिच्या कडे बघून बोललो.

          तिने माझ्या कडे रागात पाहीले, मला तिचे ओठ हालतांना दिसले. तेवढ्यात तिचा आवाज मला आवाज ऐकू आला...

          "माईन्ड योर ओन बिझनेस ! आला मोठा हुशारी शिकवायला. तु आपली तुझी इमेज जप ना ? दिसली चांगली मुलगी कि लागतात नाक खुपसायला. आला मोठा संस्कार शिकवायला."

          पुन्हा किशोर कुमार गाऊ लागले.

          जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे,
          अरमाँ हमारे पलके न मूंदे
          कैसे देखे सपने नयन,  सुलग सुलग जाए मन
          भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
          रिम-झिम गिरे सावन ...

          "बापरे ! मनकवडी दिसतेय... कि माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात हिला. हिच्या संपर्कात रहाणाऱ्याचे कठीण आहे, रे बाबा.", मी मनात म्हणालो.

          पुन्हा किशोर कुमार बंद, तिचा आवाज आला...

          "मनकवडी माय फुट. मी कशाला रे तुझं मन ताडत बसेल आणि तुझ्या चेहऱ्यावरील भाव वाचत बसायला तु काय स्वतः हृतिक रोशन समजतो कि काय ? आला मोठा ! तुझ्या संपर्कात काळ्या कुत्र्यालाही रहायला आवडणार नाही."

          बाप रे !! माझी इतकी अवहेलना आख्ख्या आयुष्यात कोणी केली नव्हती कधी. पण ही बया ! वरून कव्हर लव्हस्टोरीचे आणि आत हॉरर कथा, वाचल्यावरच कळणार.

          मला समजेना. हिला माझ्या मनातलं कसं ऐकु येत आहे आणि मला गाणं थांबुन तिचा आवाज कसा येतोय. मी एक मराठी पिक्चर पाहीला होता, त्यात त्या नायकाला बायकांच्या मनातलं ऐकु यायचं. काय बरं नाव त्या सिनेमाचं ? मी विचार करू लागलो.

          तेवढ्यात मागची ती झिंज्यावाली महीला, "अगं बाई अरेच्चा !!!" मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती खट्याळपणे हसली.

          हं... त्या सिनेमात महिला वर्गावर कायमचाच वैतागलेला श्रीरंग देशमुख एक दिवशी देवीकडे 'बायकांच्या मनातले विचार ऐकू येण्याची' इच्छा बोलून दाखवतो आणि देवी त्याची ती इच्छा पूर्ण करतेही. त्यामुळे लाभलेल्या या दैवीशक्तीने श्रीरंग अगदी त्रस्त होतो, पण नंतर या शक्तीमुळे त्याच्या हातून पराक्रमही घडतात. तोच तो 'अगं बाई अरेच्चा' अफलातून चित्रपट आहे. अहाहा !

          ईथे तर उलटेच झाले. जाऊ दे शांत बसणेच योग्य राहील...

          किशोर कुमार बंद, तिचा आवाज आला..."दॅट्स बेटर.."

          पुन्हा किशोर कुमार सुरू...

          महफ़िल में कैसे कह दें किसी से,
          दिल बंध रहा है किस अजनबी से
          हाय करे अब क्या जतन,  सुलग सुलग जाए मन
          भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
          रिम-झिम गिरे सावन ...

          मी हेडफोन काढूनच टाकला आणि तिच्या गोष्टी ऐकत बसलो. तिच्या भांडणावरून मला सर्व समजलं.

          तिने फोन ठेवला. बसमध्ये आता फक्त ती, मी अजून तीन-चार प्रवासी, कंडक्टर आणि ड्रायव्हर...

          ती माझ्या कडे बघून किंचित हसली. मला आश्चर्य वाटले की मगाशी तर माझ्यावर डाफरत होती आणि आता हसतेय.

          "अहो, सॉरी हं. मी रागात काही बोलली असेल तर एक्सट्रीमली सॉरी."

          मी, "पण मॅम तुम्ही मोबाईल वर बोलताना भान ठेवा हो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मगाशी जे कोणाशी मोठ्याने भांडण करीत होतात, तेव्हा इतर प्रवाशांची एन्टरटेन्मेंट होत होती. सर्व तुमच्या बद्दल कुजबूजत हसत होते. मला असं सांगायचा अधिकार नाही. पण खटकलं म्हणून सांगितले. वाद म्हणा किंवा पर्सनल गोष्टी अशा एक्साईट होऊन पब्लिक प्लेस मध्ये बोलु नये. मोबाईल तर आपलाच आहे नं, तुम्ही घरी किंवा एकांतात बोलु शकता."

          "हो. बरोबरच आहे हो तुमचं म्हणणं. मी लक्षात ठेवेल. धन्यवाद हं.", ती.

          "धन्यवाद ते कसले. तुम्ही ऐकलं हिच मोठी गोष्ट आहे. अंमलात आणली तर उत्तमच...", मी.

          "हो नक्की. त्याने असं डोकं भडकवलं नं. माझा कंट्रोलच नाही राहीला आणि मी तुमच्या वर सुद्धा तापले.", ती.

          मी शॉक झालो...

          "तुम्हाला मनातलं ऐकु येतं ?", मी.

          "हो. म्हणून तर आमचं भांडण झाले... तुम्ही घरी पोहचले की मनात काही बोलत बसु नका. नाही तर तुमचं सुद्धा वाजेल."

          "काय ?", मी किंचाळलोच.

          "आता आम्हां स्त्रीयांना पुरूषांच्या मनात काय खलबतं चालतात, त्याचा पत्ता लागतो.", ती.

          "अरे देवा हे तु काय केलंस ? त्यांच्या मनातले तर तुला सुद्धा नसेल कळत आणि हे असलं कसलं वरदान दिले की आम्हाला मनात देखील स्पष्टपणे बोलता येऊ नये.", मी मनात म्हणालो.

          ती सुंदरशी स्माईल देत म्हणाली, "अहो बस करा. नका बोलू मनात म्हटलं तर, जास्तीच बोलताय. या वटसावित्रीच्या दिवशी आम्हाला हे वरदान मिळाले होते. चला, आपला स्टॉप आला आहे... नका येवढा विचार करू. मला सुद्धा खटकलं म्हणून सांगितले बरं का..."

          ती खळखळून हसली आणि माझा चेहरा पडलेला...

समाप्त

अनघा लिखिते ✍🏻
वरील कथा अनघा लिखिते यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post