देवदर्शन भाग अंतिम

देवदर्शन भाग दोन

प्रांजली लेले भाग एक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇

भाग एक

सुलभाताईंनी मनाशी काही ठरवले, काय ते वाचा पुढे 

 आज सकाळी त्या मुद्दामच लवकर उठल्या. सकाळचा योगा, प्राणायाम सगळे आटोपून छान पूजा केली आणि स्वैपाक करायला लागल्या. त्यांनी एका कुटुंबाला पुरेल इतका वरण भात आणि भाजी केली. नैवेद्य दाखवला. आणि दाराशी जाऊन कुणाची तरी आतुरतेने वाट पाहू लागल्या. थोड्याच वेळात त्याना  नेहमीच्या भाजीवाल्या चा आवाज ऐकू आला. तो गेट वर येताच त्यांनी आधी त्याची विचारपूस केली. त्याच्याकडून ताजी भाजी घेतली. घरात येऊन तयार ठेवलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर आल्या आणि त्याला देत म्हणाल्या, हे जेवण घे आणि बाजारातील  तुझ्या मित्रांना दे ज्यांचे सामान आता विकल्या जात नाही आणि ज्याचे कुटुंब आता उपाशी आहेत. ते बघून तो खूप खुश झाला. त्याने आनंदाने ते घेतले आणि निघाला. हळूहळू हा त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला. भाजीवाला पण न चुकता रोज यायचा आणि सगळ्या लोकांनी दिलेले आशीर्वाद आणि त्याचे आभार प्रगट करायचा. हे सगळं करताना त्यांना येणारा थकवा पण जाणवत नव्हता. त्यांना वाटायचं खरंच देवच देतो बळ चांगल्या कामासाठी. 

     

      काही दिवसांनी त्या करत आलेल्या मदतीची  बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या आजूबाजूला पसरली. मग काय त्यांच्या मैत्रिणी पण मदत करायला पुढे सरसावल्या. मग त्यांनी लगेच आपल्या मैत्रिणीच्या व्हॉटसअप ग्रुप मधे मेसेज टाकला. सर्वांनी आपापल्या परीने जमेल ती मदत आसपासच्या गरीब लोकांना करायची असे ठरले. मग कुणी सकाळी चहा करून कॉलनीच्या गार्डस ना द्यायचे तर कुणी थंड पाण्याच्या बाटल्या दारावर विकायला येणाऱ्या भाजी वाला, फळवाला यांच्यासाठी भरून ठेवायचे. या सर्वांच्या मदतीने आता मंदिरा बाहेर बसणाऱ्या अनाथ, वृद्ध यांना  पण दोन वेळचे जेवण मिळू लागले होते. सुलभा ताईना पण या सगळ्यातून एक मानसिक समाधान लाभत होते. 

   

     संध्याकाळी अंगणात सहज फिरत असता त्यांच्या मनात विचारांचे थैमान चालु होते. खरंच सारे आयुष्य आपण  फक्त स्वतः चा विचार करण्यात घालवले. आजवर आपले कुटुंब आणि आपले नातलग, सगे सोयरे यांच्यासाठीच आपण जगलो. जीवन किती क्षणभंगुर आहे याचा त्यांना चांगलाच अनुभव आला होता. आता परमेश्वराने ही संधी दिली आहे दुसऱ्यासाठी काही करण्याची, ती सोडायची नाही हे त्यांनी पक्के ठरविले. 

   

     त्यांच्या  समोरच्या बंगल्यात एक डॉक्टर  कुटुंब राहत होते. नवरा, बायको आणि त्यांची एक कॉलेजला जाणारी  मुलगी आणि पंधरा वर्षांचा मुलगा असे चौघे राहायचे. दोघेही डॉक्टर असल्याने फार बिझी असायचे. रोज सकाळी हॉस्पिटलला जायच्या गडबडीत दिसायचे. पण गेले एक दोन दिवस ते दवाखान्यात जाताना दिसले नव्हते. 


     सुलभा ताईंनी सहज चौकशी करावी म्हणून त्यांना फोन केला. तर डॉक्टरांच्या मुलीनेच फोन उचलला. त्यांनी विचारले तशी ती रडवेल्या स्वरात म्हणाली, " काल पासूनच आई बाबांची शिफ्ट बदलली आहे. ते दोघेही आता इमर्जन्सी वाढल्यामुळे हॉस्पिटलमधे कारोना वॉर्ड मधे काम करत असल्यामुळे घरी येऊ शकत नाहीये. आई प्रयत्न करतेय येण्याचा पण अजून काही दिवस तरी जमणार नाहीये यायला असे ती म्हणाली. त्यांनी लगेच विचारले, मग शेजारी का नाही कळविले तर मुलगी म्हणाली की लॉकडाउन असल्याने कुणाकडे जायला आई बाबानी नको म्हंटले आहे. 

      मुलांच्या जेवणाची चौकशी केली तर म्हणले, "आईने दोन दिवसाचे बनवून ठेवले होते. आता ते संपले. आज आम्ही ब्रेड बटर खाल्ला सकाळी आता मी वरण भात करीन." ते ऐकून त्यांना फार वाईट वाटले. देवासारखे डॉक्टर तिकडे हॉस्पिटल मध्ये लोकांना वाचवायला धडपडत आहेत आणि त्यांच्या मुलांची काळजी घ्यायला घरी कुणी नाही. सुलभा ताईनी लगेच मुलांसाठी गरम गरम जेवण बनवले आणि स्वतः नेऊन दिले. त्यांना सांगितले, रात्री पण डबा देईन. ती मुले पण thank you आजी म्हणत आनंदाने जेवली. 


     सुलभा ताईंनी लगेच त्यांच्या आईला फोन करून म्हटले की, "मुलांची  काही काळजी करू नका. तुम्ही निश्चिंत रहा आणि काम करा. मी लक्ष देईन त्यांच्याकडे" ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणीच आले आणि ती म्हणाली, "इथे या शहरात खर तर आमचे कोणीच नातेवाईक नाहीत. तशी मुलं इंडिपेंडंट आहेत. सगळ्या कामाची सवय आहे त्यांना तरी मुलांची खूप काळजी वाटत होती. पण अश्या स्थितीत एक डॉक्टर म्हणून आमचे कर्तव्य आधी बजावणे आवश्यक होते. तुम्हीं अगदी माझ्या आई सारख्या धावत आल्यात आमच्या मदतीला." 

     

    डॉक्टर पती पत्नी घरी येईपर्यंत त्यांनी मुलांच्या खाण्यापिण्याची नीट काळजी घेतली. त्यांना तर मुलांना बघून आपली नातवंड आठवत होती. मुलं पण समजूतदार होती. परिस्थितीचे भान ठेवून नीट राहत होती. आजच सकाळी डॉक्टरांचा फोन आला की ते आज घरी परत येत आहेत. ते ऐकून मुलं फार खुश होती आणि त्यांनी सुलभा आजीना पण सांगितले.  त्यांनी लगेच चौघांसाठी छान  स्वैपाक करून डबा पाठविला.

      खरतर हे डॉक्टर कोरॉना पेशंटचे हॉस्पिटल मध्ये काम करतात हे कळल्यापासून शेजारी जरा घाबरून दोन हात दूरच राहत होती त्यांच्या पासून हे सुलभा ताईंच्या आधीपासूनच लक्षात आले होते. ही समाजाची मानसिकता त्यांना बदलायची होती. त्यांनी सगळ्यां मैत्रिणी ना व्हॉटसअप ग्रुप वर मेसेज पाठविला की आज आपले रक्षणकर्ते एक लढा लढून घरी परत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी त्यांच्या घरा बाहेर जमूया. सगळ्यांना सुलभा ताईंच्या विचार मनापासून आवडला.


      संध्याकाळी जेव्हा दोघे डॉक्टर पती, पत्नी हॉस्पिटल हून परत आले तर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ते गाडीतून उतरताच सर्वांनी त्यांच्यावर फुलांची पखरण केली. टाळ्या वाजवीत त्यांचे स्वागत केले. हे बघून खूप गहिवरून आले त्यांना. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. हात जोडून त्यांनी सर्वांचे आणि सुलभा ताईंचे विशेष आभार मानले. 


     डॉक्टरांना तर शब्दच अपुरे पडले. त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कसेबसे ती म्हणाली, मावशी कसे आभार मानू तुमचे, तुम्ही जे केले ते फक्त आई बाबाच आपल्या मुलांसाठी करू शकतात. तुम्ही जणू देवासारखे आमच्या साठी धावून आला. सुलभा ताईंचे पण डोळे भरून आलेत. त्या म्हणाल्या,"तुम्ही मला माझ्या मुलांसारखे आहात. मला अजिबात परके समजू नका. आज मला अजून एक मुलगी मिळाली."

     

      सांज वेळ झाली तशी त्या उठून देवघरात गेल्या आणि त्यांनी देवापुढे दिवा लावला, हात जोडले आणि मनोमन म्हणाल्या, या महामारीमुळे आज खऱ्या अर्थाने जीवनाचे ध्येय कळलं. माणुसकीची जाणीव झाली. तू माझ्यातच आहेस आणि माझ्या अवती भोवती देखील तूच आहेस याची प्रचिती आली.  त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रुचा अभिषेक गणरायाला होत होता. समोर बाप्पा पण त्यांच्या कडे बघून हसताना त्यांना दिसला.

समाप्त


प्रांजली लेले

वरील कथा प्रांजली लेले यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post