देवदर्शन भाग एक

 देवदर्शन भाग एक 

प्रांजली लेले



सुलभाताई बँकेच्या नोकरीतून निवृत्त होऊन जेमतेम चार पाच वर्ष झाले असतील आणि त्यांचे पती एकाएकी आजाराने त्यांना सोडून गेले. त्यांना एकुलता एक मुलगा होता पण तो नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थिर झालेला. वर्षातून काही महिने सुलभाताई  आपल्या मुलाकडे विदेशात राहायला जात असे. मुलाचा सुखी संसार पाहून त्याही मनोमन सुखावत असे. पण जास्त दिवस त्यांना तिथे करमेना मग काय  घरी परत यायच्या. इथे त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवाईक सगळे असल्याने त्यांना एकटेपणा कधी जाणवला नाही. सासर, माहेर सगळे इथेच असल्याने घरी येणारे जाणारे पण खूप होते. परत सगळे सणवार होतेच. त्यानिमित्ताने त्यांचे पण सारखे कुणाच्या ना कुणाच्या घरी जाणे व्हायचे. 

     

      निवृत्तीनंतर तर त्यांनी मैत्रिणीबरोबर दर वर्षी कुठेतरी फिरायला जायचं नक्की ठरवल होत आणि त्याप्रमाणे त्या जायच्या देखील. मागच्या वर्षी त्या सिमला, कुलू मनालीला जाऊन आल्या होत्या. आणि आता त्यांचे पुढच्या टूर चे नियोजन करणे चालु होते. सगळ्या मैत्रिणींनी मिळून पुढच्या ट्रिप मधे अष्टविनायक दर्शनला जायचं पक्के पण केले आणि त्याची तयारीही चालु केली होती. इतके त्यांनी स्वतः ला बिझी करवून घेतले होते. 


सुलभा ताईंचे रोजचे रूटीन म्हणजे सकाळी मैत्रिणीबरोबर मॉर्निंग वॉक ला जाणे त्यात वॉक आणि टॉक या दोन्ही गोष्टी घडत असे. मग घरी येऊन आंघोळ आटोपून त्या न चुकता जवळच्याच मंदिरात गणपती दर्शनाला जात. खूप बरं वाटे त्यांना देवासमोर शांत पणें डोळे मिटून प्रार्थना केल्यावर. जणू काही नवं चैतन्य येई त्यांच्या रोजच्या जीवनात. मुलाला फार काळजी वाटे त्यांची पण त्या खुश होत्या त्यांच्या रूटीन मधे. 

  

     असे त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालु असतानाच इतक्यात वृत्तपत्रातून सारखी कुठल्यातरी महामारीचे संकट चीनवर कोसळले आहे ही बातमी येत होती. मैत्रीणीबरोबर गप्पा मारताना त्यानी ऐकले  की, चीनचे लोक नको, नको त्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना खातात आणि मग हे असले रोग  पसरतात. त्यांची मैत्रीण रमा पण सांगत होती  "स्वाईन फ्लू पण त्याच देशातून आपल्याकडे भारतात आला होता म्हणे. आता हे अजून काय नवीन संकट घेऊन येणार आहे कुणास ठाउक", अश्या चर्चा हल्ली मैत्रिणी जमल्या की सुरू व्हायच्या. आणि हाहा म्हणता म्हणता  कोरोना नावाची  चीनची महामारी  भारतात पण येऊन धडकली आहे ही बातमी  वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आज आली होती. आणि मग पाहता पाहता एकाचे दहा, दहाचे शंभर असे रुग्ण भारता मध्ये पण दिसायला लागले. मग मात्र सरकारने ठोस पावले उचलायला सुरुवात केली.

      

      तिकडे परदेशात मुलाकडे देखील हीच स्थिती झाली आहे याची बातमी मुलाने फोनवर त्यांना दिली होतीच आणि आईला पण काळजी घ्यायला सांगितले. आणि आता  सुलभाताई ना चांगलेच कळले होते की देशावर महामारी चे हे मोठ्ठे संकट ओढावले आहे. ज्या प्रमाणे साऱ्या जगात या महामारिने हाहाकार माजविला आहे तसाच भारतात देखील हा आजार फार लवकर पसरणार आहे आणि आता  त्या पासून बचावासाठी सरकार ने अनियमित काळासाठी लॉकडॅाऊन  जाहीर केला होता. 

       

     या काळात  लहान मुले,  घरातील आजारी आणि वयोवृध्द लोक अशांना बाहेर पडण्यास सक्त मनाई असणार असे  नियम पण सरकारने घातले. या बातमीने तर त्या थोड्या घाबरल्याच होत्या. कारण कधीच अशी कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर आली नव्हती. आता त्यांना त्यांच्या नातवंडांची फार आठवण येत होती. पण त्यांनी स्वतः ला सावरले आणि मुलाची फॅमिली सुरक्षित राहो म्हणून त्या देवाची मनोमन प्रार्थना करू लागल्या.

   

     लॉक डाउन सुरू झाला म्हणजे त्यांना बाहेर जाण्यास मज्जाव असणार आणि मग एवढं मोठ्ठं घर एकटीला खायला उठणार या सर्व विचारांनी त्यांना जरा टेंशन आलं होत. इथल्या लॉक डाउन ची बातमी अर्थातच त्यांच्या मुलांपर्यंत  पण पोचली आणि मग काय त्याचे फोनवर फोन यायला लागले. त्यांनी त्याला शांतपणे समजावले की माझी काळजी करू नका, मी माझी काळजी घेईनच आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या. .

  

      आज अख्खा दिवस लॉक डाउन बद्दल टीव्ही वर बातम्या चालु होत्या. आणि घरी  सारखे कुणाचे ना कुणाचे सतत फोन येतंच होते. अश्या काही ना काही कारणाने दिवस निघून गेला. दमुन त्या केव्हा झोपी गेल्या त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

दुसऱ्या दिवशी जरा उशिराच त्यांना जाग आली. बाहेर चांगलच उजाडलं होत. लगबगीने सगळं आटोपून वॉक ला निघणार तितक्यात  त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिने म्हंटले, सुलभा आज पासून आपला वॉक बंद बर का. काल पासून म्हणे बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आणि कॉलनीत पण फिरायला बंदी आहे त्यामुळे त्यांनी नाईलाजाने अंगणातच थोड्या फेऱ्या मारल्या. मग आंघोळ पूजा आटोपून देव दर्शनाला जायची वेळ झाली तशी त्यांची घालमेल सुरू झाली. आज त्यात खंड पडणार होता. उदासच झाल्या त्या. कसाबसा दिवस पार पडला. बघता बघता त्यांचे लॉक डाउन रूटीन चालु झाले. फोन तर येतंच होते सर्वांचे पण बोलून बोलून तरी किती आणि काय बोलणार. 

    

      आज म्हणता म्हणता एक महिना उलटला या महामारीला सुरुवात होऊन पण अजून काही परिस्थिती पूर्णपणे बदलली नव्हती. सगळे जगच बदलले होते या आजारामुळे.  वृत्तपत्र आणि टीव्ही द्वारे रोजच काही तरी नवीन बातमी कळायची. कितीतरी लोक या महामारी ला बळी पडत होती. काही देशांची परिस्थिती तर अगदी दयनीय झाली होती. 

        

      सध्या टीव्ही समोर त्या खिळून रहात. दुसरा काही विरंगुळा पण नव्हता. त्यामुळेच त्यांना सगळ्या देशातील बातम्यांची झलक मिळे. इटली सारख्या सुंदर देशाची तर या भयंकर आजारामुळे पार अनाकलनीय दशा झाला होती. अश्या दुःखद घटनांबरोबर काही सुखद बातम्या पण येत होत्या. जश्या लॉक डाउन मुळे पोल्युशन अगदी नाहीसे झाले होते. सगळीकडे हवा शुद्ध झाली होती.  एरवी कधीही न दिसणारे प्राणी स्वच्छंद पणे रस्त्यावर आलेली  लोकांना बघायला मिळत होती. पक्षांचा किलबिलाट पण वाढला होता. जणू काही हे सारे आपल्याला सांगत होते की हे जग तुमच्या सारखेच आमचे देखील आहे आणि आम्हाला पण इथे  जगण्याचा हक्क आहे. आणि सुलभा ताईंना जाणवले की  देवाने ही शिक्षा आपल्याला देऊन इतर पशू पक्ष्यांचे पण हे जग आहे याचे भान करून दिले.

   

       एव्हाना  हळूहळू सुलभा ताईंच्या घरातले सामान पण संपत आलेले होते. त्यांची औषधं, भाजीपाला पण त्यांना आणायची होती. पण बाहेर जायची काही सोय नव्हती. आज खरंच कुणाच्या तरी सोबतीची त्यांना प्रकर्षाने गरज भासू लागली.   

 आज सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्यांना जाग आली. मस्तपैकी वाफाळलेला चहा घेऊन त्या अंगणात बसल्या. बऱ्याच दिवसांनी असं प्रसन्न वाटत होतं त्यांना. तितक्यात त्यांना भाजीवाल्याचा आवाज ऐकू आला, त्यांनी लगेच त्याला बोलावल तसा तो म्हणालाच, अहो मावशी तुम्हाला भाजी दिल्या बगर मी कसा जाईन. आम्हाला भाजी विकायला परवानगी आहे. तेव्हा मी रोजच येईन. तुम्ही उगाच काळजी करत बसू नगा..मी तुमच्यासाठी खास ताजी भाजी आणली आहे आज.  त्याचे ते बोलणे ऐकून त्या आनंदल्या. त्याची ताजी ताजी भाजी बघून त्या जाम खुश झाल्या.


     घरात येत नाही तोच फोन वाजला . फोन वर वाण्याचा आवाज ऐकुन आश्चर्यचकितच झाल्या. तसा तो म्हणाला मावशी आज एक तारीख ना, नेहमी प्रमाणे तुम्ही किराणा घ्यायला आला असता एरवी म्हणूनच फोन केला. तुम्ही सामानाची यादी सांगा, मी पाठवतो घरी सामान आणि हो, बाजूच्या मेडिकल स्टोअर्स मधल्या राजूने पण निरोप दिलाय की मावशींना औषध हवे असतील ती पण लिहून घे. सामाना बरोबर औषध पण पाठवतो घरी. तुम्ही घरीच थांबा, बाहेर पडू नका. आणि त्याने फोन ठेवला.


     थोड्या वेळातच घरी सगळे सामान घेऊन दुकानातून माणूस आला. त्याने त्यांची औषध पण आणली होती. ते पाहून त्यांना फार हायसे वाटले. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. आता म्हणे मास्क लावणे सरकारने कम्पल्सरी केला होता. तो बिचारा घामाने चिंब भिजला होता. सुलभा ताईंनी दुरूनच त्याला गुळाचा खडा आणि थंड पाणी प्यायला दिले. त्यांना अश्यावेळी तो देवमाणूसच भासला.

        

      सर्व सामान त्यांनी स्वच्छ डेटॉल ने पुसून मग वापरायला घेतले. त्यांना जाणवले की खरंच या महामारी ने सर्वांना स्वच्छतेची पण छान शिकवण दिली. इकडे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच होती. गरीब मजुरांचे तर हाल होत होते. त्यांना तर ना आता भाड्याचे घर होते ना  काही खायला काही मिळत होते. शेकडो मजूर आपापल्या गावी पायीच निघाले होते. अश्या असंख्य हातावर पोट असणाऱ्यांची ती दुर्दशा पाहून  सुलभाताई फार व्यथित झाल्या. त्यांना डोळ्यासमोर  बाजारात छोट्या मोठ्या वस्तू विकणाऱ्या त्या गरीब बायका आणि माणस दिसली आणि त्यांनी लगेच काहीतरी मनाशी ठरविले. आणि निश्चय केला की  देशावर कोसळलेल्या या संकटात आपला खारीचा वाटा तरी द्यायचा. उठून त्यांनी प्रधान मंत्री खात्यात पैसे दान केले.

काय ठरवले आहे सुलभाताईंनी वाचा पुढील भागात....

क्रमशः

पुढील भाग

👇

भाग दोन

वरील कथा प्रांजली लेले यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post