जाणीव

जाणीव.....

राजेंद्र भट



आज परत एकदा तोच अनुभव आला तिला आणि पुन्हा एकदा ती शहारून गेली.

ती सतरा अठरा वर्षाची नवतरुणी.. चारचौघी सारखी स्वप्नं पाहणारी, आजूबाजूच्या गर्दीमध्ये आपला स्वप्नातला राजकुमार शोधणारी, मात्र वाऱ्याच्या छोटया झुळूकीने देखील लगेच मिटून जाणारी..

तारुण्यात तिचं पदार्पण झालं आणि बिनधास्त हसणारी बागडणारी ती सावध झाली. तरुण मुलीच्या जातीने हे करू नये, ते करू नये, ह्या सूचना आई, आजी, मावशी, देत होत्याच. ती देखील त्या पाळतच होती. आता उगाच कुणा पुरुषासोबत कामाशिवाय हसणं बोलणं ती टाळायचीच. घरी येताना उगाच इथे तिथे रेंगाळत बसणं तिला देखील नाहीच आवडायचं. आपण भलं आणि आपलं काम भलं.

मात्र तिने स्वतःला कितीही कोषात गुरफटून घेतलं असलं तरी आजूबाजूच्या नजरा तिचं सौंदर्य बरोबर टिपून घेत असत.. त्याचा देखील तिला खूप त्रास होत होता.

त्या दिवशी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. ही नाहीच येत म्हणत होती. पण इतर मैत्रिणींच्या आग्रहापुढे तिचा नाईलाज झाला. मैत्रिणी मैत्रिणी बोलत बसल्या. त्यामुळे झाला थोडा लेट. चालत चालत सर्वजणी निघाल्या एकत्र. कोपऱ्यावर एक टोळकं बसलं होतं तीन चार जणांचं. असंच टाईमपास करत..

ह्या मैत्रिणींनी त्यातल्या एकाला पाहून उसासे टाकले. कसला भारी आहे यार...  त्याची मिशी कसली शोभून दिसतेय त्याला... हिने मान वर करून एकदाच पाहिलं सर्वाना आणि चालत राहिली...

त्या ग्रुप मधल्या मुलांना देखील हीच सर्वात जास्त आवडली. नजरेनेच त्यांनी तिची मापं काढायला सुरुवात केली...  तिच्या पाठीला डोळे असल्यासारखी तिला त्यांची नजर डसत होती. आपल्या सर्वांगावर जणू साप वळवळतोय असंच झालं  तिला.. कधी एकदा घरी जातेय असं झालं. घरी आल्या आल्या बाथरूम मध्ये शिरली. दोन वेळा साबण खसाखसा घासून तिने अंघोळ केली तेव्हा कुठे बरं वाटलं.

तो दिवस देखील खराबच म्हणायचा..  रस्त्यावर एकसुद्धा रिक्षा नव्हती.  बस यायची ती पण पंधरा वीस मिनिटांनी एक, अशी.. त्यामुळे भरूनच येत होती. एवढ्या गर्दीमध्ये चढण्याचा तिला धीर नव्हता होत. पण थांबणार तरी किती वेळ? शेवटी आलेल्या बसमध्ये चढली कशी तरी.

लेडीज म्हणून  थोडं पुढे सरकायला जागा करून दिली इतरांनी...  मात्र बसायला सीट नव्हती. लेडीज सीट सर्वच फुल होत्या. ती कशी बशी आक्रसून उभी होती. तिच्या पाठी एक मध्यमवयीन पुरुष उभा होता. तो देखील आपला धक्का लागू नये म्हणून काळजी घेत होता. तरी एकदा बसला जोरात ब्रेक लागला आणि त्याचा तिला स्पर्श झालाच. अजाणतेपणी असला तरी  अंगाची नुसती लाही लाही झाली. कडाक्याची थंडी असली तरी घरी येऊन तिने थंड पाण्याचा शॉवर घेतला..  तेव्हा कुठे बरं वाटलं.

आज तर अगदी कहरच झाला.

नेहमी प्रमाणे बसमधून घरी यायला ती निघाली.  खूप अशी गर्दी नव्हती बसमध्ये. पण बसायला सीटदेखील खाली नव्हती.. एका हाताने हॅन्डल पकडून, बॅग आणि पुस्तकं सांभाळून ती उभी होती.

इतक्यात तिला काही तरी जाणवलं. कुणाच्या तरी नजरेचा डंख तिला डसला. तिने पाठी वळून पाहिलं.. तिच्या पाठी अजून दोन माणसं उभी होती. त्यांच्या पाठी तो उभा होता आणि तिलाच निरखून पाहत होता. तिला कसंसंच व्हायला लागलं...  वाटलं आता इथे उतरून जावं..  शक्य तेवढं ओढणीने स्वतःचं अंग झाकून घ्यायचा प्रयत्न केला. त्याची नजर अजूनच तिला स्कॅन करत होती.

पुढच्या स्टॉपवर  पाठी उभी असलेली माणसं उतरून गेली. साहजिकच त्याला पुढे सरकायला मिळालं. आता त्याचा तिला सहज स्पर्श होत होता. ती अजून कोमेजून गेली. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. मात्र त्यामुळे त्याचा धीर अजून चेपला गेला. त्याने बिनधास्त तिच्या कमरेखाली स्पर्श केला. तिचा नुसता दाह दाह होत होता. ह्या आगीत जळून खाक होईल असंच तिला वाटत होतं. त्याचा हात अजून तसाच होता. आपल्या आजूबाजूला वणवा पेटलाय, आपण काहीच हालचाल नाही केली तर आपली राख होणारच... तिला आता श्वास घेणं देखील अवघड होऊ लागलं. तिच्या असहाय्यतेचा त्याला फायदा मिळत होता..

तो अजून थोडा जवळ सरकला आणि.....  आणि कुणाला काही समजायच्या आत तिने स्वतःच्याही नकळत खडकन त्याच्या थोबाडीत लगावली. अनपेक्षित हल्ल्याने तो बावरून गेला. त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यासरशी गर्दी मागे सारली गेली. तिने सर्व शक्तीनीशी त्याला अजून एक लाथ मारली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. नुसता आग ओकत होता आग...

गोंधळ ऐकून ड्राइवरने जागीच बस थांबवली. लोकांनी त्याच्यावर हात साफ करून घेत त्याला खाली उतरवलं. चला रे ह्या हरामखोराला पोलीस चौकीवर घेऊन जाऊ म्हणून एक दोन उत्साही तरुणांनी त्याची बखोटी धरली आणि त्याला घेऊन निघाले.

तिचा स्टॉप यायला अजून अवकाश होता. मात्र तिला एकाने सीट दिली बसायला. बॅगेतून बाटली बाहेर काढून ती थोडं पाणी प्यायली.  बरं वाटलं. अंगाची होणारी लाही शमल्यासारखं  वाटून गेलं. आजवर त्या आगीत ती विनाकारणच जळत होती. आज सगळ्याचा निचरा झाल्यासारखं वाटलं तिला.

पाच एक मिनिटात तिचा स्टॉप आला. ती उतरून घराकडे निघाली ताठ मानेने. कोपऱ्यावर चहाची टपरी दिसली. एक चहा मारला तर तरतरी येईल म्हणून एक चहा घेतला. बाजूला दोन पुरुष सिगारेट पीत होते. एकटी मुलगी चहा प्यायला इथे आली ह्याचं नवल त्यांच्या बोलण्यात जाणवत होतं. पण आता तिला कसलीच फिकीर नव्हती.. एक मस्त शिट्टी मारावी असं तीला वाटत होतं. पण शिट्टी कशी मारतात? तिला ठाऊक नव्हतं. मनातल्या मनात शिट्टी वाजवत ती घरी पोचली.

अंघोळ करायची असेल ना गं? आईने नेहमीच्या सवयीने विचारलं.. नको आता गरज नाही इतकंच बोलून गाणं गुणगुणत ती बेडरूममध्ये आवरायला निघून गेली.

आज लेकीचं नक्की काय झालं आहे? आश्चर्य करत आई तीच्या कामात बुडून गेली.

समाप्त

राजेंद्र भट

वरील कथा श्री राजेंद्र भट यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

तुम्हाला ही कथा ही आवडेल.

👇

भूमिका

1 Comments

  1. खूप छान कथा आणि अनपेक्षीत शेवट. तरूणपणी चे अनेक प्रसंग आठवले.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post