भूमिका

भूमिका

बीना बाचल 

"अजून फक्त एक चमचा सूप, फक्त एक चमचा ,असू दे सांडलं तर मी पुसते" 

"आणि ह्यानंतर थोडासा भात खायचाय बरं का!"

" आता हे खाल्लं नाही न तर रागवेन हा  मी. आ आ..... शाबास, आता कसं शहाण्या मुलासारखं!"

" चला, बाहेर फिरण्याची वेळ झाली"  

"असं काय करता हो,आताच तर इथे टेबलावर ठेवली होती न बाम ची बाटली'

"सांभाळून चला बरं बाथरूम पर्यंत, मी छान अंघोळ घालते तुम्हांला'

"मी आता हे पुस्तक वाचून दाखवते ह तुम्हाला, छान आहे तुम्हाला आवडेल असे"

    सध्या तिची  सकाळ, दुपार नी संध्याकाळ रोज अशीच उगवतेय आणि मावळतेय! बाहेरच्या जगाचं भान हरपल्यासारखं फक्त तिच्याच वर्तुळात फिरतेय ती!रोज ह्याच कुठल्या तरी वाक्याने दिवसाची सुरुवात नाहीतर शेवट ठरलेला!

पण विनातक्रार तिनं स्वतः ला झोकून दिलंय अगदी ह्या रुटीन मध्ये! अजिबात आळस आणि कंटाळा न करता!

बरं स्वतः ही सात महिन्यांचं पोट सांभाळत हे सगळं निभावतेय हे त्यात अजून विशेष! अर्थात नवरा आहे तिची काळजी घ्यायला पण तरीही 'ह्याची' जबाबदारी तिनं अगदी स्वतः वर घेतली आहे.

त्याला कारण ही तसंच,  ती एकुलती एक , जन्माच्या काही वर्षांतच आई गेल्यावर ,आईविना 'त्यानं' सांभाळलेली तरीही अतिशय लाडाकोडात  वाढवलेली ही पोर. तिच्यासाठी त्यानं कधीही स्वतः चा विचारच केला नाही.

             आता कुठं तिने तिच्या संसारात पाऊल टाकलंय तेवढयात हा 'role reversal' तिच्या वाट्याला आला.

बरं तिची ह्या बद्दल मुळीच तक्रार ही नाहीये.

सुरुवातीला त्रागा व्हायचा तिचा, की हे काय चाललंय ?कसं निभेल सगळं?  मी स्वतःला सांभाळू की 'ह्याला'?जमेल न मला?मी नेमकी अशी नाजूक अवस्थेत आणि हा ही अशा अवस्थेत;कसं निभेल सगळं?

पण  स्वतः चं बालपण आठवत तिनं हे काळजीचे डोंगर केव्हाच पार केलेत!

आपण लहान होतो तेव्हा 'त्यानं' नाही का आपलं सगळं सगळं केलं! आई नसल्याची खंत कधी जाणवू दिलीच नाही. फक्त लाड आणि लाडच केले.तोही तेव्हा असंच दोन घास खा म्हणून घरभर धावायचा.  ऊन ऊन पाण्यानं आंघोळ घालायचा, शाळेत ने आण, अभ्यास,गृहपाठ सगळं मायेनं करायचा. नवीन नवीन गोष्टी सांगायचा. अगदी वयात आलो तेव्हाही एखाद्या आईप्रमाणे त्यानं जपलं, कसलीच कमतरता जाणवू दिली नाही. आपल्या धसमुसळ्या स्वभावाने किती वेळा'हे सांड, ते पाड ' केलंय आपण, तेव्हा त्यानं कधीच डोळे मोठे केले नाहीत की मोठ्या चूकीसाठी भयंकर शिक्षा केली नाही.

                त्यामुळं आता तो सांडतोय, पाडतोय गोष्टी तर मी कसे डोळे मोठे करू! त्याचं सगळं अगदी जागेवर करावं लागतंय तर काय झालं?        अगदी साधा हिशोब मांडते ती हल्ली,'जे त्यानं केलं तेच आपण ही डोळे झाकून follow करायचं! जिथे तो रागावला तिथे आपण ही रागवायचं, जिथे त्यानं प्रेमानं थोपटलं तिथे आपण ही त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला थोपटायचं! त्यानं सगळं छान शिकवून ठेवलंय, "आता गुरुची विद्या गुरुलाच फळायची बस्स!"

फक्त तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आपलं सगळं करताना तेव्हा हसू असायचं आणि आता मात्र आपल्याला 'ते' जाणूनबुजून आणावं लागतंय! एवढंच काय ते शिकायचं राहिलंय!

फरक एवढाच की त्याला आपलं करताना निखळ आनंद व्हायचा आणि आपल्या मात्र आत कुठे तरी तुटतंय, त्याला माहित होतं की ही मोठी झाली की शिकेल सगळं आपोआप पण आपल्याला माहितेय की 'हा' आता नाही करू शकणार सगळं आपोआप😢 हे विचार  मात्र सुधारायला हवेत आपले !  मनाला आवर घालायला हवा. हा सुद्धा life cycle चा एक भाग आहे, हे मान्य करायला हवं.

ती रोज एकतर स्वतः च्या पोटात वाढणाऱ्या जीवाकडे पाहतेय आणि दुसरीकडे ह्या दुसऱ्या जीवाला.

           एक आतून बाहेर यायची धडपड करणारा आणि दुसरा बाहेरच्या जगातून आत खोलवर अनोळखी प्रवासासाठी धडपडणारा!! दोघांचीही धडपड सुरू आहे  पण तरीही अगदी वेगवेगळी!!

इवल्याशा रोपाला फुटलेली पालवी ते वठलेल्या झाडाची जीर्ण पानगळ ही स्थित्यंतरं न टाळता येण्यासारखी ! 

मग माणसाचं आईच्या गर्भातून बाहेर येणं ते शेवटी  थेट पुन्हा धरणी मातेच्या गर्भपर्यंत सामावण्याच्या ह्या प्रवासाला ती रोज तिर्हाईतासारखी न्याहाळत बसते . कधी न कधी जन्माला येणारा जीव  हा  दुरावणारच की मग ही दुःखाची किनार कशाला?  आज 'हा' ह्या वाटेवर आहे,उद्या त्याच्या जागी आपण असणार आहात त्यामुळे हाती आलेला दिवस आपला हेच काय ते सत्य.कितीदा तरी ती निराशेच्या गर्तेत जाता जाता सावरली आहे स्वतः ची स्वतःच!! ह्या दिवसांत स्वतःला ही जपायला हवंय आणि 'ह्यालाही!'

  पण आता तिला पक्के माहीत झालंय की आपण सगळेच  एक विशिष्ट पात्र म्हणून वावरतोय ह्या रंगमंचावर  !! आपल्या हातात काय; तर मिळालेले पात्र जास्तीत जास्त रंगवून सादर करायचं बस्स! अगदी मन लावून आपलं काम चोख करायचं कारण बाकी सगळं तर आधीच नियतीनं ठरवलंय ;कोण कधी रंगमंचावर प्रवेश घेणार कोण कधी कुठे exit घेणार.....अगदी सगळं स्वच्छ ठरलंय !

मग जीवाचा आटापिटा कशाला?

त्यामुळे आता जो जीव ह्या रंगमंचावर येऊ पाहतोय त्याचं स्वागत करू यात आणि जो निरोप घेण्यासाठी हात हलवतोय त्याला छान हसून निरोप देऊ यात. समजून घेतलं तर अगदी साधा सरळ हिशोब नाहीतर आयुष्यभरासाठी ह्रुदयात जपायची जखम ,जे काही आहे ते आपणच ठरवायचे!!

          एवढ्यात "' बाबा' ,थांब आले रे मी , एकटा नको जाऊस बाथरूम पर्यंत ,मी येते .तुझा हात धरते थांब!" म्हणत आणि डोळ्यात भरून येणार पाणी टिपत ती तिची भूमिका निभावायला एखाद्या सराईत कलाकाराप्रमाणे  रोजच्या रंगमंचावर प्रवेश करते!!


सौ बीना समीर बाचल©®

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post