बट्टी

 

बट्टी

बीना बाचल


" मानसी, आवाज खाली घे आधी, आत रियु झोपलीये , पूर्ण सोसायटी मध्ये चघळायचा विषय आहोतच आपण, किमान रियु साठी तरी चांगले आई बाप व्हायचा प्रयत्न करू यात!!" रोहित चा आवाज रागाने चिरकत होता.

" चांगला बाप होण्याआधी ना चांगला नवरा,चांगला माणूस असे टप्पे असतात अरे,पण तुला काय त्याचे ! नेहमी मी कशी  चूकीची हे एकदा सिद्ध केलं की झालं! काही वर्षांपूर्वी प्रेमात होतो एकमेकांच्या हे सांगून खरं वाटणार नाही कोणाला!!  रियु आहे म्हणून नाही तर.... केव्हाच......" मानसी पुढे बोलताना अडखळली.

" केव्हाच काय? केव्हाच घटस्फोट घेतला असता ...असंच ना? बोल ना स्पष्ट... अग मनात आहे मग बोलताना कसली आलीये लाज? मलाही कंटाळा आलाय अगदी ह्या रोजच्या कटकटीचा!! एकदाच काय ते संपवून टाकू..." रोहित पुढे बोलणार तोच त्यांची तीन एक वर्षांची लेक ; रिया डोळे चोळत बेडरूममधून बाहेर आली.

रोहित आणि मानसी जागच्या जागी खिळले.

मानसी नं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि रोहित उगाच पाण्याच्या बाटलीशी चाळा करत खुर्चीत बसला.

" काय झालं बाबा, आई का ललतेय? तू मारलं तिला?" रियु चा निरागस प्रश्न 

"नाही पिल्लू, आईनं ना कट्टी घेतलीये माझ्याशी," रोहितने बळेच काहीतरी रियु ला समजेल असं कारण पुढे केलं.

हे ऐकताच रियु मानसी कडे वळली," आई, बाबाशी कट्टी नको ना घेऊश, त्याला माया माया कर चल," रियु च्या आग्रहापुढे मानसी चा नाईलाज झाला.

ती अजिबात मनात नसताना रोहित जवळ गेली आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ,रियु च्या भाषेत त्याला' माया माया 'केली.

मानसी ला जाणवलं गेल्या कित्येक महिन्यात आपण रोहितच्या चेहऱ्यावरून असा मायेचा हात फिरवलाच नाहीये!! तिनं झटकन हात मागे घेतला.

आता रोहित ची पाळी होती, त्यानेही मानसी ला' माया ,माया' केली.

तिचे सुंदर डोळे किती खोल गेलेत, डोळ्याखालची वर्तुळं किती गडद झालीयेत हे रोहित नेही कित्येक महिन्यांनी इतक्या जवळून पाहिलं.

रियु दोघांचा हात धरून त्यांना जय बाप्पा समोर घेऊन गेली.

" नको ना ,रियु बेटा, बाबा दमलाय ग खूप, बस आता,केली न आईला माया माया, आता बस्स!" रोहितला खरं तर वैताग आला होता पण रियु चं मन त्याला मोडवेना!

अखेर अनिच्छेने च दोघे बाप्पा समोर उभी राहिली.

" हम्म, आता हात जोडा आणि म्हणा,बाप्पा आता आम्ही कधीच कट्टी घेणार नाही, सॉरी, आम्हांला चांगी बुदी दे" 

"बोल ना आई, बोल न बाबा"रियु तिचा हेका सोडायला तयार नव्हती.

अखेर दोघे बाप्पा ला सॉरी म्हणाले आणि आपापल्या जागी जाऊन बसले. एक अस्वस्थ शांतता संपूर्ण घरभर पसरली होती.

तेवढ्यात रियु पुन्हा मानसी कडे गेली," आई-बाबा तुमाला भुकू लागली अशेल, मी नई का भुकू लागली की ललते,गोंधल कलते, तश तुमाला पण भूक लागली आहे, चल आपण तिघ वरण भाता खाऊ मग छान वाटेल तुमाला" 

मानसी ला रियु ला नाही कसं म्हणावं समजेना.

ती नाईलाजाने स्वयंपाकघरात गेली आणि डाळ भाताचा कुकर लावला, कुकर होईपर्यंत तिनं मनात नसताना ही रोहित ला पूर्वी आवडायचे म्हणून चार पोह्याचे पापड तळले.  तोंडी लावायला बरणीतलं लिंबाचं लोणचं काढलं.तिलाही कळत नव्हतं की ती हे सगळं का करतेय!!

बाहेर रोहितने ही काय time pass करायचा म्हणून हॉल मधला पसारा आवरला.  त्यात रियु ने चित्र काढलेली कितीतरी कागद पसरले होते. त्यात बहुदा मानसी ने तिला काढून दिलेलं एक ' happy family,' असलेलं रियु, मानसी आणि रोहितच छानसं घर आणि त्या घराच्या दारात उभी असलेली तिघ ती असं काहीसं रेखाटलेले चित्र होतं ते, रोहितला उगाच पोटात कालवलं.

त्यानं तो कागद बाजूला काढून तसाच टेबलवर ठेवला.

तोच मानसी वरण भाताचं ताट घेऊन बाहेर आली, त्यात लोणचं आणि पापड बघून रोहित नं चमकून मानसी कडे पाहिलं पण तिनं साफ दुर्लक्ष करत ताट टेबलावर ठेवलं .

रिया ची पुन्हा भुणभुण सुरू झाली," अश नाही, तू भरव आता बाबाला" 

" रियु,बस्स झालं आता तुझं, जेवण वाढलंय ना ,ते गुपचूप जेवा आता, नाहीतर....." मानसी चा आवाज पुन्हा चढला आणि रिया ने रडून घर डोक्यावर घेतलं.

तिला शांत करताना दोघांची पुरेवाट झाली.अखेर नाईलाजाने मानसीने वरण भाताचा एक घास रोहितला भरवला.  भरवताना मात्र तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. 'किती छान सुरू होतं सगळं, का हा समजून घेत नाही मला, मीही दमते, थकते, एक मूल आलं की सगळ्या priorities बदलतात, सगळं जग बदलतं ,पण हा हट्टी पणा सोडत नाही, काय करावं मी तरी'

तिच्या हातून घास घेताना रोहित ही हळवा झाला, ' किती छान सुरू होतं सगळं, पण ही रियु आली आणि सगळं विसरून गेली आधीचं , priorities बदलतात मान्य पण त्या लिस्ट मधून नाहीशा तर होत नाहीत ना!"

अखेर दोघांनी न बोलता जेवण केलं .

पोटात दोन घास गेल्यानं थोडं शांत वाटत होतं दोघांनाही .

रियाच्या हुकूमानुसार 

आता घरातल्या सामानातून घर घर खेळायची वेळ झाली होती .

तिघेही मग पांघरुणाच्या ,उशांच्या ढीग लागलेल्या घरात विसावली आणि झोपी करा म्हणता आडवी झाली ,नकळत एकमेकांच्या शेजारी झोपली खरी पण आता खरोखरीच घर घर खेळायला हवंय , विस्कटू पाहत असलेला डाव पुन्हा मांडून पाहायला हवाय. रियु सारखं वरण भात भरवला आणि बट्टी झाली की काल चं भांडण विसरून जायला हवंय.  भांडण झालं आणि बाप्पाला सॉरी म्हटलं की ....की मनापासून एकमेकांना माफ करता यायला हवंय  अगदी रियु च्या निरागसतेनं...... किती आणि काय काय करायला हवंय!! दोघांच्या ही मनात नुसतं काहूर माजलं होतं.

अखेर  त्या खोट्या खोट्या घरात नाही नाही म्हणता दोघांचे हात एकमेकांत गुंफले गेले.

डोळ्यातून उष्ण अश्रू वाहिले खरं ,पण खरंखुरं घर सावरायची  सुरुवात झाली ;बालहट्टामुळे मोठ्यांच्या बट्टीची सुरुवात झाली होती!!

सौ बीना समीर बाचल©®

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post