एकदाची ती ट्रंक उघडली

 आणि एकदाची ती ट्रंक उघडली.... 


लेखिका - सविता किरनाळे


सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

बिछान्याच्या बाजूला ठेवलेली घंटी वाजवून यमुनाबाईंनी सूनेला जवळ बोलावले. “काही हवं का आत्या?” म्हणत तीही लगबगीने आली. यमुनाबाईंनी कॉटखाली ठेवलेली ट्रंक काढायची खूण केली. सून चकित होवून पाहू लागताच त्यांनी डोळे मोठे केले. थोड्याशा नाराजीने आणि बऱ्याचशा कुतूहलाने खाली वाकून तिने ती ट्रंक बाहेर ओढली. ही तीच ट्रंक होती जिला नुसतं हात जरी लावला तरी यमुनाबाई घरात तमाशा उभा करत. त्या ट्रंकेसोबत सुनेच्या अनेक आठवणी निगडीत होत्या, बहुतेक सगळ्या कडवटच होत्या.

यमुनाबाई पारंपरिक विचारसारणीच्या होत्या. माप ओलांडून सून घरी आली रे आली, लगेच त्यांनी घरकामातून अंग काढून घेतले. सुनेच्या हाती सगळा कारभार दिल्याचे गावभर पसरवायचे पण तिने अगदी कोणती भाजी करावी आणि भाकऱ्या किती टाकाव्या हे विचारले नाही म्हणून ‘गेली हो माझ्या हातची सत्ता’ म्हणून गळा काढणारी खडूस सासूबाई झाल्या त्या. सून बिचारी अतिशय मवाळ. सगळं सहन करूनही आल्यागेल्याचे हसतमुखाने स्वागत करणारी, सासूबद्दल चुकूनही वावगा शब्द न काढणारी. माहेरी गेल्यावर फक्त एकदाच तिने आपल्या आईसमोर तक्रार केली होती. पण आईने उलट तिलाच समजावले होते,


“बघ सुमे, सासू हे प्रकरण असंच असतं. ओठात एक आणि पोटात एक. आपणच शक्य तितकं नमतं घ्यायचं. नवरा चांगला असला की झालं. घ्यायचं थोडं सांभाळून... पदरी एक मूल आले की सगळं व्यवस्थित होईल.”


तेव्हापासून सुमा असोशीने मुलाची वाट पाहत होती. पण भाग्यात काही वेगळंच लिहिले होते. लग्न होवून चार वर्ष झाली तरी घरी पाळणा काही हालला नाही. देवधर्म, उपासतापास, गंडेदोरे, अंगारेधुपारे करून झाले. पंचक्रोशीतील सगळे दवाखाने वैद्यही झाले. पण दोष दोघांपैकी कुणातच नव्हता.


जसजशी यमुनाबाईंच्या जिभेची धार वाढू लागली तसतशी सुमा कोषात जाऊ लागली. यमुनाबाई दुसरे लग्न करण्यासाठी मुलावर दबाव आणू लागल्या. पण अनंतचे, सुमाच्या नवऱ्याचे, बायकोवर अतिशय प्रेम होते. तो आईला जुमानत नसे. मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर सासूचा सगळा राग एकट्या सूनेवर निघू लागला. बिचारी ती निमूटपणे सहन करत राही. अनंतलाही घरातील रोजची किटकिट सहन होईनाशी झाली. त्याने शेतात एक खोपटं उभे केले. कधी कधी शेतातच रात्री मुक्काम करे. सुमालाही बरेचदा कामाच्या निमित्ताने थांबवून घेई. घरी मिळत नसलेला एकांत तिथे त्यांना मिळे. रात्रभर दोघे सुखदुःखाच्या गप्पा मारत. आपल्यापरीने सुमाच्या दुःखी मनावर फुंकर घालण्याचा तो प्रयत्न करे.

“अहो, आत्याच्या खाटेखाली कसली ट्रंक आहे हो? इतकं काय आहे त्यात म्हणून जीवापाड जपतात तिला?” अशाच एका निवांत क्षणी सुमाने अनंतला विचारले.

“काय की बुआ, मला नाही माहीत. पण पार माझ्या आजीपासून ती ट्रंक आहे तिथे. आजी आणि आई दोघीही कुणाला कधीच हात लावू देत नसत तिला. काय गठुडं आहे कुणास ठावूक. तू का विचारते आहेस आज?” कुशीवर वळत त्याने विचारले.

“काही नाही, काल घर झाडून घेत होते. खाटेखाली कचरा असेल तो काढावा म्हणून ट्रंक जराशी बाहेर ओढली तर आत्याबाईंनी माझ्यासकट माझ्या माहेरच्या सात पिढ्यांचा उद्धार केला.” त्या नुसत्या आठवणीनेही सुमाच्या डोळ्यात पाणी आले.



काळ आपल्या चालीने पुढे सरकत होता. सुमाने आता मूल व्हायची आशा सोडून दिली होती. पण एक सकाळ नेहमीपेक्षा वेगळी उगवली. रात्री वस्तीस शेतावर असणारा अनंत घरी आला तर त्याच्या हातात एक बोचकं होते.

“सुमे.... आई हे बघा मला काय मिळाले...”

दोघी हातातील काम सोडून त्याच्याकडे धावल्या. तोवर ते बोचकं हालचाल करू लागले होते. सुमाने पुढे होवून पाहिले आणि धास्तावून मागे सरली. ते एक नवजात अर्भक होते.

“अहो हे काय ? आणि कुठुन आणले तुम्ही?” सुमाने प्रश्नांची फैरी झाडली.

झाले असे होते, की रोजच्याप्रमाणे अनंत पहाटे बैलांना चारा घालायला उठला तर त्याला विहिरीच्या काठावर काहीतरी हलताना दिसले. जवळ जाऊन पाहिले तर मुलगी, नुकतीच जन्मली असावी. बहुतेक विल्हेवाट लावावी म्हणून विहिरीजवळ आणली असावी पण तशी हिम्मत न होवून तशीच काठावर ठेवून निघून गेले असावे. मुलीला कुशीत घेवून अनंतने आजूबाजुला तिला सोडणाऱ्याचा शोध घेतला पण कुणीच दिसले नाही म्हणून घरी घेवून आला. तिला सांभाळण्याचा त्याचा विचार होता. पण व्यवहारी सुमाने त्याला पोलीसचौकीला पिटाळले. रितसर तक्रार दाखल करण्यात आली.


सगळे सोपस्कर पार पाडून अनंत घरी आला परंतु त्याच्या डोळ्यासमोरुन मुलीचा चेहरा जाईना. सुमाची अवस्थाही काहिशी तशीच होती. दोघांनी विचारविनिमय करून मुलीला दत्तक घ्यायचा विचार पक्का केला. यमुनाबाईंना जेव्हा हे सांगितले तेव्हा त्यांनी आकांडतांडव केले पण दोघेही बधले नाहीत. त्याकाळी दत्तकप्रक्रिया आजच्या इतकी किचकट नव्हती. अनंतने चार महिन्यात ती पुर्ण केली आणि घरी ती गोडशी परी सोनपावलांनी आली. तिचे शुभदा नाव ठेवण्यात आले. यमुनाबाईंनी मात्र कधीच तिला हातही लावला नाही. त्यांच्यासाठी ती परकीच राहिली. 


काळ आता जणू पंख लावून उडायला लागला. रांगणारी शुभदा कधी दुडूदुडू चालायला लागली आणि कधी वयात आली ते समजलेही नाही. दोन वर्षापुर्वी तिचे शिक्षक असलेल्या अनुरूप अशा संतोषशी लग्न झाले. नात जरी परकी वाटत असली तरी यमुनाबाईंना नातजावई आवडत असे. दरवेळेस येताना तो त्यांच्यासाठी साडीचोळी, मिठाई घेवून येत असे. तासंतास तो त्यांच्याशी गप्पा मारत बसे. यमुनाबाईंनी शुभदाला कधीच जीव लावला नव्हता म्हणून ती त्यांच्या जवळपासही फिरकत नसे. त्या पार्श्वभूमीवर संतोषचे वागणे त्यांच्या मनाला भावत असे.


शुभदा संतोषच्या लग्नाला दोन वर्ष झाली तरी अजून गोड बातमी कानी आली नाही. यमुनाबाईंतील खाष्ट सासू फणा काढून उभी राहिली.

“वांझोटीच्या सावलीत राहून दुसरीही वांझच झाली वाटत.” एकदा रागाने त्या बोलून गेल्या. हे ऐकून सुमा दुःखाने कळवळली. शुभदा जेव्हा माहेरी आली तेव्हा तिने प्रश्न केला.

“आई आम्ही दोन वर्षासाठी प्लानिंग केलंय.” तिने लाजत उत्तर दिले.

“अगं पण नंतर नाही झाले मूल तर?”



“नको काळजी करू गं, आम्ही आधीच तपासणी केलीय. पुढच्या वर्षी चान्स घेणार आहोत.” आईच्या गळ्यात हात टाकत लेक म्हणाली. सुमाच्या मनावरील मळभ उतरले.



म्हटल्याप्रमाणे पुढील वर्षी एका दिवशी शुभदाने गोड बातमी सांगण्यासाठी फोन केला. सुमा आनंदाने मोहरून गेली. तिने तोंड गोड करण्यासाठी शीरा करावा म्हणून रवा भाजायला घेतला आणि बाहेर धप्पकन काही पडल्याचा आवाज आला. पाहते तर काय यमुनाबाई चक्कर येवून वाकड्यातिकड्या पडल्या होत्या. सुमाने अनंतला सांगावा धाडला. शेजाऱ्यांच्या मदतीने यमुनाबाईंना दवाखान्यात नेण्यात आले. त्यांच्या मांडीचे हाड मोडले होते. शस्त्रक्रिया करून आत रॉड घातला गेला. पुर्णपणे बेडरेस्ट सांगितली गेली. यमुनाबाई आता पुर्णपणे सूनेवर अवलंबून राहू लागल्या. तीसुद्धा कर्तव्यभावनेने सर्वकाही व्यवस्थित करे.


पडल्या पडल्या यमुनाबाईंना पुर्वीचे दिवस आठवत. सून आणि नातीच्या फोनवरील संभाषणातून नातीबद्दल समजे. गर्भवती मुलीला सूचना देताना सुनेचा आनंदी, काळजीयुक्त स्वर पाहून तिच्या पोटी मूल नाही म्हणून केलेली निर्भत्सना त्यांना आठवे. परवा अशाच संभाषणातून त्यांना शुभदाच्या गर्भात जुळे असल्याचे समजले. हे ऐकून त्यांच्या मनात काही हलले. म्हणून त्यांनी सूनेला ती ट्रंक बाहेर काढायला सांगितले. पोटकुळीची चावी तिच्या हाती देवून ट्रंक उघडायला सांगितले. काय होते त्या ट्रंकेत?


उघडल्याबरोबर आतून भीमसेनी कापराचा मंद सुवास नाकात घुसला. सुमाने सुती कापडाच्या घड्या उलगडल्या. त्यात होते हिरव्याकंच खणापासून बनवलेले इवलेसे परकर पोलके, जरीकाठाच्या रेशमी कापडाचे काही अंगडे टोपडे, मलमलची झबली, चांदीच्या काही वस्तू जसे खुळखुळा, चमचा, पेला, ताटली, हाताने शिवलेली दुपटी, चिमुकल्या दोन तीन शाली.... कितीतरी बाळलेणी...


ते सर्व पाहताना सुमाला हुंदका अनावर झाला.

“यातील काही वस्तू अनंतच्या आहेत तर काही हौसेने मी स्वतः हाताने बनवल्या, त्याच्या बाळासाठी... पण देवाची करणी... त्या अशाच पडून राहिल्या. जेव्हा जेव्हा या ट्रंकेवर नजर जायची तेव्हा तेव्हा माझा तुझ्यावरील राग उफाळून यायचा. कधी कधी तुझी दया यायची पण खूप हौस होती मला नातवंड खेळवायची. म्हणून राग राग करायची मी. ना रक्ताची ना नात्याची म्हणून शुभदालाही कायम हिडिसफिडिसच केलं मी.... बहुतेक माझ्या कर्माचे फळ मला मिळाले असावे... या ट्रंकेतील  सगळ्या वस्तू तू शुभदाच्या बाळांना दे... माझी नात नाही तर निदान पतवंडं तरी याच्यावर वाढू दे.... माझ्या नातीला सांग, तिची आजी चुकली. खोट्या मोठेपणाची अढी मनात ठेवून राहिली. जमलं तर माफ कर म्हणावं.”



यमुनाबाई भडाभडा बोलत होत्या. खरंच आज दोन खूप जुन्या ट्रंका उघडल्या होत्या. एक लाकडाची आणि दुसरी यमुनाबाईंच्या मनाची. एकीतून भीमसेनी कापराचा सुगंध येत होता तर दुसरीतून पश्चातापानंतर दरवळणाऱ्या सात्विकतेचा...

समाप्त


©️सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. 


5 Comments

Post a Comment
Previous Post Next Post