मनुष्य प्राणी

 #मनुष्य_प्राणी

सौ. बीना बाचल



नारायण काका आणि वसुधा काकी म्हणजे आख्या सोसायटीत 'जमदग्नी' जोडपं म्हणून 'प्रसिद्ध'!!!

संपूर्ण सोसायटीत त्यांचा असा काही  दरारा होता की ज्याचं नाव ते!!

मोठी माणसं असोत की छोटी मुलं कोणीही त्यांच्या वाट्याला जात नसत.

वयस्कर जोडपं आहे म्हणून मदत करायला जावी तर ते अक्षरशः येणाऱ्या प्रत्येकाला इतकी हडतुड करत की तो माणूस पुन्हा त्यांची पायरी चढायला दोनदा विचार करेल!

लहान मुलं सुद्धा खेळताना बॉल वगरे गोष्टी त्यांच्या बागेत गेला तर पुन्हा आणायला ही जात नसत!!

अगदी पोस्टमन, कुरियर वाले, भाजीवाले सुद्धा जीव मुठीत घेऊन त्यांच्या दारी जात!पण काही न काही 'सुनावल्याशिवाय' ते त्यांनाही सोडत  नसत!!

     पण एवढं असलं तरी दररोज नारायण काका आणि वसुधा काकींचा एक नियम मात्र होता; रोज अगदी न चुकता ते कॉलॉनीत असलेल्या दत्तगुरुंच्या मंदिरात दर्शनासाठी जात.

सकाळी किंवा मग संध्याकाळी दोघेही छान तयार होऊन, बागेतली सगळी फुलं परडीत घेऊन मंदिरात जायचे. एकही फूल कोणाला तोडू देत नसत,सगळी फुलं मंदिरात नेऊन वाहत.

      काल सकाळीही ते दोघे असेच मंदिरात गेले,दर्शन घेतलं,घटकाभर आवारात विसावले आणि घराकडे निघाले तो एक कुत्र्याचं पिल्लू त्यांच्या मागे मागे येऊ लागलं. सुरुवातीला दोघांनीही साफ दुर्लक्ष केलं पण नंतर ते अगदीच पायात घोटाळू लागलं ,मग मात्र काका आपल्या 'ओरिजनल' रुपात आले! त्यांनी त्याला हाताने दूर सारलं, थोडं अंतर गेलं असेल पण पुन्हा ते पिल्लू त्यांचा पाठलाग करू लागलं.

आता मात्र दोघेही वैतागले,' काय मेली ही कटकट!' म्हणत दोघेही त्याला हाकलू लागले. तोवर  त्यांचं घर आलं ही! मग काय दोघेही घाईने आत शिरले पण फाटकाचे दार लावेपर्यंत ते पिल्लू ही आत शिरलं!!

 काकी आत गेल्या ,पण काकांनी बागेतली काठी त्याच्यावर उगारली, मग मात्र ते पिल्लू मुकाट बाहेर पळून गेलं.

' चला,पीडा गेली' म्हणत काका काकी आत गेले.          तोवर दुपारी बारा साडे बाराची वेळ झाली म्हणजे काका काकींच्या जेवणाची वेळ! दोघेही आपली पानं घेऊन जेवायला बसणार तोच बागेच्या दारातून बारीक आवाज ऐकू आला, दोघेही बाहेर डोकावतात तो ते मगाचंच पिल्लू!!'जणू खूप भूक लागलीये आणि काहीतरी खायला हवंय' असा एकूण 'सूर' होता त्याच्या बारीक ओरडण्याचा!

काकी वैतागल्या पण शेवटी चिडून का होईना त्यांनी एका छोट्या ताटलीत त्याला दूध पोळी एकत्र करून दिली.

दूध पोळीचे ताट बघताच त्या पिल्लांन अक्षरशः झडप घातली त्यावर! 'किती दिवसाचं भुकेलं आहे कोण जाणे!' काकीं स्वतः शीच पुटपुटल्या.

तेवढं वाढलेलं खाऊन ते पिल्लू आल्या मार्गी पळून गेलं.

ते पिल्लू पळून गेलं खरं पण त्यामुळे काकांना जुन्या गोष्टी आठवल्या आणि त्यांचा पारा चढला.

" हमम, सगळे एकजात असेच! गरज असली की दारी येऊन अक्षरशः केविलवाणा चेहरा करायचा, आणि मतलब साध्य झालं की असं पळून जायचं ,प्राणी असो की माणसं सगळी सारखीच!" काका नी खिडकीतून पळून जाणाऱ्या त्या पिल्लाला उद्देशून की अजून कोणाला पण मनातली खदखद व्यक्त केली!

" जाऊ द्या हो, घडल्या गोष्टींचा कुठे हिशोब ठेवता? आपण हे असे निपुत्रिक, तेव्हा आपल्या कडे आहे नाही ते असे गरजेपुरत्या येणाऱ्या प्रत्येकाने ओरबडले!! कोणा कोणाची म्हणून नावं घेणार! त्यापेक्षा कोणालाही जवळ येऊ द्यायचं नाही हे आपण ठरवलंय ना,मग आता कशाला नको त्या गोष्टींचा विचार!" काकींनी काकांची समजूत काढली .कित्येक वर्ष मनात असलेली ही ओली जखम पुन्हा भळभळली.  नाईलाजाने का होईना पण मग दोघेही दुपारच्या वामकुक्षी साठी आत गेले.

                संध्याकाळी काकांनी उगाच बागेच्या फाटकातून इकडे तिकडे डोकावलं , न जाणो सकाळचं ते पिल्लू भटकत असायचं!! पण ते काही दिसलं नाही," छे, हे पिल्लू ही त्याच लायकीच! आता पोट भरल्यावर कशाला फिरकेल इकडे"काकांच्या मनात तर होतं की ते पिल्लू पुन्हा दिसावं पण ते मान्य करायला तयार नव्हते.

शेवटी एक सुस्कारा टाकत काका मागे वळणार तोच त्यांचा  बागेतल्या एका दगडात पाय अडखळाला आणि अक्षरशः त्यांचा कपाळमोक्ष च झाला!

बरं आजूबाजूला कोणीही मदतीला नव्हतं, काकींना बाहेर काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला म्हणून त्याही लगबगीने बाहेर आल्या आणि काकांच्या कपाळावरून वाहणाऱ्या रक्ताला पाहून त्यांच्या पायातले त्राणचं गेले.

काय करावं  त्यांना काहीच सुचेना ,म्हणून त्या काकांपाशी  गेल्या ,तोच फाटकातून कालचे पिल्लू डोकावले आणि पुढचा मागचा काहीच विचार न करता काकींनी त्यालाच हाक मारली,"जा रे राजा, कोणाला तरी लवकर बोलाव, जा धाव'

काकींनी माणसाला साद घालावी तशी त्या कुत्र्याच्या पिल्लाला मदतीची साद घातली, आणि  परिस्थिती चं गांभीर्य समजल्यासारखं ते पिल्लू बाहेर धावल.

त्यानं भुंकून भुंकून सगळी कॉलोनी गोळा केली आणि काकांना वेळेत मदत मिळाली. 

एक तो दिवस आणि एक आजचा दिवस !! आज काका काकींच्या लग्नाचा पन्नासवा वाढदिवस ,सगळं घर कॉलॉनीतल्या 'आप्तेष्टांनी' भरून गेलंय.

कोणी केक वर मेणबत्त्या लावतय,कोणी जेवणाची व्यवस्था बघतय, कोणी काका काकींचा फोटो काढतंय!!

सगळा आनंदाचा सोहळा सुरू आहे, काका काकी खुर्चीत बसलेत आणि त्यांच्या मध्ये खुर्चीत त्यांचा लाडका 'राजा' बसलाय!!

हो जे आजवर एकाही 'मनुष्य प्राण्याला' जमलं नव्हतं ते ह्या 'मुक्या प्राण्याने' जमवलं होतं. काकांना त्या प्रसंगातून आजूबाजूच्या लोकांनी वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल करणं, ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांची काळजी घेणं आणि  त्यानंतर काका काकींनी सर्वांशी किंचित नरमाईने वागणं,'राजा' ने हळुहळू का होईना काका काकींच्या स्वभावात बदल घडवणं आणि अखेर काका काकींनी 'सगळ्याच लोकांना एकाच तराजूत तोलण सोडून देणं' हा बदल अविश्वसनीय होता.

पण राजाने त्या प्रसंगापासून काका काकींना ' दुसऱ्याने आपल्याला प्रेम देण्याची वाट बघण्यापेक्षा स्वतः आधी 'निरपेक्ष 'प्रेम करावं लागतं ' हा जणू धडाच घालून दिला होता.

आणि खऱ्या अर्थाने एका प्राण्याच्या मदतीने  ती दोघ पुन्हा 'माणसात'आले होते!!

सौ बीना समीर बाचल©®

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. ही कथा लेखिकेच्या पुर्वपरवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


Post a Comment (0)
Previous Post Next Post