निःशब्द निरोप

 नि:शब्द निरोप

लेखिका- सविता किरनाळे अजितची पॉश कार पाटीवरून गावाकडे वळली. त्याचे मनही अलगद गावाकडे पळू लागले. जवळजवळ पंधरा सतरा वर्षाने तो मामाच्या गावी जात होता. लहानपणी त्याला आजोळची खूप ओढ होती. तीन वर्षाचा असल्यापासून दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो न चुकता जायचा. जेव्हा लिहायला शिकला तेव्हापासून दोन्ही सुट्ट्यांच्या आधी दहा बारा दिवस मामाला पत्र लिहून घेवून जायला सांगायचा. मामाही परिक्षेच्या शेवटच्या दिवशी हजर व्हायचा भाच्याला नेण्यासाठी. 


दुपारी निघाले तरी गावी पोहोचायला रात्र व्हायची. दिवाळीच्या सुट्टीत छोट्या अजितला घेवून जाताना मामाला त्रास व्हायचा. पावसाळा नुकताच संपलेला असायचा. रस्त्यात एक नदी लागायची. नदीला फक्त पावसाळयात पाणी असायचे म्हणून पुल वगैरे नव्हता. पाणी नसेल तर पात्रातून गाड्या ये जा करायच्या आणि असेल तर मामाच्या गावी जाणारी बस तिच्या पलीकडे थाम्बायची. घरुन आईने पोटभर खावू घालून पाठवल्याने छोटा अजित नदीच्या अलिकडे सोडणाऱ्या बसमध्येच गुडूप झोपून जायचा. मामा त्याला आणि त्याच्या पिशवीला खांदयावर बसवायचा आणि नदी पार करायचा. मामाही तेव्हा वयाने फार मोठा नव्हता, असेल बावीशीच्या आत बाहेर.  


आता कार चालवताना अजितच्या डोळ्यासमोरून ते प्रसंग सरकत होते. त्याकाळात दळणवळणाची सोय फारशी नव्हती. मर्यादित बससुविधा आणि आडवळणी असलेलं मराठवाड्यातील मामाचे गाव. एसटी गावाबाहेर असलेल्या वडाखाली थांबायची. तिथे गावाचे नाव असलेली पाटी(बोर्ड) होता म्हणून एसटी थांब्याला लोक पाटीच म्हणायचे. ‘पाटीवर चाललो, पाटीवर भेटू’ अशी वाक्यं येताजाता कानावर पडायची. पाटीपासून एक दीड किलोमीटरवर गाव. 


डाव्या बाजूचे तळं मागे टाकून अजितची गाडी गावात शिरली. प्रवेश करताच गाव कात टाकू लागल्याची जाणीव त्याला झाली. कधीकाळी गर्द आमराईत लपलेले महदेवाचे देऊळ समोरच दिसत होते. आमराई नामशेष झाली होती. वेशीबाहेर असलेले गावाची रक्षणकर्ता देवता असलेल्या भैरोबाचे मंदिर गावात आल्यासारखे वाटत होते. मोठमोठे चिरेबंदी वाडे तसेच होते पण नवश्रीमंतांची सीमेंटकाँक्रीटची घरेही दिसत होती.  


मामाचा चिरेबंदी वाडा गावच्या टोकाला उंचावर बांधला होता. पुर्ण गावाची रचना एखाद्या बशीसारखी होती. आतल्या खोलगट भागात सर्वसामान्यांची वस्ती होती. बशीच्या एका बाजूच्या उंच भागात पाटील मंडळींचे वाडे तर दुसऱ्या भागात उघडा माळ. 


अजितच्या गाडीचा आवाज येताच मामी लगबगीने मोठ्या दारात आली. भाकरतुकडा ओवाळून तिने भाच्याचे स्वागत केले. 

“मामी लई बदललं वं गाव तुमचं. कशाचीच वळख लागीना गेल्ती. पण आपला वाडा मात्र अजूनही कुठूनबी दिसतो.”

धुतलेले हात पाय पुसत अजित उत्स्फूर्तपणे मराठवाड्याच्या बोलीभाषेत बोलला. अजितची ती खासियत होती, तो इंलिश, मराठी, हिंदी, फ्रेंच या भाषा जरी अस्खलितपणे बोलत असला तरी मामा-मामीसोबत बोलताना त्याच्या तोंडात आपसूकच  बोलीभाषा यायची.

“सगळं जग बदलतंय मग गावानंबी बदललं पायजीकी, त्याबिगरं कसं चालायचं.” मामी त्याच्या हातातला टाॅवेल वाळायला टाकत म्हणाल्या.  


संध्याकाळी मामा शेतातून आल्यावर अजितच्या आणि त्याच्या गप्पा रंगल्या. रात्री मामीच्या हातच्या, चुलीवर खरपूस भाजलेल्या गरम भाकरी आणि आमटी खावून अजित अंगणात आला. दारासमोर जुना कडुनिंब डोलत होता. किती आठवणी रुंजी घालत होत्या. 


थोडावेळ शतपावली करून अजित झोपायला गेला. मऊसर शाल चेहऱ्यावर पांघरून घेताच अचानक एका स्पर्शाची आठवण उसळी मारून मनाच्या डोहातून वर आली. अजित ताडकन उठून बसला. नीलामाय.... अरे आल्यापासून दिसलीच नाही. तरीच दुपारी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. असेल का नीलामाय अजून? मामीला विचारु का, उशीर झालाय खूप... मामी झोपल्या असतील आता...


नीलाबाई गावच्या बलुत्याच्या परटीन होत्या. वर्षभर गावाचे कपडे धुणे आणि बदल्यात वर्षाच्या शेवटी ठरलेले धान्य मिळत असे. वयोमानानुसार काम होईनासे झाल्यावर पाटलांनी म्हणजे अजितच्या मामांनी तिला आपल्या घरी आसरा दिला. त्या दिवसभर वाड्यावर राहत, भांडी घासणे, झाडू मारणे सारखी जमतील ती कामं करून रात्री आपल्या घरी जायच्या. अजित त्यांना नीलामाय म्हणायचा. रोज दुपारी नीलामाय जेवायला बसल्या की छोटा अजित तिच्यासमोर जावून बसे. ‘नीलामाय भाकरी दे’ म्हणून हट्ट करायचा. ती भाकरी तर द्यायची पण दरवेळेस म्हणायची, ‘पावण्या भाकरी तर दिली पण लक्षात ठीव बरं परटीनीने आपल्या ताटातून काढून दिली हाय तुला.’

“नीलामाय कशाला काळजी करतीस पाटलाचं रगत हाय, वाऱ्यावर सोडायचं नाय तुला.” मामी म्हणायच्या.  


दुपारी घरात सामसूम झाली की नीलामाय अजितला घेवून तिच्या घरी जायची. पांढऱ्या मातीच्या बुटक्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन असलेल्या त्या घराला खिडक्या नव्हत्या. एकप्रकारचा थंडगार अंधार असायचा घरात. घरापुढील अंगणात कोरांटी, सदाफुली आणि तुळस होती तर मागच्या अंगणात लिंबाचे झाड. अजितला ती मडक्यातील गार पाण्याने थंडगार लिंबू सरबत बनवून देई. ते पिता पिता माय त्याला आपली कहाणी सांगे. त्यातून अजितला समजले, की नीलाबाई गावाची लेक होती. लग्नानंतर बरीच वर्ष होवूनही मूल न झाल्याने नवऱ्याने सवत आणून उरावर बसवली. पुढे सवतीला मूल झाल्यावर नीलाबाईचे हाल कुत्रे खाईना. कंटाळून ती माहेरी निघून आली. पिढीजात व्यवसाय करून जगू लागली. अजितमध्ये तिला नसलेला नातू दिसे. आपली सगळी माया ती या पोरावर उधळायची. अजितही नीलामायसोबत खूप ॲटॅच्ड होता. तिचे ते थंडगार घर, मायाळू बोलणं याने त्याच्यावर जादू केली होती.

“पावण्या, लेकरु नाय झाल मनुन त्या भाड्यानं मला टाकलं. पर लई बरं झालं बगं. तुझ्यासारखा आयता नातू गावला मला. तू न्हाय इसरणार नं मला? का तू बी फिरशील मोठा झाल्यावर?” अजितच्या तोंडावरून आपला सुरकतलेला, कष्टाने रखरखीत झालेला हात फिरवत ती विचारायची. 


अजित मोठा होत होता आणि नीलामाय वाकत होती. अजितने गावी येणे सोडल्यावर ती  विस्मरणात गेली. आज अचानक अजितला तिची आठवण आली होती.


सकाळ होताच अजित मामीकडे गेला.

“मामी वरच्या आळीत नीलामाय राहायची बघा ओ ती हाय का अजून, काल दिसली नाय कुठं.” 

“हाय की पण लई ठकलीय. घरीच असत्याय. आजारी हाय रे, आजार म्हंजी बी लई मोठा नाय, म्हातारपण अजून काय. कुणाला वळखत नाय, बोलत नाय. खाल्ल तर चार घास खाल्ल नायतर उगच पडून ऱ्हायचं आपल्याआपून.”

“मग मामी कोण बगतंय तिच्याकडं मग? जेवायला कोण देतंय तिला? बाकीची काम कोण करतंय तिची?” 

“मी पाठविते जेवण, हौसा घिवुन जाते. अलिकडं माझंबी जाणं नाय झालं रे वरल्या आळीला. तू गेल्यावर जाईन.” मामी हातातलं काम करत उत्तरल्या. 

अजितला राहवेनासे झाले. ‘तू इसरणार तर न्हाय मला?’ नीलामायचे शब्द ऐकू येवू लागले.

“मामी, मी जावून इतो.” मामी अरे कुठं म्हणेपर्यंत पायात चप्पल सरकवून अजित बाहेर पडला. 


“नीलामाय... नीलामाय...” हाक मारत अजित घरात शिरला. हाकेला प्रतिसाद नाही मिळाला. घरात मिट्ट काळोख होता. कुबट वास पसरला होता. नेहमी शेणसडा मारलेले असायचे ते अंगण, सारवलेली जमीन उखडली होती. अंधाराला डोळे सरावल्यावर अजितला लाकडी फळ्या मारून बनवलेल्या पलंगावर एक आकृती दिसली. 

“नीलामाय...” अजित पुढे सरकला. 

ती वृद्धा ग्लानीमध्ये होती. जवळ गेल्यावर शरीरातून येणारा दर्प तिने कित्येक दिवसातून अंघोळ न केल्याचे दर्शवत होता. केसांच्या जटा, मळलेले कपडे बाजूला ठेवलेले अर्धवट जेवलेले ताट, खरकटा तांब्या.... 

अजितला ओकारी येतेय असे वाटले. लगेच त्याचे मन शरमेने भरून गेले. 

‘शी किती कृतघ्न आहे मी! ही तीच नीलामाय आहे जी स्वतःच्या ताटातून मला भरवायची. मला आवडत म्हणून याच तांब्यात थंडगार सरबत करायची. आई सांगते मी लहान असताना माझं ढुंगणही धुतलय हिने आणि आता स्वतः घाणीत झोपलीय.’ 


अजितचे डोळे भरून आले. धावतच तो आपल्या घरी गेला.

  “मामी आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला. तुमची साडी, एक टाॅवेल घ्या बरोबर.”

अक्षरश: मामीला ओढत तो नीलामायच्या घरी घेवून गेला. तिथे गेल्यावर सगळा प्रकार मामीच्या लक्षात आला. 

“अजित हे रं काय हाय. मी हौसाला सांगितलं व्हतं हिच्याकडं ध्यान दे म्हणून, पैशेबी देत व्हते त्याचे. कामाच्या रगाड्यात मला याला जमल नाय तर कैदाशिणीनं फायदा घेतला की. किती बाजिंदी बाई हाय म्हणाव ही हौशी.”


  मामीने नीलाबाईला डोक्यावरून अंघोळ घालून स्वच्छ साडी नेसवली. तोपर्यंत अजितने घराची, पलंगाची सफाई केली. तिला परत झोपवले. नीलाबाई भावनाहीन, रिक्त नजरेने एकटक आढ्याकडे पाहत होती. डोळ्यात अजिबात ओळख नव्हती. थोड्या वेळात मामी स्वतः पेज घेवून आल्या. आपण दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांना अपराधी वाटत होते. मामींनी कितीदा सांगूनही अजित तिथेच बसला. त्याने नीलाबाईंना पेज भरवली. 


दिवसभर तो तिच्याशी बोलत होता. तिने एक शब्द तरी बोलावा म्हणून विनवणी करत होता.

“तुला आठवत का माय, एकदा तू बोरं खायला दिली न्हाई मनुन मी तुज्याबरूबर दिवसभर बोललो न्हवतो. तर तू बोल की रे, बोल रे मनत दिवसभर माज्या मागं मागं फिरत व्हतीस... माय आज तू का रूसलीस तुज्या पावण्यावर? मी इसरलो मनून का? असं नगं करू माय. नगं अबोला धरू ग... बोल ना वं माय माज्यासंगट... मला परत तुज्या ताटातली भाकर खायची हाय. खावू घालशील न्हवं.... “


अजितचे डोळे पाणवले होते पण ती प्रतिसाद देत नव्हती. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या  दिवशी मामा डाॅक्टरांना घेवून आले. डॉक्टरांनी ती जास्त दिवसाची राहणार नाही असे सांगितले. अजितने त्याची सुट्टी वाढवून घेतली. ‘भलेही नीलामाय मला आता ओळखत नसेल पण तिच्या शेवटच्या दिवसात मी तिला एकटी नाही सोडणार’ अशी भूमिका त्याने घेतली. परटिनीला दिलेल्या वचनाला उशिरा का होईना तो जागनार होता.


चार दिवसांनी अजित नीलामायला दुपारची पेज भरवत होता. अचानक तिने त्याचा हात धरला. अजित थबकला. तिच्या डोळ्यात ओळख होती. नीलामायने आपला क्षीण हात मोठ्या कष्टाने उचलला. थरथरत तो अजितच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचला. हळुवारपणे त्याच्या चेहऱ्यावर तो फिरू लागला. 

“माय वळख लागली का गं... मी अजित... तुजा पावणा. बघ माय, मी आलूया परत... तुला मनलं व्हतं की नाय मी ईन मनून, मग तू का अशी अवस्था करून घितलीस? .... तू लवकर बरी हो मग आपून हिथून जावू.” 


अजितचे डोळे गळत होते. तिच्या तोंडून शब्द येत नव्हते पण स्पर्श बोलका होता. ती जणू सांगत होती, तू आलास बस अजून काही नको मला... तो पुर्ण दिवस अजित तिच्या बाजूला बसून स्वतःबद्दल, तिला घेवून जाण्याबद्दल बोलत होता. तिने आपल्याला ओळखले याचा आनंद त्याच्या पोटात मावत नव्हता. ती फक्त अधाशासारखी त्याच्याकडे पाहत होती. नजरेत साठवून ठेवत होती.  


संध्याकाळ झाली. अजितने त्या घरात दिवा लावला. नीलाबाई डोळे मिटून पडली होती. अचानक ती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. अजित पुढे धावला. त्याने तिला नीट बसवले. मायने हात पुढे करून अजितला कुशीत घेतले जसं तो लहान असताना घ्यायची तसं. ती त्याच्या डोक्यावर थोपटू लागली, पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडावरून हात फिरवू लागली. अजितला समजेना काय झाले पण दिवा विझण्याआधी मोठा झाला होता. तिचे थोपटणे कमी होत होत बंद झाले. अजितने वर बघितले तर तिची नजर विझली होती. तिच्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक आसवाचा थेंब गालापर्यंत अर्धवट ओघळलेला अजितला दिसला. त्याची नीलामाय त्याला सोडून गेली होती. आता त्याला ‘लक्षात ठीव बरं पावण्या’ असं कुणी म्हणणारं नव्हतं. ते थंडगार सरबत, गरम गोधडी देवू करणार नव्हतं कुणी. अजितचा गळा भरून आला, छाती दुःखाने दाटली. नीलामायच्या नि:शब्द निरोपाचे दुःख काळीज चिरून जाणाऱ्या हंबरड्यातून बाहेर पडले. 

समाप्त


कथेत मराठवाड्यातील बोलीभाषा वापरली आहे, कृपया ते अशुद्ध लेखन समजू नये.

©️Savita Kirnale


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

6 Comments

 1. खूप सुंदर निशद्ब

  ReplyDelete
 2. भावस्पर्शी !! छान !

  ReplyDelete
 3. 😔😔RHUDAYSPARSH

  ReplyDelete
 4. खूप हदय स्पर्शी लेखन छान

  ReplyDelete
 5. Dolyat pani kadhi aal samajalch nahi

  ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post