ॲडजस्टमेंट

 

#ऍडजस्टमेंट


सौ. बीना बाचल


" राजश्री, अग काय झालंय तुला? डोकं ठिकाणावर आहे ना? थोडा राग शांत कर आणि मग विचार कर, इतकी वर्षं तू येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आतिथ्य किती मनापासून केलं आहेस, अगदी प्रत्येकाच्या आवडी निवडी जपल्या आहेस, आणि आज अचानक तू आई बाबांसमोर असं कसं बोलून टाकलस की राधे काकां आणि काकूची सोय बाहेर करा कुठेही, मी काहीही करणार नाहीये. केवढा धक्का बसलाय आई बाबांना! आणि आता येणाऱ्या पाहुण्यांना कुठल्या तोंडाने सांगणार ते की आमच्या कडे येऊ नका म्हणून! जरा पुन्हा विचार कर. दोन चार दिवसांचा प्रश्न आहे, तेवढं तर आपण adjust करतोच ना ! इतकं काय झालंय तुला तडकायला? ईतकी वर्षं सगळ्यांच आदरातिथ्य केलंस आणि आता अशी वागलीस तर काय म्हणतील सगळे ह्याचा विचार कर.एक आदर्श सून,पत्नी म्हणून सगळे पाहुणे तुझ्याकडे पाहतात आणि आज असं बोलून सगळं मातीमोल करणार आहेस का" यशोधन ची प्रश्न मालिका संपता संपत नव्हती.

          पण ह्यावेळी राजश्री मात्र नेहमीच्या स्वभावाला छेद देत अगदी शांतपणे सगळं ऐकत होती.तिनं तोंडातून एकही वाकडा शब्द जाऊ दिला नाही.त्यामुळे यशोधन चा पारा आणखी चढला होता." अग बोल बये, हे कसलं बंड पुकारलं आहेस? हा कुठला बदला घेते आहेस माझा?मी काय आणि कसं सामोरं जाऊ आई बाबांना?"

" झालं तुझं बोलून?" अखेर राजश्री नं आपलं मौन सोडलं.

"इथे बैस असा माझ्या समोर, पाणी पी आणि शांत हो! मी काय सांगतेय ते अगदी शांतपणे ऐक मग तुझं मत दे. मी काही जगावेगळं सांगत नाहीये अरे, खरं तर सुरुवाती पासूनच असा पवित्रा घ्यायला हवा होता म्हणजे मग आज सारखा धक्का बसला नसता तुम्हा कोणालाच!! पण काय करणार,इतकी वर्षं आई बाबांनी दिलेले संस्कार आड येत होते, पण आता चाळीशी नंतर सगळं unlearn करायचं ठरवलंय मी, अर्थात मी नैतिकता सोडणार नाही कधीच ,पण कोणीही यावं आणि टपली मारून जावं हे आता चालणार नाही!" राजश्री ने यशोधन चे  चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी थोडा pause घेतला आणि ती पुन्हा सुरू झाली.

" हे बघ, मला न हिशोब मांडायचा नाहीये ,पण शांतपणे विचार कर, आपल्या लग्नाला आता वीस वर्षे होत आली, ह्या वीस वर्षांत आपण आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांकडे किती वेळा जाऊन आलोय? आता तू म्हणशील असा जमा खर्च मांडायचा का मग?पण ऐक ना, तेही आपल्याकडे असेच येत नाहीत, त्यांची मुलं, सुना, मुली कोणी परदेशातून येणार असतील तर 'एअरपोर्ट च्या जवळच सोयीचं पडणारं आणि सर्व सोयी युक्त असं राहण्याचं ठिकाण ' ह्या दृष्टिकोनातूनच आपल्या घरी उतरतात. शिवाय त्यांची मुलं येण्याच्या दोन दिवस आधी ते आपल्याकडे येतात आणि त्यांची मुलं भल्या 'मोठ्या बॅग्स' घेऊन इकडे पोहोचली की परस्पर आपल्या गावी रवाना होतात. नंतर आपल्याला 'परदेशी' चॉकलेट्स पाठवली की पुन्हा चार वेळा ऐकवायला मोकळे!! आठवतं गेल्या वेळी तुझी काकू इथे चार दिवस येऊन राहिली,  जीवाची मुंबई केली, आपल्या आई बाबांना घेऊन सगळीकडे फिरले , यथेच्छ शॉपिंग केलं आपल्या लेकी सुनांसाठी; पण गेले चार दिवस तुम्हा सर्वांना काय हवं नको पाहणारी,अखंड दिवस स्वयंपाक घरात राबणारी मी , माझ्या साठी त्यांना साधी एखादी गोष्ट ही आणता आली नाही? हे बघ त्यांनी भेटवस्तू आणावी हा उद्देश नाहीचे मुळी, पण त्यांनी माझ्या वरील प्रेमापोटी एक छोटी क्लिप जरी आणली असती ना बाजारातून तरी सुखावले असते मी!! गावी गेले की एक फोन ही नसतो कोणाचा, परतुन जेव्हा पुन्हा आपल्याकडे यायचं असतं त्या आठवड्यात सर्वांचे फोन सुरू होतात! हे मी एकदा दोनदा नाही तर गेली वीस वर्षे पाहतेय यशोधन!!  

आठव तुझी चुलत आत्ये बहीण,आपण तिच्याकडे गेलो होतो तर सकाळीच बाईनं करून ठेवलेला स्वयंपाक तिनं साधा गरम करून वाढण्याचे कष्ट ही घेतले नाहीत अरे, शिवाय निघताना मला माझ्याच देखत दुसऱ्या कोणीतरी त्यांना दिलेली साडी माझ्या हातात दिली!! मी असं वागण्याचा विचार ही करू शकत नाही अरे! मला माहित आहे की आज तुम्ही  मी   एक अतिशय स्वार्थी , हिशेबी आणि दुष्ट बाई ठरणार आहे, मी आधी केलेले कष्ट आज पुसून जाणार आहेत, कारण माणूस त्याने केलेल्या शेवटच्या चूकीवरून च बरा वाईट ठरत असतो, मीही आज चूक च ठरणार आहे, हरकत नाही , पण आता पुरे झाले असे वाटते रे, नेहमी संस्कारी मन स्वतः लाच दटावत राहतं की आपण ही समोरचा जसा  वागतो तसेच वाईट वागू लागलो तर मग काय फरक उरला दोघात! पण मग आतल्या आत माझा स्वतःचा संघर्ष सुरू होतो जो तुम्हाला माझ्या हसऱ्या चेहऱ्याआड कधी दिसतच  नाही, तुम्ही सगळे खुशाल मला ग्राह्य धरू लागला आहात! सर्व डोळ्यांनी दिसते पण बोलून कोणीच दाखवत नाही, वर तुला काय कमी आहे घरात तेव्हा दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतेस हा 'आहेर' मिळणारच आहे.

पण आता बस्स झालं, मला माझा जीव जाळून वर वर सगळं हसून करण्याचा कंटाळा आलाय!

आता मी माझा हा आदरातिथ्य करण्याचा स्वभाव माझ्या आयुष्यातल्या त्या लोकांसाठी राखून ठेवणार आहे ज्यांना खरच माझी काळजी आहे, माझ्या मैत्रिणी, आपल्या शेजारचे काका काकू , आपल्या कडे  कामाला येणाऱ्या मावशी इ इ,ज्यांना मनापासून माझ्या बद्दल काही वाटते, मी दोन दिवस दिसले नाही, फोन केला नाही तर त्यांचा चौकशीचा फोन येतो,विचारपूस होते. हे आहेत माझे जवळचे लोक! मी माझा स्वभाव बदलणार नाही पण तो कोणासाठी कसा वापरायचा हे मात्र मी आता ठरवलंय , ह्यात माझ्या 'आदर्श सून,बायको' ह्या पदव्यांचा बळी जाणार हे नक्की , पण जे मनाला  पटत नाही त्यासाठी करावी लागणारी adjustment आता बंद!! माझ्या मते आज साठी एवढं पुरेसं आहे नाही का?" राजश्री शांतपणे पाणी पीत बोलायची थांबली आणि यशोधन येणाऱ्या पाहुण्यांना जवळच्या हॉटेल मध्ये छान सोय होईल हे फोन करून सांगायला धावला!!

सौ बीना समीर बाचल©®

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. ही कथा लेखिकेच्या पुर्वपरवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

2 Comments

  1. अप्रतिम शब्द मांडणी , विचार करायला लावणारी कथा.... सुंदर, अतिसुंदर......

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post