उपहार

 

#उपहार


सौ. बीना बाचल" अनि, अरे खरंच सांगते आहे,मला  सुट्टी नाही मिळणार शिवाय दिशा चीही परीक्षा आहे नेमकी, नाहीतर मी येणार नाही असं झालंय का कधी! तरीही मी प्रयत्न करते. पण येईनच असं पक्कं सांगत नाही रे, माझे आशिर्वाद कायम आहेतच तुम्हां दोघांना! एक तर इतक्या वर्षांनी तुझ्याकडे आनंदाची बातमी आहे आणि इकडे माझ्याकडे अशी अडचण, जीव नुसता दोन्हीकडे धाव घेतोय रे पण  तू समजून घेशील च ना" मधुरा चा आवाज कातर होत होता .

                   पण तिच्या लाडक्या भावाला ;अनिश ला तिचं ऐकूनच घ्यायचं नव्हतं!!" ताई तू नाही आलीस तर काय मग त्या कार्यक्रमाला अर्थ आहे सांग, आई बाबा गेल्या नंतर तूच तर आम्हा सर्वांना सांभाळलं आहेस. तुझे आशिर्वाद तर हवेतच ना बाळाला. शिवाय रुद्धा दादा, मिनू ताई पण येणार आहेत त्यांच्या कुटुंबासह ,तू काही करून येच!"

" हो रे राजा, मी पाहते." म्हणत मधुरा नं फोन ठेवला.

खरं तर अनि ला असं खोटं सांगताना तिच्या अगदी जीवावर आलं होतं पण तिचा ही अगदी नाईलाज होता.

              गेल्या वर्षी मधुरा च्या यजमानांचं अपघातात अचानक झालेलं निधन आणि त्या नंतर मधुरा वर कोसळलेल्या एका वर एक आपत्ती ,ह्यामुळे मधुरा अगदी हतबल झाली होती पण तिचं तिच्या धाकट्या भावंडांवरच प्रेम मात्र तसंच होतं उलट ह्या अवघड काळात त्यांच्या मधलं नातं अधिकच घट्ट झालं होतं.

        पण ह्यावेळी मात्र आपल्या पेक्षा धाकट्या भावंडांना त्रास देणं तिच्या अगदी जीवावर आलं होतं; नेहमी न सांगता मदत करणारी आपली भावंडं, ह्यावेळी नको वाटत होतं तिला  त्यांना त्रास द्यायला.

                खरं तर तिचा धाकटा भाऊ ;अनिश कडे बऱ्याच वर्षांनी गोड बातमी होती म्हणून अनिश नं त्याच्या बाळाचं बारसं अगदी थाटामाटात करायचं ठरवलं होतं.

पण इकडे महिना अखेर ; मधुराची नवीन च असलेली नोकरी,घरातील खर्च ह्या सगळ्या मुळे मधुरा कडे पैशांची चणचण होती.

आता आपण मोठी आत्या म्हणून मिरवायचं तर आपल्या छोट्याशा भाचाला लोकरितीनुसार किमान लहानसा सोन्याचा दागिना तरी करणं भाग च होतं.

पण तिच्या बँक खात्यात आणि घरी ही अगदी खडखडाट होता.आता कसं बरं करावं ह्या विवंचनेत ती होती आणि त्यातच हा अनिश चा फोन!! म्हणून तिनं असं काही बाही खोटं कारण पुढे केलं. मधुरा चा जीव अगदी कसानुसा होत होता, पण काही इलाज नव्हता.

अखेर तिनं आपल्या मनाची समजूत घातली आणि थोडे पैसे जमले की मग जाऊ भाच्याला बघायला असं मनोमन ठरवलं.

तोच दुसऱ्या दिवशी तिचा दुसरा भाऊ अनिरुद्ध चा फोन आला," ताई,परवा निघते आहेस ना तू अनि कडे यायला? की मी येऊ तुला न्यायला? सगळे सोबत च निघू यात"

" रुद्धा, अरे कालच अनि चा फोन येऊन गेला, मला काही ह्या वेळी जमणार नाही, तुम्ही सगळे जाऊन या, मजा करा"

अनिरुद्धनं खूप समजावलं पण मधुरा ने नकारच दिला, अखेर अनिरुद्ध चा नाईलाज झाला.

 त्याचा फोन होतो तोवर मिनू चा फोन!!" ताई मी उद्या निघतेय अनि कडे, हे आणि शिवम ही आहेत सोबत, तुला आणि दिशाला सोबत नेतो"

मधुराने तिलाही नाही म्हणत फोन ठेवला.

मधुरा चे डोळे सारखे भरून येत होते पण काय करणार ,परिस्थिती पुढे तिचे काही चालेना.

    अखेर अनिश कडे कार्यक्रमाचा दिवस उजाडला. प्रथम अनिरुद्ध त्याच्या कुटुंबासोबत येता झाला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर अनिरुद्ध ने अनिश आणि त्याच्या बायको कडे स्वतःचा आहेर सुपूर्त केला आणि सोबत अजून एक छोटी दागिन्याची डबी काढली आणि तीही अनिश कडे देत सांगितले," मधुरा ताईला सुट्टी नाही मिळाली अरे, म्हणून मग तिनं हा आहेर माझ्याकडे दिला, तो तुला सुपूर्त करतो."

तेवढ्यात मिनू ही आली, तिच्या यजमानांना काय हवं नको ते पाहून अनिश मिनू कडे वळला. मिनूनं  आपल्या लाडक्या छोट्याशा भाच्याला हातात घेतलं आणि त्याच्या गळ्यात सोन्याची चेन घातली आणि हातात ब्रेसलेट घालत म्हणाली," पिल्लू, हे तुझ्या दोन्ही आत्तु कडून तुझ्या साठी बरं का!अरे अनि दादा, मधुरा ताईला यायला जमणार नव्हतं म्हणून मग तिनं तिचा आहेर माझ्याकडे दिला तुला सुपूर्त करायला!"

अनि आणि अनिरुद्ध दोघेही तिच्याकडे आश्चर्याने बघत च राहिले. 

तेवढ्यात कशी कोण जाणे मधुरा ही तिथे पोहोचली.सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर होताच पण आश्चर्य ही होतं.

पण मधुरा नं आत येत लाडक्या भाच्याला हातात घेतलं त्याला भरभरून आशिर्वाद देत म्हणाली " अनि, अरे खूप मन होतं यायचं पण तुझ्याशी खोटं बोलले .त्यानंतर मात्र  एक मिनिट ही स्वस्थ बसवेना, शेवटी ठरवलं की तुम्हांला सर्वांनाच खरं काय ते सांगू यात.अरे महिना अखेर आणि त्यात घरातल्या इतर गोष्टींमुळे पैशाची फार अडचण होती.रिकाम्या हाती कशी येऊ म्हणून लाजत होते ,पण शेवटी ठरवलं की 

आपल्याच्याने किमान अंगडं टोपड तरी जमेलच की! किमान तेवढं तरी घेऊन जाऊ यात आणि बाळाला आशिर्वाद देऊ यात"

मधुरा चं बोलणं पूर्ण होईपर्यंत अनिश ला रडू आवरेना," ताई, माझं बाळ खरंच खूप भाग्यवान आहे ग, इतर बाळांना उपहार मिळत असतील पण माझ्या बाळाला फक्त उपहारच नाहीत तर त्याच्या काका,आत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे आणि ह्या सारखे जगात दुसरे मौल्यवान काहीच नाही"

मधुरा ला समजेना की नक्की काय प्रकार आहे.

तेव्हा अनिश ने अनिरुद्ध दादाने आणि मिनू ने आणलेल्या दागिन्यांबाबत सर्वाना सांगितले.

आता सर्वांचेच डोळे भरून आले होते.

अनिरुद्ध म्हणाला," ताई तुझ्या आवाजवरूनच माझ्या लक्षात आलं होतं की तुझ्या न येण्या मागे असेच काही कारण असणार, ताई तू बोलली नाहीस तरी इतक्या वर्षात तुझा भिडस्त  आणि स्वाभिमानी स्वभाव आम्हा सर्वानाच माहीत आहे"

" अगदी बरोबर बोललास रुद्धा दादा, मला ही ताईशी बोलताना जाणवलं च होतं, एक तर भाऊजी गेल्या नंतर ताईची परिस्थिती बरीच वाईट झाली आहे पण त्यातूनही ती तिच्या पद्धतीनं मार्ग काढतेय, कोणा पुढे एकदा ही याचना न करता तिनं स्वतः ला सावरलं मग त्यात आम्ही थोडा हात भार लावला ,एखाद्या वेळी आम्ही थोडी मदत केली तर कुठे बिघडलं, हाच विचार होता माझाही" मिनू ही पुढे होत म्हणाली.

मधुरा ला पुढे बोलायला सुचलं च नाही,तिचे डोळे वाहू लागले.तिनं कोणाला उपहार देण्यापेक्षा आज तिच्या भावंडांनी तिलाच ह्या निरपेक्ष प्रेमाचा उपहार दिला होता; ज्याचं मोल जगातल्या कुठल्याही दागिन्यापेक्षा कितीतरी जास्त होतं.

सौ बीना समीर बाचल©®

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकाकडे सुरक्षित आहेत. शब्दचाफा ब्लॉगिंग लेखकाच्या पुर्वपरवानगीने ही कथा प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

6 Comments

 1. Speechless. खुप छान, आपले कौतुक करावे तितके कमीच आहे.

  ReplyDelete
 2. खूप खूप सुंदर कथा... खूप भावली

  ReplyDelete
 3. Dole aani man bharun pavle

  ReplyDelete
 4. असे क्वचित घडते प्रत्यक्षात मात्र एवढा समजूतदारपणा कमी पाहायला मिळतो

  ReplyDelete
 5. Khup Sundar maze n maza bavandache hi asech relation ahet tumhi jashi mazich gosta sangata ase vatale mam

  ReplyDelete
 6. खुप छान, असेच भावंडांनी एक मेकांना समजून घेतले पाहिजे.

  ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post