रिचार्ज

 

'रिचार्ज'

सचिन देशपांडे

जानकीबाई हातात एक पिशवी घेऊन, नेहमीप्रमाणे खाली उतरल्या. दूध, भाजी, किराणा आणि असंच काही किडूक - मिडूक आणण्याकरीता. ही त्यांची रोजची खाली उतरण्याची वेळ असे... साधारण सकाळचे नऊ - सव्वा नऊ. दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या वाट्या बदललेल्या असल्याने, जानकीबाई फार धावपळ करत नसत. दोन वर्षांपुर्वी त्यांचे मिस्टर जयंतराव गेले, तेव्हाच जी काही धावपळ झाली होती त्यांची तीच. अर्थात तेव्हाही त्यांचा पुण्याला राहणारा थोरला मुलगा... आणि इथे त्यांच्या घरापासून पंधरा मिनिटांवरच राहणारा धाकटा मुलगा, अशा दोघांनीच सगळं इमाने इतबारे केलं होतं बाबांचं. मिस्टरांमागे ह्या गेल्या दोन वर्षात... जानकीबाई दोन्ही लेकांच्या आग्रहाला न जुमानता, एकट्याच रहात होत्या त्यांच्या 1BHK फ्लॅटमध्ये.  

काही दिवस दोन्ही लेक अस्वस्थ होते, पण नंतर झालं होतं रुटीन सुरु दोघांचंही. जवळ राहणारा धाकटा लेक, अर्थातच सुरुवातीला दिवसाआड चक्कर मारत होता आईकडे. मग ते प्रमाण कमी होत दर आठवडा, दर पंधरा दिवसांनी ते महिन्यातून एकदा असं झालं होतं. आणि आता तर येणं सोडाच, फोनवर बोलणंही दुरापास्त झालं होतं. त्याच्या मुलांचा मात्र आजीवर फार जिव होता. ती दोघं येत असत अधूनमधून एखाद्या शनिवारच्या रात्री आजीकडे रहायला, आणि रविवारी रात्री जेऊन परतत असत घरी स्वतःच्या. मोठा आता चौदा वर्षांचा असल्याने, तो आठ वर्षांच्या धाकट्याला व्यवस्थित काळजीपुर्वक घेऊन येत - जात असे. जानकीबाईंचाही प्रचंड जिव होता, ह्या दुधावरच्या सायीवर... आणि अर्थातच जयंतरावांचाही होताच ते असेपर्यंत. 

तर आजही अशाच बाहेर पडलेल्या जानकीबाई, आणि त्यांना आठवलं की त्यांचा फोन रिचार्ज करायचाय. कालच रात्री बारा नंतर आऊटगोईंग, व्हाॅट्सअॅप वगैरे बंद पडलेलं त्यांचं. म्हणूनच जरा वाट वाकडी करत, त्या आज थोड्या लांबवर गेल्या. ह्या दुकानापासून धाकट्या लेकाचं घर, पाच - सात मिनिटांवरच होतं. रिचार्ज करुन जानकीबाई वळल्या आणि समोरच असलेल्या बागेच्या कठड्यावर, त्यांना त्यांची दोन्ही नातवंड बसलेली दिसली. सकाळची दहाची वेळ... आॅड डे... त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. बागेच्या तोंडावर एक ज्युसवाला बसे, नी एक घरगूती नाश्तावाला. ते दोघेही आवराआवरीच करत होते एव्हाना. जानकीबाईंच्या छातीत एकदम धस्स झालं, दोन्ही नातवंडांना तिथे बसलेलं बघून. छोटा पाय हलवत बसला होता, आणि मोठा बसला होता त्याच्या खांद्यावर हात ठेऊन.  

जानकीबाई रस्ता क्राॅस करुन बागेपाशी आल्या, आणि जाऊन उभ्या राहील्या नातवंडांसमोर. आजीला एकदम समोर बघून मोठा कावराबावरा झाला, आणि छोट्याने आनंदात आजीच्या कंबरेला मिठी मारली. जानकी बाईंनी मोठ्यालाही जवळ कवटाळून घेतलं, नी विचारलं... 

"काय रे इथे काय करताय दोघं?"

"अं... काही नाही आजी... असंच बागेत राऊंड मारायला आलो होतो"

"आजीशी खोटं?... अरे तुमचा बाबाही पचवू शकला नाही एकही थाप माझ्यासमोर... नी तुम्ही काय रे? बोला खरंखूरं"

अजूनही आजीच्या कंबरेला विळखा मारुन उभा असलेला छोटा नातू, आता मात्र रडायला लागला. तर मोठा एव्हाना पार गांगरुन गेला होता. जानकीबाईंनी छोट्या नातवाच्या हाताचा विळखा सोडवत, त्याला कठड्यावर बसवलं. मोठ्यालाही त्याच्या शेजारी बसवलं. बाजूच्या त्या ज्युसवाल्याकडून, एक प्लास्टिकची खुर्ची घेतली त्याला विनंती करत. नातवंडांसमोर खुर्चीवर बसत जानकीबाईंनी विचारलं...

"मला सांगा बरं निटपणे काय झालंय ते"

"आई - बाबा सारखे भांडत असतात गं घरी. दोघांचंही घरुन काम... दोघेही एकमेकांसमोर सतत... येता जाता भांडतात अगदी. "तुझा चहाचा कप का अजून इथेच पडलाय?" पासून ते... "गुरांचा चारा तुझ्या जेवणापेक्षा टेस्टी असतो". "चार - चार बनियान आहेत, पण सगळे एकाचवेळी धुवायला कसे जातात?" पासून ते... "एवढंच आहे तर मग, आपणच लावावं ना मशीन वेळचेवेळी". "मला ही घरची धूणी - भांडी करायचा अठरा लाख ctc देत नाही माझी कंपनी, आॅनलाईन बसावं लागतं अठरा - अठरा तास" पासून ते... "तुझ्या निम्मा पगार घेते माझ्या बँकेच्या नोकरीतून पण म्हणून घरी मी एकटीनेच दुपटीने राबावं असं नाही ना, मी ही असतेच ना बसलेली आॅनलाईन बारा - बारा तास"...  नी काय काय. पुर्वी आम्ही दोघं आई - बाबांची भांडणं सुरु झाली की, सरळ खाली खेळायला उतरायचो. सुट्टी चालू आहे शाळांना, त्यामुळे कोण ना कोण असतंच खाली खेळत. पण आई - बाबांच्या भांडणाचा आवाज पोडिअमवरही यायचा... मग बाकीची मुलं आम्हाला बोलायची... "हो गया चालू रामायण - महाभारत एकसाथ तुम्हारे घरका"... नी हसायची आपसात. मग तेव्हापासून आम्ही खाली खेळणंही सोडलं. आता असेच मग बाहेर पडतो, फिरतो इथे - तिथे, बसतो बागेत जरावेळ... आणि जेवणाच्या वेळेला जातो घरी. भांडण चालूच असेल, तर जेऊन पुन्हा खाली उतरतो"

"भर उन्हात?... आणि अभ्यास वगैरे?"

"कसा होणार अभ्यास आजी अशा घरात?"

"हे कधीपासून चाल्लय आणि?"

"पहिल्या लाॅकडाऊन पासूनच खरंतर... पण आम्ही बोललो नाही तुला"

जानकीबाईंच्या हृदयात कालवाकालव झाली. खुर्चीवरुन उठत त्यांनी दोन्ही नातवंडांना, पोटाशी - छातीशी घट्ट धरलं. दोन्ही नातवंड रडत होती आता... आणि जानकीबाईंचे डोळेही वाहत होते. त्यांनी ते पुसले, मनातल्यामनात काहीतरी ठरवत. ज्युसवाल्याला त्याची खुर्ची परत देत, त्याला थँक्यू म्हणत... जानकीबाईंनी जोरात आवाज दिला... "आॅटोsss".


.


.


.


मेघना धाय मोकलून रडत होती... मिहिर कमालिचा हवालदील झालेला. एकमेकांना घट्ट चिकटूनच बसले होते दोघे. दोन्ही लेक दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेल्यावरही, घरी आले नव्हते. आणि आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेले. बिल्डिंगमधल्याच इतर स्त्री - पुरुषांचा घोळका जमलेला त्यांच्या घरी. खाली बिल्डिंगमध्ये शोधाशोध झाली होती, मित्रांकडे चौकशी झाली होती, जवळपासचे एरीयाही पिंजून काढले गेले होते, चार - पाचजणं बाईकवरुन सतत फेर्‍या मारतच होते. पण आता पोलिसांकडे जाण्यावाचून, दुसरा पर्यायच उरला नव्हता. मिहिरने मेघनाचा हात पकडला... मेघनाने रडतच मिहिरच्या खांद्यावर डोकं टेकवलं. दोघेही जागचे उठले... आणि समोर बघतात तर, दारात दोन्ही पोरं त्यांच्या दोन्ही आज्यांसोबत. मिहिर आणि मेघना डोळे विस्फारुन, हबकून बघतच बसले समोर. जमलेल्या लोकांमध्ये सार्वजनिक कुजबूज झाली. मेघना पायातले त्राण गेल्यासारखी खाली बसली, नी तिला घट्ट धरत मिहिरही. ओक्साबोक्शी रडत होती मेघना आता... आणि मिहिर तिला तसंच जवळ धरुन बसलेला. आता जमा झालेली लोकं निघायच्या बेतातच होती की, जानकीबाईंनी त्या सगळ्यांना हाताने खूण करत थांबवलं... नी बोलू लागल्या त्या... 

"तुम्ही ही थांबा सगळे... माझ्या लेकाच्या - सुनेच्या वयाचेच दिसताय. मिहिर - मेघना... मी आज माझ्या दोन्ही नातवंडांना घेऊन, उंडारायला गेले होते. विहिणबाईही होत्या सोबत. इथे मला बागेच्या कठड्यावर दिसली मुलं योगायोगानेच. घरी जायला अनुत्सुक... खरंतर घाबरलेली... तुमच्या दोघांमधील सततच्या भांडणांमुळे कमालीची भेदरलेली. मग काय केली आॅटो, नी गेले घेऊन त्यांना ठाण्याला. आॅटोतच सुचलं की विहिणबाईंनाही घ्यावं बरोबर... त्याही तशा एकट्याच राहतायत व्याहीबुवांच्या मागे, माझ्याहूनही जास्त वर्ष. आणि ह्यामागे दुसरा विचार हा की... ह्या पापात आपली आईही सहभागी आहे म्हंटल्यावर, मेघनाची बोलती बंद होईल. म्हणजे मागाहून तिने मिहिरला ऐकवायला नको की, शोभतं का हे असं वागणं तुमच्या आईला वगैरे. मग तलावपाळीला बसलो चौघं थोडावेळ. नंतर मस्त सिंधुदुर्गमध्ये जाऊन, फिश थाळी चापली. मग म्हंटलं गडकरीला चक्कर टाकावी, तर सुदैवाने तिथे 'निम्मा शिम्मा राक्षस' चा प्रयोग होता अडीच वाजताचा. मग काढली तिकीटं नी बसलो आम्हीही दोघी म्हातार्‍या, मुलांसोबत मुलं होऊन. मध्यंतरात मस्त गरमागरम बटाटेवडे हादडले. प्रयोग संपल्यावर मुलांजोडीने आईस्क्रिम खाल्लं. आणि आॅटो करुन आलो इथे. विहिणबाईंना म्हंटलं तुम्हीही चला बरं, मी नाही खायची एकटी बोलणी. आज म्हंटलं माझ्याकडे रहा, आपण उरलेल्या गप्पांचा कोटा पुर्ण करु. पण एका गोष्टीचं मात्र प्रचंड आश्चर्य वाटलंय आम्हा दोघींनाही... इतरवेळी तर जाऊनच द्या... पण आपली मुलं लापता आहेत म्हंटल्यावर तरी, एखादा फोन यायला हवा होता आम्हाला तुमच्याकडून. मी जवळ राहतेय तर निदान मला तरी. पण एक फोन नाही तुमचा आम्हा दोघींनाही, खरंच कमालेय. अरे आम्ही फोन रिचार्ज करतो, ते तुमच्याशी बोलण्याच्या ओढीनेच ना? बरं तुम्हाला बोलणं जमत नाही मान्य, तरी तुमचा एखादा मेसेज दिसल्यावरही प्रचंड हायसं वाटतं रे आम्हाला. पण ते ही नाहीच. म्हणजे थोडक्यात तुमच्या पिढीला, आधीच्या पिढीची गरजच उरलेली नाहीये. आणि नंतरच्या पिढीला तुमची असलेली गरज भागवण्यासाठी, तुमच्याकडे वेळच उरलेला नाही. आणि वेळ तरी कुठून उरावा? सगळा वेळ जातो एकमेकांना दाखवून देण्यात की, बघ मी काय काय करतोय किंवा करतीये. आणि त्यावरुन आपणच एकटे कसे मर मर मरतोय घरासाठी, असं समोरच्याला जाणवून देत भांडण्यात. अरे पण त्याच तुमच्या तथाकथीत घरात राहणार्‍या, तुमच्या लहानग्या मुलांचं काय? आपल्या भांडणाचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय, हे पहायची साधी तसदी तरी घेता का तुम्ही काॅर्पोरेट आई - बाप कधी? ह्या महानगरीय जिवनशैलीशी जुळवून घेण्याच्या ह्या वेगात वा नादात, तुमचे आपसातील बंध सैलावतायत... अगदी पार सुटून, तुटून जातायत हे लक्षातच येत नाहीये तुमच्या. असो... पण आज तुमच्यामुळे मला मात्र, एक छान मैत्रीण मिळाली बरं का. त्यामुळे आता जेव्हा कधी तुम्ही हमरी - तुमरीवर येत भांडणार असाल, तेव्हा तेव्हा आम्हा चौघांचा डे-आऊट ठरलेला असेल. आणि एक... मी आजच रिचार्ज केलंय, त्यामुळे महिनाभरच माझा हा नंबर चालू असेल. त्यानंतर आम्ही दोन्ही विहिणींनी ठरवलंय की, जूना नंबर बंद करुन नवा नंबर घ्यायचा. जो तुम्हा दोघांनाही देणार नाहीयोत आम्ही... फक्त नातवंडाना देणार आहोत, ज्यांना खरीखूरी निकड असते आमची आणि राहिलही... निदान आणिक थोडे वर्ष. आमच्या ह्या दोन पिढ्या सांधणारा तुमच्या पिढीचा हा पुल, फार म्हणजे फारच कुचकामी आहे बरं का. त्यामुळे मग आम्हीच संवाद साधत जाऊ थेट एकमेकांशी यापुढे. निघतो आम्ही... आणि हो... मुलं परतलीयेत तेव्हा त्यात आनंद मानून, त्यांना जवळ घ्या आता. ती गेलीच का बाहेर मुळात?... ह्याचा त्रागा करत, त्यांच्यावर रागावू नका. येतो आता आम्ही दोघी. आज ही माझी मैत्रीण माझ्याकडेच मुक्कामाला आहे, तेव्हा रात्रीचं जेवण आटोपल्यावर बघा चक्कर मारायला जमली तर आईकडे. वेलची, जायफळ घालून काॅफी करेन मस्त, अगदी मेघनाला आवडते तशी"

दोन्ही नातवंडांच्या पाठीवर, जानकीबाईंनी टॅप केलं मागून. दोघेही पळतच आई - बाबांना जाऊन बिलगले. प्रसन्नपणे हसल्या जानकीबाई... आणि विहिणबाईंचा हात धरत, त्या बाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या मोबाईलच्या जोडीने... त्यांचीच काही संपलेली नातीही त्या आज 'रिचार्ज' करु शकल्या होत्या, हे समाधान झळाळत होतं जानकीबाईंच्या चेहर्‍यावर आता. 


---सचिन श. देशपांडे

वरील कथा श्री सचिन देशपांडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ही कथा आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर लेखकाच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


5 Comments

  1. रिचार्ज गोष्ट खूप छान आहे सर आजच्या कार्पोरेट आईवडीलांचे वास्तव

    ReplyDelete
  2. छान अंजन आहे अशा आईवडिलांना जे धड मागची पिढी ना धड पुढची पिढी सांभाळू शकत

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर कथा.

    ReplyDelete
  4. मेसेंजरवर कसा कॉन्टॅक्ट करायचा,swapna kulkarni

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post