ओझं

 

'ओझं'


सचिन देशपांडे'कैवल्य' हाॅस्पिटलच्या स्पेशल वाॅर्ड मधील... शुभ्र चादर अंथरलेल्या बेडवर, अमिता बसली होती काजळी साठल्या मनाने. अमिताची आई बाजूच्या स्टूलावर बसून रडत होती... तर बाबा येरा - झारा मारत होते खोलीत, प्रचंड अस्वस्थपणे. पाय समोर सरळ रेषेत ठेऊन... उशीला टेकून बसली होती अमिता, शून्य नजरेने पंख्याकडे बघत. बाबांच्या बर्‍यापैकी चढ्या आवाजाने भानावर आली ती...

"आता काय पंख्याला लटकायचा विचार आहे का?... फॅडच आलंय ना हल्ली जिव द्यायचं... काय तर म्हणे डिप्रेशन... मुर्खाचा बाजार नुसता... काही विचार करणं नाही मागचा - पुढचा... चालले संपवायला स्वतःला... ठिकर्‍या झाल्या असत्या ठिकर्‍या... गोणीत कराव्या लागल्या असत्या गोळा... अक्कलशून्य कुठली... गेली आपली तोंड वर करुन रेल्वे ट्रॅकवर... काहीच पडलेली नाही की नवरा आहे, बारा - तेरा वर्षांचा मुलगा आहे... थोबडवून काढावं वाटतंय".

"अहो पुरे आता... आधीच मनस्थिती बिघडलीये तिची... कशाला आणिक भर टाकताय तीत... नाही करायची ती पुन्हा अशी... काय गं?... नाही ना करणार असं काही पुन्हा?... अगं बोल काहीतरी".

"बघ.. बघतरी काही बोलतेय का... डोक्याला ताप नाहीतर... मी तर म्हणतो जायलाच हवी होती ट्रेन अंगावरुन... कशाला यायला हवं होतं अमररावांनी वाचवायला उगा... मरुच द्यायला हवी होती... चांगला सोन्याचा संसार... काय ही अवदसा सुचावी".

"अहो तुम्ही जरा शांत व्हा पाहू... तुमची तब्येत बिघडायची अशाने... जा बरं... बाहेर जाऊन बसा... आणि कुणी आलंच भेटायला घरच्यांव्यतिरीक्त, तर बाहेरुनच बोळवण करा... सांगा डाॅक्टरनी सक्तीची विश्रांती सांगितलीये".

"अगं घरचे आले तरी आपल्याच... अमररावांच्या घरचे कोण कशाला येतील, ह्या अशा नवरा - मुलाला वार्‍यावर सोडून मरु पहाणार्‍या मुलीचं तोंड बघायला... आणि न आलेलेच बरे... आपण तरी कोणत्या तोंडाने सामोरं जाणार आहोत त्यांना?".

अमिताच्या बाबांनी दरवाजा उघडतच, हे शेवटचं वाक्य टाकलं... नी धाड्डकन दरवाजा आपटत ते बाहेर निघून गेले. अमिताची आईही तोंडावर पदर ठेऊन, रडतच बाहेर गेली मागोमाग. अमिता आत्ताही फक्त बघत होती, डोक्यावरच्या त्या फिरणार्‍या पंख्याकडे. अचानक तो पंखा जसा काही उलटा फिरु लागला तिच्यासाठी, आणिक जास्त वेगात. अमिताच्या डोळ्यांसमोर आली होती, तिची पहिली झालेली भेट... दिपांकरशी. 

दिपांकर शारंगपाणी... अमिता ज्या काॅलेजमध्ये लेक्चरर होती, तिथे टिचींग फॅकल्टी मेंबर म्हणून नव्यानेच भरती झालेला. प्रचंड देखणा... रुबाबदार... आणि अतिशय लाघवी. शिकवायचा इकोनाॅमिक्स सारखा रटाळ सब्जेक्ट... आणि हातातही असत कायम, 'कार्ल मार्क्स' नी 'अमर्त्य सेन'. पण जिभेवर मात्र असे साहिर, गुलजार, फाजली वगैरे मंडळींची... सततची उठ - बस. साहित्याची प्रचंड जाण... जागतीक सिनेमाचा, संगिताचा गाढा अभ्यास. किशोरच्या खूप जवळ जाणारा... बेस असलेला आवाज, नी कुठेही गाणं म्हणायची तयारी. आणि सहज सोपी अशी, अंगी असलेली वक्तृत्व कला. अल्ट्रा मॅग्नेटीक होता दिपांकर... अगदी मानवी 'बर्म्युडा ट्रँगल'च. सहा - आठ महिन्यांतच काॅलेजमधील मुलींचा, हार्टथ्रोब झाला होता दिपांकर... पण तो मात्र आक्रुष्ट झाला होता, त्याच्याहून सहा - आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमिताकडे. आकर्षक, बांधेसुद, बुद्धिमान अमिता... सुरुवातीला त्याला इग्नोर करत होती. पण हळूहळू तिच्यातील विझायच्या वाटेवर असलेलं स्त्रीत्व सुद्धा... खेचलं गेलं होतं दिपांकरमधील टिपेवर असलेल्या, उन्मुक्त अशा पुरुषाकडे. 

सहा फूट उंचं दिपांकरच्या मागे बुलेटवर बसून... त्याच्या खांद्याचा हलकासा आधार घेणारी अमिता, आता त्याच्या पोटाभोवती हातांचा विळखा मारुन बसू लागली होती. त्याच्या त्या 'फ्लाईंग मशिन' जॅकेटचा होणारा, उबदार स्पर्श. हेल्मेटमधून बाहेर येत वार्‍यासोबत भुरभुरणारे, यंग इम्रान खान सारखे त्याचे ते मानेवर रुळणारे... कुरळे केस. आणि त्यातून येणारा तो कोलोन वाॅटरचा गंध. त्याच्या कानांच्या पाळ्यांखालून येणारा, डिओचा मंद असा सुगंध. आणि सतत तोंडात आॅरबिट चघळण्याने येणारा, तो थंडगार सुवास. एकंदरच कंप्लिट पॅकेज होता दिपांकर, कुठल्याही स्त्रीला त्याच्यावर आरक्त होण्यासाठी उद्युक्त करु शकेल असा. आणि अमिताच्या ह्या अशाच भारल्या अवस्थेत... दिपांकर तिला त्याच्या घरी घेऊन गेला होता एके दिवशी, काॅलेज सुटल्यावर. पावसाळी कूंद दुपार, आणि घरी फक्त ही दोघं. तिच्या खूप जवळ येत, कानात एका 'नज्म'ची फुंकर मारली त्याने... 

"दो तेज हवाओंकी बुनियाद है तुफाँ पर... 


या तूम ना हसीं होते... या मै ना जवाँ होता". 

नव्हती सावरु शकली मग अमिता स्वतःला. नव्हती अडवू शकली मग अमिता दिपांकरला. त्या जादुई अंमलातून जेव्हा बाहेर आली अमिता, दिपांकर उभा होता खिडकीपाशी उघड्या अंगाने... एक हात भिंतीवर ठेऊन, एका हाताने सिगरेट पित. स्वतःचे कपडे ठिकठाक करत, अमिता जाऊन बिलगली त्याच्या पाठमोर्‍या पिळदार अंगाला. दिपांकर वळला... नी हसला बघून अमिताकडे. ती त्याच्या भरदार छातीवर डोक टेकू पहातच होती, की त्याने थांबवलं तिला नी म्हणाला...

"बायको निघालीये तिच्या आईकडून... तासाभरात पोहोचेल... तिची आज शेवटची सोनोग्राफी होती... अजून थोडे दिवस... एकदा का डिलिव्हरीसाठी ती गेली तिच्या आईकडे, की चार - पाच महिनेतरी फक्त तू आणि मी... देन नो टाईम लिमिट".

हे बोलून दिपांकरने डोळा मारला अमिताला... आणि फिल्टरपर्यंत आलेली सिगरेट जमिनीवर टाकत, त्याच्या स्लिपरने ती विझवली. अमिताला त्याक्षणी त्या सिगरेटमध्ये, नी स्वतःत काहीच फरक वाटला नव्हता. काम झाल्यावर, ओढ निवल्यावर... पायाखाली चिरडलं होतं दिपांकरने दोघींनाही. शिसारी आली अमिताला... किळस आली तिला स्वतःचीच. 

"चार - पाच महिनेतरी फक्त तू आणि मी... दॅट्स व्हाॅट ही सेड?... आणि नंतर?... म्हणजे मी सब्स्टिट्यूट त्याच्या बायकोची?... त्याची निव्वळ 'सोय' बायको नसतांनाची?... ग्गाॅश... व्हाॅट द हेल आय हॅव डन आॅल धिस?... चाळीशीत मी घसरुच कसा दिला पाय माझा?... ते ही एका अशा स्वार्थी माणसासाठी". 

तुटलेल्या अमिताने स्वतःला गोळा करत, इकडे - तिकडे पडलेलं तिचं सामानही गोळा केलं... आणि काहीही न बोलता घराबाहेर पडली ती. रिक्षात बसून घरी आली... आणि बांध फुटला अमिताचा... ओक्साबोक्शी रडू लागली ती. संध्याकाळचे सहा वाजायला आले होते... मुलगा शाळेतून यायची वेळ झालेली... पाठोपाठ अमरचीही वेळ झालेली आॅफिसहून परतायची. काहीतरी ठरवून स्वतःशीच, अमिता उठली. तिच्याकडून घडलेली अक्षम्य चूक, तिने एका कागदावर लिहिली. त्या चिठ्ठीची घडी घालून त्यावर 'अमर' लिहिलं तिने. आणि अमरच्या ड्राॅवरमध्ये ती चिठ्ठी ठेऊन, अमिता बाहेर पडली. 

ट्रेनच्या हाॅर्नचा कर्णकर्कश्य, नी रक्त गोठवणारा आवाज... गर्दीचा मोठ्याने झालेला गलका... आणि तिच्या अंगाला बसलेला प्रचंड हिसका. बेशुद्ध पडलेली अमिता... दुसर्‍या दिवशी सकाळीच थेट शुद्धीवर आली होती, हाॅस्पिटलच्या बेडवर. आई संततधार रडत होती... बाबा हातांच्या मुठी वळवत, चिडून फेर्‍या मारत होते. डोळे उघडल्यापासून गप्प राहून, आई - बाबांच फक्त ऐकत होती अमिता... निस्तेज डोळ्यांनी. आई - बाबा दिसले होते अमिताला... पण अमर?... आणि तिचा लेक अनय? 

"अमर तर आपल्याला माफ करणं शक्यच नाही... पण कळत्या वयात येऊ पहाणारा आपला लेकही, तुटेल का आता आपल्यापासून?... दोघेही दिसले नाहीयेत अजिबातच... ना त्यांच्या असण्याची चाहूल लागलीये". 

ह्या विचारांच्या कल्लोळात अमिता असतांनाच, एक सिस्टर आली रुममध्ये इंजेक्शन द्यायला तिला. 

"कैसी है मॅडम आप?... लकी हो आप के ट्रेन के सामने खडे रहेकर भी बच गई... लेकीन वो नही बच पाया... कल शाम को घर जाते टाईम, एक आदमी आया ट्रेन के निचे... ठिकठाक कपडे थे... सूना के किसीको बचाते हूवे खूद मर गया बेचारा... बहोत टाईमतक गाडी अटकी थी हमारी... मैं एक घंटा देरसें पहूँची घर, तो बच्चा परेशान हूवा मेरा... वो आदमी तो अभीभी घर नही पहूँचा होगा... क्या हूवा होगा उसके घरपे?". 

अचानक आठवलं अमिताला, तिच्या बाबांचं वाक्य... 

"कशाला यायला हवं होतं वाचवायला अमररावांनी मध्ये... म्हणजे... म्हणजे... अमरनी मला वाचवलं... आणि स्वतः तो... ओह नो... म्हणून तो दिसला नाहीये का मला सकाळ पासून?". 

इंजेक्शन द्यायला जवळ आलेल्या नर्सला, अमिताने ढकललं... आणि बेफाम पळत ती दरवाजा उघडून बाहेर गेली. बाहेरच्या बाकावर रडत बसलेल्या... तिच्या आईच्या खांद्यांना पकडत, ते गदागदा हलवत विचारलं तिने अमर बद्दल. आईच्या बाजूला बसलेल्या बाबांकडे बघून... हात जोडत, रडत... विचारलं तिने त्यांनाही अमर बद्दल. त्या दोघांकडूनही न आलेल्या उत्तराने... अमिता कोसळायच्याच बेतात होती की, एक हात विसावला खांद्यावर तिच्या. खूप ओळखीचा होता स्पर्श तो... प्रचंड विश्वासार्हता असणारा... आपल्या एखाद्याबद्दलची काळजी, मोकळेपणाने व्यक्त करणारा असा. हो... अमर होता उभा अमिताच्या मागे... तिच्याकडे बघत. सावळासा... मध्यम उंचीचा... डोक्यावरचे केस विरळ होत चाललेला... कपड्यांतून घामाचा मंद असा दर्प येणारा... पण तरीही फक्त तिचाच असलेला अमर. तिची काळजी घेणारा... तिच्यातील स्त्रीत्वाचा यथोचीत मान राखणारा... मुख्य म्हणजे तिला 'मादी' नाही, तर 'स्त्री' समजणारा अमर. 

अमिताला प्रचंड हायसं वाटलं अमरकडे बघून. "म्हणजे नर्स आपल्याला बाय कोईन्सिडन्स काल संध्याकाळीच झालेल्या, कुठल्याशा वेगळ्याच अपघाताबद्दल सांगत होती तर"... हे मनात येत, आवेगाने मिठी मारली अमिताने अमरला. भानावर आली अमिता मिनिटभरातच, विलग होत अमरपासून. वाहत्या डोळ्यांनीच ती जोडू पहात असलेले हात, अर्ध्यावरच अडवले अमरने... आणि हळू आवाजात बोलला तिला... 

"इथे कोणालाही काहीही माहित नाहीये... अनयलाही नाही... तुझी चिठ्ठी वाचून मी फाडून टाकलीये ती... तू आत रुममध्ये जा... औषधोपचार कर... तुला संध्याकाळी डिस्चार्ज मिळणारेय... आपण एकत्रच जाऊ घरी... अनय तुझी कालपासून वाट बघतोय... काहीही विचारु नकोस आता... काहीही बोलू नकोस... फक्त घरी येतांना मनावरचं हे ओझं, इथेच सोडून ये... एकदाच झालेली चूक उमगून... तिचा चकवा न होऊ देता, त्यात न अडकता बाहेर आलीयेस तू... हे कमी महत्वाचं नाहीये माझ्यासाठी, आणि आपल्यातलं नातं सामान्य राहणं... निदान आपण ते तसं भासवणं... खूप महत्वाचं आहे आपल्या मुलासाठी". 

अमरने सासुबाईंकडे पाहत मान हलवली. त्या जागेवरुन उठत, आत घेऊन जाऊ लागल्या अमिताला. जाता जाता पुन्हा पाहिलं अमिताने वळून अमरकडे, तर तो अगदीच कोरड्या डोळ्यांनी बघत होता तिच्याकडे. चर्र झालं काळजात अमिताच्या, त्याच्या त्या मघाच्या स्पर्शातील नी आत्ताच्या ह्या नजरेतील विरोधाभास जाणवून. आणि थरथरली ती, आठवून त्याचं ते शेवटचं वाक्य... "आपल्यातलं नातं सामान्य राहणं... निदान आपण ते तसं भासवणं...". कळून चुकलं होतं अमिताला एव्हाना की, तिच्याकडून घडलेल्या अपराधाच्या ओझ्यापेक्षाही... अमरने आत्ता आई - बाबांसमोर आपल्यावर केलेल्या उपकाराचं, आणि यापुढे कायमच लेकासमोर तो आपल्यावर करणार्‍या कृतज्ञतेचं ओझं... वजनात कायमच जास्त भरणार होतं. आणि हे कधीच अनलोड करता न येणारं 'ओझं', यापुढे सतत वहावं लागणार होतं तिला तिच्या आत्म्यावर... आजन्म.


---सचिन श. देशपांडे


वरील कथा श्री सचिन देशपांडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ही कथा आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर लेखकाच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post