घास

 *घास*

अर्चना धवड



सीमा, आज कळण्याच्या वड्या आणि भाकरी कर. आईला खूप आवडायच्या. अगं काल बासुंदी पुरीचा घास घेतलाच नाही. चार दिवस झाले पण एकदाही कावळा शिवला नाही घासाला.सुमित आपल्या बहिणीला सीमाला सांगत होता.


"अरे कावळेच नसतील तीथे "


"आहेत ना, बरेच असतात पण येतच नाही घासाजवळ "


"कसे येतील? तू जिवंतपणी एक तरी सुखाचा घास दिला का "मनात सीमा म्हणाली


सीमा आणि सुमितच्या आईचं निधन झालं होतं. दहा दिवस, सुमित लहान असल्यामुळे सुतक पाळत होता. तोच रोज जिथे अग्नी दिला त्या जागेवर घास न्यायचा. कुटुंबातील स्त्रियांच्या हातचा स्वयंपाक चालत नाही म्हणून सीमा रोज घासाचा स्वयंपाक करायची. आपल्या आईला जे जे आवडायचं ते सर्व पदार्थ ती करायची.


आताच मागे दिवाळीला आली तेव्हा सुमितचं आईसोबत झालेलं भांडण आठवलं आणि तिला भरून आलं.


"तू दादाकडे का जात नाही? मला त्रास होतो.चल तुला आता बस मध्येच बसून देतो".राधाला हाताला धरून बेडवरून उठवीत सुमित म्हणाला.


"मी कशाला जाऊ, तू निघ घरातून. हे माझं घर आहे "त्याच्या हाताला हिसका देत राधा जोरदार ओरडली.


"कसलं तुझं घर? आमच्या नावावर केलंय बाबांनी "


"हो ना, तुमच्या नावावर केलं. त्यांना विश्वास होता आपल्या मुलांवर. आईला सांभाळेल याची खात्री वाटत होती. त्यांना थोडीच माहिती होतं आईला कोण सांभाळेल म्हणून भांडण कराल . हरामी.. असे पोरं असल्यापेक्षा नसलेली बरं"राधा मुलांना शिव्या घालू लागली.


आईचा होणारा अपमान सीमा बराच वेळ बघत होती. शक्य तोवर ती आई आणि भावाच्यामधे बोलत नसे.सीमाने बराच वेळ कंट्रोल केला स्वतःवर पण शेवटी बोललीच.


"ती कशाला जाईल? तू निघ ना घरातून"


"तू मधे बोलू नकोस. एवढा पुळका आहे तर आपल्या घरी घेऊन जा"


"मी आताही न्यायला तयार आहे तू आणून दे तिला. ती कुठे जायलाच तयार नाही तर तू कोण तिला बाहेर काढणारा.कशाला नेहमी दादाकडे जा म्हणून धमाकावतो?आणि माझ्याकडे का येईल ती? प्रॉपर्टी तुम्ही खाता ना"


"प्रॉपर्टी एकट्याला दिली का? दादाला पण दिली ना?सगळ्यांची आई आहे ना? सगळ्यांनी सांभाळायला नको का?"


"तू सांभाळतो का? तू काय करतो? डबा लावलाय ना तिने मेसचा स्वतःसाठी? "


"फक्त जेवायला मिळालं की होतं का ?बाकी इतर अनेक गोष्टी असतात. ती सू करते. मग वास येतो आम्हाला"


"इतर गोष्टी? काय करतोस रे तू? अंघोळीला पाणी देतोस की पातळ धुतो. स्वतःच स्वतः तर करते ती. आता थकली ती.. एखादेवेळी करीत असेल सू.. तू धुतोस पातळ? मग एवढा वास येतो तुला तर सोड ना हे घर. बाहेर रहा किरायाने ".


"मी कशाला बाहेर जाऊ.. हिने दादाकडे राहायला जावे "


अशीच बहीण भावाची वादावादी झाली होती.


सुमितचं आणि आईचं नेहमीच भांडण व्हायचं. तो तिला दुसऱ्या मुलाकडे जा म्हणायचा आणि ती मी हे घर सोडून जाणार नाही हे ठामपणे सांगायची.त्यावरून रोजच वादविवाद व्हायचे.


संध्याकाळी सीमासाठी बासुंदीचा पाहुणचार केला होता. जेवताना तिचा घास घश्याखाली उतरत नव्हता. ती ताटावरून उठून आईच्या खोलीत गेली, आई थोडी बासुंदी देऊ का गं?


"नको गं. आज छान बटाटा रस्सा दिला होता डब्यात. बुधवार असल्यामुळे एक गुलाबजाम पण होता गं.. जास्त गोड झेपायचं नाही या वयात "


सीमाला कळलं होतं की आई खोटी बोलते. गोड बुधवारी नव्हे तर रविवारी असते. चुपचाप आपल्या पानावर बसून पानात वाढलं तेवढं जेवून सीमा उठली.


राधा आजी, माधव आजोबा यांना दोन मुलं, एक मुलगी होती. माधव आजोबा नोकरी करायचे. महावितरणमधे नोकरी असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळत नव्हती. दोन्ही मुले चांगल्या नोकरीवर होती. मोठा मुलगा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहायचा . लहान सुमित आईवडिलांसोबत घरी राहायचा .

वडिलांचा मृत्यू झाला आणि मृत्यूपत्रानुसार घर लहान मुलांच्या नावे आणि प्लॉट मोठया मुलाच्या नावे करुन ठेवला.


राधा लहान मुलांसोबत राहू लागली. एका वर्षातच सुमितला आईची अडचण होऊ लागली.मोठा भाऊ मजेत राहतो आणि माझ्या मागे जबाबदारी लावून दिली. त्याला आई म्हणजे ओझं वाटू लागलं. मोठा मुलगा चल म्हणायचा पण त्यांना आपलं स्वतःच घर सोडून जायचं नव्हतं. घरातील प्रत्येक वस्तू त्यांनी कष्टाने जमवली होती त्यातून त्यांचा जीव सुटत नव्हता आणि ज्या गावात, घरात आपलं अख्ख आयुष्य घालवीलं ते सोडून त्या दुसरीकडे राहू शकत नव्हत्या. त्यामुळे आपल्या घरात दोन खोल्यात वेगळ्या राहू लागल्या.जोपर्यंत अंगात शक्ती होती तोपर्यंत वेगळा स्वयंपाक करायच्या. पेन्शन जरी नसली तरी थोडेफार पैसे वडील ठेवून गेले होते. स्वतःची सगळी कामे स्वतः करायच्या. सुमितचं म्हणणं होतं आई दोघांची तर सांभाळाणे सुद्धा दोघांची जबादारी त्यामुळे तो आईकडे ढुंकूनही पाहत नसे.


हल्ली राधा थकली होती त्यामुळे स्वयंपाक जमत नसे म्हणून मेसचा डबा लावला होता. डबेवाला प्रेमाने डबा आणायचा. एखादेवेळी काही कामं आलं तरी मुलाला पाठवायचा. शक्य नसेल तर सकाळीच संध्याकाळचा डबा पण द्यायचा.


आठ दिवसापूर्वी डबेवाल्याच्या जावयाचा अपघात झाला होता त्यामुळे त्याला ताबडतोब जावं लागलं. घरचे सगळेच गेले त्यामुळे डब्याची सोय करता आली नाही.


राधाने दोन दिवस डब्याची वाट पाहिली. पाणी पिवून झोपली.

स्वाभिमानी राधाने मुलाला जेवायला मागितलं नाही आणि मुलाने पण चौकशी केली नाही. पोटात अन्न नसल्यामुळे प्रचंड थकलेली राधा लघवी करायला बाथरूममधे गेली आणि तोल जावून पडली. मेंदूला मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला.


दुसऱ्या दिवशी आईच्या रूम मधून काहीच आवाज येत नाही म्हणून मुलाने डोकावून पाहिलं तर बेडवर दिसली नाही म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं तर बाथरूममधे पडलेली दिसली.


आज पाच दिवस झाले होते राधाला जाऊन.लहान मुलाने दिवसपाणी केले की पावन असतं असं म्हणतात म्हणून सगळे विधी सुमित करीत होता.


रोज घास घेऊन जायचा सुमित.सगळे राधाला आवडणारे पदार्थ केले जायचे. एक घोटभर चहा न देणारा मुलगा आज आईला काय काय आवडत होतं ते अगदी आठवणीने करीत होता.

सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. मनात म्हणाली, "अरे जिवंतपणी एक घास तू कधी खायला घातला नाहीस आणि तिला आता काय आवडतं म्हणून रोज वेगवेगळ्या पक्वन्नाचा घास नेतोस. कसा शिवणार रे कावळा".


तेवढ्यात डबेवाला आला. हातात तोच आईचा डबा. हॉलमध्ये आईचा हार घातलेला फोटो बघून त्याला धक्काच बसला.


सीमाने त्याला घडलेलं सगळं सांगितलं.


त्याने राधाच्या फोटोला हात जोडले. तेवढ्यात सुमित घास घेऊन जायला निघाला.


"दादा, मी येऊ का? अंतिम दर्शन नाही घेऊ शकलो आजीचं.जागेवर जाऊन नमस्कार करुन घेतो"


चला ना..


"दादा तुझं या महिन्याचे बिल?"सीमाने प्रश्न केला.


"ताई, अहो जाऊ द्या बिल. बिलाचं काय? सगळीकडे पंधराशे रुपयाने डबा द्यायचो पण आजीला पंधराशे रुपये खूप वाटायचे. मग त्या म्हण्याच्या एक वेळ डबा दे बाबा. दोन वेळा खाईल.मी त्यांना म्हटलं की आजी तुम्ही सातशे रुपये द्या मीच एकवेळचा डबा दोन वेळा वाटून देईल. तेव्हा त्या दोन वेळचा डबा लावयाला तयार झाला होत्या.


सीमाच्या डोळ्यातून अश्रू आले.


डबेवाला सुमितच्या मागे चालू लागला. सुमितने द्रोणातून राधाची आवडती कळण्याची भाजी आणि भाकरी आणली होती सोबत आईला आवडते म्हणून थोडी रसमलाई पण आणली होती.अग्नी दिलेल्या जागेवर द्रोण ठेवून दोघेही बाजूला उभे राहिले. बरेच कावळे होते पण एकही कावळा येत नव्हता.


डबेवाला बराच वेळ शांतपणे पाहत होता.सोबत आणलेला डबा घेऊन राधाला अग्नी दिलेल्या जागेवर गेला. जागेला नमस्कार करुन सोबत आणलेला डबा उघडून ठेवला. डोळे बंद करुन हात जोडले आणि म्हणाला आजी, "बघ तुझ्या आवडीची झुणका भाकर आणली होती गं आज".


एक कावळा उडत येऊन डबेवाल्याच्या डब्यातील अन्न खायला येऊन बसला....एक कावळा आलेला बघून बरेच कावळे त्याच्या डब्याभोवती जमा झाले..


सुमितचा द्रोण मात्र एकटा पडला होता जसं त्याने आईला एकटं पाडलं होतं...

©अर्चना अनंत ✍️✍️


वरील कथा अर्चना धवड यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. 

तुम्हाला ही कथा ही वाचायला आवडेल.

👇

पायंडा

Post a Comment (0)
Previous Post Next Post