पायंडा

'पायंडा'

सचिन देशपांडेश्रीरामराव आणि जानकीबाईंची, सकाळपासूनच लगबग सुरु होती. अगदी युद्धपातळीवर धावपळ केल्यावर अखेर... दोघं आवरुन तयार होऊन, एकमेकांसमोर उभी ठाकली. अडीच तास बेडरुम बळकावून बाहेर आलेल्या जानकीबाईंना बघून, डोळे लकाकले श्रीरामरावांचे. 

आंबा कलरची पैठणी, नाकात कोयरीच्या आकाराची मोठाली नथ, गळ्यात मोहनमाळ - तनमणी, कानांत कुड्या, हातांत पाटल्या - बांगड्या - तोडे - गोठ, पायांच्या बोटांत जोडवी, अजूनही भरघोस असलेल्या केसांचा घातलेला आंबाडा... त्यात माळलेली मोगर्‍याची घसघशीत वेणी आणि कपाळावर चार आण्याच्या आकाराचं, ठसठशीत कुंकू. पासष्ट वर्षांच्या गोर्‍यापान जानकीबाई, कम्माल सुंदर दिसत होत्या. 

श्रीरामरावही अर्थातच, तसूभरही मागे नव्हते जानकीबाईंच्या. आॅफ व्हाईट रंगाचा... सोनेरी एम्ब्राॅयडरी असलेला स्टँड काॅलरचा कुर्ता, खाली सोनेरी रंगाचा चुडिदार, पायात आॅफ व्हाईट रंगाच्या सोनेरी टोकांच्या मोजड्या, उजव्या मनगटात सोन्याचं ब्रेसलेट, बोटांत सोन्याच्या दोन अंगठ्या, डाव्या हातात घड्याळ, कपाळावर उभं गंधाचं बोट आणि एकन् एक पिकलेल्या केसांची... तेल लाऊन व्यवस्थित बांधून ठेवलेली मोट. सावळेसेच श्रीरामराव त्यांच्या सहा फुट उंची, नी योगासनांच्या पिळदार शरिरयष्टीत... सत्तरीचे वाटतच नव्हते. 

दोघेही एकमेकांकडे पाहून, दिलखुलास हसले. एकमेकांत ठरलेली नेत्रपल्लवी करत, मान उडवली दोघांनी. श्रीरामरावांनी १-२-३ ह्या अर्थी आपली तीन बोटं उघडली... आणि जोरदार शिट्टी मारली. हेच टायमिंग अचूक साधत... काकूंनी स्वतःची दोन बोटं ओठांत पकडून, नुसतीच हवा बाहेर सोडली. म्हणजेच दोघांनीही एकमेकांकडे बघत, शिट्ट्या मारल्या. पुन्हा एकदा दोघेही, प्रसन्नपणे हसले एकमेकांकडे बघून. काकांनी दुमडलेल्या हाताचं कोपर काकूंपाशी नेलं... काकूंनी स्वतःचा हात त्यांत अडकवत, काकांना चला अशी खूण केली... आणि दोघेही घराबाहेर पडले. 

सहयोग मंगल कार्यालयात, लग्नकार्याची धांदल सुरु होती. सनईचे सुर वाजत होते... गुलाबपाण्याचे तुषार भल्यामोठ्या पंख्यातून, येणार्‍यांवर उडत होते... आसमंतात निरनिराळ्या सुगंधाचा, एकत्रीत थवा विहरत होता... एकंदरीतच सगळीकडे अल्हाददायक वातावरण होतं. श्रीरामराव आणि जानकीबाई हा हर्षोल्हास... आपापल्या डोळ्यांनी टिपत बसले होते, एकमेकांशेजारी एका कोपर्‍यात. तेवढ्यात नवरा आणि नवरी जोडीने आले त्यांच्यापाशी... आणि मनापासून वाकून पाया पडले, श्रीरामराव आणि जानकीबाईंच्या. दोन पिकल्या पानांनी भरभरुन आशिर्वाद दिला, नुकत्याच फुटलेल्या दोन हिरव्यागार पानांना. श्रीरामराव आणि जानकीबाई जागेवरुन उठले... नी पुन्हा हात धरत एकमेकांचा, हाॅलच्या बाहेर पडले. जोडल्या हातांनी अन् भरल्या डोळ्यांनी... नवरी मुलगी नी मुलगा हाॅलच्या दारापर्यंत आले होते, श्रीरामराव आणि जानकीबाईंना सोडायला. त्यांना हात करत श्रीरामराव, जानकीबाई वळले, तोच फोन वाजला श्रीरामरावांचा. तिथे बाहेरच ठेवलेल्या खुर्च्यांवर, बसले दोघे पुन्हा... आणि फोन घेतला श्रीरामरावांनी. दोनेक मिनिटं बोलत होते मग श्रीरामराव फोनवर. आणि मग फोन ठेवत, जानकीबाईंकडे बघत बोलले ते... 

"चला गौरीच्या आई... तुमची अजून एक पैठणी, बाहेर काढून ठेवायला हवी बरं का. पुढच्या आठवड्यात, आणिक एका लग्नाला जायचंय आपल्याला. आणि तुम्हाला माहितीये का... पुढल्या आठवड्यातली मुलगी आपली, पन्नासावी मुलगी असेल गेल्या पंधरा वर्षांच्या काळात... आपण कन्यादान करुन सासरी पाठवणी केलेली. आपली एकुलती एक लेक गौरी... तिच्या लग्नाच्या अगदी आदल्या रात्री, ब्रेन हॅमेरेजने अचानकच गेली. तिचं थाटात लग्न लाऊन द्यायची, तिचं कन्यादान करायची, तिची साश्रू डोळ्यांनी पाठवणी करायची आपली इच्छा... अपुर्णच राहिली. मी तरी सावरलो काही दिवसांत ह्या अतिव दुःखातून, पण गौरीच्या आई... तुम्ही धक्क्यातून बाहेर यायचं नाव घेईनात. तुमची शारिरीक अन् मानसिक प्रकृती, झपाट्याने खालावू लागली. तुम्ही जणू हायच खाल्ली होतीत... जगण्यातला इंटरेस्टच संपलेला तुमचा. आणि तेव्हाच अचानक मला हे सुचलं की... आपण एखाद्या अनाथ मुलीचं कन्यादान केलं तर? आणि त्या दृष्टीने शोधमोहीम सुरु केली मी. आपल्या शेजारीच रहाणार्‍या धारपांच्या, दूर नात्यातील एका अनाथ मुलीचं लग्न ठरलेलं त्याचवेळी. तिचे मामा - मामी कन्यादान करणार होते तिचं. पण धारपांच्या मदतीने त्यांना समजावत, तुझ्या तब्येतीचा दाखला देत... मी मुलीच्या मामा - मामींचं मन वळवलं. तुला मी स्वतः अगदी साग्रसंगित नटवलं होतं मग. आपण दोघांनी मिळून त्या मुलीचं कन्यादान केलं. आणि गौरीच्या आई... तुमची तब्येत चक्क सुधारु लागली. तेव्हाच मी ठरवलं की, आता ह्या शुभकार्यात खंड पडता कामा नये. त्यानंतर मग असंच मी, कळेल त्या ठिकाणी जाऊन अॅप्रोच होऊ लागलो. काहींनी ऐकलं... तर काहींनी हाकललंही. पण गौरीच्या आई... तुमची तब्येत फक्त माझ्यासाठी महत्वाची होती. कारण लेकीमागोमाग आता तुम्हालाही गमवायची, अजिबात हिंमत नव्हती माझ्यात. आणि मग हा 'पायंडा', आपोआप पडत गेला. आता लोक आपल्याला अॅप्रोच होऊ लागलेत, पाहिलंत ना. तेव्हा गौरीच्या आई... आता पुढल्या आठवड्यातील आपली गोल्डन ज्युबिली, दणक्यात साजरी करुया बरं आपण. तुम्हाला ती पेशवेकालीन ठूशी करुन घेऊया. गौरीच्या लग्नातच करायची होती तुम्हाला, पण राहून गेली ना? आता आपल्या ह्या पन्नासाव्या गौरीच्या लग्नाप्रित्यर्थ, नक्की करुया ती तुमच्यासाठी. चलूया आता?".

इतकं बोलून श्रीरामराव जागेवरुन उठले... जानकीबाईही उठून उभ्या राहिल्या. पुन्हा एकदा दोघेही, प्रसन्नपणे हसले एकमेकांकडे बघून. काकांनी दुमडलेल्या हाताचं कोपर काकूंपाशी नेलं... काकूंनी स्वतःचा हात त्यांत अडकवत, काकांना चला अशी खूण केली... आणि दोघेही घराकडे निघाले. 

---सचिन श. देशपांडे

वरील कथा श्री सचिन देशपांडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


तुम्हाला ही कथा वाचायला आवडेल.

👇

कणा

Post a Comment (0)
Previous Post Next Post