कणा

 'कणा'

सचिन देशपांडे

अचानक कसलासा आवाज आला रोहिणीबाईंना, आणि दचकून उठल्या त्या. हाताशीच असलेला नाईटलँप लावला त्यांनी, नी चहूबाजूला बघितलं. भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचे सव्वातीन झालेले. त्यांची खोली तर शांत निजलेली दिसली त्यांना, थंडीची दुलई पांघरुन. पण काहीतरी जमिनीवर पडल्याच्या आवाजा पाठोपाठ, कसलीशी कुजबूज जाणवली रोहिणीबाईंना... त्यांच्या मुलाच्या, अनिषच्या रुममध्ये. पाचेक महिन्यांपुर्वीच लग्न झालेलं, अनिषचं मेघनाशी. आणि सगळं तसं आलबेल चाललेलंही. "मग ही कुजबूज वजा धुसफूस, ह्या साखरझोपेच्यावेळी का बरं चाल्लीये?" असा विचार करत रोहिणीबाई, पलंगावरुन उठल्या. शेजारील स्टुलावर ठेवलेल्या बाटलीतून, पाणी प्यायलं त्यांनी. आणि तिथूनच पुन्हा कानोसा घेतला. अजूनही आतून बोलाचालीचा आवाज येत होता... आणि तो खचितच प्रेमालापाचा नव्हता, हे रोहिणीबाईंनी ताडलं होतं. 

आपल्या बेडरुममधून बाहेर येत... रोहिणीबाई अनिषच्या बेडरुमच्या बंद दाराकडे बघत, किचनमध्ये गेल्या. आणि देव्हार्‍यातील देवाला हात जोडत... पुन्हा बंद दाराकडे बघतच, स्वतःच्या खोलीत परतल्या त्या. दाराच्या खालच्या फटीतून ट्यूबचा प्रकाश, दोनेक लाद्यांपर्यंत पसरला होता. पलंगावर बसत उशीखाली ठेवलेली माळ काढली रोहिणीबाईंनी, नी स्वामींचा जप केला एकशे आठ वेळा. "म्हणजे उजेड करुन वादावादी चाल्लीये तर"... असा विचार करतच रोहिणीबाईंनी, त्यांच्या मिस्टरांच्या फोटोकडे पाहिलं. त्यांच्याकडे बघत जरासं प्रकटपणेच बोलल्या रोहिणीबाई... "तुम्ही नका काळजी करु... मी आहे". आणि मंदसं हसत नाईटलँप बंद केला, नी अंथरुणाला पाठ टेकली त्यांनी. 

रात्रीच्या ह्या पाऊणेक तासांच्या झोपमोडीमुळे, रोहिणीबाईंचा डोळा अंमळ उशिरानेच उघडला सकाळचा. त्या उठल्या तेव्हा... दिवा न लावता घड्याळात किती वाजलेत, हे दिसण्याएवढं उजाडलं होतं. रोहिणीबाई घाईतच उठल्या... अंथरुण - पांघरुण आवरुन, प्रातर्विधी आटोपून... चहाचं आधण चढवलं त्यांनी. किचनच्या घड्याळात आठ वाजले होते तोपर्यंत. "म्हणजे पावणे आठ... आज रविवारच आहे, तेव्हा पोरं काही दहा शिवाय उठायची नाहीत... पोह्यांसाठी चिराचीरी करुन ठेऊ... मुलं उठली की घेऊ करायला". असा विचार करत रोहिणीबाई चहाचा कप घेऊन, हाॅलमधील सोफ्यावर येऊन बसल्या. पहिला घोट घेतलाच होता त्यांनी की, त्यांना आपल्या रुमचा दरवाजा उघडून मेघना येतांना दिसली. आंघोळ करुन, तयार वगैरे होऊन... खांद्यावर एक मोठाली बॅग अडकवून. रोहिणीबाई जराशा चक्रावल्याच. सोफ्यावरुन लगबगीने उठत त्यानी मेघनाला विचारलं... "काय गं... रविवारचं एवढ्या लवकर तयार होऊन कोणीकडे दौरा?... आणि अनिष कुठेय?". मेघनाने खांद्यावरची बॅग खाली ठेवली, आणि मान खाली घालून उभी राहीली ती. तिच्या गालांवरुन ओघळलेले थेंब पाहिले रोहिणीबाईंनी... आणि वेळ न दवडता मेघनाच्या हाताला धरत, तिला सोफ्यावर बसवलं त्यांनी. तिच्या शेजारी बसत... तिचा हात आपल्या हातात धरत विचारलं त्यांनी, कारण तिच्या अस्वस्थतेचं. मेघना काहीही न बोलता, नुसतीच मुसमुसत होती. तेवढ्यात अनिषही आला बाहेर. एकदा मेघनाकडे... एकदा आईकडे बघून, तो डायनिंग टेबलजवळची खुर्ची ओढून त्यावर बसला. मेघना काही बोलत नाही पाहून, रोहिणीबाईंनी आपला मोर्चा अनिषकडे वळवला... आणि विचारलं त्याला की, नेमकं काय झालंय. 

अनिषने सांगायला सुरुवात केली... "आई... आमच्या आॅफिसमध्ये, एक नताशा म्हणून मुलगी आहे... तिचा मला काल रात्री मेसेज आला... आणि तो मेघनाने पाहिला, म्हणून ती अपसेट झालीये". मेघनाने आता चेंडू आपल्या कोर्टात आलाय पाहून, तो तटावला... "रात्री अडीच वाजता कुठला मेसेज पाठवला तिने, ते ही सांग ना... तुमची कुठली UAT सक्सेसफुली रन झाली, किंवा तिचं कोणी अचानक गेलं वगैरे सांगणारा मेसेज नव्हता तो... इट वाॅज अ पाॅर्न क्लीप शी सेंट टू यू... आणि खाली डोळा मारणारे, नी डोळ्यांत बदाम असणारे स्माईलीज... रात्री अडीच वाजता?... रादर अॅट एनी पाॅईंट आॅफ टाईम, आॅफिसमधल्या लेडी कलिगने अशी क्लीप पाठवावी?... डोन्ट यू फाईंड एनीथींग राँग इन इट?". अनिष सारवासारव करत बोलू लागला... "मेघना मी तुला तेच तर सांगत होतो ना... अगं नताशा मॅड आहे... ती सगळ्यांशीच अशी वागते आॅफिसमध्ये... एकटी राहते... अनमॅरीड आहे... स्वत्ःच्या टर्म्स नी कन्डिशन्सवर आयुष्य जगते... अर्धा खोका CTC घेते... आणि तो जेन्ट्सबरोबर पार्ट्या, क्लब्जमध्ये उडवते... पण अर्ध्या रात्री कोणीही तिला फोन करावा, ताबडतोब मदतीला धाऊन जाते ती... ते ही पैसे घेऊन, परतफेडीची अपेक्षा न ठेवता... अॅटलीस्ट नाॅट इन टर्म्स आॅफ मनी... शी इज व्हेरी हायली क्वालिफाईड, अँड वाॅज रनिंग आवर सिंगापोर आॅफिस अप टू द लास्ट इअर... तिची आई एक्स्पायर्ड झाली, आणि ती इथे आली... खूप मोठ्या पोझिशनवर आहे ती... आमच्या CEO ला डायरेक्ट रिपोर्टींग करते... तिच्या हाताखाली सात मॅनेजर्स आहेत, ज्यांपैकी एकाच्या अंडर मी आहे... आय कॅन नाॅट से एनिथींग टू हर डॅमईट... ही अशी लोकं वाकड्यात गेलेल्यांचं, करिअरही बर्बाद करु शकतात... तिचा इगो नाही दुखावू शकत मी, प्लिज अंडरस्टँड धीस फाॅर गाॅड्स सेक". 

अनिष एवढं बोलून... टेबलवर जोरात हात आपटून, खाली जमिनीवर बघत बसून राहिला. मेघनाने संतापून विचारलं अनिषला... "म्हणजे उद्या ती तुला तिच्याबरोबर नाईट स्पेन्ड करायला सांगेल, तर तू ते ही करणार का?... थिंकींग शी वुईल रुईन युवर करीअर, इफ यू से नो टू हर". अनिषने काहीही न बोलता मुठ वळवत, पुन्हा टेबलवर आपटली. मेघना दोन्ही हात तोंडाशी नेऊन, आता हमसून हमसून रडू लागली. इतकावेळ हे सगळं ऐकत, नी बघत असलेल्या रोहिणीबाई बोलू लागल्या... "कोणीही कितीही पाॅवरफुल असो, पण आपला कणा गहाण टाकू नये रे कोणापाशी... काय होईल?... नोकरी जाईल ना... अरे दुसरी मिळेल... अर्ध्या पगाराची मिळेल... किंवा मिळणारच नाही ना... अरे स्वतःची कन्सल्टींग सुरु कर... CS आहेस तू... वेळ लागेल जम बसायला... पण पैशाच्या हव्यासापाई, स्वतःला इतकं मिंधं करु नकोस रे कोणासमोर... आणि गेलं वर्षभर जर ती बाई त्रास देतेय तुला, तर तू हे आधी का बोलला नाहीस?... म्हणजे तुला ते मिळणारे महिना अडीच लाख जास्त महत्वाचे वाटले, स्वतःच्या स्वाभिमानापुढे... ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही, ते ही कदाचित अशी पिळवणूक सहन करणार नाहीत... मग तुझ्यासारख्या उच्चशिक्षितांनी का झुकावं अशा हुकूमशहांपुढे?". आईचं बोलणं ऐकून अनिष म्हणाला... "आई... अगं फक्त इतकंच कारण नाहीये गं... नताशाला धरुन राहीलो तर पुढे - मागे मला साऊथईस्ट एशियाचा हेड करुन, सिंगापोर आॅफीसलाही पाठवू शकते कंपनी आमची... मला खूप चांगले प्राॅस्पेक्ट्स आहेत आई, जर मी नताशाला न दुखावता राहिलो". रोहिणीबाईंनी अनिषला विचारलं... "म्हणजे उद्या नताशाने तुला... म्हणजे मेघना मघा म्हणाली तसं काही.. म्हणजे मग तू ते ही... म्हणजे...". अनिषने आईला हाताने थांबवत सांगितलं... "हो आई... मी ते ही करेन... रादर करावंच लागेल... काॅर्पोरेट कल्चरमध्ये हे करावंच लागतं, इफ यू रिअली वाॅन्ट टू अचिव्ह समथींग बिग... आणि इथे आपल्या बोटांवर नाचवणार्‍यांचं जेंडर नसतं... जितक्या मुली एक्स्प्लाॅईट होतात इथे, तितकेच मुलंही होतात... मुलांचं नशिबच म्हणायचं जर हे एक्स्प्लाॅईटेशन करणारी, कोणी बाई असेल तर... नाहीतर...". 

रोहिणीबाईंनी अर्ध्यावरच थांबवलं अनिषला. मेघनाकडे पाहिलं त्यांनी नी म्हणाल्या... "इतका डोक्यात विचार पक्का आहे त्याच्या... इतकं ध्येय ठरवून बसलाय तो आयुष्यात, आणि त्याची शिक्षा तू स्वतःला देतीयेस?... तू घर सोडून चाललीयेस?... बॅग उचल नी आत नेऊन ठेव... आणि अनिष तू... घरातून जर कोणी बाहेर जाईल, तर तो तू जाशील... कारण आम्हाला फक्त एकमेकींचीच गरज आहे... हिची नॅशनलाईज्ड बँकेतली नोकरी आणि ह्यांचं मिळणारं अर्ध पेन्शन, आम्हाला पुरेसं आहे व्यवस्थित जगण्यासाठी... पण ह्या महानगराने मुळासकट गिळंकृत केलेल्या तुला, आता  गरज राहिलेली नाहीये आमची... तेव्हा तुझा रस्ता तुला मोकळा आहे, तुझ्या पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी... तू बॅग भर तुझी, नी आत्ताच्या आत्ता निघ इथून... फक्त जातांना तो खुंटीला अडकवलेला, तुझा कणाही घेऊन जा... जेव्हा कधी वापरायची वेळ येईल, तेव्हा तो जरुर वापर... नी तेव्हाच पुन्हा घरी ये... मेघना तू अगदी आल्यापासून मला 'ए आई' म्हणतेयस ना... बघ ही आई तिच्या मुलीच्या पाठीशी उभी राहीलीये आज... बॅग आत ठेऊन ये तुझी, मी आपल्या दोघींसाठी पोहे करतीये".

मेघना आणि रोहिणीबाई एकमेकींना धरुन आत जातांना, काही बोलण्यासाठी अनिष उभा राहिला. आणि तेवढ्यात त्याला मेसेज रिसिव्ह झाल्याचं, नोटिफिकेशन आलं. नताशाचा मेसेज वाचून तो अॅकनाॅलेज करेपर्यंत... मेघना आणि रोहिणीबाई दोघीही अनिषला ओलांडून, पुढे निघून गेल्या होत्या.

---सचिन श. देशपांडे

वरील कथा श्री सचिन देशपांडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post