अशीही एक राखी पौर्णिमा

 #अशीही_राखीपौर्णिमा

बीना बाचल

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ्या ते सिग्नल लागला की प्रत्येक गाडीसमोर नेऊन विकायचा.दहा गजरे विकले तर कुठे ५-१० रुपये त्याच्या हाती पडायचे.तेही मल्ली नं धडपणे दिले तर!! नाही तर रोजची भांडणं ठरलेली. बरं कचऱ्या एकदम प्रामाणिक, एकही गजरा न मारता जेवढे विकले गेले त्याचा हिशोब द्यायचा.बाकीची पोरं कितीतरी वेळा अफरातफर करायची. कचऱ्याला खूप चिडवायची. " अरे ,आपन भिकारी ,भिकारीच राहणार .एवढा सिध राहून काय तुला स्वर्ग भेटणार हाय काय" पण अशा बोलण्याचा कचऱ्यावर काही परिणाम व्हायचा नाही. त्याचं नाव सुद्धा मल्लीची च देण होती, आई बापाचा पत्ता नाही अन नाव कोण ठेवणार!! कचऱ्यात सापडला म्हणून कचऱ्या नाव ,बस्स!! 

            एकदा कचऱ्या फुटपाथवर झोपला होता तेव्हा त्याच्या उशाशी एक लहान पोर कोणीतरी सोडून गेलं, तिच्या कर्कश रडण्याने कचऱ्या जागा झाला. एक अगदी नवजात मुलगी होती आणि कोणीतरी तिला असं फुटपाथवर सोडून गेले होते.बस त्या दिवसापासून ते आज पर्यंत कचऱ्याने तिला आपली बहीण मानली.तिची सगळी काळजी घ्यायचा. जे काय शिळं पाक मिळेल ते आधी तिला भरवायचा मगच स्वतः खायचा.तिला नावही त्यानं अगदी छान दिलं होतं, 'सोना' ,आपल्या सारखी कचऱ्यात सापडली म्हणून काय झालं, आपल्या साठी तर सोन्यासारखीच आहे ना,म्हणून सोना!! तर असं सोना आणि कचऱ्याचे आयुष्य त्या सिग्नल वर टळत होतं. सणासुदीला त्याचे गजरे जास्त विकले गेले तर कचऱ्या सोना ला घेऊन कुल्फी खाऊन यायचा. तो दिवस म्हणजे त्यांचा एकदम 'पेशल' दिवस असायचा.

अशातच श्रावण महिना सुरू झाला आणि राखीपौर्णिमेचा सण जवळ येऊन ठेपला., रस्त्यावरच्या  घाई-गर्दीमुळे वरून आणि लोकांच्या हातातल्या खरेदी ने कचऱ्याच्या  लगेच लक्षात यायचं  की  सण  जवळ आलाय, कचऱ्या त्यातच खुश "आता भरपूर गजरे विकले जाणार'! मग तो सोना ला स्वप्न दाखवायचा " आपण बी असंच दुकानात जायचं, कपडे खाऊ सगळं सगळं घ्यायचं.सोनाला ते खरं ही वाटायचं. लहान होती ना ती म्हणून, तसा कचऱ्या ही फार मोठा नव्हता असेल जेमतेम 12-13वर्षाचा, पण ह्या दुनियेने त्याला केव्हाच मोठं केलं होतं.

          आज राखीपौर्णिमा होती,म्हणून कचऱ्याने सोनाला शेजारच्या नळावर मस्त अंघोळ घातली, एक त्यातल्या त्यात बरा फ्रॉक चढवला. तिला म्हणाला" आज भाऊ बहिणीचा मोटा सन असतोय, तेव्हा तुला काय पाहिजे ते सांग,आज मी ते तुला देणार." सोना बोलून गेली"दादा आज समोरच्या हाटेलात मला पोटभर जेवाय दे,बस" कचऱ्या हिशोब करू लागला.समोरच्या हाटेलात खायचं म्हणजे 60-70 रुपये पाहिजे म्हणजे आज लै च धावव लागणार, पण हरकत नाही. आज सोना साठी धावू.,गेले कित्येक दिवस दोघे पोटभर जेवलीच नव्हती,तेव्हा आज तरी बघू जमतंय का" कचऱ्या भराभर आवरून तयार झाला.कोणी पुण्यवानांनी त्याला सकाळीच चा-बिस्कुट खाऊ दिलं. कचऱ्याला हुरूप आला. दिवसभर ह्या गाडीच्या मागे धाव ,त्या गाडीच्या मागे धाव असं करत दुपार झाली. अजून निम्मे पैसे पण जमा नव्हते झाले. कचऱ्या जरा सावलीत येऊन बसला, खायला काहीच नव्हते म्हणून पाणी प्यायला. परत थोडा वेळानं धावू लागला.पण अचानक वातावरण च बदललं .दुपारपासून कडक ऊन होतं आणि आता आभाळ भरून आलं, जोराचा वारा वाहायला लागला आणि बघता बघता पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागले, सगळ्यांची पळापळ झाली.कचऱ्याचा जीव थोडा थोडा होऊ लागला, "आता ह्या पावसामुळं गाडीतले लोक काचाच खाली करणार न्हाईत, मग कसं गजरे विकायचे?" त्याचं डोकं विचारांनी भरून गेलं,तरीही त्या पावसात तो धावतच होता.पण त्याला आलेली शंका खरी होती, कोणीही काचा खाली घेऊन त्याच्या गजऱ्यांकडे पाहिना!! कचऱ्या गाडीच्या काचेवर अलगद हातांनी गजरे दाखवत फिरत होता.हवेत गारवा दाटून आला, अंधारून आले, सकाळपासून कचऱ्याच्या पोटात एक कप चहा पलीकडे काही नव्हते, त्यामुळे त्याला दमायला झालं.थोडा वेळ बसावं वाटू लागलं. त्यानं सिग्नलच्या खांबापाशी जागा शोधली आणि तिथेच टेकला. हातात गजरे आणि डोळ्यात दमून गेल्यामुळे आलेली ग्लानी, त्याचे डोळे कधी मिटले त्याचं त्यालाच कळेना!! तोंडातून लाळेचा ओघळ गेला इतका गाढ झोपला त्या कोलाहलात ही तो!! आणि अचानक विजेच्या कडकडाटाने त्याला जाग आली, नीट जाग येईपर्यंत त्याच्या लक्षात आलं की बराच उशीर झालाय आणि सोना त्याची वाट बघत असेल.आपण काय तिला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो नाही, अगदी निराश वाटलं त्याला. तो तसाच जड पावलांनी सोना कडे निघाला, सगळे गजरे विकले नाहीत म्हणून मल्लीच्या चार कचकचीत शिव्या खाल्ल्या.खाली मान घालून तसाच हातात मल्लिने दिलेले पैसे घेऊन पुढे निघाला. वर आकाशाकडे बघत त्यानं हात केला' देवा, फार नव्हतं मागितलं रे,फकस्त एक वेळचं पोटभर जेवन हवं होतं,ते बी नाय दिलंस'. भरलेले डोळे घेऊन तो सोनापाशी येऊन बसला. सोना त्याची वाटच बघत होती, पण त्याच्या तोंडाकडे बघून काय ते ती समजली.तीही मग गप्प बसून राहिली. तेवढ्यात एक मोटर कार त्यांच्या समोर येऊन उभी राहिली, त्यातून एक जोडपं बाहेर पडलं. त्यांच्या हातात बऱ्याच पिशव्या होत्या. त्यांनी त्यातल्या दोन चार पिशव्या काढल्या आणि कचऱ्या आणि सोना पाशी दिल्या.आणि भुर्रकन निघून गेले. पिशवी उघडताच त्यात राखी ,खाण्याचे पदार्थ, पुरी भाजी ची पॅकेट, नवीन कपडे असं बरंच काही होतं, कचऱ्या आणि सोना ते डोळे मोठे करून पाहतच राहिले.कचऱ्याने सोनाकडून त्यातली राखी बांधून घेतली आणि मोठ्या आनंदाने दोघेही आज पोटभर जेवली.कोणा तिऱ्हाईताकडून का होईना पण आज त्यांची राखीपौर्णिमा साजरी झाली!!

                इकडे गाडीतल्या जोडप्याचा संवाद" कधीच या दिशेला येत नाही आपण ,पण आपल्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी भरलं म्हणून इकडे वळावं लागलं. हरकत नाही पण बाबाजींनी सांगितल्या प्रमाणे निराधार मुलांना वेळेत अन्न-कपडे,राख्या तरी देता आले, नाहीतर ह्या भर पावसात एक भिकारी दिसत नव्हता रस्त्यावर!आता तरी आपल्या घरी पाळणा....."त्या जोडप्यातल्या तिचा आवाज  हुंदक्याने गळ्यातच अडकला.

आणि वर देवाचा संवाद सुरू झाला"  ही सगळी माझीच लेकरं, मग कचऱ्या आणि सोनाला मी आज उपाशी कसं झोपू दिलं असतं!!" अशा प्रकारे ह्या सगळ्या संवादांचे ठिपके जोडत  एक सुरेखशी रांगोळी तयार झाली!!

देव करो आणि येणारा प्रत्येक सण असाच एकमेकांच्या आयुष्यतील उणिवा भरून काढत सुख समाधानाने साजरा व्हावा. पृथ्वीवरचा कुठलाच जीव उपाशी राहू नये, सगळीकडे आनंदीआनंद पसरावा!!

 

 सौ.बिना समीर बाचल.

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


याच लेखिकेची ही कथा ही वाचून पहा.

👇

प्रेमाचा सोहळा

Post a Comment (0)
Previous Post Next Post