उपलवटी वांदर (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
लेखक-प्रा.श्रीराम काळे, देवगड, सिंधुदुर्ग
त्यावर्षी दसरा झाला नी अकल्पितपणे टोळधाडी सारख्या वादरांची टोळी आमच्या गावात दाखल झाली. आमच्या आगराला लागूनच हरीभाऊंच घर नी आगर. त्यांच्या मागिल दारी न्हाणीघर विहीर आणि खालच्या अंगाला रामाच्या देवळाजवळ डेगेबरोबर महाप्रचंड चिंचेचं झाड. दोन बापयांच्या वेंगेत मावणार नाही इतकं मोठं सहा एक हात उंच कांड नी त्यावर चार उंच डेळे. अगदी वाटणी करावी तसे निम्मे विस्तॎर हरीभाऊंच्या आगरात नी अर्धाविस्तार आमच्या आगरात. आम्ही भावंडं सकाळी दात घाशीत घाशीत अंगणात गेलो नी हुप्प हुप्प असा आवाजआला म्हणून पहातोय तर चिंचेवर वांदर बसले दिसले. आवाज आयकून आज्जीही बाहेर अंगणात आली . आम्ही कौतुकाने चिंचेकडे बोटं करून ते बघ कित्ती वांदर आलेहेत ते. नीट निरखून बघितल्यावर आज्जीने म्हटलं, “अरे त्या सगळ्या वांदरीणी आहेत. बाजूला त्या आडव्या फाट्यावर बसलेला आहे ना....तो वांदर...त्याला हुप्प्या म्हणतात. तो नर आहे नी बाकीच्या त्या सगळ्या माद्या.”
चहा घेताना काका म्हणाले, “आत्तापर्यंत हा क्लेश नव्हता.आता ह्यांचा उपलवट बघायला नको,अळं वारवं काय्येक व्हायला द्यायचे नाय. आंबा, पेरू कायकाय लाभयचा नाय. मळ्यातल्या कडदणाचा तुळांकार झाला. भंगली नासकर्मी जात.....खाणार त्याच्या दसपट नासाडी करणार. ” त्यांचं बोलणं सुरु असताना तानू बाणे कामाला आला. त्याने बातमी आणलीन की संध्याकाळीच एक टोळी पर्ल्या बामणाच्या आवाठात अष्टावर आली नी तिथून मग घोरिप चिंचेवर वस्तीला थांबलेली.प्रत्येक टोळीत पंचवीसपेक्षा जास्त वांदरीणी आहेत. आठ दिवसा मागे भुईबावडा घाटातून तीन-चार टोळ्या वलाटीत उतरल्या नी तिथून एकेक गाव घेत मोरोशी, प्रिंदावण , उपळे, तारळ या खाडपट्ट्यातल्या गावानी स्थिरावल्या. तारळकरानी ही टोळी आमच्या गावात पिटाळून दिलेनी. आप्पा म्हणाले ती पिटाळून जाणारे विवशी नाय...“जय खाणां मिळात थय ऱ्हवणार..... चिच म्हंजे तेंचा आदस्थान.... चिचेक बारामाही फुटवो येता. खय काय खाणां नाय मिळाला तर चिचेचो पालो हा, वांदर तेका लय लबूत. तासाभराने रामाच्या देवळावरच्या छपरावर नी तिथून पुढे धोदांब्यावर उड्या टाकीत वांदर नपश्चात झाले.
आमचा नावळे गाव म्हणजे खाडी किनाऱ्या लगत ची चिंचोळी पाजोटी. वरच्या कडेला पहिलीच धुमाळ वाडी, तिथून खाली एकदम टोकाच्या भंडार वाडीत पोचायला अगदी चालसूर माणूस असला तरी खाडी किनाऱ्याने किंवा वरून सड्याची धार धरून कुठच्याही वाटेने पावणेदोन तासाची राखण. सड्याची धार माडभर उंचीवर. कुठच्याही वाडीतून सडा गाठायचा तर दमछाक करणारी घाटी चुकली नाही. धुमाळवाडीतली वाडीतली घरं तेवढी टापूवर कातळी भागात. पण खाली गावाच्या टोकापर्यंत सड्याची धार सुरु होते त्या आधीच्या सवथळ भागात नी खाली मळा त्यापुढे खाडी. मळे जमिनीत फाल्गुनापर्यंत आंग ओल टिकून असायची म्हणून दसऱ्या ला भातं कापून झाली कि, कुळीथ,चवळी,वरणे, मूग, उडिद ही कडदणं पेरीत.काही जण भुईमूग ,वांगी,मुळा,नवलकोल ,मिर्ची ,पोकळा,माठ अशा भाज्या पिकवीत . या जित्रबाला पाणी शिंपायची गरज नसे,ते आंग ओलीवर होई. चैत्र वैखाख दोन महिने मळे उखळून पड टाकलेले असत.मळ्याच्या टोकाला खाडी किना ऱ्या ला माड, उसही विना शिंपण्याचे होत! त्यामुळे वांदराना बारा महिने विपुल खाद्य मिळायचं.
भुईमूगची फुलं जमिनीत रिगायची खोटी की वांदर उपडून खायला सुरुवात करीत. उसाचे शेंडके मोडून दोन दोन-तीनतीन पेरांचे तुकडे मोडून न्हेत. मिर्ची सोडली तर त्याना बाकी कशाचाच वगळ नव्हता कडदणाची अख्खी ढाकंच(रोप) उपटून नेत .... एखादी शेंग खात नी हातातलं ढाक तिथेच टाकून दुसरं ढाक उपटून नेत. मुळे नवलकोल उपटून जरासे चाबल्यासारखे करून टाकीत. चवळीच्या पाल्याला तर वांदर एका नंबर लंपट. चवळीचा पाला ओरबडून वेलाचा पुरता विद्वास करीत.अख्ख्या टोळीने एकदा का जित्राबात पाय टाकला की नासाडी बघून डोळ्यान टीपं काढायची पाळी येई.एकदा ह्या हैवानांची फेरी येवून गेली की महिनाभर जित्रब वर येत नसे. त्यामुळे मळ्यात राखण धरायचं एक नवीन शुक्लकाष्ट गाववाल्यांच्या मागे लागलं वांदर एवढे हुषार की कसली चाहूल लागू न देता मळ्याच्या कडणीला असलेल्या झाडांवर दबा धरून बसत नी राखणा न्हेरी करायला किंवा न्हायला म्हणून दहा मिनीटासाठी घराकडे गेला की खाली उतरून धाड घालीत. त्यांचा म्होरक्या टेहळणी करीत बसून असे . राखणा येताना दिसला ख्यॅक ख्यॅक करून कळपाला सावधगिरीचा इशारा देत असे नी मिळतील ती ढाकं उपडून वांदरं पळ काढीत असत.
आता राखणीला बसलेला माणूस पाच मिनीटंही बाजूला जायचं झालं तरी कुकारे मारून घरातून दुसरं माणूस आल्याशिवाय चाळवेनासा झाला. सकाळी दिसायला लागलं की लगेच राखण धरावी लागे ती अगदी सूर्य मावळतीला जाईपर्यंत. त्यात जरा चाल ढकल झाली तरी वांदर डाव साधीत. माणसानी कायमराखण धरल्यावर वांदरांची पंचाईत व्हायला लागली. कळपातल्या बहुतांश वांदरीणी गाभण असाव्यात कारण त्यांची पोटं टिळटिळीत दिसायला लागलेली.त्याचमुळे त्याना खावखाव सुटली होती काय न कळे..... वांदराची जात सालीभलतीच हुषारनी तल्लख़! माणसानी खडा पहारा धरल्यावर त्यानीही शक्कल लढवली. खाडीच्या पाण्यात चिखलवटीत कांदळ- चिपींची मोठमोठी झाडं वाढलेली. वांदरीणी खाजणातून कांदळाच्या नी चिपीच्या झाडावरून उड्या मारीत खाडीकडच्या बाजूने मळ्यात शिरत. राखणा वरच्या कडेवर बसलेला. त्याचं लक्ष नसलं तर वांदरांची धाड पडल्याचं उशिरा कळायचं.नी लक्ष गेलच तरी तोउठून येईपर्यंत वांदराना कार्यभाग साधता येत असे.
काहीवेळा कांदळाकडून वांदर मळ्यात शिरत .नेमके त्या वेळी मच्छीमार होड्या खाडीतून जायला लागल्याकी त्यांचा टेहळ्या ख्यॅक्क ख्यॅक्क करून इशारा देई नी तो आवाज ऐकून राखणा सावध होई . काही वेळा गरवायला किंवा पाग धरायला तर कधी कुर्ल्या धरायला कोणी ना कोणी येत घाबरून वांदरांचा टेहळ्या इशारत देई नी राखणा सावध होई.तरी त्या गडबडीतही वांदरांची हातचलाखी वाखाणण्यासारखी असे.... ते रिकाम्या हाताने पळत नसत. या प्रकारात नजर चुकवून वांदर मळ्यात घुसलेच तरी नासाडी फारच कमी व्हायची. त्याना खाताना जरा निवांतपण मिळालं की त्यांच्या मर्कट चेष्टाना उत यायचा,नी खाणं कमी नासाडी अधिक अशी गत व्हायची. वांदर खाडीच्या दिशेने यातला लागल्यावर राखणे शेतात मध्यवर्ती मचाणावर बसून राखण धरायला लागले. काहीजणां सोबत कुत्रे असत. कुत्र्यांना जरा चाहूल लागली तरी ते भुंकायला लागत.काही वेळा कांदळात घुसून वांदरांचा ताणपट्टा काढीत. वरच्या अंगाला वस्ती नव्हती अशा ठिकाणी राखणा मचाणावर असला तरी गावदरीकडच्या बाजूला झाडकळीच्या आडोशाने वांदराना गुपचूप मळ्यात रिगायला मिळे नी राखणा येईपर्यंत काही ना काही डल्ला मारता येत असे.
आठ दहा वर्षात वांदरांच्या संख्येत वाढ झाली. कळपात नव्या हुप्याचे राज्य आले. जुना हुप्या नी कळपातल्या दोन तरण्या हुप्याना कळपातल्या नराने हाकलून लावले . दोन हुप्ये जोडीने रहात. पण म्हाताऱ्या हुप्याचे त्यांच्याशी झोंबट लागे म्हणून तो एकवशी पडला. तो कायम कळपाच्या मागून फिरत असे. गावात एकटं-दुकटं पोर,बाई माणूस दिसलं तर दात विचकून त्यांची पाठ घेई . हरीभटाच्या चिंचेवर हुपट बसलेला होता. त्यांची मुलगी डोणीवर कपडे धुवीत असताना हुप्प्या पाणी खायला उतरला. कामाच्या नादात रजुताईचं लक्षच गेलं नाही.पाठीमागे ख्यॅक ख्यॅक आवाज आला म्हणून तिने वळून बघितलन नी जोरात बोंब मारलीन. आम्ही अंगणात खेळत होतो. लगेच विहीरीकडे धाव घेतली नी आम्हाला बघितल्यावर हुप्प्या चिंचेवर चढून गेला. तावडीत गावलेल्या एक दोन पोराना त्याने चांगलंच फांजळून काढलन. त्याची नख़ं लागून झालेल्या जखमा आब्रावल्या. तो हुप्प्या एकदा घाटीत बसलेला असताना घाड्यांच्या पोरानी पाच सहा कुत्रे सोबत नेवून त्याला आडावून आडावून सड्यावर पिटाळलेनी. त्याचा चांगला ताणपट्टा काढल्यावर तो टेकीला आला नी कुत्र्यांच्या तावडीत गावल्यावर कुत्र्यानी त्याला फाडून खाल्लेनी.
तरणे हुप्ये कायम कळपाच्या माग़ून फिरायचे . कळप येवून गेला की मागोमाग हुकुमी त्यांची फेरी व्हायची. त्यांची रात्रीची वस्ती कायम घोरीप चिंचेवर असे. ही जोडी मात्र भलतीच बिलंदर! दोघे दोन बाजूने मळ्यात रिगायला उतरत. राखणा हाकलायला गेला तरी हुप्या त्याला हुलकावण्या दाखवीत अंगावर घ्यायचा नी तेवढ्या वेळात दुसरा हुप्या घुशी करून हाताला मिळेल ते घेवून पसार होई. कधितरी कळप पुढे निघून गेला तरी एखादी मादी खाण्याच्या नादात मागे रहायची. त्यावेळी मागोमाग हुप्यांची जोडी आली की त्यांची दंगामस्ती सुरु व्हायची. काही वेळा कळपातून मागे ऱ्हायलेल्या दोन दोन माद्या सुद्धा ह्या हुप्यांबरोबर रहायच्या. टोळीतल्या नराची नजर गेली की तो चाल करून येई. जोडीतल्या एखाद्या नराशी त्याचं झोंबट लागे. नी त्याला फांजाळलन की तो पळून जाई नी माद्या पुन्हा कळपात रिगत.
गावात तीनचार चौसोपी - राजांगण असलेले वाडे होते. दुपारी माणसं जेऊन खाऊन पडायची.अशा निवांतवेळी वांदर राजांगणातून आत शिरत. घरात हुसकाहुसकी करून हाताला लागेल ती खाणे वस्तू घेऊन पोबारा करीत. काही वेळा माणसे उठल्यानंतर उसक पासक दिसल्यावर वांदर येवून गेल्याचे कळायचे. काही वेळा भांड्याचा किंवा फडताळ उघडल्याचा आवाज होऊन माणसाना चाहूल लागे नी वांदर घरभर सैरावैरा धावत. पर्ल्या बामणाच्या घराजवळ अष्टाचे झाड गगनावेरी उंच गेलेले. हा वांदरांचा आसराच होता. कैक वेळी रात्री त्या झाडावर वांदरांची बसल असे.पर्ल्याच्या आगरात चिकू, पेरू, रामफळीची मुबलक झाडे. केळीचे तर बनच होते. “माज्याकडे दर दोन दिवसान घड तुटता” असे पर्ल्या मोठ्या अभिमानाने सांगे. त्याला वांदरांचा त्रास फारच होई. त्याच्याकडे आल्सेशियन कुत्रा बाळगलेला होता . तो भलताच तिखट , परिचयाचे चार गडी नी पैरी वगळता कोण येईल त्याच्यावर कुत्रा तुटून पडायचा.
ओसरीवर छोटेखानी दुकान असायचे त्यामुळे सारखी गिऱ्हाईकांची येतुक जातुक असायची म्हणून कुत्रा बांधूनच ठेवावा लागे. त्यात वांदरांचे चांगले फावे. सुरुवातीला जरा चाहूल लागली की कुत्रा बेजान भुंके नी अगदी अष्टावर बसलेले वांदरही भिऊन पळ काढीत. पण दिवस गेले तशी वांदराना सवय झाली नी ते घाबरेनासे झाले. ओसरीवर कुत्रा बांधलेला असताना दुपारच्या शांत वेळी वांदर राजांगणातून पर्ल्याच्या घरात शिरले. ते छपरावर आल्यापासून कुत्र्याने भुंकून सकनात केला. पण ते नेहेमीचेच असल्याने कुणीच दखल घेतली नाही. वांदरानी ताकातला लोण्याचा गोळा काढून घेताना टेबलावर ठेवलेली चिनी मातीची बरणी ठो करून पडली नी त्या आवाजाने त्याची आई जागी झाली. ती स्वयंपाक घराकडे गेली नी आत वांदर बघून तिने घाबरून बोंबलायला सुरुवात केली. तेव्हा वांदरांची पळापळी सुरु झाली . बापये नेमके काठ्या घेवून राजांगणा भोवती असल्यामुळे वांदराना बाहेर पळायला मिळेना. त्यानी इतस्तत: धावायला, उड्या मारायला सुरुवात केली. उशिराने ही गोष्ट पर्ल्याच्या लक्षात आल्यावर “बाजूक होवा... तेंका जावंदेत ” असं ओरडल्यावर माणसं बाजुला झाली नी आल्या वाटेने वांदर छपरावर उड्या टाकून पळून गेले.
पर्ल्याची दुनळी काडतूसची बंदूक होती. परश्या सुतार ती शिकारीला नेत असे. तो पट्टीचा नेमबाज होता, तो बंदूक घेवून गेला की हुकमी कवडे, रानकोंबडे,लांडोरी, ससे, भेकर काही ना काही पारध आणायचा. त्यातला निम्मे वाटा पर्ल्याला मिळायचा. वांदरांची उपल्वट अतीच झाली तेव्हा त्याने परश्याला बोलावले.वांदरअष्टावरच बसलेले होते. पण वांदरावर बार टाकायला त्याने नकार दिला. “ ती मारुतीरायाची जातकूळ तेंच्यावर बार टाकीत तेचो वस वाढोचो नाय.... हवेत बार काडून पळवून लावया... पन तेंची हत्या आपल्याच्यान व्हनार नाय...” म्हणत त्याने हात जोडले. मग पर्ल्याने युक्ती योजली. त्यावेळी कलमावर फवारणी करायला एन्ड्रीन -डिमेक्रॉन ही विषारी औषधे येत. त्याने शेरभर शेंगदाणे त्या औषधात घोळवून उन्हात सुकवून वांदरांच्या बसायच्या जागांजवळ ठेवले. वांदर आले ....त्यानी औषधाच्या वासामुळे दाण्याना हातही लावला नाही. दोन दिवसानी चान्या, कांडेचोर मरून पडायला लागले. त्याने राजांगणाला लोखंडी जाळी लावून घेतली. त्याचं बघून मग गावातल्या सगळ्याच चौसोपी घरांच्या मालकानी राजांगणाला लोखंडी जाळ्या मारून वांदरांचा मार्ग बंद केला. वांदर जाळी वरून डोकावून बघीत पण आत जाता येत नसे.
हल्ली राखणी मुळे जवळ जवळ घरठेप कुत्रा बाळगलेला असायचा. कुत्रे सुद्धा ठायमूर मळ्यात बसून राखण थोडीच करणार? मालक राखणीला बसलेला असेल तेवढाच वेळ ते थांबत. मग कोणीतरी शक्कल लढवली . त्याच्या गळपट्ट्याला लांब रशी बांधून कुत्र्याला मळ्यात टांगलवून ठेवीत. वांदर आली की कुत्रा लांब अंतरापर्यंत धाव घेत जाई. कुत्र्याचा पल्ला हेरल्यावर त्याच्या बाहेरून वांदर मळ्यात रिगत. तरीही अंदाज फसून सुरवाती-सुरवातीला दोन तीन वांदर कुत्र्यांच्या कचाट्यात गावलेच. पण ते तेवढंच! या घटनां नंतर वांदर सावध झाले नी ही युक्तीही फुचूक झाली. काही जणानी चिव्याच्या काठीचे कागवळ त्याना आम्ही शिरड म्हणू. अशी शिरड नी भरीला कऱ्याचे - आंजणीचे फाटे वापरून सहा सात हात लांबनी दोन हात उंच तटकी बांधली . जित्राबाच्या चारी बाजूने अशी शिरडीची तटकी- सलडी उभी करून त्या कोंढाळ्यात कुत्र्याला कोंडून घालीत. कोंढाळ्यात जायला दोन हाती फ़ाडं ठेवून तिथे कवाडी लावीत. कुत्र्याला सलड्यांवरून उडी मारून बाहेर पडता येत नसे. शिरड मजबूत नी अशी गच्च आंथरलेली असे की कुठेच सांदी - फटी मिळत नसत. दुपारी कोणीतरी जावून कुत्र्याला भात-भाकरी नी थाटलीत पाणी ओतून येत. सकाळीच कुत्र्याला कोंढाळ्यात सोडीत नी काळवं पडल्यावर बाहेर काढीत.
पावसाच्या सुरवातीला आमच्या गावातून आवती, मलकी काठ्यांचे तीनतीन ट्रक भरून जात. गावात चार पाच ठिकाणी काठ्यांची घाऊक तोड व्हायची. हजारो काठी तुटायची नी ढिगानी शिरड साठायची. अंतू मिर्जुला नी त्याचे दोन पोरगे काठ्या तोडून नेणारा सुलेमान , बज्या भंडारी यांना पाचदहा रुपये देवून तिथली शिरड कबजात घेत. सराईबरोबर बाप लेक मिळून शे शंभर सलडी बांधून विकीत नी लोक खटखट न करता ती विकत घेत. मिर्जुला तटकी बांधायला कुंबयाचे बंद वापरी . तटकी उभी करताना कम जास्त सुंभाचे बंद घ्यावे लागत. दर वर्षी कोरम झालेला खूटखांबा बदलून अधे मधे सुंभाचे नवे बंद घेत राहीले की या सलड्याना आठेक सीझन तरी भंग नसे. थोडी कटकट नी उचापत पडे खरी पण वांदरांना आरेख पडला. मळ्यात जाय-यायच्या वाटा सोडल्या तर अशी शेकडो कोंढाळी असायची. क्वचीत एखाद्या वेळी वांदर घुशी करीत . तटक्याच्या फटीतून भोसकून भोसकून एखादे धाट ओढीतही. जुन्या कोरम झालेल्या तटक्यांची शिरड मोडून तिथे घबी पडत नी वांदरांच्या पाठलागात कुत्रे कोंढाळ्यातून बाहेर पडत. तिथे तोरणीची दोन काटेरी शिरडी आडवी बांधली की मग धास्ती नसायची. नी हे प्रकार अगदी चुकार व्हायचे.
एकदा तर एकदम पाच सहा वांद्रीणी एका वेळी तटक्यावर चढल्या. सलडं तीनचार सीझन पावसाचं पाणी खावून तकलादू झालेलं त्याला भार सहन झाला नाही नी सलडं पोटावर घेवून वांदरीणी आडव्या झाल्या. दोन सडे हुपट मात्र माजोर्डे झालेले.... मळ्यात चवळीवर असताना एख़ादाच कुत्रा भुंकत अंगावर गेला तर वांदर दात विचकून त्याच्या वरच चाल करून जात नी त्याला दुशी बाजुनी घेरून फांजळून काढीत. पण बव्हंशी ही दुक्कल कुत्र्याला हुलकावणी देवून त्याने एकाची पाठ घेतली की दुसरा वांगी- काकड्या ओरबडून पळ काढी रवी यादवाच्या म्हाताऱ्या कुत्र्याचा तर वांदरांशी झालेल्या झोंबटात एक डोळाच फ़ुटला. अर्थात चांगला दांडगा दुंडगा कुत्रा असला की हुप्यांची डाळ शिजत नसे. एकदा बाणेवाडी खालच्या मळ्यात कुत्र्याचे भुंकणे आयकून करट्यांची लगोरी खेळणारे दहावीस पोर मळ्यात गेले पोर आलेले बघितल्यावर हुप्ये खाडीच्या दिशेने पळाले. जोरगतीची सुकती असल्यामुळे खाडीत दोन्ही तडीना मोठी भाट पडलेली नी मधल्या पाच सहा वाव भागात भांगलवणी व्हावत होते. पोर डोकेबाज, हुप्ये कांदळातून निसटून गावदरीत घुसू नयेत म्हणून त्यानी वरच्या भागातून आडावीत आडावीत नी दग़ड मेखलावीत हुप्याना खालच्या दिशेने पिटाळलेनी. हा गदारोळ आयकून वाडीतले पाच पन्नास बापये खाडीच्या दिशेने धावले. “त्या भडयांक कांदळात घुसोक देवया नुको.... ते खाली उतारले काय पैलाडी पिटाळूया....” जमात वाढल्यामुळे हुप्यांचा निरुपाय झाला. खाली उतरून ते मोकळ्या खाडी पात्रातून धावायला लागले. आता लोकानी दगड मेखलवायला सुरवात केली नी हुप्ये भांगलवण्यात उतरले. लोकानी चिखलडीतून पुढे जावून आरडा ओरडा केल्यावर हुप्ये पोहत पोहत पलिकडे गेले. ते जे गेले ते गेले ,त्यानंतर पुन:श्च ते गावात दिसले नाहीत.
आंब्या फणसाच्या दिवसात एकदा का कळप कलमावर आला की बघायलाच नको. वांदर साधारण जुन झालेले आंबे डासळवून टाकीत नी दुसरा आंबा काढीत. त्यांची दंगामस्ती, पाठशिवणी , धडाधड उड्या मारणं ह्यात झाडाखाली आंब्यांचा नुस्ता खच पडे. ते फणसावर आली की एकेक फणस चेपून बघीत नी पिका फणस अचूक उमगून काढीत. मग दोन तीन वांदरीणी बोटानी उचकरून उचकरून चारखंड पेचीत एकेक गरा खात त्यांचा अगदी यथेच्छ फराळ चाले. जमिनीवर आठळांची पखळण व्हायची. उरला-सुरला भाग चान्या , कावळे खात नी सुकलेल्या पावी महिनोन् महिने लोंबकळत रहात. गाववाले त्यांच्या उच्छादाने गांजले. वांदरांचा विषय निघाल्यावर आमचे आमचे आप्पा म्हणत की , “साधारण एक तपानंतर निसर्गचक्रात म्हणा सामाजिक स्थितीत म्हणा काहीना काही परिवर्तन होत असते. ही वांदरांची विवशी आली हे हा त्यातलाच प्रकार. एक तप सरले की चक्र फिरेल नी ही उपल्वट आपसूख कमी होईल...” कलमी आंबे म्हणजे उत्पन्नाची बाब. पन्नासपासून शंभर,दोनशे चारशे ,पाचशे झाडं एवढ्या मोठ्या कलम बागा. त्यात राखणे बसवून घासलेटाचे रिकामे डबे वाजवून नी फटाके लावून वांदराना काय कर्म पळवून लावणार? सिझनपुरत्या करारावर बागा घेणारेसुद्धा वांदरांच्या भयान बागा करायला तयार होईनात. केलेनी तरी - आदी शिजन पुरो होवने, वांद्रांच्या उच्छादात्सून काय ऱ्हवता नी कितपत आंग वाटावणी होता ती बगूया नी मग्ये काय तां देन..... अशी रड लावीत.
भलुखोतांची बाराशे कलमांची बाग सवत कड्याजवळ गावदरी पासून जरा लांब. त्याना वांदरांचा उपद्रव सगळ्यात जास्त व्हायचा. लोक मळ्यात सलडी बांधूनआडवस करायला लागल्यावर तर साधारण सुपारी एवढं तोर झाल्यापासून वांदर सड्यावर बसल धरीत. काळवं पडलं म्हणून राखणे वाटेला लागले की दडून ऱ्हायलेले वांदर बागेत शिरत...तिथेच मुक्काम करीत नी बागेची लंका करून सकाळी राखणे पाखडीपर्यंत आले की हुप्प् हुप्प् करीत पसार होत. दहा वर्षात कलमांचे पाचशे रुपयेपण उभे झाले नाय. वांदर आल्यापासून दरवर्षी त्यांच्या संख्येत वाढच होत होती. तरी एक बरं की, टोळीच्या म्होरक्या पोरांच्या शेपट्या वर करून तपाशी नी जे नर असतील त्याना हापटून टाकी. पोरांच्या आया पोरं वाचवायची शिकस्त करीत पण म्होरक्या टेळ ठेवूनच असे नी आयशीपासून पोर जरा बाजूला गेलं की धरून हापटी. म्हणून वांदरांची संख्या थोडीतरी आरेखात ऱ्हायलेली होती.
जे सड्यावर तेच गावात. गावदरीतल्या झाडवाल्यानाही खायला आंबे मिळायची पंचाईत. कोणीतरी कातकरी (वांदरमारे) गावात आणून कायमस्वरूपी बाळगायचा सल्ला दिला. भलुखोतानी वाडीप्रमुखाना बोलावून हा प्रश्न मांडला नी सगळ्यानी रुकार दिला. त्यावेळी फोंड्याजवळ कातकऱ्यांची मोठी वसती असायची. गोडकर गुरुजींची फोंड्याला सासरवाड, त्यांच्यामार्फतीन शंकर कातकरी, त्याची बायको रुकी नी पोरगा हरी अशी तिघंही आली. गावात नव्वद नांदता उंबरा होता. बिऱ्हाडागणिक वार्षिक आठ आणे पट्टी, प्रत्येक आळीपाळीने घरठेप दुपारची चार भाकऱ्या दोन भाताची डिखळं नी भगुलंभर आमटी अशी वाडी द्यायची ठरली. वाडी न्ह्यायच्या निमित्ताने कातकरी दिवसाडी गावभर फिरत रहावा हा त्या मागचा मुख्य हेतू होता . भलुखोतानी त्याला सवत कड्याजवळ खोपटी बांधून रहायला दोन गुंठे जागा नी खोपटी बांधायला वासे,काठ्या, सुंभाचे बंद दिले. त्याने जमेल तसतसे वांदर मारून संपवायचे होते. बोली प्रमाणे पर्ल्या बामणाच्या घरापासून कातकऱ्याच्या वाडीची सुरुवात झाली.
काही असो पण कातकरी आल्या दिवसापासून वांदर कुठे दडी मारून बसले देव जाणे. बामणांचा अष्ट, घोरीप चिंच.हरीभटाची चिंच, गाबतडीतला ढोल्यावड, भरडातला नथू आग्र्याचा कळंब ही वांदरांची हुकुमी ठिकाणं पण कुठेच वांदर नजरेला पडेनासा झाला. शंकर तीरकामठा घेवून गावदरीत फिरे. रुकी नी हरी जेवणाची वाडी न्यायला येत. त्यांचा पायरव लागला की गावदरी पर्यंत आलेले वांदर सडा गाठीत. कातकरी सवत कड्यावर रहायला लागल्यावर गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दातकड्याकडे त्यानी आपला मुक्काम हालवला. वरच्या वाडीतली घरं संपून मधल्या वठारात दुपारच्या जेवणाची पाळी सुरु झाली. शंकर खोपटं बांधायच्या कामाला लागला. कातकरी आल्यापासून साधारण पाऊण महिन्यानंतर एक दिवस पर्ल्याच्या घराजवळ अष्टावर वांदर आले. पर्ल्याने लगेच गडी पाठवून शंकराला निरोप दिला. कुत्र्याच्या भुंकण्याने वांदर पळू नयेत म्हणून त्याला आगरात पार खाली न्हेवून बांधला. मध्यान्हीच्या टायमाला गडी नी कातकरी दोघेही आले. वारा खाडीकडून सड्याच्या दिशेला वहात असल्यामुळे वांदराना शंकराचा माग लागला नाही. तो दबकत दबकत पुढे येत होता. सगळीमाणसं मजा बघायला अंगणात जमली. वांदर त्यंच्याकडेच बघित राहिलेले .
वांदर तीराच्या टप्प्यात आल्यावर शंकराने बाण सोडला. बारक्या फांदीवर बसलेल्या एका वांदरीणीच्या बगलेत बाण घुसला, त्याबरोबर ती हातभर पुढे उडवली पण लगेच हाताला मिळाली ती फांदी गच्च धरून ती जरावेळ लोंबकळत राहिली नी मग धप्पकन खाली पडली. तीला बाणलागल्या बरोबर डोळ्याचं पातं लवण्यापूर्वी किच्च किच्च किच्च असे आवाज काढीत धडाधड उड्या टाकीत वांदर सड्याच्या दिशेने पळाले . पर्ल्या भलताच खूष झालेला. त्याने शंकराला जेवायला घातलं . शिवाय दोन रुपये , पानं,सुपारीची खांडं, तंबाखू,भला खासा गुळाचा ढेपसा नी चार मुठी चहाची बुकी बांधून दिली. बामणीकडून लुगड्याचा धडपा घेवून सामानाचं गाठलं बांधून मारलेल्या वांदराची शेपटी धरून लोंबवीत शंकर खोपट्याकडे निघाला.जाताना वाटोवाट वाडी प्रमुखाना मारलेला वांदर दाखवीत तो संध्याकाळी घरी पोचला. भेटलेल्या लोकानीही त्याला काया काय जिन्नस बक्षिस म्हणून दिले . घर गाठीपर्यंत मिळालेल्या सामानाचं मोठं बोचकं त्याला डोक्यावरून न्यावं लागलं.
त्यानंतर बरेच दिवस वांदर गावाकडे फिरकले नाहीत. पण मळ्यातल्या कडदणाच्या नी भाजीच्या मोहापायी वेगवेगळ्या वाटा शोधीत वांदर अवचित मळ्यात यायचे. गावात कुठेनाकुठे शंकर आलेला असायचा. त्याला वर्दी जायची नी तो येताना सुगावा लागला की वांदर पळत. तरीही वर्षभरात तीन वांदर त्याच्या तडाख्यात मिळालेच. आंबा सिझनला वांदरांचा काहीच उपाधी गावदरीत झाला नाही. सवत कड्यावर कातकरी रहायचा तो भाग तर वांदरानी टाकलाच. दातकड्यावर मात्र किरकोळ दोनतीन बागात त्यांचा थोडा त्रास झाला. लोक असे हुषार.... शंकराच्या वासाला वांदर भितात म्हणून त्याला चांगले कपडे देवून त्याची जुनी चिरगुटं बागेत नेवून उंच फांदीवर टाकून ठेवली. लोक आता निश्चिंत झाले. कातकाऱ्याला अन्नाची वाडी देण्यात कोणीच चाल ढकल करीत नसे. एखाद दुसरा खट सोडला तर घरठेप आठ आणे पट्टीही लोक खळखळ न करता देत नी रक्कम न दिलेल्यांच्या तुटीची भरपाई भलुखोत बिनबोभाट करीत.
सड्या - माळावर गवत,कवळ,लाकडं आणायला गेलेल्या लोकाना कधितरी वांदर नजरेला येत. आता ते गावदरीत असताना सारखे चरबलेले दिसेनात नी त्यांची संख्यापण बरीच कमी झालेली असायची. बासष्ट साली दिवाळीच्या दरम्यान कोकणात मोठ्ठं जोऊळ (वादळ) झालं. खाडी किनाऱ्यावरच्या गावानी जोवळाचा दांडगा फटका बसला. बामणांचा अष्ट, घोरीप चिंच, हरीभटाची चिंच, गाबतडीतला ढोल्यावड, भरडातला नथू आग्र्याचा कळंब ही नावळ्यातली प्रख्यात मोठी झाडं तिन्हीसांजेला पहिल्या तडाख्यातच मोडून पडली. पुढच्या तीनचार तासात तर एकही उंच झाड शाबूत रहिलं नाही. वादळानंतर सड्या शिवरालाही वांदरांचा मागमूस दिसेना.आप्पा म्हणत, “ तेरा वर्षामागे वांदर आले नी त्यांचा उपल्वट सुरु झाला... आता आपसूख स्थित्यंतर झाले.....” पण वांदर संपले तरी पुढची काही वर्षं कातकऱ्याची दुपारची वाडी नी वार्षिक पट्टी सुरुच राहिली!
◎◎◎◎◎◎