मानसी

 मानसी...  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️सौ. स्वरूपा कुलकर्णी 



     शेवटचा आलाप झाला...तिने तानपूरा नीट ठेवला..मेघनाताईंना वंदन केले..त्या हसून म्हणाल्या  'काय गं..आज लक्ष कुठे होतं रियाझ करतांना?'तेंव्हा ती लाजून म्हणाली ' आज घरी बघायला येणार आहेत' मेघनाताईंनी तिला तोंडभरून आशिर्वाद दिले...ती तिथून बाहेर पडली...

 वा-यावर भूरभूर उडणारे तिचे लांब केस .. ५०- ६० च्या स्पीडवर तिची गाडी रस्त्याची अनेक वळणे मागे टाकत  सेव्हन व्हील्स ला पोहोचली...तिथून एक टर्न मारत तिने घर गाठलं...घर पाहताच आता पुढे काय?असा तिच्या मनात विचार आला.. 

खरं म्हणजे तीचा लग्न करण्याला विरोध नव्हता पण बिना नोकरीचं लग्न करावं हे तिच्या करीअरिस्टीक मनाला पटत नव्हतं.. ती दिसायला सावळी, सुंदर मोठ्या डोळ्यांची, लांब केस, तुकतुकीत त्वचा, फिगर छानच असलेली , थोडक्यात लग्न नावाच्या बाजारात पसंत असलेली.. ती सावळी होती पण तीच तिची उजवी बाजू होती कारण तिचा चेहरा विलक्षण आकर्षक होता.. सावळी माणसं नाकी, डोळी निटस असल्यावर सुंदर दिसतात... तशीच ती... नावाप्रमाणेच 'मानसी' मन मोहून टाकणारी.. तिचा स्वभावही मनस्वी, हळवा, सालस... संवेदनशीलता ओतप्रोत भरलेली..ती तिच्या बाबांची अत्यंत लाडकी ...तळहाताच्या फोडाला जसं जपावं तसं जपलेलं त्यांनी तिला..उत्तम संस्कार

देणारे तिचे बाबा म्हणजे तिचे आधारस्तंभ.. तिचे बाबा निवृत्त बैंक अधिकारी, आई गृहिणी, ती एकुलती एक, त्यामुळे आई बापाचा जीव की प्राण.. तिच्या बाबांचं स्वप्न होतं तिला उत्तम जोडीदार मिळावा हे..

  तिला घरात आल्या आल्या आईने फ्रेश होऊन तयार व्हायला सांगीतले.. ती जरा नाखूषीनेच बाथरूमकडे वळली..  "या, या, नमस्कार...". असे म्हणत मानसीच्या बाबांनी पाहुण्यांचे स्वागत केले.. पाहुणेही नमस्कार करत घरात प्रवेशले.. मुलाचे बाबा, त्याची आई, मानसीची मावशी व मुलगा एव्हडीच मंडळी होती.. मानसीचे बाबा मंडळींशी बोलू लागले...बोलतांना त्यांची नजर मुलाकडे जात होती, अतिशय देखणा, उमदा म्हणावा असा निशांत डोळ्यात भरण्यासारखा होता, ते मनोमन प्रसन्न झाले.. 'जोडा अगदी शोभून दिसेल' त्यांच्या मनात आले..सगळी मंडळी मोकळेपणाने गप्पा मारत होती, निशांतही मधून मधून सहभागी होत होता... पण त्याची आतुर नजर पडद्याकडे लागली होती... फोटोत दिसणारी ती प्रत्यक्षात कशी असेल? मनातले  ते विचार दाबून ठेवत चेहर्यावर हसू आणत तो तीची वाट पहात होता.. गेला आठवडाभर तिचा फोटो पाहून तिच्या प्रेमात पडलेला तो तिला भेटायला उत्सुक होता..समोरील मंडळींना जास्त न ताणता मानसीच्या बाबांनी मानसीच्या आईकडे ईशारा केला.. तशी ती 'आलेच हं' म्हणत आत गेली... आई मानसीला घेऊन बाहेर आली.. तीला समोर पहाताच निशांत क्षणभर स्तब्ध झाला... तीचा तो सुंदर, देखणा चेहरा, तिचे लांबसडक केस, तीने कौशल्याने बांधलेली त्याची हेअर स्टाईल, गळ्यात नाजुक नेकलेस, कानात टॉप्स, तीची सुबक बिंदी, खुबिने नेसलेली गुलाबी रंगाची साडी, तीची साधी पण सुंदर रहाणी तो एकुणच हरखून गेला... हीच माझी स्वप्नातली राणी तो मनाशी ठरवून तिच्याकडे बघू लागला... तिने मान वरून एकदा सगळ्यांकडे बघितलं निशांतकडे नजर जाताच तिलाही काहीतरी जन्मोजन्मीचं आपलं नातं आहे असं वाटुन गेलं.. तिचं तिलाच आश्चर्य वाटलं... तिला तो पहिल्या नजरेतच आपला वाटला, तीने लाजुन मान खाली घातली ... नंतर सगळ्यांशी हलक्याफुलक्या गप्पा झाल्यानंतर मावशी म्हणाली, 'अगं ताई, मानसी व निशांतला निवांतपणे बोलू दे म्हणजे त्यांना एकमेकांचे स्वभाव कळतील'  सगळ्यांनी अनुमोदन दिले... ती दोघं टेरेसवर गेली... 

   कुंड्यात मस्त गुलाबी गुलाब फुललेला होता, जाई-जुई, चाफा, मोगरा फुलले होते... तिथल्या २ खुर्च्यांवर ते दोघं बसले.थोडावेळ शांतता होती..मग निशांतनेच बोलायला सुरुवात केली... ' तुम्ही  एस.पी.कॉलेजमध्ये आहात नं? '  तिने हळूच हो असा प्रतिसाद दिला... तीचा शांत स्वभाव त्याला आल्यापासून जाणवत होता... त्याने संभाषण चालुच ठेवलं, तीही मनमोकळेपणाने बोलत होती.. 'तुम्हाला गुलाब आवडतो की मोगरा' ती हसुन, 'दोन्हीही 'असं उत्तर दिलं... त्यावर तो म्हणाला ' मला मात्र गुलाबी गुलाबच आवडतो' यावर त्याचे डोळे तिच्याकडे हसत बघत होते... तीला अचानक लक्षात आलं की आपण गुलाबीच साडी नेसलीये.. ती खूप लाजली.. त्यावर तो म्हणाला, 'मी गुलाबाचा खरंच चहाता आहे, जिथे गुलाब तिथे मी'  मनापासून हसत तो उतरला.. तिला अजुनच लाजलेलं पाहून तिचे दोन्ही हात हातात घेऊन, 'मानसी, माझ्याशी  लग्न करशील? मला मनापासून साथ देशील, मी तुझी जन्मोजन्मी साथ निभवेल, तु फक्त हो म्हण' यावर त्याचे एकेरी संबोधन व त्याच्या हातांचा उबदार स्पर्श खूप जवळिक निर्माण करून गेला... ती मनोमन खुश झाली... त्याच्यापासून हात सोडवत ती दुसरीकडे बघत म्हणाली, पण मला नोकरी करायचीये, माझं करीअर लग्न झाल्यावर थांबेल.. यावर तो, 'अगं एव्हडंच ना, ते मी पाहुन घेईन तू नको काळजी करूस, लग्न झाल्यावरही तुझं करीअर थांबणार नाही, I promise'यावर त्याला नकार द्यावा असं तीला काहीच वाटलं नाही... तो दिसायला, वागायला अतिशय लोभस वाटला.. त्यात चांगल्या कंपनीत उच्चपदस्थ होता... MBAझालेला तो उत्तम गिटारीस्ट पण होता... तिला त्याच्या बायोडेटामधिल माहिती आठवली.. ती काहीच बोलत नाही हे पाहुन तो घुटमळला'त्याची नजर तिचे चेहर्यावरचे हावभाव पाहु लागली.. ती हसली.. तो अजुनच खलास झाला.. ही काहीच का बोलत नाही, तो बैचैन झाला.. ती हळूच एक एक शब्द बोलली.. 'अं माझ्याकडून होकार आहे'.. ते शब्द त्याला ऐकुनही ऐकुच आले नाही, त्याने परत विचारले, 'काय म्हणालात? 'यावर ती त्याच्या परिस्थितीवर हसून म्हणाली, 'मी तयार आहे लग्नाला'त्यावर  अतिशय हर्षाने त्याने तिच्या हाताचं किस घेतलं..thank you❤🌹ती खळखळून हसली.. तो मात्र वेड्यासारखाच तिच्या दिलखुलास हसण्याकडे बघतच राहिला... हाय, मी तर या मुलीवर जाम फीदा आहे. .. त्याने तिला तिथेच propose केलं I love you Manasi ती वर नजर करून त्याच्याकडे बघु शकत नव्हती... ती लाजेने लाल गुलाबी झाली.. त्यांना त्या स्वप्निल जगातून बाहेर काढणारे शब्द कानी आले, 'निशांत, मानसी अगं किती वेळ, लवकर खाली या' तो आईचा आवाज होता... मानसी बावरली त्याच्याकडे न बघताच सरसर पायर्या उतरून खाली आली.

   थोड्याच दिवसात त्यांचं लग्न ठरलं व ती दोघं विवाह बंधनात अडकली....मानसी निशांतची झाली.

लग्न झाल्यावर एकेदिवशी ती बेडरूममध्ये आली.

    नुकतेच न्हयल्यामुळे ओले झालेले तिचे लांबसडक, काळेभोर केस तिने अलगद समोर घेतले... तीने आरशात बघितले... लग्न झाल्यानंतरचे तिच्यातिल बदल तीला जाणवले...सावळा सुंदर, टवटवीत चेहरा, सुंदर मोठे डोळे, गुलाबी ओठ,कोणीही प्रेमात पडावं असं गोड हसू...मग तिचं लक्षं गेलं, कपाळावरील थोडीशी मोठी टिकली., सोन्याचे कानातले, गळ्यातलं मंगळसुत्र.. नविनच शिकलेली नी सावरायला थोडी कठीणच वाटणारी साडी, त्याचा सुंदर पदर, नविन लग्न झालेल्या तिच्या चेहर्यावरील नवी नव्हाळी ...ती हे सगळं भान हरपून पहात होती...लग्न झालेल्या मानसीचं हे नवं रूपडं बघून ती स्वतःशीच हसून लाजली... मनात विचारांची गर्दी झाली...लग्न होऊन एक महिना झालेला पण निशांत तिला फुलासारखं जपत होता.. सासरही तीला जपणारं होतं.. प्रेमळ, समजुतदार माणसं... मोठं घर, नोकचाकर, घर सुखवस्तूच.. 

          लग्नात पाठवणीच्या वेळी स्फूंदून स्फूंदून रडणारे तिचे बाबा तिला आठवले नी ती क्षणभरात हमसून हमसून रडू लागली... माहेरच्या आठव़णीने तीला गहीवरून आले..मानसी मुळातच मनाने हळवी अन् बाबांच्या आठवणीने अजूनच हळवी झाली... आई -बाबांचे प्रेम आठवून तीला अधिकच दाटून आले... आता मात्र न रहावून ती तोंड झाकून आरशासमोर रडू लागली ....  अन्  'माssनssसी' हॉलमधून  आवाज आला...तशी धावतच ती खोलीतून बाहेर पडली.. 'आले आई' म्हणतच पायर्यांवरून खाली आली..सासूबाई तिची वाट पहात दाराशीच उभ्या होत्या... 'अगं तुझी तार आलीये रत्नागिरीहून' ते शब्द कानावर पडताच ती गोंधळली.. तीने हातात घेतली..पण ....पण हाय रे देवा...ती तार वाचताच ती उभ्या उभ्याच कोसळली..तिचे प्राणप्रिय बाबा तिला सोडून,हे जग सोडून गेले होते...निशांतने कसंबसं तिला सावरलं...ती बेशुद्ध झाली होती...सासूबाईंनी पटकन डॉक्टरांना फोन केला..थोड्यावेळाने ती सावरली..मन दुःखावेगाने अनावर झालं होतं..किती मोठा मानसिक धक्का..देवाने दान देतांना एक प्रेमाचं माणूस दिलं व दुसर्या हाताने एक प्रेमळ माणूस काढून घेतलं...किती जबर मानसिक धक्का...ती महतप्रयासाने सावरली ती निशांतच्या बळकट आधाराने... त्याने तिचा हात हाती घेतला..."मानसी,तू कोलमडून जाऊ नकोस..मी सतत तुझ्यासोबत आहे...काळजी करू नकोस..."लगेच निशांतने तिच्या माहेरी फोन केला,तिच्या आईला सांत्वना दिली..तो वेळ पडली तर किती जबाबदार जावई आहे याची झलक तिला पहायला मिळाली.नंतर त्याने तिला माहेरी पोहेचवले..२ ते ३ महिने तिला सारखं समजावत होता...तिची व तिच्या माहेरच्या लोकांची अतोनात काळजी घेतली..ती त्या धक्क्यातुन हळूहळू बाहेर आली..तिची आई कणखर असल्यामुळे या घटनेतून लवकर सावरली...नंतर मानसी सासरी आली..सासूबाईही तिची समजूत घालत राहिल्या..

 मानसी विचार करत होती, मी खरोखर देवाचे आभार मानायला हवेत..सासरी काळजी करणारे सगळेच आहेत...मी माहेरच्या आठवणी उरभर जपू शकेन.. जणू सासर माहेर एकच ..बाबांची लाडकी परी तिच्या संसारात सुखी आहे....बाबांचं स्वप्न निशांतच्या रूपाने पूर्ण झाले..मी त्याला मनापासून साथ देणार ..तोच माझा प्राणधार...तोच माझं सर्वस्व...अन् ती देवाच्या मनोमन पाया पडली...


तुम्हालाही कथा सुध्दा वाचायला आवडेल.

👇

होकार

1 Comments

  1. खुपच छान मनाला भावणारी.....

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post