होकार

 होकार   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

लेखिका - अनघा लिखिते



          स्मिता आपल्या ऑफिसमधून आल्यावर बेडरूममध्ये बसली होती. दहाव्या मजल्यावर घर होते. बेडवर बसल्यावर खिडकीतून सुंदर डोंगर दिसायचे, पावसाळ्यात तर निसर्गाचा नजारा काही औरच असायचा. तिचं उदास मन, डोंगराच्या विशाल कुशीत सामावून जायचं. त्याच्याकडे पहात ती आपलं दुःख अश्रूं द्वारे व्यक्त करायची...

          रोजच्या तिच्या या रूटीन मध्ये आजचा दिवस अगदी वेगळाच उजाडला. ऑफिस सुटल्यावर मॉलमध्ये शॉपिंगला गेली होती. अचानक शैलेश आणि तिची भेट झाली, दोन - अडीच वर्षांनी. शैलेश तिचा कलीग, दोघांची जॉईनींग सोबतच झालेली... दोघांमध्ये छान मैत्री झाली वर्षभरात. फिरणे, शॉपिंग, आउटींग, सिनेमा, हॉटेलींग सोबत इतर असले तरी, या दोघांचे ट्युनिंग छान जमायचं. इतरांनाच काय तर अगदी शैलेशला सुद्धा तेच वाटलं होतं की आपलं हे मैत्रीच्या पलीकडे गेलेलं नातं आहे. त्याने सुद्धा ठरविलेच होते की आता प्रमोशन झाले की सरळ तिच्या आई-वडिलांना भेटून मागणीच घालायची.....

          आज अचानक त्याला पहाताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाने हलकेच वर्णी लावली. तिने दुरूनच पाहून हात हलवत 'हाय' केलं. त्याने कसं रिॲक्ट व्हावं असं विचार करून, नुसतेच स्माईल केले. आजूबाजूला कुठे तिचा नवरा असेलच, असा मनात विचार आला त्याच्या.

          "कसा आहेस ?", तिने त्याच्या जवळ जाऊन विचारले.

          शैलेश संकोचून, "अं... मी मजेत... तु ?"

          "हं. मी बरी आहे. भारतात कधी आलास ?", स्मिता.

          "झाला आठवडा. कंपनीने दोन वर्षांसाठीच पाठवले होते. पण आई गेली, त्यामुळे लवकर परतलो. तसं पॉलिसीच्या विरूद्ध होतं, पण मॅनेजमेंटनी चांगला सपोर्ट केला. सो आईचं शेवटचं दर्शन घेता आले."

          दोघेही बील पे करुन बाहेर पडले आणि परतले आपापल्या घरी.

          स्मिता कॉफी घेत भुतकाळ गेली....

......

          मी टी ब्रेकची वाटच पाहत होते. लंच अवर मध्ये सुद्धा मला सगळ्यांसमोर शैलेशला आनंदाची बातमी देता आली नाही. कारण पहीले त्याच्याशीच शेयर करायची होती.

          शेवटी मी अक्षरशः त्याला खेचून आणले....

          "अगं !! असं का करतेय. येणारच होतो मी तुझ्याशी बोलायला. मला कळलं होतं की तुला काही सांगायचं आहे. कारण, तु सगळ्यांमध्ये असुन एकटी होती.... हरवलेली, माझ्याशी बोलायला एकांत शोधणारी... माझ्या नजरेतून थोडीच सुटणार होतीस.", शैलेश तिचा हात हातात घेत म्हणाला.

          "हाऊ नाईस ऑफ यु. म्हणुनच तर आपलं ट्युनिंग जुळतं. तुला सगळं कळतं माझ्या मनातलं. लव यु डियर", असं म्हणत मी घाईघाईने हात काढून घेतले आणि पर्समधुन मोबाईल काढत म्हणाले, "शैलेश, प्लीज डोळे बंद कर. एक मस्त सरप्राईज आहे."

          मी फोटो गॅलरी मधुन फोटो उघडला. त्याच्या समोर धरत म्हणाली, "उघड डोळे."

          त्याने डोळे उघडले... मोबाईलमधील माझ्या ॲंगेजमेंटचा फोटो पाहून तो हक्का-बक्का झाला... त्याच्या चेहऱ्यावरील उडालेल्या रंगाकडे माझं दुर्लक्ष झाले आणि मी आपली माझ्या आयुष्यात नवीन रंगाची उधळण करणाऱ्या गंधारच्या रंगात रंगली गेली होती. गंधार, प्रसिद्ध डायमंड मर्चंट नानासाहेब फडणीस यांचा एकुलता एक मुलगा, त्यांचा प्रशस्त फ्लॅट आहे मुंबईत, पुण्यात सुद्धा डुप्लेक्स अंडर कन्स्ट्रक्शन आहे, लग्नानंतर ईथेच राहण्यासाठी, आई नाही, वडील बिझनेस निमित्त नेहमी आऊट ऑफ इंडिया असतात, त्यामुळे मस्त राजा-राणीचा संसार असणार आहे, ईत्यादी ईत्यादी...

          

          शैलेश माझ्याकडे बघून नुसता ऐकत राहीला. पण मला नाही समजलं, त्याच्या स्वप्नांचा मनोरा तुटत होता आणि मी आपली स्वप्नातील राजकुमारासह विचारात गुंग होती.

          अर्धा तास त्याला युगासारखा भासला असावा..

          "आय थिंक आपल्याला निघायला हवं. आईला बरं नाहीये, बाबांची औषधं पण जाता जाता मेडिकल मधुन घ्यायची आहे. मला थोडं अन-इझी फील होतंय.", असं म्हणून मला विश न करताच शैलेश जो निघून गेला तो आज भेटला. त्याची आई गेल्याचे ऐकल्यावर त्याची ख्यालीखुशाली विचारण्याची हिंमत नाही झाली. 

          हे कसलं बॉन्डींग ? मला कळलं सुद्धा नाही, तो माझ्यावर प्रेम करत होता. अचलाने सांगितले नसते तर मला कळलंच नसतं. ना धड मी मैत्री केली ना धड प्रेम आणि लग्न...ते पण मला झेपलं नाही. छे.. छे... झेपलं नाही, असं नाही म्हणता येणार. गंधारच्या विचित्र अटी माझ्या सारख्या मध्यमवर्गीय मुलीला पटणाऱ्या नव्हत्या. तो दिवस नेहमी जसाच्या तसा तरळतो डोळ्यासमोर...

          "मला बाबांनी डायमंड सेट घेऊन दिला होता आणि मी तो घालून छानसे फोटो शुट केलं. गंधारच्या एका ब्रॅन्चने स्पर्धा ठेवली होती ॲडव्हर्टायझिंग साठी. मी सहज म्हणून माझा फोटो पाठविला आणि माझा फोटो सिलेक्ट झाला ॲड साठी. मला ओपनिंगच्या वेळेस विथ फॅमिली इन्व्हिटेशन होते. हे शैलेशला मी सांगितले. किती खुश होता तो तेव्हा. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी तो सुद्धा आला. मेन एन्ट्रन्स् वर माझा मोठा फोटो दिमाखात झळकत होता. दुसऱ्या दिवशी नातेवाईक, आई-बाबांच्या मित्र मैत्रिणी, कलीग्ज्, ई. अभिनंदनाचे फोन वर फोन. त्याच दिवशी गंधार आणि स्वतः डायमंड मर्चंट नानासाहेब फडणीस आमच्या घरी आले मला मागणी घालायला. त्यांचं एक आदर्श घराणं ही ख्याती जगजाहीर होतीच. त्यात गंधारचे राजबिंडे रूप, कोणीही भाळेल. नाही म्हणायला जागा नव्हती. सर्व झटपट झाले की मला दोन मिनिटे साधं शैलेशला फोन करायला सुद्धा वेळ नव्हता.... अं.. हं... असं नाही झालं. मला त्यांचा तामझाम, वैभव, त्यात गंधारने मला पसंत केले, या सर्व गोष्टींची भुरळ पडली होती. विसर पडला होता मला शैलेशचा. धुमधडाक्यात लग्न पार पडले, पण उपस्थितांमध्ये शैलेश नव्हता. रागच आला होता मला तेव्हा.

          नानासाहेब फडणीसांचे घराणं जरी आदर्श असलं तरी अपवाद तर असतोच ना... कपडे बदलावे त्याप्रमाणे मी आज याच्या सोबत तर उद्या त्याच्या सोबत असं राहू शकणार नव्हती, त्याला ती सवय होती. तु पण माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये राहून असंच वागावं, येवढीच अपेक्षा होती गंधारची, त्याच्या दृष्टीने. बाकी पैसा, दागिने, फॉरेन ट्रिप्स्, घरात नोकर-चाकर, बाहेर पाऊल ठेवताच माझ्यासाठी मर्सिडीज घेतलेली, कशाचीच कमी नव्हती. दुरून माझं नशीब नजर लागण्यासारखं. पण आत ? कधी मी कोणाची रिप्लेसमेंट म्हणून असेल, हे सरप्राईज असायचे. मग आमचं भांडण व्हायचे, मी नकार द्यायचे, मग मारहाण. मी मर्यादेत राहीली म्हणून वर्षभर आमचं त्याच कारणाने वाजत राहीलं. फक्त आई-बाबांनी साथ दिली. वर्षभरात वेगळे झाले मी. आठवणींनी सुद्धा अंग शहारून जातं. आई-बाबा खचुन एका पाठोपाठ गेले. आईच्या घरी राहून दु:खाच्या आठवणी ताज्या रहायच्या, म्हणून मग अचलाने हट्टाने हा फ्लॅट बुक करायला लावला. निसर्गाच्या सान्निध्यात मला काहीतरी विसर पडेल. हळूहळू मी विसरायला लागली सुद्धा होती, तोच आज अचानक शैलेश भेटला.

          दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी मी आणि अचला काकांना भेटून आलो, शैलेशला बरं वाटलं हे त्याच्या चेहऱ्यावरून जाणवलं.

          पुन्हा माझं रूटीन सुरू....

महीनाभराने.....

          रविवार... मी नेहमी प्रमाणे उठली, आठवडाभराची कामं आटोपली. बारा वाजताच जेवण आटपून निवांत गाणी ऐकत पहूडले होते. तेवढ्यात बेल वाजली. यावेळी कोण असणार ? अचला तर चार-पाच वाजता येते गप्पा मारायला. मग कोण असावं ? मनात नेहमी भितीच असायची... कारण मोजकेच फ्लॅट्स गेले होते आणि माझ्या फ्लोअरवर तर मी एकटीच. अचलाचा सेव्हंथ फ्लोअर होता.

          आयहोल मधुन पाहीले, मला शैलेश दिसला. मला आश्चर्य वाटले की हा इथे कसा ?

          मी दार उघडले....

          "ये ना शैलेश... बस्."

          "आश्चर्य वाटले ?", शैलेश.

          "अर्थात.", मी ग्रील लावत बोलले. "बस्. मी पाणी आणते.", असं म्हणून मी पाणी घेऊन आली.

          पाणी पिऊन ग्लास ठेवत शैलेश म्हणाला, "कशी आहेस, हे मी नाही विचारणार तुला. मला अचलाने सर्व सांगितले आहे. मी येऊन महीना झाला. पण तुला नाही वाटलं की आपण शेयर करावं आपल्या मित्राला ?"

          माझ्या डोळ्यांत पाणी आलं, "कसं वाटेल ? तु तर माझ्यावर नाराज होऊन गेला होतास.."

          "हो.. होतो नाराज, कारण मला ज्या दिवशी नवीन कंपनीचं ऑफर लेटर मिळालं होतं आणि मी तुला नेमकं त्याच दिवशी लग्नाबद्दल विचारणार होतो. तेव्हा तु मला दि ग्रेट गंधार फडणीस सोबत तुझी ॲंगेजमेंट झालेला फोटो दाखविला.", शैलेश.

          "तु एकदा तर म्हणून पहायचं होतं...", मी.

          "कुठे तो गर्भश्रीमंत आणि कुठे मी छोट्या छोट्या गोष्टीत तडजोड करत स्वतःला वर आणायला धडपडणारा... कुठल्या तोंडाने मी विचारणार ? जेव्हा की तु सरळ ॲंगेजमेंटचा फोटो दाखविला.", शैलेश.

          "चुकलं तर आहेच माझं. मोहीनी पडली होती तेव्हा, जणू जॅकपॉट लागला, या भ्रमात होते मी. बरं, जाऊ दे ते... तु लग्न कधी करणार आहेस ? काका थकले आहेत, सुन आली तर घराला घरपण येईल म्हणत होते त्यादिवशी. तु दोन वर्षे फॉरेनला होतास. कोणी पसंत असेल तर सांग त्यांना, ते स्विकारतील आनंदाने.", मी.

          "मी तिथे काही पोरी पहायला थोडीच गेलो होतो.", शैलेश.

          "अच्छा मग आता फोटो तरी पहायला तयार हो. एखादी आवडली की मग आपण पाहायचा कार्यक्रम ठेवु.", मी.

          "हो फोटो पाहीला आहे. पसंत सुद्धा आहे मला. आपली कलीगच होती ती. पण मला माहित नाही ती होकार देईल का ?", शैलेश.

          "वेडा आहेस का ? इतका कर्तृत्ववान, शिकलेला, चांगले पॅकेज, आई-वडीलांची काळजी घेणारा आदर्श मुलगा, एक चांगला मित्र, ऑफिस मध्ये तर तु सगळ्यांचा आवडता होता, हे सगळं एकाच पॅकमध्ये भेटत असेल तर कशाला ती नकार देईल... स्नेहा नं ? तिची उदोउदो करून मला पिडायचा नं...", मी.

          "अं. हं.. आता तु डोळे बंद कर", शैलेशने दार लावल्याचा आवाज झाला, मी क्षणभर घाबरलेच. गंधारने दिलेल्या अनुभवातून मन अजून बाहेर नव्हते पडले.

          "हं.. उघड आता...", असं म्हणाला. त्याने सुद्धा माझ्यासमोर मोबाईल धरला होता. माझा काढलेला फोटो....

          "नाही शैलेश... आता हे शक्य नाही...", मी त्याच्या समोर उभी राहून म्हणाली. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. 

          "का शक्य नाही ?"

          "मी तेव्हाच तुझं प्रेम जाणायला हवं होतं. सहज वाक्य फेकावं तसं नुसतं पोकळं 'लव यु डियर' म्हणायची. पण तुझं प्रेम समजायला असमर्थ ठरली. मी तो हक्क गमावला आहे. माझ्या उध्वस्त आयुष्याची सावली तुझ्या भावी उज्वल आयुष्यावर नको पडायला...", मी त्याच्या समोर हात जोडले.

          माझे हात हातात घेऊन, "तु माझ्या आयुष्यातुन गेली, तेव्हाच माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तु जर परत आलीस तर ते उज्वल होईल. तु मला तेव्हाही आवडायची आणि आताही. मी तेव्हा उशीर केला तुला प्रपोज करायला. पण आता मी विचारतोय 'आपल्या मैत्रीच्या नात्याला संसाराच्या बंधनात बांधण्याची संधी देशील.'"

          मी डोळे बंद करून घेतले होते, डोळ्यांतून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते, जणू दु:खाचा बांध इतके दिवस तग धरून आज फुटला. कधी शैलेशने मिठीत घेतले नाही कळले. एक भक्कम आधार मिळाला मला, मी लहान होऊन रडले. मला शैलेश हवा होता, मला नात्याला संधी द्यायची होती. पण मी नव्हते म्हणु शकत.

          "स्मिता, तु जर मला आता नाही स्विकारले तर मी कायमचा तुटून जाईल. प्लीज, विसर झालं-गेलं. करशील तु माझ्याशी लग्न ?"

          मी मिठीतच होकार दिला. 

समाप्त

अनघा लिखिते.

ही कथा वाचून पहा.

👇

पंचामृत

3 Comments

  1. Hokar hi Katha pharch chan hoti 👌👌

    ReplyDelete
  2. खुप छान.... भावनाप्रधान

    ReplyDelete
  3. खुप सुंदरकथा,शब्द गुंफण ,भावनाप्रधान लिखाण असते अनघा लिखीतेंचे.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post