पंचामृत

 

'पंचामृत'     (अक्षरचाफा कथा स्पर्धा)


✍️ सचिन देशपांडे



सागर आणि स्वातीच्या घरी... त्यांच्या लग्नानंतर जवळ जवळ नऊ वर्षांनी, पाळणा हलला होता. नानाविध उपाय करुन झाले होते, अनेक उपास - तापास करुन झाले होते, कित्येक नवस बोलून झाले होते... पण स्वातीची कुस काही केल्या उजवत नव्हती. अखेरीस गेल्या वर्षीच्या मे महिन्यातच... स्वातीला बाळाची चाहूल लागली, आणि पुरंदरे परिवारात आनंदाला उधाण आलं होतं. ह्यासोबतच स्वातीच्या माहेरी... म्हणजेच क्षिरसागर परिवारातही, ह्या गोड बातमीने उत्साहाचं वारं वाहू लागलं होतं. स्वातीचे बाबा पाच वर्षांपुर्वीच गेले होते. पण नाशिकला राहणार्‍या स्वातीच्या आई रोहिणी क्षिरसागर... आणि तिचे अमेरीकास्थित दादा - वहिनी, प्रचंड खुश झाले होते. 

खूप काळजी घेतली होती मग स्वातीची, सागरने आणि त्याचे आई - बाबा... अर्थात उमा आणि निळकंठ पुरंदरे ह्यांनीही. अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं तिला... बाळंतपणाचे हे सारे महिने, ह्या सार्‍यांनी मिळून. सागरचे आई - बाबा तर गेल्या आठ महिन्यांपासून... सागरकडेच आले होते मुक्कामाला, आपलं पुण्याचं घर बंद करुन. कारण स्वातीची डिलिव्हरीही इथे मुंबईतच होणार होती, उमाबाईंच्या अनुभवी देखरेखीखाली. अखेरीस ह्या गेल्या जानेवारीतील मध्यावरच... एका गोंडस, गुटगुटीत मुलीला जन्म दिला होता स्वातीने. 

मे महिन्यात ठरलेल्या बाळाच्या बारशाला मग... स्वातीची आई, आणि त्याचवेळी भारतात आलेले तिचे दादा - वहिनीही आले होते. सागर - स्वातीच्या लेकीचं धूमधडाक्यात बारसं झालं. 'सिया' नाव ठेवलं बाळाचं. आणि पुढे आठवड्याभराच्या पाहूणचारानंतर, स्वातीच्या माहेरचे स्वगृही परतले. दादा - वहिनी चारेक दिवस नाशिकला राहून, अमेरिकेसाठी निघणार होते. इवल्या सियाच्या येण्याने, इथे पुरंदर्‍यांच्या घरात जणू गोकूळच अवतरलं होतं. स्वाती, सागर आणि सागरचे आई - बाबा... अगदी आनंदात न्हाऊनच निघाले होते, बाळाच्या सहवासात. 

असेच दोनेक महिने हर्षोल्हासात सरले. श्रावण महिना उंबरठ्यावर आला, आणि स्वातीच्या आईचा... रोहिणीबाईंचा फोन आला तिला. त्यांनी सांगितलं स्वातीला... तिची कुस उजवावी म्हणून, त्यांनी बोललेल्या नवसाबद्दल. बाळाच्या जन्मानंतर येणार्‍या पहिल्याच श्रावणात... सागर - स्वाती त्यांच्या राहत्या घरी, सत्यनारायणाची पूजा घालतील. आणि त्यावेळी केल्या जाणार्‍या पंचामृतात, रोहिणीबाई स्वतःने कढवलेलं घरचं तुप घालतील... असा तो नवस होता. स्वातीने फोन आटोपल्यावर अगदी लगेचच... तिच्या आईच्या ह्या बोललेल्या नवसाबद्दल, सागर नी त्याच्या आई - बाबांना सांगितलं. तिघेही अर्थातच खुश झाले होते हे कळून... आणि ही नवसपुर्ती करण्याला त्यांच्यापैकी कोणाचाही काही आक्षेप असण्याचं, कारणही नव्हतं. 

तर... ठरल्याप्रमाणे सागर - स्वातीच्या घरी, आज श्रावणातलं सत्यनारायण होतं. काल रात्री स्वातीने अगदी जागत पुरणपोळ्या करुन, ह्या एका अती महत्वाच्या कार्याची इतिश्री केली होती. बाकी ठरलेल्या बेतानुसार... काय काय कधी कधी करायचंय, हे स्वातीच्या डोक्यात नक्की होतं. त्यामुळेच पुरणाच्या पोळ्या आटोपल्यावर, ती रात्री साडेबाराच्या सुमारास झोपायला आली. आणि साधारण अडीचच्या सुमारास दचकूनच उठली स्वाती, दरदरुन फुटलेला घाम पुसत. अंथरुणावर उठून बसली ती, घटाघटा पाणी प्यायली... आणि तिने सागरला उठवलं. सागरही डोळे किलकीले करत उठला, नी स्वातीकडे प्रश्नार्थक पाहू लागला. कपाळावरचा, ओठांभोवतीचा घाम हाताने पुसत स्वाती म्हणाली... 

"सागर... सागर अरे मला आत्ता, एक फार भयानक असं स्वप्न पडलं रे". 

"व्हाॅट? स्वप्न? आणि त्याकरता तू माझी झोप मोडलीस? अगं काय हे स्वाती? उद्या तुला पाच वाजता उठावं लागणारेय ना? अगं मग झोप आता, नाहीतर ऐन पूजेवेळी पित्ताचा त्रास सुरु होईल".

"अरे... एक... एक मिनिट माझं ऐकून तर घे. मला... आय मिन माझ्या स्वप्नात एक न्युजपेपर आला, नी त्यातील काही मजकूर. तो बाकी मजकूर तर काही दिसला नाही मला, पण त्याची हेडलाईन दिसली. ती... ती... हेडलाईन होती की... की... उमा पुरंदरे ह्यांचा, अकस्मात म... म... मृत्यू".

"काय? आर यू सिरियस? अगं... अगं हे कसं शक्य आहे? तू... तू आता मला टेंशन देतीयेस स्वाती".

"मला माहीत नाही सागर की, हे असं स्वप्न कसं काय पडलं. आणि न्यूजमध्ये का दिसावं नाव? आपण काही कोणी सेलिब्रिटी नाही. पण... पण मे बी हा... हा एक मेसेज असावा. कुठलासा संकेत असावा".

"व्हाॅट द हेल यार... थांब मी आलोच".

सागर घाई गडबडीतच त्याच्या अंथरुणावरुन उठला, आणि धावतच आई - बाबांच्या रुमकडे गेला. नुसता लोटलेला दरवाजा हळूच ढकलत, आवाज न करता तो आत शिरला. त्याने नाईट लँप लावला... नी निजलेल्या आईची छाती, वर - खाली होतीये की नाही ते पाहिलं निरखून. आईचा श्वासोंश्वास व्यवस्थित चालू होता. तोपर्यंत त्याच्या मागे येऊन उभ्या राहिलेल्या स्वातीकडे, त्याने हायसं वाटून पाहिलं. स्वातीनेही वर बघत हात जोडले... आणि दोघेही अजिबात आवाज न करता, नाईट लँप बंद करुन बाहेर पडले. स्वतःच्या खोलीत आले दोघे आणि... "ते फक्त एक स्वप्न होतं... सो रिलॅक्स" अशी स्वातीच्या मनाची समजूत काढत, सागरने स्वातीला जवळ घेतलं. थोड्याच वेळात गाढ झोपी गेले होते मग दोघेही. 

आजची सकाळ धावपळीतच उगवली होती. पाच वाजल्यापासूनच सुस्नात अशा स्वाती आणि उमाबाई, स्वैपाकखोलीत स्वैपाकाचं बघत होत्या. सहाच्या दरम्यान उठलेले निळकंठराव आणि सागर, आंघोळी - पांघोळी आटोपून... पूजेच्या साहित्याची जमवाजमव करणे, तुळशीपत्र - दुर्वा निवडत बसणे... वगैरे कामं करत होते. स्वातीची आईही सकाळी सहाच्या दरम्यानच... शेअर टॅक्सीने नाशिकहून, मुंबईला येण्यासाठी निघाली होती. तसं त्यांनी फोन करुन, कळवलंही होतं स्वातीला. बरोब्बर अकरा वाजता गुरुजी आले... आणि विसेक मिनिटांत मांडामांड होऊन, कपभर चहा पिऊन... गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. तत्पुर्वी सियाला दूध पाजून, निजवून आली होती स्वाती. पूजेला सागर - स्वाती जोडीने बसलेले, पण स्वाती जरा बेचैनच होती. सगळा स्वैपाक तयार होता... अगदी चटणी, कोशिंबीरीसहीत. प्रसाद तयार होता आत ओट्यावर, गुरुजींकडून बाहेर येण्याच्या आज्ञेची वाट पाहत. आणि पंचामृतही आॅलमोस्ट तयार होतं, फक्त त्यात तुप घालायचं सोडून. कारण स्वातीच्या आई... म्हणजेच रोहिणीबाई क्षिरसागर त्यांच्या नवसानुसार, स्वतः घरी कढवलेलं तुप घालणार होत्या पंचामृतात. सकाळी सहाच्या दरम्यान नाशिकहून मुंबईसाठी निघालेल्या रोहिणीबाई... आता साडे अकरा वाजून गेले होते, तरी पोहोचल्या नव्हत्या. स्वातीने हळूच सागरपाशी बोलूनही दाखवली होती चिंता, आई अजूनही न आल्याची. त्यावर सागरने... "ट्रॅफिक असेल अगं, येतील"... असा दिलासाही दिला होता तिला. 

आता बारा वाजायला आले होते, आणि गुरुजी कुठल्याही क्षणी पंचामृत मागू शकले असते. तितक्यातच स्वातीचा फोन वाजला. गुरुजींकडून जराशी सवलत मागत, स्वातीने फोन उचलला... आणि पांढरा फटक पडत गेला तिचा चेहरा. सागरही पुरता गोंधळला, स्वातीचा चेहरा बघून. स्वातीच्या हातून फोन गळून पडला, अन् निश्चलपणे बसून राहिली ती. सागरने घाईतच फोन उचलला, नी तो बोलू लागला फोनवर. समोरुन एक इनस्पेक्टर बोलत होते. एका प्रायव्हेट टॅक्सीचा अॅक्सिडेंट झाल्याचं सांगत होते ते, आणि आत बसलेल्यांना तातडीने हाॅस्पिटलमध्ये नेल्याचंही. त्या टॅक्सीचा त्यांनी सांगितलेला नंबर... हा सकाळी निघतांना रोहिणीबाईंनी स्वातीला सांगितलेल्या नंबरशी, मॅच होत होता. बाकी त्या इनस्पेक्टरच्या आवाजात डिस्टर्बन्स येत असल्या कारणाने, पुढे काय म्हणाले ते मात्र नेमकं कळलं नव्हतं सागरला. सागरने फोन कट केला... आणि स्वातीकडे बघत, तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याने. एव्हाना उमाबाई आणि निळकंठरावही त्यांच्या जवळ आलेले, काहीतरी अघटीत घडलंय हे जाणवून. आणि... आणि स्वाती अचानक, किंचाळलीच जोरात... 

"सागर... सागर... माझ्या आईचं माहेरचं नाव. अरे आपण ह्या योगायोगाबद्दल, बोलून खुशही झालो होतो... जेव्हा लग्न ठरलेलं आपलं. की... की तुझ्या आईचं जे सासरचं नाव आहे, तेच... तेच माझ्या आईचं माहेरचं नाव आहे. उमा पुरंदरे... माझ्या आईचं माहेरचं नाव सागर... उमा पुरंदरे. ओह माय गाॅड... ओह माय गाॅड... असं कसं विसरले मी हे? म्हणजे... म्हणजे ती कालच्या स्वप्नातली बातमी... ती बातमी तुझ्या नाही, तर माझ्या आईची होती? मला हे कालच का लक्षात आलं नाही? मी... मी आईला निघूच दिलं नसतं, आज नाशिकहून. मीच कारणीभूत आहे आईच्या मृ...".

हे इतकं बोलून, स्वाती आता ढसाढसा रडू लागली होती. सागरच्याही डोक्यातून साफच गेलेली ही गोष्ट, त्याला आता आठवली होती. तो ही आता पुरता भेदरला होता, आणि स्वतःला गिल्टी फिल करवून घेत होता. सत्यनारायणाची पूजा अर्ध्यावरच थांबलेली. पंचामृतही तुपाशिवाय अडलं होतं. आता पुढे काय करावं, त्याबद्दल कोणालाच काही सुचत नव्हतं. सागरला जेवढं मघा त्या इनस्पेक्टरचं ऐकू आलं होतं, त्यावरुन गाडी बरीच डॅमेज झाली होती. म्हणजे आतली लोकं ही... सागरने मान हलवत, विचार झटकून लावला. आता तो स्वातीला, व्यवस्थित रडू देत होता. त्याने आपल्या आई - बाबांकडे पाहिलं... तर ते दोघेही डोळे मिटून, हात जोडून उभे होते सत्यनारायणासमोर. त्यांचं बघून मग, सागरनेही मनोभावे हात जोडले सत्यनारायणाला. 

आणि तितक्यात त्यांच्या सकाळपासून, सताड उघड्याच असलेल्या दाराची बेल वाजली. सगळ्यांनी एकत्रच दाराकडे पाहिलं... तर दारात रोहिणीबाई उभ्या होत्या, हातात पिशवी घेऊन. सगळे अवाक् होऊन, बघतच राहिले रोहिणीबाईंकडे. स्वातीने धडपडत उठून, पळत जात... आईला घट्ट मिठी मारली. पण अत्यानंदाने भरुन वाहणार्‍या डोळ्यांमुळे, तिच्या तोंडून काही शब्दही फुटेना. मग रोहिणीबाईच तिला पकडत... आत येत, सोफ्यावर टेकल्या. एक भांडभर पाणी घटाघट पिऊन, पदराने तोंड पुसत बोलू लागल्या त्या...

"समोरुन एक दुसरी आमच्यासारखीच टॅक्सी, डिव्हायडर तोडून आमच्या गाडीवर आपटली. आणि वाकडी तिकडी पुढे जात, उलटली ती दोन - तीनवेळा. आमच्या टॅक्सीचं, ड्रायव्हरच्या साईडचं बरंच नुकसान झालं. पण ड्राईव्हरच्या मात्र, जरासं कपाळाला लागलं बस्स. त्याच्या शेजारी बसलेल्या मला... नी मागे बसलेल्या तिघांना, तर साधं खरचटलंही नाही. पण... पण त्या दुसर्‍या गाडीतले दोघे गेले गं, आॅन द स्पाॅट. ह्या सगळ्या प्रकरणामुळेच, आम्हा सगळ्याच प्रवाशांना पोलिसांनी थांबवून ठेवलं होतं. त्यांचे ते सारे पोलिसी सोपस्कार आटोपल्यावर, मग एकेक करुन सोडलं आम्हाला. त्यांच्यापैकीच एका पोलिसाने मला... एक टॅक्सी पकडून, त्यात बसवून दिलं". हे बोलून झाल्यावर... रोहिणीबाईंनी त्यांच्याकडील पिशवीतली, तुपाची मोठी बरणी स्वातीच्या हातात दिली. आणि बोलल्या त्या... 

"कालच कढवलंय तुप घरी. मी नवस बोलल्याप्रमाणे... तुमच्याकडील पंचामृतात, माझ्या हातचं तुपच जायचं होतं असं दिसतंय. म्हणून तर सत्यनारायण देवच, खमकेपणाने पाठीशी उभे राहिले माझ्या". 

आणि घट्ट बिलगल्या रोहिणीबाई स्वातीला. सागर पाया पडला मग रोहिणीबाईंच्या... आणि उमाबाईंनीही साश्रू डोळ्यांनीच त्यांचे हात, आपल्या हातात धरले ठामपणे. निळकंठरावांचेही डोळे भरुन आले होते. सागर आत जाऊन, पंचामृताचं भांड नी पळी घेऊन आला. स्वातीने तुपाची बरणी उघडली, आणि उमाबाई रोहिणीबाईंना म्हणाल्या... 

"विहीणबाई... तुमच्या हातचं कढवलेलं तुप, तुमच्या हातूनच पंचामृतात घाला... नी छान मिसळून एकजिव करा ते सगळं. आम्ही दोघं, सागर नी स्वाती... असे चौघे आहोतच, एकमेकांत आधीच विरघळून गेलेले. तेव्हा आता तुम्ही पाचव्याही या आमच्यात, म्हणजे खर्‍याअर्थी पंचामृत तयार होईल आपलं. आज ही पूजा आटोपली की... दोनेक दिवसांनी, तुम्ही सागर सोबत नाशिकला जायचं. आणि तुम्हाला तुमचा घ्यायचाय तो संसार गोळा करुन, सरळ इथे राहायला यायचं... कायमचं. शेवटी जावई हा मुलगाच तर असतो, तेव्हा अवघडलेपण यायची गरजच नाहीये. गुरुजी... तुम्ही करा पुन्हा सुरुवात पूजेला. आणि आता ह्या पंचामृतातील एकही घटक... वेगळा निघता कामा नये, अशी प्रार्थना करा सत्यनारायण देवापाशी".

उमाबाईंचं हे बोलून होतय ना होतय... तोच झोपेतून जागी झालेली सिया, आतून जोरात ओरडली. आणि इथे बाहेर... हे सगळेजण एकत्रच ओरडले, भरल्या डोळ्यांनी हसतच... 

"सत्य आहे".

---सचिन श. देशपांडे

ही कथा वाचून पहा.

👇

ग्रहण




Post a Comment (0)
Previous Post Next Post