छत्र-छाया

छत्र-छाया (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

अनघा लिखिते 

          जयदीप, "काय सुमती, आज मंदिरात जाऊन आल्यावर सुद्धा चेहऱ्यावर नाराजी दिसतेय. आज देवाशी भांडण झाले की काय ?"

          लग्नाला पस्तीस वर्षे पूर्ण झाली होती. जयदीप वरीष्ठ पोलिस अधिक्षक होऊन निवृत्त झालेले. मागच्या वर्षी एकसष्ठीचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला मुलगी, जावई, मुलं आणि सुनांनी. दोन्ही मुले न्युझीलंडला स्थाईक झाले. नातवंडांसोबत फार थोडाच काळ घालवायला मिळाला. मग शेजाऱ्यांच्या मुलांचे ते दोघे आजी-आजोबा झाले.

          सुमतीच्या चेहऱ्यावरील भाव लगेच ताडले. सुमती आपल्याच विचारांत गुंग. वरवर नेहमी प्रमाणे कामं सुरू होती, पण मनात उथलपुथल सुरूच होती. झाडलोट, लादी पुसणं, पोळ्या करून देणे, धुणं-भांडी हे सगळं करायला कुसुम होती, अगदी त्यांच्या पहिल्या बाळंतपणापासुन आत्ता पर्यंत कामाला होती, तिच्यापेक्षा वयाने लहान. ती आपली कामं उरकून गेली सुद्धा. 

          सुमतीने वरण-भाताचा कुकर लावला आणि भरली भेंडी केली. कुकर होईपर्यंत नुसती ये-जा सुरू होती.

          शेवटी न राहवून जयदीप, "अगं सुमती, ये बस पाहू सोफ्यावर आधी. काय झालं ? काही तरी नक्की बिनसलंय.... नाही तर मंदिरातुन आल्यावर प्रसन्न मुद्रेने घरांत पाऊल पडतं तुझं..."

          "अहो ! जग किती वाईट होत चाललंय."

          "ते तर आहेच. पण काही वाईट अनुभव आला का तुला ?"

          "नाही. मला नाही, पण...."

          "पण काय सुमती ?"

          "बघा ना ! आपण मुलांना मोठं केलं, आता ते परदेशात स्थायिक झाले, त्यांना आपली ओढ राहीली नाही.... ते तर जावई म्हणाले की आपण बाबांची एकसष्ठी करू, तर तुम्ही या... पण अगदी उपकार करून आले दोघेही आणि लगेच दुसऱ्या दिवशी रवाना सुद्धा झाले. दुसरीकडे असे मुलं आहेत जी आपल्या आई-वडिलांना नको आहेत, जन्म देऊन सोडून देतात वाऱ्यावर. त्यांना सर्व्हाईव्ह कसं व्हायचं इतपत तरी सांभाळावे, अन्यथा जन्मालाच घालु नये."

          "बरोबर आहे तुझं. त्यांना माहीत आहे, आपण सोडलं तर अनाथाश्रमचे लोकं सांभाळतील किंवा मग बेवारस अवस्थेत जगतील. जर इतकी समज असती तर बरेच गुन्हे कमी झाले असते.  पण आज अचानक काय आलं हे तुझ्या मनांत ?"

          "आज मंदिराच्या आवारात कोणी तरी एक बाळ ठेवून गेलं. मुलगी आहे ती ? कोणी कधी ठेवली, नाही माहित त्या पुजाऱ्याला. खुप रडत होती. आज तर मंदिरात तो अगदी चर्चेचा विषय झाला आहे. मिडीया पण पोहचली. पुजाऱ्याच्या बायकोने त्या नवजात अर्भकाला दुध दिले. पण ती मला म्हणाली की मी नाही संगोपन करू शकणार, त्यांचीच परिस्थिती जेमतेम आहे. ती म्हणाली की पोलीसांना कळवुन त्या बाळाला एखाद्या अनाथाश्रम ठेवायचे. पण दोन-तीन ठिकाणी नाही म्हणाले, त्यांच्या कडे ऑलरेडी खुप मुलं आहेत, त्यांच्या संगोपनालाच मदत नाही मिळत. कसं बसं चालताहेत ते आश्रम."

          "मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा नाही का ?"

          "नाही."

          "ठिक आहे. चल तु टेन्शन नको घेऊ, मी स्वतः लक्ष घालून शोध घेतो या प्रकरणात..."

          "अहो पण. सापडले तर ते अजून दुसरी कडे टाकून नाही देणार, याची काय गॅरंटी. मी काय म्हणते की आपण त्या मुलीला सांभाळलं तर ?"

          जयदीप एकदम अचंबित होऊन पहात राहतात.

          "अहो ! काय म्हणतेय मी ? समजतंय का तुम्हाला ?"

          "मला हेच म्हणायचे आहे की तु काय बोलतेस, हे तुला समजत नाही का ? अगं मी साठी ओलांडली आहे, पुढच्या वर्षी तु ओलांडशील. हे काही आपलं वय नाही अगदी लहान बाळाला सांभाळणं. कधी आपली पानं गळतील, त्यात ही जबाबदारी.... छे.. छे... इतकी इमोशनल नको होऊस. इट्स नॉट अ जोक."

          "अहो आपण बाई ठेऊ करायला. सुना इथेच असत्या, नोकरी करत असत्या तर नसतं सांभाळलं मी ?"

          "अगं आजी म्हणुन काही वेळ सांभाळणं आणि आई होऊन सांभाळणं, यांत काही फरक आहे का नाही ? वाटल्यास आपण ज्या अनाथाश्रमात ठेवण्याची व्यवस्था करू, त्यांना दरमहा काही रक्कम डोनेट करू."

          सुमती काही न बोलता हिरमुसुन उठून जाते. टेबलावर जेवण वाढते. दोघेही न बोलताच जेवतात. एकमेकांच्या विचारांत दूमत आलेलं असतं. सुमतीच्या डोळ्यासमोरून त्या तान्हुलीचा चेहरा हटतच नाही. जयदीप यांचा साफ नकार तिला आवडलेला नसतो, तिला हे अपेक्षितच नसतं. विचार करता करता तिचा डोळा लागतो.

          जयदीप शतपावली करत विचार करत असतात की सुमतीच्या मनांत हे कसलं खुळ आलं... दुपारचे दोन वाजले असतात. जयदीप शर्ट चढवतात आणि मंदिरात जायला निघतात. मंदिरात पोहचल्यावर, लोकं त्यांना पाहून मागे हटतात. त्यांचा आदरयुक्त दरारा अजूनही कायम असतो.

          त्या बाळाला पाहून त्यांना सुद्धा दया येते. निरागस, भाबडं रूप जणू काही याचना करत होते की मला सांभाळा, मला नका या जगात असंच सोडून देऊ माझ्या जन्मदात्यां प्रमाणे. त्यांचेही हृदय परिवर्तन होतं. ते घरी परततात. सुमतीने चहाचं आधण ठेवलेलेच असतं.‌..

          "सुमती, खुप रागावलीस नं माझ्यावर ?"

          "नाही. इट्स ओके. बरोबरच आहे तुमचं. आपण एखाद्यावेळेस नाही नीट सांभाळू शकणार. पण मनाला नेहमी खंत राहील. आपल्याला देवाने सर्व दिलं, पैसा-अडका, सोबत एक चांगलं काम करण्याची संधी सुद्धा दिली, पण आपण असमर्थ ठरलो."

          जयदीप तिच्या खांद्यावर हात ठेवून, "सुमती, आपण ती संधी वाया नाही जाऊ देऊ. मी तयार आहे, तुझ्या या सत्कार्यात सहभागी व्हायला. उद्या आपण रितसर दत्तक घेऊ. उद्या लक्ष्मी-पूजनाच्या शुभसमयी त्या लक्ष्मीला घरी घेऊन येऊ. चल... आता चेहऱ्यावर छानसे स्माईल आणं, देवाजवळ दिवा लाव."

          सुमतीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. 

          "नको रडूस सुमती... मला लक्षात आलं की तु का असं विचार करतेय.."

          "साठ वर्षांपूर्वी मला जर बाबांनी दत्तक घेतले नसते, तर माझी काय अवस्था असती, हे विचार करून अंगावर काटा उभा राहतो हो. बाबा आणि आईची मी बायलॉजिकल मुलगी नाही, हे मला लग्नाच्या वेळी कळले, ते पण तुमच्या घरच्यांची फसवणूक नको व्हायला म्हणून. तेव्हा मी तुटून गेले होते. तुम्ही आणि तुमच्या आई-वडीलांनी मला सावरले. तसेच आयुष्य आपण त्या चिमण्या जिवाला द्यावे, हीच ईच्छा होती."

          "तुझी ईच्छा पुर्ण होईल उद्या. ठिक आहे. चला तु आज चकल्या करणार आहेस ना ? मी केव्हाची वाट बघत आहे की कधी मी खुसखुशीत चकल्यांवर ताव मारणार."

          सुमतीने आनंदात छान चकल्या केल्या. संध्याकाळी आकाशदिवा, पणत्यांनी घर झगमगुन गेलं. जयदीप यांनी येता जाता चकल्यांचा चांगला समाचार घेतला. 

....

          दुसऱ्या दिवशी लक्ष्मी-पूजन, अगदी पहाटे उठून आंघोळ, सडा-रांगोळी, देवपूजा, नैवेद्य, सर्व आवरून छानशी तयार होऊन सुमती हॉलमध्ये आली. जयदीप तयार होते लक्ष्मीला आणायला. दोघे कारने बाहेर पडले, जातांना सुंदर पाळणा, छोटे छोटे कपडे, लंगोट, झबली-टोपरी, दुधाची बॉटल, घेतले. लक्ष्मीला रितसर दत्तक घेतले आणि घरी आले. कुसुमने ओवाळणीची तयारी केली होती. सुमतीने तिला ओवाळून घरांत घेतलं.

          जसंच मुलांना कळलं, तेव्हा शुभेच्छा, सहकार्य सोडून फक्त टिकाच केली. सणाच्या दिवशी मुलांची नाराजी पत्करली.

          तिचं नाव देखील लक्ष्मी ठेवलं. संध्याकाळी एक स्त्री काम मागायला आली. काही केल्या ती ऐकत नव्हती, गयावया करत होती. 

          "अगं आमच्या घरी सर्व कामांसाठी आहे बाई... अजून गरज नाही."

          "छोट्या बाळाला सांभाळायला तर हवंच आहे नं सुमती आपल्याला.", जयदीप म्हणाले.

          सुमती त्या बाईला म्हणाली, "हे बघं या बाळाला सांभाळायला हवे आहे, तु करशील का हे काम... अगदी शी-सु पासून मालीश वगैरे सगळे करणारी हवी आहे."

          "हो... आईसाहेब मी सांभाळेल नं सगळं. तुम्हाला काहीच तक्रार करायला जागा नाही मिळणार.", ती आनंदाने तयार झाली.

          "हे बघ... नाव काय तुझं ?", सुमती.

          "चंपा मोरे...", तिने नांव सांगितले.

          "हे बघ चंपा, आम्ही तुला मुळीच ओळखत नाही. तु काही हलगर्जीपणा किंवा दगा-फटका केलास तर तुला महागात पडेल. हे मोठे पोलिस अधिकारी होते... समजलं...", सुमती.

          "हो ताई... मी आत्ता पासून राहु ?"

          "चालेल. तु तुझ्या बद्दल माहिती दे आणि मग मी तुला खोली दाखवते."

          वीस वर्षांची चंपा सांगायला लागली, "मी हिरॉईन बनण्याचे स्वप्न घेऊन या शहरात आले, माझी फसवणूक झाली. आता गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही. मी परत नाही जाऊ शकत. माझं शिक्षणांत लक्ष कमीच होतं. त्यामुळे नोकरी पण मिळत नाही किंवा कमी दर्जाची मिळते, मग पगार पुरत नाही. मला तुम्ही एकवेळ कमी पगार द्या, पण डोक्यावर छत खुप आवश्यक आहे हो.", ती हमसुन रडु लागली.

          "ये रडू नकोस आता. आज चांगला दिवस. माझ्या जुन्या साड्या-ब्लाऊज आहेत, ते घाल आणि ये पूजेला... गुरूजी येतीलच इतक्यात. आमच्या घरी लक्ष्मी आली आहे, तिच्या साठी स्पेशल साग्र संगीत पुजा ठेवली आहे.", सुमती.

          "हो. आईसाहेब.", म्हणून ती पाया पडली.

          "सदा सुखी रहा.", आशिर्वाद देऊन सुमतीने तिला उठवले.

          दिवसामागून दिवस जाऊ लागले.आठ-पंधरा दिवसांत चंपाला चांगलाच लळा लागला लक्ष्मीचा. सुमतीला आता काहीच चिंता नव्हती. ती आजी बनुन राहीली, बाकी तिच्या सोशल ॲक्टीव्हीटीज् सुरू झाल्या. चंपा अगदी सर्व व्यवस्थित सांभाळून घ्यायची आईसारखे. 

          दुपारी तर चंपा आणि लक्ष्मी दोघीच असायच्या. एकेदिवशी सुमती सहज म्हणून तिच्या खोलीत गेली लक्ष्मी पाळण्यात दिसत नाही म्हणून पहायला. तर समोरचं दृश्य पाहून ती अवाक झाली. चंपा लक्ष्मीला पदरात घेऊन दुध पाजत होती. सुमतीला पाहून ती बावचळली. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. लक्ष्मीला दूर करताच, ती तान्हुली दुधासाठी रडु लागली.

          "चंपा, आधी तिला दुध पाज. मग बोलू आपण.", असं म्हणून सुमती तरातरा निघून गेली.

          लक्ष्मी झोपली होती, चंपाने तिला आणले आणि पाळण्यात ठेवले. सुमतीचे पाय धरले, "आईसाहेब, माफ करा. मी च आई आहे हो. म्हणून पाझर फुटतो."

          सुमती खुप संतापली होती, "मग असं तिला जन्माला घालुन सोडून देताना लाज नाही वाटली आणि कुठे आहे हीचे वडील. आता यांना सांगुन जेल मध्ये खडी फोडायला लावते. एखाद्याला जन्म देऊन, त्याच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार कोणी दिला. जा चालती हो इथुन..."

          "असं नका करू आईसाहेब. मला एकदा माझं म्हणणं मांडण्यासाठी संधी द्या. मग तुमचा निर्णय मला मान्यच राहील. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला फसवल्या गेलं, माझ्या वर अन्याय झाला, त्यातून या मुलीचा जन्म झाला, वडील कोण म्हणुन नाव घेऊ. मी लहानपणी पासून देवाची मनोभावे पूजा करत आली आहे, पण तरी माझ्या नशिबात हे काय वाढून ठेवले होते. माझी फक्त हिरॉईन व्हायची ईच्छा होती, ती चुकीची होती का ? एखाद्या गरीब मुलीनी हे स्वप्न पहायचेच नाही का ? माझ्या वर मातृत्व लादलं गेलं. मी अबॉर्शन करून घेऊ शकली असती, पण मी आई आहे, मीच माझ्या बाळाला कसं मारू. मुलगा असता तर मी निर्धास्त असते. पण मुलगी झाली, मी देवावर खुप नाराज झाले. एका वर एक परीक्षाच सुरू होती. मी देवाला म्हटलं की आता तुच सांभाळ हिला. माझं रक्षण करू नाही शकला. किमान हीचं तर कर. सिद्ध कर आता तुच स्वतःला. देवाला पाझर फुटला, तुमच्या रूपी पालक मिळाले. मला माझ्या मुलीला सुखात नजरेसमोर पहायचं होतं. म्हणून मी तुमच्या कडे काम मागायला आली. देवाने मला तिला सांभाळ करण्याचं काम दिले. मी माझ्या चिमण्या जिवात गुंतले. बस्, येवढं आहे सांगण्यासारखे. मी जाते, फक्त तिला कधीच कळू देवु नका माझ्या बद्दल. तिला खूप दुःख होईल."

          सुमतीला स्वतः अनुभवलेले दु:ख आठवलं, लग्नाच्या वेळी जेव्हा तिला कळलं की आपण अनाथ आहोत. चंपाने आपल्या मुलीला डोळे भरून पाहीले आणि जाऊ लागली. जयदीप पण आलेलेच होते, चंपाचे दु:ख ऐकून ते पण हळहळले.

          "थांब चंपा.", सुमती.

          चंपा घाबरली, रडवेल्या सुरात म्हणाली, "आईसाहेब. मला नका पोलिसांत देऊ. अजून माझ्या वर जेल मध्ये जाण्याचा ठपका लागला तर मला थातुरमातुर काम सुद्धा नाही मिळणार. मी कोणत्याही वाईट उद्देशाने नव्हती आली." त्यांच्या पाया पडली.

          तिला उठवत, "चंपा तुझी आता एकच शिक्षा आहे की तुला आमची मुलगी बनून रहावं लागेल, लक्ष्मीची आई बनून झाशीची राणी सारखे शूर, कणखर व्हावं लागेल, दुबळी राहशील तर लोकं गिळून टाकतात. आपल्या मुलीला नीट शिकवुन एक आदर्श, सुजाण नागरिक बनवायची आई-वडीलांची जबाबदारी असते. ज्यांनी गुन्हा केला आहे, त्याची शिक्षा तर देव त्यांना देणारच आहे, त्यांच्या पापाचा घडा भरल्यावर. तुझी चुक ही होती की तु चुकीच्या लोकांवर भरवसा केला, देवाने तुला वेळोवेळी सिग्नल्स नक्की दिले असतील."

          तिला आठवलं की दादाने सांगितले होते की जयेश बरोबर मुलगा नाही. आई-बाबांनी चांगल्या मुलाशी साक्षगंध करून दिले होते. तिला माहित होतं की तो मुलगा चांगला आहे, पण जयेशवर प्रेम केलं, त्यानी दाखवलेल्या खोट्या स्वप्नाला भुलली. जिथे थांबले होते, तिथल्या मुलीने सुद्धा सावध केले होते की पळून जा. पण जयेश म्हणाला की तिच्या जागी तुला ब्रेक मिळणार आहे, म्हणून ती असं म्हणतेय. असं प्रत्येक मोठ्या हिरॉईनला आज याच्या सोबत उद्या त्याच्या सोबत रहावं लागतं. एकदा का तु स्टार झाली की मग नाही गरज याची. ते लोकं तुला मोठमोठ्या ऑफर्स देतील. असं खोटं सांगुन फसवलं आणि मी फसले. देवाची काहीच चूक नव्हती, फक्त मला ईशारा कळला नाही.

          "चंपा कुठे हरवलीस. जा तुझी मुलगी उठली आहे, रडतेय, तिच्या दुधाची वेळ झालीये. वरची रूम तुझी आहे, पाळणा मी कुसुमला ठेवायला सांगते वर. तुझं सामान पण घेऊन ये."

          चंपा सुमतीच्या गळ्यात पडून हमसुन रडली, आज तिला सुद्धा मायेची छत्र-छाया  मिळाली होती....

समाप्त

अनघा लिखिते.

तुम्हाला हे वाचायला आवडेल.

👇

प्यार का गम

Post a Comment (0)
Previous Post Next Post