मैत्री

मैत्री  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ शिल्पा कुलकर्णी

सा रे ग म प म प ध नी सा..... सुंदर सुरांची बरसत होत होती. पावसामुळे घरात नाइलाजाने थांबलेला राकेश हे स्वर ऐकून गॅलरीत आला. एरवी तो स्वच्छंदी, एकटा जीव अहोरात्र कुठे ना कुठे फिरत असे. बाईक टूर नाहीतर ऑफिस. कुठून स्वर येतायत त्याला काहीच समजेना. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या शेजारच्या घरातूनच हे स्वर येत आहेत. आत्तापर्यंत इतका सुंदर आवाज त्याने ऐकलाच नव्हता. आणि आपल्या शेजारच्या घरामध्ये कुणी गातं हेच त्याला माहीत नव्हतं. आपण घरातच कुठे असतो म्हणा? त्याच्या मनातल्या प्रश्‍नाचे उत्तर त्याने मनातच देऊन टाकले. पण तरीपण....
तो घरातून जरा बाहेर आला. एकाला एक चिकटून असलेल्या रो हाऊस असल्यामुळे शेजारच्या बंगल्यातल्या पॅसेजमध्ये तो गेला. खूप मधुर सुरात ती मुलगी गाणे गात होती. आता ती गात होती, ‘जब कोई बात बिघड जाए...’ त्याने शेजारच्या दाराची बेल वाजवली. इथे फक्त एक काका काकूच राहातात हे त्याला पक्कं माहीत होतं, मग आत्ता गाणं कोण म्हणतंय? काकू? त्याच्या मनात प्रश्‍न आला आणि मग काकूंचा चेहरा आठवून त्याला हसू आलं. त्या बेटा बेटा करत नाटकी गोड गोड बोलणार्‍या काकू इतक्या सुंदर गात असतील? आणि छे हा तर तरुण मुलीचा आवाज वाटतोय.
बेल वाजवून 10 मिनिटं झाली तरी दार उघडलं गेलं नाही, पण गाण्याचा आवाज पूर्ण थांबला होता. आत काहीच हालचाल नव्हती. राकेशने खिडकी हलवून पाहिली. थोडीशी फट  राहिल्यामुळे त्याला ती स्लाईडिंग विंडो उघडता आली. आणि आतलं दृश्य बघून तो एकदम स्तब्ध झालं. एक सुंदर तरुणी व्हील चेअरवर बसलेली दाराजवळ जाऊन कडी उघडण्याची खटपट करीत असलेली त्याला दिसली. पण तिला काही ते जमत नव्हतं.
‘‘अहो शुक शुक ऽ’’ त्याने पटकन हाक मारली. तिने मान वळवली. आणि राकेशला पाहून ती घाबरली.
‘‘घाबरू नका. मीच बेल वाजवत होतो. राहू द्या. दार उघडायचं.’’
ती सावकाश व्हील चेअरवरून खिडकीशी आली.
‘‘मला नाही हो जमत दार उघडायला.’’ तिने गोड आवाजात सांगितलं.
‘‘तुमचं नाव काय?’’ राकेशने दबकतच विचारलं. ‘‘पहिल्यांदाच पाहिलं तुम्हाला इथे आणि तुमचा आवाज किती मधुर आहे.’’
‘‘माझं नाव सुवर्णा! धन्यवाद माझ्या आवाजाची स्तुती केल्याबद्दल.’’
‘‘अहो धन्यवाद कसले मानता?’’
‘‘हो कारण आताशा मला कौतुक ऐकायची सवय राहिली नाही.’’ तिच्या मधुर स्वरात दु:ख होतं.
‘‘तुम्ही इथे कधीपासून आहात?’’ राकेशने विचारले.
‘‘दोनच दिवस झाले मी इथे आले आहे मामीकडे.’’ तेवढ्यात एखादा बोका कसा वाढत येतो तशा काकू वास काढत  हजर झाल्या.
‘‘अरे वा बेटा राकेश? तू आज घरी कसा? आणि इकडे काय करतोस?’’ त्यांनी जरा साशंकतेनेच विचारले.
‘‘काही नाही. काकू, तुमच्या घरातून छान गाण्याचा आवाज आला म्हणून..’’
‘‘बरं बरं...’’ म्हणत काकू रागारागानं आत गेल्या त्यांना गाण्याची स्तुती आवडलेली दिसत नव्हती. हा उपटसुंभ राकेश इकडे कुठे फिरकला? अशी काकूंची झालेली चडफड त्याला जाणवली.
काकूंना बघताच सुवर्णाच्या डोळ्यातलं भीतीचं सावट राकेशच्या नजरेतून सुटलं नाही. राकेशला खूपच अपराधी वाटलं तो आपल्या घरी जायला वळला. पण त्याच्या मनातून तो सुवर्णाचा स्वर काही जाईना. नंतर आठवडाभर तो सुवर्णाला भेटण्याचा प्रयत्न करत राहिला, पण ती काही त्याला भेटली नाही. ती तर भेटली नाहीच, पण तिचं गाणंही ऐकू आलं नाही. एक-दोनदा काका-काकू त्याला गडबडीत बाहेर जाताना दिसले. त्याने त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ताकास तूर लागून दिली नाही. ते बाहेर गेल्याची खात्री करून त्याने खिडकीही उघडायचा प्रयत्न केला, पण या वेळी खिडकी घट्ट लावलेली होती.
आता काका-काकू राकेशवर आणि राकेश त्यांच्यावर लक्ष ठेवून राहू लागला. एकदा आपण 4-5 दिवस गावी जातोय असं काका-काकूंना सांगून राकेश तिथून बाहेर पडला. काकूंनी जरा हुश्श केलं. राकेशच्या डोळ्यांत त्यांनी सुवर्णाबद्दलची करुणा पाहिली होती. त्यांना ती आपल्याकडे राहाते हे कुणालाही सांगायचं नव्हतं. तिलाही आता गाणं म्हणण्याची पूर्ण बंदी होती. राकेश गावी गेला असं समजून काकू जरा निश्‍चिंत होत्या. त्यांनी काही बेत आखले. दुसर्‍याच दिवशी त्या आणि काका कुठेतरी गडबडीत बाहेर पडले. समोरच्या मित्राच्या फ्लॅटमधून लक्ष ठेवून असलेल्या राकेशने ते बरोबर हेरले.
तो तातडीने सुवर्णाच्या घराजवळ गेला. पण तरीही खिडक्या बंदच होत्या. त्यानं खिडकीजवळ टकटक करताच खिडकी उघडली गेली. त्याला जरा आश्‍चर्यच वाटलं, तिथं डोळे पाण्याने भरलेली सुवर्णा खुर्चीत बसलेली होती. ती म्हणाली.
‘‘मला वाटलंच होतं, कधीतरी तुम्ही या खिडकीत याल आणि मला हाक माराल. मी दार उघडायचीही प्रॅक्टीस केलीय. थांबा मी दार उघडते.’’ सुवर्णा म्हणाली आणि राकेशचं काम सोपं झालं.
राकेशला फारच आनंद झाला. सुवर्णा म्हणाली, ‘‘तुम्ही अगदी योग्य वेळ साधलीत मामा-मामी गावाला गेलेत. दोन दिवस येणार नाहीयेत. मला सर्व सूचना करून गेलेत.’’
‘‘अरे वा मग बरंच झालं की, पण मला सांगा नक्की हा काय प्रकार आहे? तुम्हाला असं बंदिस्त करून का ठेवलंय?’’  
‘‘सांगते. मी तुम्हाला एकदाच बघितलं आहे, पण तुमच्यावर विश्‍वास ठेवून सांगते, कारण तुम्ही मला खूप चांगले गृहस्थ वाटलात. मला माझे मित्रच वाटलात. माझ्या आयुष्यात जर काही चांगलं होणार असेल, तर तुम्ही मला देवासारखे मदत कराल.’’
‘‘मी नक्की प्रयत्न करेन.’’ राकेश म्हणाला.
‘‘मी माझ्या आई-वडिलांची एकुलती मुलगी, पण अशी अधू. इथून जवळच्याच गावात आमचं घर आहे, मला गाण्याची आवड आहे. किंबहुना तिथे माझे प्रोग्रामही होत असत, पण कारोना काळात माझे आई-बाबा गेले आणि...’’ सुवर्णा रडू लागली.
हो मध्यंतरी काका-काकू बरेच दिवस गावी गेले होते खरे.
‘‘हो ते तिकडे आले, पण माझ्या जीवनाची वाट लावून गेले.’’
‘‘म्हणजे काय केलं?’’
‘‘मामीला आमचा पैसा, घरदार, याचा मोह पडला. मला तिकडचे कोणीच नातेवाईक नाहीत हे तिच्या पथ्यावरच पडलं आणि मामाही मामीच्या मागे नाचू लागला. त्यात मी अशी अधू. माझी जबाबदारी तरी कोण घेणार? मामा-मामी मला इकडे घेऊन येत आहेत म्हटल्यावर सगळ्यांनीच हुश्श केलं. खरंतर आपल्याच घरात राहून मी सर्व काही मॅनेज करणार होते, पण.. मामा-मामींनी मला इकडे आणून मला सांभाळायची तयारी दाखवली आणि मीही भुलले. मी इकडे आले, पण आता मला यांचे सर्व डाव कळत आहेत, मी असहाय्य आहे. मला एक मावशी आहे, ती या सगळ्याच्या विरुद्ध होती, पण तिला या दोघांनी गप्प केले.’’ सुवर्णाने जमेल तसं सर्व राकेशला सांगितले. राकेशला तिची फार दया आली. राकेश सडाफटींग मुलगा होता. तो आपलं घरदार सोडून एकटाच राहात होता. त्याला चांगली नोकरी हाती, कुणाची तमा नव्हती, पण कसं काय कोण जाणे त्याला सुवर्णाबद्दल प्रेम वाटू लागलं होतं.
त्याने तिला थोडावेळ थांबण्यास सांगितले. त्याच्या घरी कामाला येणार्‍या लक्ष्मीला त्याने बोलावले. आपली स्वत:ची गाडी काढली आणि तो सुवर्णाला घेऊन तिच्या गावी गेला. बरोबर तिच्या मावशीलाही घेतले.
सुवर्णाच्या घरात तिचे मामा-मामी आधीच पोहोचले होते, राकेशचा अंदाज बरोबर ठरला होता. सुवर्णाकडून जबरदस्तीने सह्या घेऊन ते तिचे घर विकण्याच्या विचारात होते. राकेशला आणि सुवर्णाला तिथे पाहातच त्यांच्या चेहर्‍याचा रंगच उडाला.
‘‘तू इथे काय करतोयस?’’ काकूंनी त्याला जोरात विचारले.
‘‘मी काही करत नाहीये, तुमच्या हातून चुकीचं काही होऊ नये म्हणून मी इथे आलो आहे.’’ राकेशने जरबेच्या आवाजात सांगितले.
मग काका-काकूंचा सर्व बेत त्याने हाणून पाडला. त्यांना सुवर्णाच्या वाट्याला न जाण्याची तंबी दिली आणि तो सुवर्णाच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला. पुढे त्याने सुवर्णाच्या पायाची ट्रीटमेंट करून घेतली. ती आता आपलं आपलं सर्व करत होती. मावशीच्या मदतीने गाण्याचे प्रोग्राम करत होती. एक नावाजलेली गायिका म्हणून ती प्रसिद्ध झाली आणि राकेशबरोबरच राहू लागली. त्या दोघांनी लग्न वगैरे केलं नाही, पण एक मैत्रीचं नातं ती जगली आणि त्या त्यांच्या मैत्रीच्या नात्याला ती दोघंही जागली....
वेळ आली की मात्र सुवर्णा त्याला हमखास म्हणत असे, ‘जब कोई बात बिघड जाए...’’
राकेशही हसून तिला प्रतिसाद देत असे.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी,

kolhapur

हे वाचून पहा. 👇

छत्र छाया

Post a Comment (0)
Previous Post Next Post