ठसठसणारी ठुशी

 ठसठसणारी ठुशी (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

अपर्णा देशपांडे



          खिडकीतून  उन्हं आत येऊन पार चटके बसायला लागले , तसा नाईलाजाने दिवाकर उठला .
सविता आणि तिच्या प. पू. मातोश्री नक्की घरात नाहीयेत न  , हे त्याने बघितलं . कालच आपण त्यांना दुपारी रेल्वेत बसवून आलो हे आठवल्यावर  हे स्वप्न नसून सत्य आहे हे जाणवून त्याने हातपाय ताणून मस्त आळस दिला . इतका सगळा मोकळा वेळ आपल्या चड्डी बड्डी दोस्त प्रशांत सोबत मस्त धमाल करून घालवायचा म्हणून त्याने प्रशांत ला रात्रीच बोलावून घेतलं होतं .
प्रशांत मात्र आधीच  उठून तयार झाला होता . दोघांनी
रात्री उशिरापर्यंत जागून सिनेमा बघितला . .. नुसताच सिनेमा बघितला नव्हता , तर  खारे दाणे आणि काजू आणून मनसोक्त कार्यक्रम जमवला होता ...त्यामुळे काल त्याची स्वातंत्र्यसंध्या अगदी मनासारखी साजरी करून झाली होती .
दिवाकर अतिशय खुश होता .
   " इतका उडू नको रे दिव्या ! तुझे स्वातंत्र्य फार काळ टिकणार नाहीये .
परवा तुला पण जायचंय न लग्नाला ?" गुणगुणत , आनंदाने डोलत दात घासणाऱ्या दिवाकर कडे बघून प्रशांत म्हणाला .
"हट रे! मी कसला जातोय लग्नाला ? इतक्या दिवसा नंतर मोकळा वेळ मिळालाय . मला एन्जॉय करू दे जरा!"
दुपारच्या जेवणासाठी  बाहेरून मागवलेली चिकन बिर्याणी ताटात वाढून घेतांनाच दिवाकर चा फोन वाजला . सासुबाईंचा फोन म्हटल्यावर उचलताना त्याची इतकी तारांबळ झाली की फोन बिर्याणीच्या भांड्यात पडता पडता वाचला .
"हॅलो सासूबाई !  सुखरूप पोहोचल्या न तिकडे?" आवाजातला आनंद लपवत त्याने विचारलं.
"होय हो...पण न एक गडबड झाली बघा . नवऱ्या मुलीसाठी घेतलेली ठुशी सविताच्या कपाटतच विसरली . तुम्ही परवा येताय तर तेव्हढी घेऊन या न!" सासूबाई हुकूम युक्त आर्जवी स्वरात म्हणाल्या .
" चक्क नवऱ्या मुलीच्या आहेराची ठुशी कशी काय विसरली पण?"
"इतकं काय त्यात? तुम्ही येताय न मागनं ! तुम्हाला काहीही ओझं होणार नाही त्याचं ! आणा आठवणीने!" प.पूं नी हुकूम सोडून फोन बंद केला . हा प्रेमळ संवाद ऐकून हसणाऱ्या प्रशांत कडे बघून दिवाकर चिडला . "दात काय दाखवतो बे ? तुझं लग्न होउदे , मग बघतो!"
    
     निवांत बिर्याणी खाऊन दिवाकर ने  सविताचं कपाट उघडलं . सगळीकडे बघितलं , पण ते ठुशी नामक प्रकरण काही सापडलं नाही . त्यानं गुगल वर ठुशी ची चित्र बघून घेतली , पण त्या सारखा कुठलाही दागिना तिथे नव्हता . थोडासा वैतागून त्याने सविता ला  फोन केला .
"अग कुठे आहेत तुमच्या ठुशी बाई?
तुझं सगळं कपाट शोधलं मी! "
" माझ्या साड्या उचकटून ठेवू नका बरं!
दूसऱ्या कप्प्याखाली चोर कप्पा आहे . त्यात बघा न जरा ."
"त्याला कुलूप आहे ..किल्ली कुठाय सविता?" थोडसं वैतागत दिवाकर म्हणाला .
"अहो , स्वयंपाक घरात दुसऱ्या फळीवर
साबुदाणा असं लिहिलेल्या डब्यात पोहे आहेत ..त्यात आहे चावी ."
   दिवाकर ने डोक्यावर हात मारला . काय ह्या बायका ! कुठे काय ठेवतील नेम नाही म्हणत त्याने चावी आणली .
" काय सविता ! इथे फक्त रेसिपी चे कागद आहेत ..एकही दागिना नाही ."
"अय्या ! विसरलेच मी . आत्ता आठवलं . अहो , ती ठुशी न , पौर्णिमा कडे राहीलीये . तिला तश्शीच बनवून घ्यायची आहे न , म्हणून तिने नेली होती . तिच्याकडून आणून घ्या न प्लि sज ."
हे ऐकून दिवाकर चं निम्मं अवसान गळालं . त्याला बघून
प्रशांत ने पुन्हा दात काढले , तसा दिवाकर ओरडला " घशात हात घालून  खाल्लेली सगळी बिर्याणी बाहेर काढेन मी . हसू नकोस ! आता जा तूच पौर्णिमा कडे , आणि आण ती ठुशी !"
"चिडू नकोस रे ! बिच्चारा ! ..हॅ.. हॅ !!! ..आणतो ..आणतो...." म्हणत तो खाली जाण्यासाठी उठला .
    प्रशांत गेल्यावर अंघोळ करावी म्हणून दिवाकर ने गिझर सुरू केला , अंगाला टॉवेल गुंडाळला , आणि दाढी करावी म्हणून बेसिन जवळ गेला , की खालून जोरात  प्रशांत चा आवाज आला ..
"दिव्या ss , ए दीव्या ss !"
  अंगाला टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत तो बाहेर पळाला ....जोराचा वारा आला , आणि धाडकन  लॅच लागलं !! कपाळावर हात मारून तो ओरडला ,"काय झालं रे ?"
"अरे , मी चुकून तुझ्या गाडीची चावी आणलीय ..त्यात पेट्रोलच नाहिये!
कसा जाणार? मला
माझ्या स्कुटर च्या चाव्या दे न ! फेक वरून खाली !"
" दहाव्या मजल्यावर जाऊन आता मलाच फेकतो खाली ! "
"तू नकोयस मला , चाव्या दे !"
" अरे नालायका , दार लागलंय हवेने . माझ्याकडे चाव्या नाहीत ! " त्याचा आवाज ऐकून वरच्या  मजल्यावरील नखरेल शर्मिला ने त्याच्याकडे असं काही बघितलं , की त्याला  आपण फक्त टॉवेल वर बाहेर अडकलोय ह्याची  जाणीव झाली , आणि तो अजूनच वैतागला .
      धापा टाकत वर आलेल्या प्रशांत ला टॉवेल गुंडाळून कपाळाला हात लावलेल्या अवस्थेत पायरीवर बसलेला दिवाकर बघून पुन्हा फीस्सकन हसू आलं . त्याच्याकडे दुर्लक्ष करून दिवाकर म्हणाला ,
"अजून एक किल्ली चा जोड सविता आणि प.पू. घेऊन गेल्या आहेत . एखाद्या चावी बनवणाऱ्या माणसाला घेऊन येऊ  आपण , पण असा भोंगळा नाही जाऊ शकत न ?
आधी  माझ्यासाठी समोरच्या प्रभाकर चे कपडे घेऊन येतो ."

  त्याने समोरच्या फ्लॅट ची बेल दाबली . सौ.प्रभा वहिनींनी दार उघडलं . दारात नुसत्या टॉवेल वर उभ्या दिवाकर ला बघून वहिनी म्हणाल्या , "अय्या भाऊजी ? तुम्ही तर भन्साली च्या सिनेमातल्या
रणबीर कपूर सारखेच दिसताय की ! 'जब से तेरे नैना ' म्हणत किती क्युट नाचतो न तो?"
दिवाकर ला मेल्याहून मेल्या सारखं झालं , पण तरीही नाईलाजाने त्याने प्रभाकर चे कपडे मागून आणले .
त्याच्या पेक्षा दुप्पट आकाराच्या प्रभाकर
च्या कपड्यात तो झोळीतला माकड दिसत होता , पण सध्या  दिसण्या पेक्षा लज्जा रक्षण जास्त गरजेचं होतं .

   आता आधी किल्लीवाला  गाठायचा , मग गाडी च्या चाव्या , मग पौर्णिमा कडे जाऊन ती मेली ठुशी आणली की मग ह्युश्श्य होणार होतं .
पेचात अडकलेल्या दिवाकरच्या परिस्थिती चा पूर्ण फायदा घेत चावी वाल्याने दुपटीने पैसे वसूल
करत  दरवाजा उघडून दिला . आत बाथरूम मध्ये गिझर च्या  नळाखालची बादली भरून धो धो पाणी वहात होतं . अंघोळ करून , प्रभाकर चे कपडे वापस करून ,आठवणीने किल्या घेऊन निघेपर्यंत दुपारचे चार वाजून गेले होते . संध्याकाळ चा सहा चा इंग्रजी सिनेमा बघायचा त्यांचा प्लॅन अजूनही यशस्वी होणार होता , म्हणून दोघं खुश होते .
दिवाकर च्या गाडीतलं पेट्रोल संपल्याने गाडी  लांबवर   ढकलत  पंपावर नेताना हाडं ढिले झाले होते .
",इतकं करून पौर्णिमा ताईंकडे जर ठुशी नसेल तर?" प्रशांत चा हा वाव्ह्यात
प्रश्न ऐकून दिवाकर जाम उसळला .
"काळया जिभेच्या ! अभद्र बोललास
पुन्हा? आता जर तुझं म्हणणं खरं ठरलं
तर तुला धावत पाठवेन लग्न घरी .
मग दे तुझ्या हातांनी ठुशी प.पुं .ना
      प्रशांत ने हसत स्वतःच्या तोंडावर हात ठेवला .
पेट्रोल भरून दोघं पौर्णिमा कडे गेले .
    पौर्णिमा कडून ठुशी ताब्यात घेतल्यावर दिवाकर ने डोळे भरून त्या दागिन्याकडे बघितलं . अख्खी दुपार वाया घालवणारी ती ठुशी त्याच्या नजरेत ठसठसत होती , पण
"किती गुणाचा ग माझा जावई" अशी प.पू. सासुबाईंकडून शाबासकी मिळाल्याने मनाला जरा दिलासा मिळाला होता .
       दोघांनी पळतच 'मिनर्व्हा' गाठलं , आणि आपल्या कामगिरीवर खुश होत हवी ती जागा पकडून
आरामात सिनेमा बघितला . मध्ये आलेले सविताचे कॉल चक्क नजरेआड करून त्यांनी धमाल केली.
थिएटर मधून बाहेर आल्यावर दिवाकर म्हणाला , "पश्या ती ठुशी ची बॅग नीट डिक्कीत टाक रे बाबा! पुन्हा नाटक नको!"
"ए s , दिव्या , माझ्याकडे नाहीये ती बॅग ! तुझ्या हातातच तर होती रे!"
दिवाकरचं हृदय आता उडून तोंडात आलं होतं . त्याने आपल्या छोट्याशा मेंदू ला ताण देत क्रम पुन्हा एकदा आठवला .
" आपण पौर्णिमा कडे गेलो..बॅग ताब्यात घेतली...मग मधुर चहा वल्याकडे चहा प्यायलो....तेव्हा ती माझ्याकडे होती...मी चहा पिताना ती पिशवी बाजूला ठेवली होती ...
पश्या!!!! लेका ती बॅग चहा च्या टपरीवरच राहिली !!" पुन्हा एकदा कपाळ बडवत दिवाकर म्हणाला .
"लोटांगण घालतो तुला दिव्या . तसा लहानपणापासूनच तू वेंधळा ."
"मी वेंधळा? तू स्वतः काय कमी होतास? क्रिकेट खेळायच्या ओढीने घाईगडबडीत फक्त शर्ट चढवून मैदानावर आला होतास ..खाली तसाच... भोंगळा... (खी! खी!)"
" हसतोस काय दिव्या ..प.पू.सासूबाईंना डोळ्यासमोर आण , म्हणजे परिस्थिती चं गांभीर्य लक्षात येईल तुझ्या ." प्रशांत ने त्याला भानावर आणलं , तसे दोघं चहावाल्याकडे पळाले .
दिवाकर ला वाटलं आजचं आपलं नशीब लिहिलं तेव्हा देव नक्की आळसाने  लोळत पडलेला असणार ..कारण दुकान बंद करून चहा वाला घरी गेला होता .
मटकन खाली बसलेल्या दिवाकर कडे बघून हसण्याचा मोह टाळत प्रशांत ने दुकानदाराला फोन लावला . वर पाटीवर ठळक अक्षरात फोन नंबर दिला होता .
" काका , मी प्रशांत बोलतोय."
"आकांत ?"
"आकांतच आहे खरं तर ..पण जाऊ द्या. ..काका , आज संध्याकाळी आमची एक बॅग राहिली होती इथे ."
"अरे काय रे पोरं तुम्ही! आहे ती बॅग माझ्याकडे .सोनं कुणी असं विसरतात का ? कमाल झाली तुमची ! "
"धन्यवाद काका . तुमचा पत्ता द्या , आम्ही येतो तिकडे ."
"आता मी आणि कुटुंब निघालोय गावाला . तिकडून आल्यावर देतो तुमची बॅग . काळजी करू नका ...मी ठेवतो नीट! असं विसरायचं नाही रे!.." म्हणत काकांनी बरंच काय काय सुनावलं .
    "आता काय करायचं पश्या? बायको आणि प.पू. माझी चटणी करतील बाबा ."
"आयडिया !" प्रशांत ने त्याला काहीतरी सांगितलं , आणि दिवाकर चे डोळे चमकले .
           शनिवारी ठरल्याप्रमाणे दिवाकर लग्नाला गेला . जावई आलेले बघून सासरच्या मंडळीस खूप आनंद झाला होता . नवऱ्या मुलीचा आहेर जावयाने आठवणीने आणला म्हणून प.पू. फारच खुश होत्या .  दिवाकर ने  तशीच दिसणारी नकली ठुशी बॅगेतून काढून सासू बाईंच्या हातात ठेवली .
"मिळाली ग बाई ठुशी!" सासूबाई म्हणाल्या ,  आणि मागून आवाज आला ..
"अरे , पाहुणे इकडं कुठं?"
दिवाकर ने वळून बघितलं , आणि त्याला दरदरून घाम फुटला . समोर चहा वाले काका उभे होते .
"काय योगायोग म्हणायचा! तुम्ही इथं ? तुमची सोन्याची ठुशी माझ्याजवळच आहे की ! देतो आत्ता आणून! इथंच थांबा !" काका लगबगीने गेले , आणि दिवाकर ने प.पू.कडे एक केविलवाणा कटाक्ष टाकला .

अपर्णा देशपांडे , पुणे

हे वाचून पहा. 👇

ती





     
      

Post a Comment (0)
Previous Post Next Post