ती

ती (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ जयश्री दाणी



         हिरव्याबुंद डेरेदार चाफ्याच्या झाडाखाली ती बसली होती. शेजारचे आंब्याचे झाड छण छण आवाज करत एकसारखे किणकिणत होते. संध्याकाळ झालीच होती. पाखरं येऊन बसली असणार त्या झाडावर. झाड यावेळेला फार किलबिलतं. तिला तो नाद आवडायचा. जीव एकवटून ती तो आवाज ऐकत बसायची. फांदीफांदीतून येणाऱ्या त्या ध्वनीलहरी इतक्या सुरेल होत्या की तिला त्यासाठी वेगळी नजर उचलून झाडाकडे बघावे लागतच नसे. हं, त्यावेळी तिची नजर गढली असे समोरच्या हिरव्यागार पानांच्या जाईवर. 

          संध्याकाळ जसजशी गडद होत जाई तसतशी जाईच्या फुलांची सौम्य शुभ्रता खुलून दिसे. कळ्या-सुमनांनी फुललेली जाई उजळून येई. वरचा चाफा जसा श्रावणाच्या उन्हात राजसबिंडा लखलखता दिसे तशीच ही जाई सायंकाळी शालीन अनुपम भासे. निसर्गाच्या या विविध अविष्कारात ती हरवून जाई. तिला तिच्या एकटेपणाचा विसर पडे. दिवसभर मनात उठणाऱ्या अनेक विचार तरंगांना ती कवितेच्या रुपात वहीवर उतरवून घेई. 

          परवाच तिची कविता जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या स्त्री मासिकात छापून आली होती. असे काव्यबिव्य लिहिणे विशेषतः मुलीबाळींनी अण्णांना - तिच्या वडिलांना पसंत नव्हते. म्हणून तिने त्या मासिकाची प्रत तिच्या मैत्रिणीच्या पत्त्यावर मागवली होती. मैत्रिणीचे वडील पुरोगामी विचारसरणीचे होते. ब्रिटिशांना हाकलायला जितके प्रयत्न करता येईल तितके ते करत. या उलट तिचे वडील भित्रे आपल्या आपल्या चौकटीत नाकासमोर राहणारे सरळ. इंग्रजांच्या दरबारात इमानेइतबारे नोकरी करत. कुटुंब पोसत. कधी स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले नाही की देशासाठी घरदार फुकुन बसले नाहीत.

"मलाही वाटतं हो देश स्वतंत्र व्हावा पण इंग्रजांची पकड ढिली करण्याची ताकद आपल्यात नाही", असे ते मित्रमंडळीत बोलून दाखवत. 

          पत्नी त्यांच्या, सासुसासऱ्यांच्या आज्ञेत खालमानेने राहिली. रितीभातीप्रमाणे तिचेही अकराव्या वर्षीच लग्न करण्यात आले. वयात यायची असल्याने तोवर माहेरीच ठेवायचे ठरले. झालं, तिचा अल्लडपणा कायम राहिला पण अण्णांनी डोळे काढले की ती दबकत चालत घरात गुडूप व्हायची. 

           हे काय? पैंजण वाजायला नको. कंकण हलायला नको. पदर ढळायला नको. आपल्याच घरात इतके निर्बंध? 

"आपल्याच?" अण्णांनी जोरात विचारले होते. ती चमकलीच होती. अण्णांच्या स्वरात अधिकच कोरडेपणा होता का? विवाह झाल्यानंतर हे घर आपले राहिले नाही. आपण इथे उपरेच ही भावना मग खोलवर ठसठसायला लागली. ती आक्रसल्यासारखी झाली. कानकोंडली राहू लागली. नवीन लग्न करून आलेल्या भावजयी जितक्या मोकळेपणाने वावरत तितकाही तिला जमेना. जरा जोरात हसली की अण्णा रोखून बघायचे. आई कसनुसे स्मित करून तिला झाकून घ्यायची. 

            घराचे हे बदललेले स्वरूप तिला झेपेना. ज्या वास्तुत ती जन्मली, वाढली तिथेच ती खुंटावी? विवाहानंतर कन्या इतकी परकी होते? 

          सासरहून मूळ येण्यासाठी अण्णांचे सतत दाराशी तिष्ठत  असणे तिला साहवेना. घर सोडायची इच्छा नव्हती पण अण्णांच्या बदलेल्या वागणुकीमुळे सासरी चालले जावे असेच वाटत राही.

          तिकडे काय गौडबंगाल सुरू होते देव जाणे. ती ऋतुमती झाल्यावर वारंवार निरोप पाठवूनही तिला घ्यायला सासरची मंडळी येईना तेव्हा दादा नि काका नेमकी काय गोम आहे म्हणून थेट तिकडे बघायलाच गेले. त्यावेळी तिचा वर देशसेवेसाठी घरातून निघून क्रांतिकारकांच्या टोळीत सामील झाल्याची बाब समोर आली आणि माहेर गंभीर झाले. मुलगी अशीच सधवा एकटी इकडे राहणार की कधीतरी विधवा झाली म्हणून खबर येईल अन् हिचे जीवन उद्धवस्थ होणार हीच चिंता सगळ्यांना लागून राहिली होती.  

            तिचा पती घरात असो वा नसो पण तिला जनरीतीप्रमाणे सासरी न्यावे यासाठी अण्णा नातेवाईकांकडून त्या पक्ष्यावर दबाव टाकत होते. तिचे सासरे मुलगाच नाहीतर सुनेला ठेवून काय करू म्हणत हात झटकत होते. केवळ काही विधींनी तिला ना इकडची ठेवले ना तिकडची. अण्णांच्या तीक्ष्ण नजरेने ती काचून गेली होती. आईही भावजयींची वरवर, बाळंतपणात गुंतली होती. ती खऱ्या अर्थाने एकाकी पडली. खिन्न झाली. कुढत राहू लागली.

          अशाच निरुत्साही मनस्थितीत तिला चाफ्याचे झाड सापडले. मागच्या अंगणातील आपल्याच चाफ्याच्या झाडाकडे ती नव्याने नवलाने बघू लागली. प्रत्येक ऋतूतील त्याचे विभ्रम तिला वेडावू लागले. हळूहळू झाडाचे फुल पान तिच्याशी बोलू लागले. तिला संवाद साधायला सुखाचा सोबती मिळाला. भिंतीवर रेललेली जाईही त्यांच्यात मिसळली. सुखदुःखाचे काही बोलू लागली. तिघांची गट्टी जमली. त्यात झाडावरच्या पाखरांची भर पडली. काळ्या पांढऱ्या पंखांचा खंड्या, कोकीळ, मैना, राघू, वटवटे, चिमण्या, भारद्वाज सारे तिचे मन रमवू लागले. एकांतातील त्या अनोख्या जगात ती फुलू लागली. तिच्यातील कवित्व बहरले. आता तिला मनोरंजनासाठी ना कुणाची मदत लागत ना कुणाची तीव्र नजर टोचत. निसर्गाच्या सानिध्यात तिची ती तिला सापडली.

            अण्णा दुष्ट होते अशातला भाग नाही. ते चारचौघांसारखे समाजाच्या सर्वसाधारण विचारसरणीचे कैदी होते. लग्न झाले आता सासरी जावे अशी त्यांची पांढरपेशी निखळ अपेक्षा होती. त्यात वावगे काही नव्हते. सासरची मंडळी न्यायला तयार नाही यात तिचा दोष नव्हता. नवरा संसारसुख अनुभवण्याआधीच देशासाठी ब्रह्मचारी झाला यात तिच्या होकार नकाराचा प्रश्नच नव्हता. अण्णांनी जसे तिला गृहीत धरले होते तसेच नवऱ्यानेही तिची संमती समजून तिला सोडून दिले होते. यात तिच्या मनाचा, स्त्रीसुलभ भावनेचा कुठेच उल्लेख नव्हता. 

          काळजात उठणारे हे वादळ तिची फार नासधूस करायचे. ती बेजार, अनुत्तरित व्हायची. आजूबाजूच्या मैत्रिणींचे संसार बघून जीव नकोसा व्हायचा. नष्ट करायचाही भाव यायचा पण त्याचवेळी आसपासच्या निसर्गशक्तीने तिला सावरले. जगवले. तगवले. आतले काहूर शमवायला ती कविता करू लागली. खुळ्यासारखी तासनतास लिहू लागली. अण्णा आले की पुढ्यातील परडीत कवितांची वही लपवू लागली. आईला सगळे माहिती होते. ती बिचारी जमेल तशी तिला सांभाळत रहायची पण शेवटी आईही परस्वाधीन. अण्णांच्या परवानगीशिवाय गंजलेला खिळाही हलवायची आईला मुभा नव्हती. 

              आई तिच्या कवितांना वहीच्या पानातच दडवायला सांगायची. नको प्रसिद्ध करू म्हणायची. खूप दबून दबून राहिल्यावर शेवटी तिच्या मनानेच उचल खाल्ली. आईलाही न सांगता तिने टोपणनाव धारण करून कविता प्रकाशित केली. "जाई चाफेकर" नावाने तिची कविता जेव्हा मासिकाच्या मधोमध छापून आली तेव्हा किती हर्षाने नाचली ती. चाफ्याला, जाईला बिलगली ती. या कवितांनीच तिच्या घाबऱ्या मनाला नवऱ्याने टाकलेली या कुत्सित टोमण्यातून अलगद तारले. स्वप्न पहात तरंगत ठेवले. 

          मैत्रिणीचे वडील धीर द्यायचे. पुढचे शिक्षण घे, नर्सिंगचा अभ्यासक्रम कर म्हणून प्रोत्साहन द्यायचे. ती अण्णांच्या भीतीने थबकायची. अण्णांना आवडणार नाही म्हणून पदोपदी स्वतःला रोखायची. असेच दिवस व्यतीत व्हायचे. पण सगळेच दिवस सारखेच नसतात. हिवाळ्यातल्या थंडगार सोनसकाळी ती पूजेसाठी हार करत असताना सणसणीत बातमी आली. पूर्ण घर हादरून गेले. जो तो तिच्याकडे बघू लागला.

            फिरंग्यांच्या क्लबवर हल्ला चढवतांना पकडल्या गेलेल्या तिच्या नवऱ्याला डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. तीही उंबऱ्याशी अडखळली. धप्पकन कवितांच्या वहीजवळ जाऊन पडली. डोळे काठोकाठ भरून आले पण हुंदका फुटेना. 

           उपचार म्हणून तिला सासरी नेण्यात आले. अंत्यविधी उरकले. चौदावा दिवस व शुद्धी झाल्यावर अण्णांनी परत निघायचा विषय काढला. आता तर मुलगाच नाही म्हंटल्यावर ते तिला कशाला ठेवून घेणार हे उमजून अण्णांनी त्या लोकांना तसा कुठलाच आग्रह न करता कुटुंबाला सामान बांधायला सांगितले. रात्र उलटली की पहाटेच निघायचे होते. खटला तयार करून ठेवला होता. जाजम पसरवून झाले होते. 

            तिच्यासाठी ती रात्र वैऱ्याची ठरली. लाल आलवणातील आजेसासूबाईंनी तिच्या केशवपनाचा जोरकस मुद्दा मांडला. विधवांना आवश्यक आहे म्हणाल्यात. भावना काबूत राहतात. उचंबळत नाही. आपली हद्द समजते. अण्णा काय थोरामोठ्यांच्या हो ला हो लावणारे. कधीच नाही म्हणून नाराजी ओढवून घेत नसे. आई मात्र थरथर कापायला लागली. भावजयी भेदरून गेल्या. तिच्या मानसिक धक्क्यात अधिकच भर पडली. मती सुन्न झाली.

             बैलगाडीतून ती परत आली तेव्हा पांढऱ्या पदराखालचे तिचे डोके खुरटलेले होते. डोळ्यात आसू गोठलेले. जाईच्या नाजूक वेलीने जवळ घेताच घळाघळा रडली ती. चाफ्याजवळ स्फुंदली ती. अण्णांनी टरटर उदास डोळ्यांनी पाहिले ते व काही न बोलता  विषण्णपणे निघून गेले. 

"तिचे भोग आहे ते, तिला भोगावेच लागणार", तिच्या मैत्रिणीच्या वडीलांजवळ अण्णा बोलले.

"कसले भोग हो? जरा बुद्धीचा वापर करा. तिला कर्व्यांच्या शाळेत घाला, पुढचे आयुष्य तरी आपल्या मर्जीने जगू द्या", मैत्रिणीचे वडील कडाडले. त्यावर दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार करत अण्णांनी बोलणेच खुंटवले. 

         तिच्या आत मात्र कर्व्यांची शाळा, कर्व्यांची शाळा हा शब्द नाचत राहिला. तेवत राहिला. वाटाड्यासारखा वाट दाखवत राहिला. भादरलेल्या डोक्यावरून नकळत हात फिरवताना शिशिर ऋतूत पानगळ झालेली झाडं समोर आली. पानगळीचा मौसम सरल्यावर उघडीबोडखी झाडं पुन्हा नव्याने तल्लखीत होतात. हिरवे अंग धरतात. नव पालवीने, कळ्या-फुलांनी बहरतात. मग आपणच का असे हातपाय गाळून बसायचे? नामोहरम,  नाउमेद व्हायचे? 

            तिने अंधाऱ्या कोपऱ्यावरच्या खुंटीला लटकलेल्या पिशवीतील चुरगाळलेला कागद काढला. पुण्याच्या कर्वे शाळेचा व महिला वसतीगृहाचा पत्ता होता त्यात. कवितांचे मानधन म्हणून मिळालेले काही पैसेही. या भांडवलावर ती आरामात पुण्याला पोहचू शकणार होती. तिथे कामधाम करून उपजीवेकेपुरते कमवू शकत होती. अशांत अनिश्चित मनस्थितीतच ती निजलेल्या आईजवळ गेली.

"काय गं?" आई एकदम धसकलीच. आजकाल आईच खूप दचकायला लागली. तिच्या मनाने टिपले. क्षणभर निश्चय डळमळाला. आईची करुणा आली. आईसाठी थांबावेसे वाटले. थांबणे म्हणजे जिवंतपणी मरण पुन्हा. अंतहीन काळोखात खितपत पडणे पुन्हा. एकच तर जन्म मिळालाय. का नाही योग्य पध्द्तीने जगावा?

तिने आईला मनातले सांगितले. 

"नाही नाही नाही नाही" आई नकारार्थी मान डोलवत राहिली. तिला खूप शपथा घातल्या. अण्णांचा, दादाचा धाक दाखवला. स्वतःच्या छिन्न हृदयाविषयी न बोलता अण्णांना वाईट वाटेल म्हणाली. 

"मला नाही वाईट वाटले?" आपले दोनचार अति आखूड केस हातात धरत तिने विचारले. आई चूप झाली. ओढलेल्या भीषण डोळ्यांनी बघू लागली. तिचे मन आईला कळत होते पण मातृहृदय एकट्यादुकट्या तरुण मुलीला दूरदेशी पाठवायला राजी नव्हते. इथे कशीही राहील पण नजरेसमोर सुरक्षित तर राहील.

"नाही आई इथे माझी तडफड तडफड होतेय. मी नाही जगू शकणार असे" ती आक्रंदत म्हणाली. 

आईचे अंतःकरण द्रवले. 

आईने तिच्या सुकलेल्या गालावरून मायेने हात फिरवला. 

बालपणापासून जोपासत असलेल्या भीतीला ओलांडत जड अंत:करणाने आई हळूच उद्गारली "बरं जा बाळा".

- जयश्री दाणी

हे वाचून पहा. 👇

महापूर


3 Comments

  1. निरागस अशा निसर्गवर्णनानं सुरू होणारी ही कथा पुढे अशी वळणं घेते की वाचक थक्कच होतो. तेव्हाचं असणं, समाज, धारणा, भीती, परकीय शासक हे अंगावर येतं. मग ती अवघड बातमी येते. परिस्थिती हताश होते…. ती कर्व्यांची रुपेरी किनार घेऊनच. शेवट अपेक्षित असला तरी निश्चय, आशय, माया व भाषा यामुळे लक्षात राहतो. अभिनंदन जयश्री.

    ReplyDelete
    Replies
    1. निरागस अशा निसर्गवर्णनानं सुरू होणारी ही कथा पुढे अशी वळणं घेते की वाचक थक्कच होतो. तेव्हाचं असणं, समाज, धारणा, भीती, परकीय शासक हे अंगावर येतं. मग ती अवघड बातमी येते. परिस्थिती हताश होते…. ती कर्व्यांची रुपेरी किनार घेऊनच. शेवट अपेक्षित असला तरी निश्चय, आशय, माया व भाषा यामुळे लक्षात राहतो. अभिनंदन जयश्री. - उदय सुभेदार पुणे

      Delete
  2. खूप सुंदर कथा.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post