महापूर

     महापूर (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ ऋचिता बोधनकर दवंडे 

               शिरसगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील गायत्री नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर गाव. गावाला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले होते. एका बाजूने वाहणारी गायत्री नदी, नारळ पोफळीच्या बागा, गावाच्या पूर्वेला असणारा हिरवागार डोंगर आणि कोंदणात जणू हिरा बसवावा तसे ह्या सर्वांमध्ये वसलेले शिरसगाव. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय होता. शिरसगावात जे सधन शेतकरी होते त्यांचीच दगडविटांची घरे होती. बाकी सगळ्या झोपड्याच. ह्याच गावात महेश हा शेतकरी आपली बायको नंदा आणि तीन वर्षांचा मुलगा राकेश सोबत राहत होता. महेशने मेहनतीने गावात छोटेसे पण पक्के घर बांधले होते. दारी कपिला नावाची एक गाय पण होती. त्यांच्या घराच्या आजूबाजूला मात्र सगळ्या झोपड्याच होत्या. महेशचे कुटुंब श्रीमंत नव्हते पण त्यांना दोन वेळेचे पोटभर खायला मिळत होते. महेश सकाळी शेतात जात ते एकदम संध्याकाळी घरी येत असे. मधून मधून शेतीच्या कामानिमित्त त्याला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या शिरसगावचे हवामान नेहमीच छान आणि प्रसन्न राहायचे. पावसाळ्यात मात्र मुसळधार पाऊस पडायचा. पावसामुळे होणारे घरांचे, शेतीचे नुकसान हे काही गावाला नवीन नव्हते.

            आताही पावसाळा सुरु झाला होता. पावसाळ्यापूर्वीची शेतीची सगळी कामे महेशने करून घेतली होती. मात्र आज त्याला काही फवारणी करण्याची औषधे आणि खते आणायला तालुक्याला जायचे होते. कालपासून पाऊस सुरु होता. आजही सकाळपासून सूर्याचे दर्शन नव्हते. पावसाने मात्र थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे महेशने तालुक्याला जायचे निश्चित केले. नंदा त्याला जायला नकार देत होती. एकतर पावसाळा सुरु होता आणि शिवाय घरी राकेश आणि सहा सात महिन्यांची गर्भवती असणारी ती दोघेच राहणार होते. त्यामुळे तिला भीती वाटत होती. पण महेश संध्याकाळपर्यंत येतो आणि काही लागले तर शेजारच्या शकू मावशींना हाक मार असे सांगून निघाला. महेश आणि नंदाला शकू मावशींचा आईप्रमाणे मायेचा आधार होता. महेश गेल्यावर नंदाने घरची कामे आटोपली आणि ती बाहेर गोठ्यात कपिला गायीला चारा द्यायला आली. चारा टाकत असतानाच अचानक आभाळ भरून आले. आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाला सुरवात झाली. सोसाट्याचा वारा सुटला. आभाळ गडगडायला लागले. विजांचा कडकडाट सुरु झाला. नंदाने गायीला गोठ्यातच आडोशाला बांधले आणि स्वतःला सांभाळत आत आली. दारं खिडक्या लावून घेतले. आता पावसाने उग्र रूप धारण केले होते. सोबतीला वाऱ्याचा जोर होताच. महेश तालुक्याला पोहचला असेल की पावसात अडकला असेल ह्या विचाराने नंदा घाबरली. राकेशला जवळ घेऊन ती एका ठिकाणी बसून होती. बाहेर पाऊस आणि विजांचा खेळ सुरु होता. आजूबाजूंच्या झोपड्यांमध्ये पाणी गळायला लागले होते. 

              असेच चार पाच तास गेले. नंदाला अचानक कपिला गायीचा हंबरण्याचा आवाज आला. महेश आला की काय असे वाटल्याने मांडीवर झोपलेल्या राकेशला बाजूला करून ती उठली आणि खिडकी थोडीशी उघडून ती बाहेर डोकावली. बाहेरचे दृश्य पाहून तर तिची पायाखालची जमीनच सरकली. महेश तर नव्हता आला पण सगळीकडे पाणी भरले होते. वाऱ्याने फाटक उघडले होते आणि आत पाणी शिरून गोठ्यात गाय पाण्यात उभी होती. गायीला वाचवावे म्हणून नंदाने समोरचे दार उघडले. दार उघडताच तिच्या लक्षात आले बाजूच्या सगळ्या झोपड्यांची छप्परे उडून गेली होती. लोकांचा गोंधळ सुरु होता. कसातरी पाण्यातून मार्ग काढत ती गोठ्यात आली. गायीचे हंबरणे सुरूच होते. कारण आता ती अर्ध्याच्या वर पाण्यात होती. नंदाने तिचा दोर सोडवला आणि तिला ओढले. पण थोडे पुढे जात नाही तोच तिच्या हातून दोर सुटला आणि पाण्याचा जोर इतका जास्त होता की कपिला गाय पाण्यात ओढल्या गेली. नंदाला मोठा धक्का बसला. पण स्वतःला सावरत ती आत जायला वळली तोच तिने पहिले की पावसाचे पाणी पायरीपर्यंत येऊन घरात शिरत होते. आता मात्र तिची पाचावर धारण बसली. आत राकेश झोपला होता. ती घाईघाईने आत गेली. राकेशला उचलले आणि स्वयंपाकघरात थांबावे म्हणून गेली तर तिथले दारही वाऱ्याने उघडून पाणी आत आले होते. वाऱ्याचा जोर इतका होता की दार लावले जात नव्हते. शेवटी ती राकेशला घेऊन पाण्यातून मार्ग काढत जिन्याकडे आली. गच्चीवर महेशने शेतीचे जास्तीचे सामान ठेवायला एक सिमेंटचा आडोसा बांधून घेतला होता. तिथे जाऊन बसावे म्हणून ती जिन्याने वर जात होती. बाहेर कुठे जायची तर सोयच नव्हती. जिन्याने वर जात असतानाच तिला किंकाळी ऐकू आली. पाहते तर काय शकू मावशींची झोपडी वाहून जात होती आणि सोबत शकू मावशीही. आईप्रमाणे असणाऱ्या शकू मावशींना डोळ्यासमोर पाण्यात गेलेले बघून नंदा चांगलीच हादरली. डोळ्यातून पाणी वाहायला लागले. पण तिच्या हातात काहीच नव्हते. ती हळूहळू गच्चीवर पोहचली आणि राकेशला घेऊन आडोशाच्या तिथे येऊन बसली. दोघेही ओलेचिंब झाले होते. इतक्या वेळ झालेल्या दगदगीने गर्भवती नंदा थकून गेली होती. गच्चीचे कठडे फार उंच नसल्याने तिला सभोवतालचे सगळे दिसत होते. एक एक करून आजूबाजूच्या सगळ्या झोपड्या पाण्यात वाहून गेल्या. झाडे उन्मळून पडली. शेतं पाण्याखाली गेलेली दिसत होती. नंदा राकेशला जवळ घेऊन बसली होती. मनात महेशच्या विचाराने कालवाकालव होत होती.

                हळूहळू अंधार पडायला लागला. पण पाऊस अजूनही आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. आडोशाला बसल्याने त्या मायलेकांना पाऊस लागत नव्हता. पण ओले झाले असल्याने आता त्यांना थंडी वाजायला लागली होती. तिने राकेशला थंडी वाजू नये म्हणून पदराखाली घेतले. थोड्याचवेळात तिला जवळच्या आणि पोटातल्या दोन्ही लेकरांच्या भुकेची काळजी पडली. त्यांची रोजची जेवायची वेळ झाली होती. तेव्हा तिच्या लक्षात आले की स्वयंपाकघरातून येताना तिने पदरात पारले जी बिस्किटाचा पुडा बांधून घेतला होता. तिने तो पुडा लगेच पदरातून सोडवला. पुडा बाहेरून ओला होता पण आतील बिस्किट्स मात्र चांगले होते. तिने राकेशला बिस्कीट खायला दिले. महेशच्या काळजीने घास जात नव्हता पण पोटातल्या लेकरासाठी तिनेही दोन बिस्किटे पोटात ढकलली. दोघांनी पावसाचेच पाणी पिले. अंधारात काहीही दिसत नव्हते फक्त पाऊस कमी झालेला नाही हे लक्षात येत होते. प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकव्याने थोड्याच वेळात नंदा आणि राकेश तिथेच झोपी गेले. 

              सकाळी कसल्याशा आवाजाने नंदाला जाग आली. पावसाचा जोर बराच कमी झाला होता. नंदा उठून बाहेर गच्चीवर आली आणि बाहेर पाहते तर काय? गावाची सगळी रयाच पालटून गेली होती. मुसळधार पावसाने गायत्री नदीला महापूर येऊन जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी झाले होते. त्यातून फक्त पक्की घरे तेवढी उभी होती. बाकी झोपड्या, गुरेढोरे सगळे पाण्यात वाहून गेले होते. तेवढ्यात तिला रबरी बोटींमधून काही लोक येताना दिसले. ते पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत होते. त्यांनी एक बोट नंदाच्या घराजवळ आणली. घराचा खालचा मजला पूर्ण पाण्यात होता. बोटीतील लोकांनी सावधगिरीने नंदा आणि राकेशला खाली उतरवून बोटीत बसवले आणि थेट गावातील रुग्णालयात नेले. रुग्णालय थोडेसे उंचीवर असल्याने पाण्यापासून सुरक्षित राहिले होते. त्या दोघांना ताबडतोब खायला प्यायला देण्यात आले. त्यामुळे त्यांना थोडीशी तरतरी आली. नंदाची परिस्थिती पाहता तिला आराम करण्यास सांगण्यात आले. तिचे मन मात्र महेशसाठी चिंताक्रांत होते. गावातील वाचलेल्या सगळ्या लोकांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. अखेर दोन दिवसांनी पुराचे पाणी ओसरल्यावर महेशला गावात येता आले. सगळीकडे पावसामुळे झालेला चिखल, पडलेली झाडे, उध्वस्त पसरलेले झोपड्यांचे  अवशेष हे सर्व पाहून हे आपलेच गाव आहे का असा प्रश्न महेशला पडला. त्याला तडक रुग्णालयात आणण्यात आले. नंदा आणि महेश ह्यांची नजरानजर होताच दोघांच्याही डोळ्यातून अश्रू यायला लागले. महेशने धावत जाऊन राकेश आणि नंदाला जवळ घेतले. त्यांचे घर तर शाबूत होते पण घरातील आतील परिस्थिती मात्र नक्कीच खराब झाली होती. शेतीची तर पार वाट लागली होती. निसर्गापुढे माणूस किती छोटा आहे हेच जणू ह्या महापूराने दाखवून दिले होते. संसार तर पाण्यात वाहून गेला पण आपले कुटुंब सुरक्षित आहे ह्याचे समाधान महेश आणि नंदाला होते आणि त्याच समाधानात ते दोघेही एकमेकांच्या साथीने पुन्हा संसार मांडण्यासाठी सज्ज झाले होते. 


                                                                                      

     सौ. ऋचिता बोधनकर दवंडे


Post a Comment (0)
Previous Post Next Post