कावड यात्रा

 कावड यात्रा (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

कांचन अकोलकर 

आयटी कंपनी मध्ये काम करणाऱ्या मोहिनी ची बदली दिल्ली मध्ये झाली होती आणि ती तिथे रुजू झाली होती. तिची पोझिशन ऑफिसर ची होती. तिच्या हाताखाली पन्नास जण काम करत होते. कंपनी तर्फे तिला तीन बेडरूम हॉल किचन असलेला फ्लॅट मिळाला होता.

येणारे प्रत्येक प्रोजेक्ट सफल करण्याची जबाबदारी तिची होती. दिल्ली सरकार चे एक मोठे प्रोजेक्ट चालले होते. खूप मोठी जबाबदारी होती. एक दिवशी एक उमदा तरुण तिच्या कॅबिनेट मध्ये आला. दिसायला तो हँडसम होता.

दार वाजवून तिच्या परवानगीने तो आत आला आणि त्यांनी आपली ओळख करून दिली. मी रोहन पांड्या असे म्हणून त्याने हात पुढे केला. थोडेसे संभ्रमित होऊन मोहिनी ने हात मिळवला. तो म्हणाला मी सरकारी ऑफिसर आहे आणि आपण दोघांनी मिळून हे प्रोजेक्ट पुरे करावे म्हणून मला इथे पाठवले आहे. आम्हाला काय अपेक्षित आहे ते मी सांगेन आणि तुम्ही तसे तुमच्या स्टाफ कडून ते करवून घ्या. या शेजारील केबिन मध्ये मी बसेन.

मोहिनी त्याच्या व्यक्तिमत्वाने खूप भारावून गेली होती. तोही मोहिनी कडे आकृष्ट झाला होता. लंच मध्ये ते दोघे एकत्र जाऊ लागले. आणि त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. हरिद्वार पासून शंभर किलोमीटर असणाऱ्या एका खेड्यातून तो आला होता. आई वडील, दोन मोठे भाऊ लग्न झालेले होते. तिथे ते शेती करत होते. मोहिनी पुण्यातील असून ती एकुलती एक होती.

काही महिने गेले आणि श्रावण महिना दोन दिवसात सुरू होणार होता. रोहन पंधरा दिवसाच्या रजेवर जाणार होता. त्या दिवशी लंच घेताना त्याने तसे सांगितले. मोहिनी ने विचारले....


काही विशेष कारण रोहन?


रोहन म्हणाला हो! आम्ही तिघे भाऊ दर वर्षी श्रावण महिन्यात कावड यात्रा करतो.

म्हणजे काय असते ही कावड यात्रा?

मोहिनी तू गूगल वर जा तुला सर्व माहिती मिळेल.  मोहिनी ने सर्व माहिती वाचली. तिला दोन गोष्टींचा प्रश्न पडला होता की रोहन सारखा शिकलेला माणूस ही यात्रा कशी आणि का करतो. आणि तिला ही यात्रा प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता होती. 


दुसऱ्या दिवशी तिने रोहन ला विचारले की ती त्यांच्या बरोबर या यात्रेस येऊ शकते का?

तो म्हणाला की हो नक्की येऊ शकतेस पण तुला रजा घेता येईल का? कारण खेड्यात कॉम्प्युटर फारसा चालणार नाही आणि दुसरे म्हणजे पाच दिवस रोज २० किलोमीटर चालण्याची तयारी आहे का?

विचार करून तिने हो आहे तयारी असे म्हटले आणि कामाची व्यवस्था लाऊन तिने दहा दिवसाची रजा घेतली आणि दुसऱ्या दिवशी ती रोहन बरोबर त्याच्या कार ने निघाली. वाटेत तिने त्याला विचारले तू ही यात्रा दहा वर्ष करत आहेस याचे मला आश्चर्य वाटते. तुझ्या सारखा उच्च शिक्षित माणूस ही यात्रा का करतो? रोहन म्हणाला तू अनुभव घे आणि मग तुला कळेल.

दोघे संध्याकाळी गंगानगर ला त्याच्या गावी पोचले. एका मोठ्या जुन्या घरासमोर गाडी उभी केली आणि घरातील सर्व मंडळी गोळा झाली. बाबूजी, बाईजी,  सोहम आणि मोहन दोन मोठे भाऊ, त्यांच्या पत्नी आणि चार मुले. रोहन ने आल्या वर बाबूजी आणि बाईजी यांना वाकून नमस्कार केला. सोहम आणि मोहन यांनी त्याला प्रेमाने मिठी मारली. रोहन ने मोहिनी यात्रेसाठी येणार हे कळवले होते.

आई बाबा आणि मोहिनी अशा फक्त तिघांच्या घरात वाढलेल्या मोहिनीला इतक्या सर्व माणसांनी भारावून टाकले. सर्वांनी तिचे  खूप प्रेमाने स्वागत केले. रोहन ची मोठी आणि छोटी वहिनी म्हणजे स्वाती आणि ज्योती भाभीजी या मोहिनी ला घरात घेऊन गेल्या.


घर खूप मोठ आणि कौलारू होते. मोठा दिवाणखाना, स्वयापघर आणि त्याला लागून जेवणाची खोली. तिथे पाट मांडून जेवणाची पाने मांडली होती. त्या शिवाय सहा झोपायच्या खोल्या होत्या. त्यातील एक खोली तिला देण्यात आली. प्रवासानंतर आंघोळ करून रोहन आणि मोहिनी तयार झाले आणि मुले पुरुष यांची पहिली पंगत बसली. स्वयंपाक करण्यासाठी एक महाराज म्हणून आचारी होता. गंगानगर स्टाईल रोटी, दोन सब्जी, डाळ, चावल आणि गोड हलवा होता. पहिली पंगत झाल्यावर सर्व बायका बसल्या आणि पुरुष त्यांना वाढत होते. खूप हसत खेळत गप्पा मारत जेवण झाले.

  दोन दिवसात त्यांना यात्रेची तयारी करायची होती. रोहन त्याचे भाऊ, वहिनी आणि मोहिनी मिळून सहा जण हरिद्वार येथे जाणार होते. मोहिनी साडीत चालू शकणार नाही म्हणून तिच्या साठी चार भगवे पंजाबी ड्रेस तेथील शिंप्याने दोन दिवसात शिवून दिले. या यात्रेसाठी सर्वांना भगवे कपडे अथवा साडी घालावी लागणार होती. सर्व तयारी करून सर्व जण एका जीप मधून निघाले. बरोबर गावातील आणखी काही लोक होते. सर्व हरिद्वार ला तीन तासात  पोचले. तिथे त्यांनी एक कावड विकत घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून सर्व गंगे काठी गेले आणि त्यांनी त्या कावडी च्या दोन्ही घागरी भरून घेतल्या.  आणि सर्व जण घरा कडे चालू लागले. काही अंतर चालल्यावर ती कावड दुसरा घेत असे. मोहिनी ने ती घेतली आणि अशी जड कावड उचलून चालणे किती अवघड आहे हे समजले. सूर्यास्त झाल्यावर ते एका घरी पोचले. तिथे त्यांचे स्वागत झाले. त्यांनी कावड एका उंच चौथर्या वर ठेवली आणि सर्व जेऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यावर अंघोळ, नाश्ता करून चालू लागले. दुपारचे जेवण त्यांना बांधून दिले होते. 

मोहिनी ला तिचे आई बाबा दर वर्षी वारी करत होते आणि पंढरपूर ला दिंडी बरोबर चालत जात होते त्याची आठवण झाली. ते नुकतेच वारी करून आले होते. मोहिनी ला ते सर्व तितकेसे पटत नव्हते. पण या कावड यात्रेत तिने सर्वांचे प्रेम अनुभवले, चालण्याचा अनुभव घेतला आणि तिला तिचे आई बाबा आठवले.

पाच दिवसाची सफर करून ते गंगानगर येथे पोचले. मुक्कामाच्या सर्व ठिकाणी त्यांचे खूप प्रेमाने स्वागत झाले.  दुसऱ्या दिवशी  श्रावणी सोमवार होता. अंघोळ करून सर्व जण गावातील शंकराच्या देवळात गेले आणि सर्वांनी पिंडी वर गंगा जलाचा अभिषेक केला. मनोभावे शंकराची प्रार्थना केली. आणि प्रत्येकाने स्वतः साठी काहीतरी मागितले.

असा सुंदर अनुभव घेऊन मोहिनी पुन्हा तिच्या कामाच्या विश्वात परतली. रोहन अजून पाच दिवसांनी राजा संपल्यावर येणार होता.

चार महिने गेले आणि प्रोजेक्ट यशस्वी रित्या पुरे झाले.

त्या दिवशी रोहन आणि ती लंच साठी हॉटेल मध्ये गेले.


निरोपाची वेळ आली हे दोघानाही जाणवत होते. पुन्हा कधी भेट होणार या विचाराने मोहिनी मनातून खट्टू झाली. आणि अचानक रोहन ने तिचा हात धरला आणि विचारले.


मोहिनी मी गेले दीड वर्ष तुझ्यावर प्रेम करतो आहे. तू माझ्याशी लग्न करशील?


माझ्या घरातील सर्वांना तू पसंत आहेस.


मोहिनी संभ्रमात पडली. हे अगदीच अनपेक्षित नव्हते. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते. पण रोहन आत्ता विचारेल हे स्वप्नातही वाटले नव्हते.


रोहन म्हणाला विचार करून उद्या सांग. उद्या माझा शेवट चा दिवस असणार आहे.

मोहिनी दिवसभर त्याच विचारात होती आणि संध्याकाळी ती घरी आली आणि पाच मिनिटात तिचा मोबाईल फोन वाजला. फोन वर तिची आई रडत बोलत होती....


मोहिनी तुझे बाबा हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये आहेत. त्यांना हार्ट अटॅक आला आहे.


मोहिनी म्हणाली आई मी लगेच पुण्यात विमानाने येते. 


मोहिनी च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने विमानाचे बुकिंग केले


आणि ती लगेच निघाली.  पहाटे चार  वाजता ती पुण्यात पोचली आणि तडक हॉस्पिटल मध्ये गेली. आई, तिचे मामा मामी असे हॉस्पिटल मध्ये होते. मोहिनी ला ICU मध्ये सोडले कारण बाबा तिचेच नाव घेत होते. मोहिनी त्यांच्या जवळ गेली आणि त्यांचा हात हातात घेतला. बाबांनी डोळे उघडुन पाहिले. त्यांच्या तोंडावर हास्य पसरले. बाबा मी कुठेही जाणार नाही, तुम्ही बरे व्हा! मोहिनी म्हणाली.

हॉस्पिटल मधून तिच्या मामानी दुसऱ्या दिवशी ती ऑफिस मध्ये काही दिवस येऊ शकत नाही असे कळवले. 

इकडे रोहन तिच्या केबिन मध्ये गेला पण ती आज येणार नाही असा निरोप मिळाला. त्याने तिला फोन केला पण तो आऊट ऑफ रेंज मध्ये आला. बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही फोन लागला नाही. 


आणि रोहन गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या जुन्या ऑफिस मध्ये जाऊ लागला. अचानक मोहिनी ला काय झाले. तिने त्याला साधा फोन ही केला नाही. 

इकडे मोहिनी च्या वडिलांची तब्येत गंभीर होती. पंधरा दिवस झाले तरी बाबा ICU मध्येच होते. तिने कामावरही रजा टाकली होती. अखेर वीस दिवसांनी सर्व खेळ संपला. बाबांचे निधन झाले. आई एकटी पडली. मोहिनी ला आता पुण्यात राहणे आवश्यक होते. या सर्व गडबडीत ती रोहन विषयी विसरून गेली होती. सध्या तिने बिन पगारी राजा घेतली होती. बहुतेक  तिला ही नोकरी सोडून द्यावी लागणार होती. बाबांचे क्रिया कर्म केले होते. पुण्यात ती दुसरी नोकरी शोधत होती. तिने दिल्लीतील नोकरीचा राजीनामा दिला. पुण्यात एका छोट्या कंपनी मध्ये ती नोकरी करू लागली. 

आई शरीराने खूप थकली होती. बाबांच्या निधनाने ती मनाने ही थकली होती. आई आणि नोकरी यातच मोहिनीचा सर्व वेळ जात होता.  पुण्यात येऊन वर्ष होऊन गेले होते. लग्न कर म्हणून आई तिच्या मागे लागली होती. पण रोहन ची आठवण तिला सतावत असे. वर्षभराने तिने त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. त्याला ईमेल लिहिले पण तेही परत आले. 

दिल्लिशी संबंध सुटला होता. गंगानगर ला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तोही यशस्वी झाला नाही.


त्याला काहीतरी कळवायला हवे होते पण हॉस्पिटल मधून फोन करता येत नव्हता आणि तिची मनस्थिती ही चांगली नव्हती.

नंतर लग्नाचे ती टाळत राहिली. अशीच पाच वर्षे निघून गेली आणि दोन महिन्यापूर्वी आई ही स्वर्गवासी झाली. आता मोहिनी एकटी पडली होती.  तिने प्रयत्न करून अमेरिकेत नोकरी मिळवली आणि ती कॅलिफोर्निया मध्ये गेली. तिची कॉलेज मैत्रीण मीना तिथे राहत होती. तिने तिच्या घरी मोहिनी ची तात्पुरती सोय केली.  मोहिनी दुसऱ्या दिवशी मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये गेली. एका केबिन चे दार वाजवले आणि परवानगी मिळाल्यावर  ती आत गेली. 

समोर खुर्चीत रोहन पांड्या तिचा बॉस बसला होता.


दोघे एकमेकांकडे बघत राहिले. बसा  असे रोहन म्हणाला आणि ती समोर खुर्चीत बसली. डोळ्यात आश्चर्य दिसत होते. तेवढ्यात दार वाजवून एक सुंदर तरुणी आत आली. ही रीना पांड्या माझी बायको  आणि ह्या मोहिनी दाते आज कामावर रुजू झाल्या आहेत. अशी रोहन ने ओळख करून दिली. 

रीना ने मोहिनी शी हात मिळवला आणि ती काम समजावून सांगू लागली. 


काही दिवस गेले. रोहन ने तिला लंच चे निमंत्रण दिले. आज रीना ने रजा टाकली होती. लंच घेताना मोहिनी च्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने सर्व घडलेले सांगितले. तसेच रोहन ने ही त्याची कथा सांगितली. रीना प्रेग्नंट असल्याची गोड बातमी ही दिली.

मोहिनी सुन्न होऊन कामाला लागली.

कांचन अकोलकर


कॅलिफोर्निया


Post a Comment (0)
Previous Post Next Post