फेशियल

 फेशियल…! (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️चित्रा अविनाश नानिवडेकर 


"हाय.. गायत्री?….प्रताप  बोलतोय "


ह्याचा कसाकाय आज फोन आला?


"हॊ.. मीच बोलतेय"


"जरा मोकळी आहेस का? थोडं बोलायचं होतं " सर्रकन काटाच आला गायत्रीच्या अंगावर.. ह्याला काय बोलायचं असणारे?


"अं … सॉरी अरे समोर कस्टमर आहे."


"ओह.. इट्स ओके… मी नंतर करतो. नाहीतर संध्याकाळी भेटशील?.... थोडं बोलायचं होतं चालेल? मी पत्ता वॉटसप करतो "


कसबसं हॊ म्हणून तिने फोन ठेवला.


मग मात्र तिचं लक्ष कामातून उडालं ते उडालं एवढं काय काम असेल हयाचं माझ्याकडे? काय बोलायचं असेल.तिच्या डोळ्यासमोर आपला भूतकाळ सर्रकन डोळ्यपुढं आला…!


कॉलेज च्या शेवटच्या वर्षी ज्याचा सणसणीत अपमान केला. चार चौघांच्या समोर नुसता अपमान करून थांबलो नाही तर घरी गौरव ला जाऊन सॉलिड भडकावलं होतं. त्याने तर प्रतापला चांगलाच धुतला होता.


त्यानंतर आत्ता एक महिन्यापुर्वी इथे बोरिवलीत अचानक भेटला.मध्ये कुठे गेली ती फॅमिली कळलं नाही.. आपण पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये गुरफटलो होतो म्हणा.


कसली गुर्मी होती आपल्याला. सौंदर्याचा गर्व की आबांच्या जीवावर आपण उडया मारत होतो? की..प्रताप चा बाबा लखन आपल्या आबांचा आश्रीत आणि त्याचा मुलगा म्हणून आपण त्याची पायरी दाखवायला तसं वागलो? आपण नेहमी आबासाहेब आणि गौरव ह्यांच्याच नजरेने जग बघत होतो. आपल्याला जमिनीवर आणलं ते गौरीने.वहिनी म्हणून आली आणि आपल्या आणि माईच्या जीवावर उठली. होत्याचं नव्हतं झालं.नशीब आबा आधीच वारले. आपल्याच घरात कानामागून आली आणि तिखट झाली. सांगणार तरी कोणाला? जिकडे सख्खा भाऊ आपला राहिला नाही. ऐन तारुण्यात प्रताप सारख्या कित्येकांना आपण लाथाडलं.आपल्याला खात्री होती की आबासाहेबांच्या तोलामोलाचं घरच आपल्याला मिळेल…कोणीही मागणी घालेल. पण कसचं काय. जिथे स्वतः च्या घरातून बेघर व्हायची वेळ आली. तिथे लग्न काय होणार?आता हा त्या अपमानाचा बदला तर घेणार नाही?  त्याच्याकडे पी. एस. आय. म्हणून पॉवर आहे.अरे देवा…!!आपण हे पार्लर अनधिकृत गाळ्यात चालवतोय. कारण हा नवश्रीमंत महिलांचा एरिया  बिझनेस च्या दृष्टीने चांगला. हे तर नसेल कळलं त्याला? किंवा मग आपण राहतो त्या चाळीबद्दल काही? काय बोलायचं असणार ह्याला?


आता आपल्याला वाचवायला कोणी सुद्धा नाही. आबासाहेब तर नाहीतच आणि गौरव आपली साधी खुशालीही विचारत नाही.


गायत्रीला अचानक असाह्य वाटायला लागलं. जूना मायग्रेन चा त्रास उफाळून आला. हाताखालच्या मुलीवर पार्लर सोपवून ती चक्क घरी गेली.


अचानक तिला घरी बघून माईंना सुद्धा काळजी वाटली. पण माईंना काहीही न सांगता मायग्रेन ची गोळी घेऊन ती झोपायला गेली. पण डोळ्यासमोर प्रतापची आणि तिची भेटच सारखी तरळत राहिली.


त्या दिवशी….ती पार्लर ला जायला शिंपोलीच्या बस स्टॉप वर उभी होती. अचानक तिच्या समोर पोलिसांची गाडी उभी राहिली. तिच्या सकट स्टॉप वरचे पॅसेंजर धास्तावून आजूबाजूला बघू लागले. "ओ… हाय गायत्री. तू बस स्टॉपवर का उभी? अगं आज बसेस चा संप आहे. विसरलीस? चल बस गाडीत मी सोडतो तूला"


 जीप मधून जेंव्हा प्रताप खाली उतरत म्हणाला गायत्रीने गोंधळून आजूबाजूला पाहिलं. त्याने हसत म्हटलं


"कोणीही पहात नाहीये चला मॅम उशीर होतोय.वेळेवर पार्लर ला जायचेय ना "


तिच्यासाठी दार उघडून आदबिने मान झुकवत तो म्हणाला."तू… तूला काय माहित? तू… काय माझ्या मागावर असतोस का?"मान उडवत लटका राग दाखवत ती त्याच्या शेजारी बसत म्हणाली.


मिस्कील हसत तो हळूच म्हणाला


"काश… हे तूला समजलं असतं,"...जोरात मात्र म्हणाला..अगं!ह्या एरियाचा पी.एस.आय.आहे मी. खडानखडा माहिती ठेवणं माझी ड्युटी आहे.


बाय द वे… आबासाहेब आणि माई कशा आहेत? "


ती उदास हसत म्हणाली "आबानां  जाऊन चार वर्षे झाली. माई इथेच माझ्याकडे असते. बाकी गावी काय… चांगलंच चाललं असणार…तू कधी झालास हे.. ते.. आपलं इन्स्पेक्टर वगैरे?


कोणी बोललं नाही मला. "


"हं.. झालं दीड वर्ष. UPSC स्कोर करत गेलो.. आणि आलो इथपर्यंत "


त्याच्या आत्मविश्वास पूर्वक सावळ्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज पाहून नकळत गायत्री च्या काळजात अनामिक कळ उठली. आपण काय गमावलं ह्याची हुरहूर अचानक जागी झाली.


अरे!थांबव इथेच. समोरच जायचंय मला. पार्लर चं सामान घ्यायचंय. थँक्स… रतनबाय… आय मीन रतन काकी...तुझी आई कशी आहे?"


"आहे बरी… ये कधीतरी घरी. भेट होईल तुझी घरच्यांशी… आणि हो निघताना मीस कॉल दे मी पाठवेन गाडी. संप एवढ्यात मिटेल असं वाटत नाही.माझा नंबर घे "


"नको… प्रताप अरे जाईन रमत गमत तेवढाच व्यायाम."


त्याच्या डोळ्यात उदासी तरळली खांदे उडवत तो म्हणाला "तुझी मर्जी"त्या सबंध दिवस पार्लर मध्ये गायत्रीला आपलं गांव आणि कॉलेज चे मयुरपंखी दिवस आठवत राहिले.विक्रमगड च्या पाटलांची एकुलती लडकी लेक… लक्ष्मी चारही हाताने पाणी भरत होती इतकं वैभव. ह्या प्रताप चा लखूबाबा आणि रतनबाय आमच्याकडे शेतमजूर होते… आमच्या कडचे जुने कपडे, पुस्तकं ह्याला देत असे माई. लखूबाबाला मोठया भक्तिभावाने ते गाठोडं घेऊन जाताना कित्येकदा पाहिल्याच आठवलं तिला.. गौरव मात्र ह्या प्रतापची येताजाता टिंगल टवाळी करायचा. गौरवला आपल्या वडिलांच्या पाटीलकीची लहानपणापासून गुर्मी होतीच. आपण पण काही कमी नव्हतो म्हणा तेंव्हा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी प्रतापने स्नेहसंमेलनात आपल्या सोबत गाणं म्हटलं होतं…'आजा सनम मधुर चांदनी में हम…'  किती वन्स मोअर घेतले होते.आवाज छान होता त्याचा.. पण आपण त्याच्या समोर ते कधी कबूल केलं नाही.


त्या रात्री आपल्याला सोडायला बंगल्यापर्यंत आला आणि गेट जवळ भावुक होत म्हणाला होता "गायत्री…!मला.. खूप आवडतेस… तू कळायला लागल्या पासून तुझाच विचार करतोय मी… तू.. तूला…?"


मागचा पुढचा विचार न करता आपण खाडकन त्याच्या गालफडात मारत म्हटलं होतं… "शुद्धीवर आहेस का प्रताप… कुठे तू आणि कुठे आम्ही.. एक गाणं काय तुझ्याबरोबर म्हटलं तू तर आपली पायरीच विसरलास… म्हणे मला आवडतेस तू. आरश्यात बघ स्वतःला "


फणकार्याने आपण निघून गेलो. त्यानंतर रतनबाय भेटली तेंव्हा एका कोपऱ्यात तिला सुद्धा जाम फैलावर घेतलं होतं… कित्ती राग राग भरला होता आपल्या मनात तेंव्हा. बिचारी रतनबाय डोळ्याला पदर लावून रड रड रडली. हात जोडून माफी मागितली… खरंच आपण एका मस्तीत जगत होतो त्या काळात. प्रताप आपल्या खिजगणित सुद्धा नव्हता.


पाच वर्षांत होत्याचं नव्हतं झालं. दादासाहेब गेले. गौरव आपला सख्खा मोठा भाऊ… वहिनीच्या ताटाखालचं मांजर बनला. माई ला आणि मला गोडगोड बोलून सगळ्या संपत्तीतून बेदखल केलं. जेमतेम आपण बोरिवलीला आलो.हे दोन खोल्यांचं घर आणि पार्लर साठी गाळा मिळवण्यासाठी माई चे आपले सगळे दागिने, एफ. डी. मोडली. हौस म्हणून केलेला ब्युटीपार्लर चा कोर्स ईकडे कामी आला. जेमतेम दोघींचं भागत. पण गौरव पुढे हात पसारावे लागत नाहीत. आपलं लग्न बिग्न हे तर आता स्वप्नच राहिलं. आताशा माई पण विषय काढत नाही. साहजिक आहे म्हणा तिला पण तिच्या म्हातारपणाची काळजी असणारच.


प्रतापला आपण खानदानाचा ताना दिला. त्याच खानदानाने आपल्याला बेघर केलं.भावकीत कोणीही आपल्यासाठी  धावून आलं नाही. गौरवला जाब विचारला नाही. दुसरे कशाला माई पण मुकाट्याने अन्याय सहन करत तिथे रहात होती.वहिनी कित्ती हाल करायची.पाण्याबरोबर तिने फेकलेले भाकरीचे तुकडे गिळत होती, माई.आपण आवाज करायचा प्रयत्न केला तर आपल्याला गप्प बसवायची. आपला हक्क मारला तरी आपल्या बाजूने ब्र शब्द काढला नाही… का तर मुलगा घराबाहेर काढेल. पण शेवटी त्याने घराबाहेर काढलंच की.आपण तिला त्या खाईत सोडू शकत नव्हतो. मैत्रिणीच्या पार्लर मध्ये नोकरी धरली. हळूहळू ईकडे बोरिवलीत सुमार वस्तीत घर घेतलं. सुरवातीला माई खूप उदास असायची. जिकडे फुलं वेचली तिकडे गोवऱ्या थापायची वेळ आली. हळूहळू रूळली. आज प्रताप भेटला आणि  आठवणींच मधाच पोळ उचकटलं. केवढा बदललाय प्रताप. एकदम रुबाबदार दिसतो.नकळत त्याचा विचार करू लागलो की  आपण. 


  "गायत्री .. आज एकदम चमकतेस काही विशेष? कस्टमर म्हणाली तशी भानावर येत आपण  आपल्या भूतकाळाला दूर सारत व्यावसायिक हसू आणत म्हणालो " नाही हं मॅडम विशेष काय असणारे उलट आज बेस्ट चा संप आहे त्याचा विचार करतेय.…"समोरच्या आरशात आपल्या गालावर चढलेली लाली पाहून आपल्याला स्वतः चे नवल वाटले… खरंच आपण नकळत प्रतापचा विचार करतोय? त्याने…आपल्याला कोणे ऐके काळी प्रपोज केलं होतं. लग्न झालंच असेल त्याचं…कशी असेल बायको कोणजाणे.भरभर हाताने कस्टमर च्या गालावर सफाईने मसाज करत  मनाला सावरलं.    चार पाच दिवस उगाचच  रेंगाळत ईकडे तिकडे त्याला शोधत होतो आपण. मग मात्र मनाला पक्के बजावले 'बस्स झाले आता… त्याचं लग्न संसार सगळं झालं असणारे… तूला काय वाटलं एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे तो… त्याच्यासाठी वधूपिते रांगा लावून असतील. तू आपली बस नसत्या मानापानच्या कल्पना घेऊन.'  त्या दिवशी घरी जायला रात्रीचे 10वाजले. कस्टमर खूप खूष असतात गायत्रीच्या फेशियल,मेकप वर.. तिच्या सारखं नॅचरल मेकअप कोणाला जमत नाही… गायत्री मनापासून वधू ला तयार करते नेहमी.तिच्या अंतर मनात लग्नासाठी आसूसलेली एक मुलगी अजून स्वतः च्या लग्नाची वाट बघतेय ना. त्याची कसर ती प्रत्येक वधूला तयार करताना काढते.…त्यात आज भालेकर म्हणजे बडी हस्ती. पार्टी खूप मोठी होती.तिला भरपूर कमाई झाली.


घरी आली तर माई खूप उत्साहात होती. कारण आज   वझीराच्या गणपतीला माई गेल्या तेंव्हा येताना नाक्यावर प्रताप भेटला.त्यांना पाहून गाडी थांबवली.आपल्या गावचा मुलगा भेटला म्हटल्यावर माईंना काय करू नी काय नको असं झालं.  ती सारखं प्रताप च्या हुशारीच्,शौर्याच्. कौतुक करत होती.."लखन चं नांव काढलं पोरानं. सरकारी बंगल्यात राहतो बरं का ग तो. लखन गेला मागच्या वर्षी. पण रतनबाय मात्र त्याच्या बरोबर असते.….खरंच मुलगा असावा तर असा."


 लक्ष नाही असं दाखवत आपण ऐकत होतो ."लग्न बिग्न झालंच असेल त्याचं "


"काय की बाई… तो विषय निघालाच नाही. विक्रमगड च्या खूप आठवणी काढत होता."


 "हं… आपल्यासाठी विक्रमगड आता कडू आठवणींचा डोंगर झालाय. हे कुठे त्याला माहितेय.

 ####


नॅशनल पार्क समोरच्या सी.सी.डी मध्ये. प्रताप ऑर्डर आणायला गेला. आजूबाजूचं तरुण तरुणीचं उत्साहित खिदळणं, एकमेकांना बिलगून बसणं, बघून गायत्रीच्या मनात अनामिक धडधड उठली…' हे.. इतकं आनंदित आपण कधी होणारच नाही ह्या जन्मात '


टेबलवर खाण्याचा ट्रे ठेवत समोर बसत तो म्हणाला "सॉरी हं गायत्री… तूला इतक्या उशिरापर्यंत वाट पहावी लागली. अगं येता येता कमिशनर सरांचा फोन… आजची भेट बहुतेक कॅन्सल करावी लागेल असं वाटत होतं.एकतर मोठया मुश्किलीने तू यायला तयार झालीस."


गायत्री ने झटकन वर बघत म्हटलं "अरे!!एवढं काय परत भेटलोच असतो… काय काम होतं कमिशनर साहेबांचं… तू तर एकदम व्ही. आय. पी. पर्सन झालास..अर्थात काही सिक्रेट असेल तर नको सांगूस "


मान मागे टाकत दिलखुलास हसत तो म्हणाला "अगं काहीं नाही नेहमीचंच… गणेशउत्सव बंदोबस्त… वगैरे. "गायत्री कॉफी सीप करता करता विचार करत होती… पण ह्याने आपल्याला का बोलावलं आणि.. त्याला काय बोलायचंय. की.. नुसता टाईमपास?  ह्याला समजलं असणारे की आपल्याला आगा ना पिच्छा… मग फिरवू हिला.. तेवढंच इंप्रेशन…अजूनही 32व्या वर्षी आपलं सौंदर्य टिकवून आहोत आपण. अजूनही आपल्याकडे वळून बघणाऱ्या नजरा मनाला सुखाऊन जातात.…! आणि हा तर एकेकाळी आपल्यावर फिदा होता…तशात पोलीस बिलीस. एक घरवाली एक बाहरवाली असा ह्यांचा लौकिक असतो म्हणतात.


माईने  परवा काय काय सांगितलं असणारे..काय असेल ह्याच्या मनात? बायकांच्या बाबतीत कसा असेल हा? आत्ता किती आदबीने बोलतोय… पण पोस्ट चा गैरफायदा घेत नसेल कशावरून? आपल्या सारख्या सुंदर सुस्वरूप मुलीला सहज फिरवतोय असा डंका मारायचा असणारे… आपण मात्र दिवस वाया घालवला ह्याचा विचार करण्यात."हं.. गायत्री, बाकी काय म्हणतेस? परवा माई भेटल्या वझिरा नाक्यावर.नेहमी येतात का?"


"हॊ.. म्हणाली मला तू भेटल्याचं.  घरी सोडायला आला होतास तिला. थांबला नाहीस. आपली भेट झाली असती."


"बापरे!!होतो की 10 वाजेपर्यंत. इतका नेहमी उशीर होतो तूला?"


"अरे!नाही त्या दिवशी ब्रायडल… वधू ला साजवायचं होतं.म्हणून उशीर झाला "


"ओह… माई म्हणत होत्या, दुसऱ्या वधूचा मेकअप करण्यात वेळ घालवते स्वतः कधी वधू होणारे कोणजाणे…"अच्छा म्हणजे हे काम आहे का ह्याचे आपल्याकडे. माईने बोलायला पाठवलं म्हणायचं. कॉफीचा मग खाली ठेवत त्याची नजर चुकवत गायत्री म्हणाली "माई पण ना… जाऊ दे. तूझं सांग. लग्न केलंस ना? कुठची आहे मुलगी?"


"छे… अगं लग्न वगैरे कुठंच करतोय.आधी आयुष्याची घडी बसवण्यात गुंतलो होतो…आत्ता जरा स्थिरावलो. आई बाबाला सुखात ठेवायचं स्वप्न होतं. तूला तर माहीतच आहे कसं कष्टाचं आयुष्य काढलं त्यांनी. अर्धपोटी राहून दोघे राबराब राबायचे माझ्यासाठी. मला पणतीतल्या ज्योती सारखं जपायचे दोघेही. त्यांना खूप खूप सुखात ठेवायचं हे एवढंच आयुष्याचं स्वप्न आहे… अखेरच्या दिवसांत माझ्या सरकारी बंगल्याच्या प्रत्येक खोलीत त्या दोघांना अप्रूप पणे फिरताना बघून धन्य वाटतं मला. माझ्यासाठी कित्ती खस्ता खाल्ल्या बिचाऱ्यांनी दोन वर्षांत बाबा गेला बिचारा.


गायत्री तुला सांगतो … उन्हातान्हात ह्याच्या त्याच्या वाडीत, शेतात राबयचे दोघेही..कुठे लाकूडफाटा गोळा कर. कुठे शेण्या थाप, दळण कांडण  करून माझ्यासाठी पै पैसे जमवायची दोघेही…!शिक्षण, हॉस्टेल चा खर्च भगवायचे. मला काही कळू देत नसत. जाऊदे.विसर ते. मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुझ्याशी."


आता मात्र गायत्री सरसाऊन बसली.


"बोल… काय  बोलायचंय?"एकदम ट्रान्स मध्ये जात प्रताप म्हणाला "कदाचित तूला हे जरा ड्रॅमेटीक वाटेल… पण वाटू दे… माझ्या फीलिंग्स मला तुझ्याकडे मोकळ्या करायलाच लागणारे…तूझ्या शिवाय अजून कोणी….! पुढे तो काही बोलणार तोच त्याचा फोन वजला…तिला सॉरी म्हणत तो फोन घेऊन दारापाशी गेला.अचानक तिचे गाल लाल झाले. मनात म्हणाली 'म्हणजे अजून ह्याला….माझ्या बद्दल? ओ.. माय गॉड'


मान खाली घालून ती त्याची वाट पहात बसली.


"सॉरी…गायत्री…आमचं लाईफ असंच असतं बघ.. कामावरून सुटलो तरी सतत फोन…मी म्हणत होतो?जीव कानात साठवून त्याचे म्हणणे ऐकू लागली.


" हं गायत्री तूझ्या शिवाय माझं हे काम दुसरं कोणी करूच शकणार नाही.… तूला माझ्या आग्रहा खातर रविवारी वेळ काढावा लागेल… त्यादिवशी च्या तूझ्या सगळ्या अपॉइंटमेंट चे पैसे मी देईन.पण… मला खास तुझी अपॉइंटमेंट पाहिजे. कारण.. कारण.. माझ्या आईचा वाढदिवस आहे.रविवारी."


'हुश्श!.. आपण काय विचार करत होतो?'आपला मूड ठीक करत गायत्री म्हणाली 


"अरे एवढंच ना… मी येईन की माई ला घेऊन. त्यासाठी अपॉइंटमेंट कशाला?""नाही… पूर्ण ऐक. नुसता वाढदिवस तर प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो…पण ह्या वर्षी तिचा 50वा वाढदिवस मला वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे…तू हसू नकोस.. पण..आईचं  ते काय म्हणतात ते फेशियल  करायचं आहे ."


"क्काय… रतन काकी आणि फेशियल?.. कशाला? आय मीन.. तूझं लग्न बिग्न आहे का? की कोणता समारंभ?"


"तसं काहीच नाहीये. मला तिच्याप्रति कृतज्ञता दाखवायची आहे…"


"त्यासाठी फेशियल?"


"गायत्री… वेडा म्हणशील मला तू. पण तिने ज्या खस्ता खाऊन दिवस घालवले… उन्हातान्हात उपाशी, अर्धपोटी वणवण केली त्या सगळ्याची परतफेड मी कशी करू हाच विचार मी वरचेवर करत असतो… माझ्या मनगटाच्या जोरावर मी तिला सगळी भौतिक सुखं द्यायचा प्रयत्न करतो. तिला चांगलं खायला घालतो. ल्यायला भारी भारी कपडे आणतो… घरात तिच्या तैनातीला एक मुलगी आहे. कुक आहे. रोज घरी आलो की तिचे पाय दाबतो….पण तिच्या चेहऱ्यावर ज्या रेषा, ज्या सुरकुत्या आल्यात त्या बघितल्या की माझ्या पोटात तुटतं. तू… एक चांगली प्रोफेशनल ब्युटीशियन आहेस.तू तिच्या चेहऱ्यावर चमक आणशील?"


भावनांवेगाने त्याने गायत्री चे हात घट्ट पकडत तिला विचारलं आणि नकळत गायत्रीचे डोळे भरून आले. खरंच किती मोठं मन आहे ह्याचं. आपल्या आईवडिलांना प्रत्येक सुख द्यायला किती धडपड चाललीय… आपण काय समजत होतो ह्याला. तिच्या डोळ्यात पाणी पाहून तो बावचळला.


"अरे.. अरे.. गायत्री? मी हर्ट केलं का तूला सॉरी "


झटकन त्याने हात सोडले.


तिने मान हलवून अश्रू परतवत म्हटलं


"नाही रे… उलट तुझा अभिमान वाटला. आई चा एवढा विचार करणारा मुलगा असू शकतो ह्यावर माझा विश्वास नव्हता… खूप चांगला विचार आहे. मी नक्की येईन. "खरंच त्या दिवशी सकाळीच गायत्री सगळ्या जम्यानिम्या सहित त्याच्या घरी आली. पाच खोल्यांची प्रशस्त क्वार्टर्स.. तिला बघून रतनबाय ला खूप आनंद झाला. गावच्या आठवणी, माई आबासाहेब ह्यांच्या बद्दल अपार कृतज्ञता. सगळं तिच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होतं.त्या दोघीचं बोलणं मनापासून प्रताप सुद्धा कौतुकाने 


ऐकत होता.


तिने जेंव्हा रतनबाय ला म्हटलं "काकी जरा आरामात ईकडे झोपा. मी तुमच्या चेहऱ्याला मालिश करणार आहे."


प्रथम तर तिने गायत्रीचे हात आपल्या कपाळाला लावून म्हटलं "नको ग माह्या म्हातारीच कसलं मालिश न काय "


पण प्रतापने तिला बळजबरी झोपायला लावलं.


 "काकी आपण गप्पा मारत मालिश करू मग तर झालं? आरामात डोळे मिटून पडून राहा."फेशियल च्या प्रत्येक स्ट्रोक नंतर ती सुखावत होती. खूप आनंदात होती, रिलॅक्स होत गेली … डोळे मिटून घेत म्हणाली "तिचं मन मोकळं करत गेली. समोर बसून ते पहात होता प्रताप.


आधी तिच्या चेहऱ्याला क्लीनसिंग मिल्क लावले… तशी रतनबाय पटकन म्हणाली


"गो बाय माझे. केव्हढे मऊ हात आहेत गं तुझे जणू मोरपीस फिरतंय असं वाटतं "


नंतर तिच्या हनुवटी पासून हलक्या हाताने गालावर मसाज करत हळूहळू गालावरील एकेक सुरकुती हळुवार पणे उलगडत गायत्री तिच्याशी गप्पा मारत होती.


हळूहळू रतनबाय आपल्या आयुष्यात झालेल्या घटना,भूतकाळातील एकेक कथा, आपल्या आयुष्यत आलेले चढ उतार मोकळेपणाने तिच्याशी बोलत होती.माणसांनी केलेले अपमान, नवऱ्याच्या सवयी,प्रतापच्या शिक्षणासाठी केलेली धडपड, आणि आता प्रताप ने सगळ्या कष्टाचं कसं सोनं केलं… आपल्या साठी किती काय काय करतो हे खुलवून सांगत होती.गायत्री ने प्रतापला खूण करून गप्प ऐक सांगितलं.गायत्रीने पिंचिंग, हनुवटी पासून सुरु केलं ते हळुवार जोर देत मसाज करत करत कपाळावर आणलं. खूप सुखावली काकी.


गायत्रीला आतून जाणवलं खरंच कपाळावरील एकेक रेष म्हणजे तिने भोगलेल्या दुःखाची सोसलेल्या वादळाची खूण जणू. भरपूर क्रीम जिरवून सुद्धा ह्या रेषा भरून निघणार नाहीत. आपल्या मऊ मुलायम हाताने तिने गाल, कपाळा वर स्ट्रोक घेत घेत तिच्या डोळ्यांवर गोलाकार कपिंग केलं… "हॉ… कित्ती छान वाटतंय जणू.सगळा थकवा गेलाय पोरी… लई गार गार वाटतंय."


प्रताप म्हणाला मी चहा करायला सांगतो. गायत्री म्हणाली "हो जाताना लाईट घालवून जा मी काकीला बॅक मसाज देतेय. प्रताप खरच आज तू खऱ्या अर्थाने ह्या फेशियल ला जाणलंस रे…खरं म्हणजे बायका फेशियल करायला पार्लर मध्ये येतात त्या नुसतं फेशियल करून जातात असं नाही त्या आपला ताण, संसारातलं फ्रेस्टेशन हलकं करायला येतात…एक प्रकारचं मेडिटेशन आहे हे कोणा पुरुषाला कळलं असेल असं मला कधी वाटलच नाही…पण आज तू केलंस खरंच मानलं तूला "


शेवटी रतनबाय ला छान बॅक प्रेशर मसाज देऊन तिने डोळ्यावर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवत म्हटलं "काकी निवांत झोपून राहा हया पट्ट्या तूझ्या डोळ्याचा सगळा शिण खेचून घेतील आणि छान झोप येईल. मी आहे बाहेर "


रतनबाय ने कृतज्ञतेने तिचे हात दाबत म्हटलं "कोणत्या जल्माचं रीण फेडाय आलीस बाय लईच झकास वाटलं बघ… गायत्री एक सांगू? माज्या पोराच्या मनात अजून तूच हायेस बग… लई लई मागण्या येतात पर त्याच्या खिवशात अजून तुजाच फोटू असतोय बग."


 तिने आपले हात सोडवत लाजत म्हटलं


"अच्छा!बरं झालं काकी सांगितलं… मी बोलते त्याच्याशी… तू… तुम्ही पडा निवांत "


बाहेर प्रतापकडे बघून तिला इतकं प्रेम दाटून आलं… कसा आहे हा.. वेडा. इतकं काय पाहिलं आपल्यात ह्याने?


"थँक्स गायत्री… माझ्या आईला खूप खूप आनंदात पाहिलं मी आज. ये बस. तू पण दमली असशील ना. घे चहा आणि तुझ्या आवडीचं थालीपीठ लावलं आहे आमच्या कुकने."


खाताना अचानक त्याने विचारलं


"गायत्री… तूझं फेशियल कोण करतं?"


उदास चेहऱ्याने तिने शून्यात नजर लावत म्हटलं "माझ्या साठी कोण एवढे कष्ट घेणार…?"


आत्ता पर्यंत सोसलेल्या एकाकीपणा मुळे किंवा कोणजाणे पण अचानक गायत्रीचे डोळे भरून आले. त्याने घाईघाईत तिच्या डोळ्यातलं पाणी स्वतः च्या बोटावर घेत तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या डोळ्यात थेट नजर भिडवत विचारलं 


मी.. करू? तूझं … फेशियल?"


ती होकाराची मान हलवीत हलकेच म्हणाली "हो चालेल "


तो एकदम ताडकन उडाला घाईघाई ने उभं रहात तिच्याकडे पहात म्हणाला


"आर यू सिरीयस?... मी. मला हक्क आहे तूझ्या चेहऱ्याला… हे.. ते… आपलं "


ती त्याचा हात धरत खळखळून हसत म्हणाली


"पाकिटात अजून माझाच फोटो ठेवून फिरतोस ना?... मग तूला का नसेल हक्क माझ्या त्या…गालाचा…त्या कपाळाचा…त्या ओठांचा…"


तिला आपल्या मिठीत घेत अवेगाने त्याने म्हटलं


"नक्की ना गायत्री?... डन… तूझं फेशियल मीच करणार राणी "


आपला लाजेने लाल झालेला चेहरा लपवत त्याच्या हातांचा विळखा सोडवत म्हणाली"सोड ना प्रताप…मला..काकींचा पॅक सुकला असेल मी तो काढून येते. "


त्याने तिला सोडत पुन्हा तिच्या डोळ्यात डोकावत म्हटलं "फेशियल मात्र मीच करणार "ती लाजून आत पळाली.


©®चित्रा अविनाश नानिवडेकर.Post a Comment (0)
Previous Post Next Post