वादळ

 वादळ-  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️अर्चना पिसू देवगिरीकर


चिपळूणच्या दिशेनं गाडी निघाली आणि दिनेश ही आपल्या बालपणात शिरला. गावाकडची वडिलोपार्जित शेती, मोठं घर  त्याला पटकन आठवलं. आबांना शेती करण्याची किती हौस ,पण काकांकडून फारसा प्रतिसाद नव्हता . काकांचा अपघात झाला आणि त्यादरम्यान दोन वर्षांत आबा निवृत्त झाले.तेव्हापासून ते  चिपळूण ला स्थायिक झाले. अपघातानंतर लवकर मेडिकलची  सोय  होऊ शकली नाही म्हणून त्या रागातच  चुलत भावंडांनी   गावाकडे पाठ फिरवली. 

                                                                                            या विचारात अचानक गाडीसमोर गाय आली आणि दिनेशने करकचून ब्रेक दाबला. सविताने त्याच्याकडे रागाने पाहिले. "दिनेश कुठल्या विचारात आहेस ? जरा सावकाश, किती घाई करशील ? माहितीये तुला तुझ्या माहेरी जायचे !"  तिचं बोलणं ऐकून मुलं हसली "बाबा खरच किती दिवसांनी जातोय तू . मला तर काहीच आठवत नाहीये!" हर्ष म्हणाला ,"मला गाईंचा गोठा कळप आठवतोय .त्यांच्या मागे मागे मी आणि आबाबा जात होतो." काहीतरी मोठी आठवण सांगावी तसं सई सांगू लागली .सविता नाराजीच्या सूरातच म्हणाली," खरंच खूप वर्ष झाली ,आमच्या कामाच्या आणि तुमच्या अभ्यासाच्या ,शिक्षणाच्या व्यापात इकडे येणं झालं नाही .आता हे असं अचानकच ! खरंच कितीतरी वर्षांनी, आठवतही नाही. "

                दिनेश परत बालपणात रमत होता. पण सविताच्या बोलण्याने पुन्हा वर्तमानात आला. सविता फोनवर कुरकुरूतच म्हणत होती ," हो न गं,कितीदा म्हणाले यापूर्वी अरे चल ,जरा पाहून येऊत वाड- वडिलांचे वैभव ,पण कधी मनावर घेतलं नाही आणि आता वादळ काय झालं ह्याला भिकेचे डोहाळे लागले आहेत ! यायचं म्हणाला इथे  ! "सविताचं फोनवर बोलणं सुरू होतं. पण त्याकडे दिनेशने दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं . 

                        रस्त्या सारखे वाटणारी रस्तेसुद्धा आता रस्ते असल्याची ओळख देत नव्हते. आरामदायी गाडीत बाहेरच्या खाचखळग्यांचा हलकासा जर्ग बसत होता. तरी गाडीतला प्रत्येक जण 'अरे बापरे ,केवढे खड्डे ' असं म्हणून कुरकुरत होता. दिनेश मात्र कोणालाच कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हता . त्याच्या मनात आलं 'एवढं वादळ झालं .लोकांची घरं उघडी पडली. सगळं काही रस्त्यावर आलं त्यांना घरापेक्षा रस्ताच आपलासा वाटला असणार!'

                  विचारांचे वारे इतके जोरात वाहत होते की आपण कधी कोणत्या वळणावर आलो हे त्याला त्याचच कळालं नाही. समोरून पाठीवर कसलेसे गाठोडे घेतलेले काका चाललेले दिसले. त्यांना थांबवून दिनेशने विचारले "काका वल्ली गाव कुठे हाय ? "काकांनी सांगितले ,"या नारळाच्या बागा संपला की मोठा पिंपळ- जमिनीवर झोपलाय ,तिथून उजवीकडे !' झोपलेला पिंपळ म्हटलं की दिनेश ला कसंस झालं. 

                   इतक्या वर्षापासून चा पिंपळ सुद्धा वादळाने झोपून टाकला! या विचाराने तो काळजीत पडला. खरं तर ,गाव जवळ येत होतं तसा तसा त्याच्या गाडीचा वेग कमी झाला होता .त्याचं त्यालाच वाटलं आता 'इथूनच आपण परत जावं खरं तर किती ओढीने आलो आहोत आपण ,पण आता का पळून जावसं वाटतं ! पाहण्याची हिम्मत नाही का की आता नाळ तुटली याची जाणीव प्रकर्षाने होत आहे  ?' त्याचं त्यालाच कळत नव्हतं .तितक्यात पिंपळ रस्त्यावर आडवा झालेला दिसला. त्याची सळसळणारी पानं निपचित पडली होती जमिनीवर ! उघडी पडलेली सगळी मुळं वादळाची भयानकता आणि जीवनाची सत्यता सुद्धा दाखवीत होती. एकदाका जमिनीशी असलेले तुमचं नातं तुटलं की माणूस खऱ्या अर्थाने उघडा पडतो. हेच जणू तो पिंपळ दाखवत होता. पिंपळाने जणू गावातल्या परिस्थिती ची झलक दाखवली.

                    आपल्या गावाला फार मोठा फटका बसलाय याची दिनेशला कल्पना आली .हळूहळू रस्ता काढत त्याने गाडी उजवीकडे वळवली, पण पुढे त्याला चालवेना. त्याने गाडी थांबवली .हर्षला तो म्हणाला, तू गाडी घेऊन ये .मी  पायीच जातो ." हर्ष काही बोलणार, त्याच्या आत तो गाडीतून उतरला आणि झपाझप चालू लागला.

               रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक झाडं आडवी झाली होती. ठिकठिकाणी चिखल, पडलेल्या भिंतींचे अवशेष, उडून आलेला प्रचंड कचरा , कपडे   दिसत होते.पडक्या घरांमध्ये कोणी राहात असेल का? यापेक्षा- यामध्ये राहणारी माणसे गेली कुठे ? असा विचार त्याच्या मनात आला. काही घरांच्या आवारात नारळांचा खच पडलेला होता. प्लास्टिकच्या पिशव्या ,बाटल्या रुतलेल्या दिसल्या. काही झाडं अजूनही स्वतःला सावरू शकली नव्हती ,तर काही झाडांनी मात्र आहे त्या परिस्थितीत स्वतःला ताठ उभं केलं होतं. काही घरांच्या सांगाड्याच्या समोर घरातली सर्व लहान-थोर घरासमोरचा कचरा भरून ठेवत होते. घर पुन्हा एकदा उभारण्याचा प्रयत्न करत होते .एका घरासमोर एक लहानशी मुलगी आपल्या हातातल्या तुटक्या, विद्रुप झालेल्या बाहुलीला बिलगून बसली होती .तिच्या मागे उध्वस्त घराचा सांगाडा उभा होता. ज्यातली अर्धवट बैठक नि माजघर सोडले तर इतर खोल्या पत्रे उडून गेल्याने उघड्या पडल्या होत्या .त्या निरागस बालपणाला पाहून दिनेशला अजूनच वाईट वाटले .

                        दिनेश एका पटांगणाच्या समोर पोहोचला . मैदानात ठिकठिकाणी चिखल, पाणी साचलेले होतं. इकडे तिकडे उडून आलेले कपडे पसरले होते. घाऊकवल्लीची ही शाळा. शाळेच्या काही खोल्या बर्‍या स्थितीत होत्या. तिथे घर हरवलेली माणसं हरवल्यासारखे बसलेली होती. दिनेश थबकला .शाळेच्या आसपासची वस्ती फारशी बदललेली नव्हती. नाही म्हणायला शाळेसमोर आणखी एक दुमजली इमारत होती. टायपिंगचे क्लास मोबाईल रिपेरिंग असे छोटे-मोठे क्लासेस घेतले जातील अशी पाटी लोंबकळत होती. 

              दिनेशला पाहून काही बायका घाई घाईत पण दबकत त्याच्याकडे आल्या म्हणाल्या ," नुकसान कसू झालो बघताय ना ! गेलो रे ,पावसात सगळे घरातलो सामान तांदूळ ,डाळ ,तेल सगळे उडालेलो. यो झोंबणारा वारा उडवून नीवूचा !" त्यांच्या बोलण्याने दिनेश चा चेहरा केविलवाणा झाला .ते पाहून दुसऱ्या काकू पदर तोंडावर ठेवून सांगू लागल्या, "सुपारी आली होती यंदा बक्कळ पैका आला असता .सुमती च्या लग्नासाठी. पण काय होऊन गेलाय सगळी पोती गच भीजल्यात कोणी घेऊ चा नाही आता ना माका सुमतीला  ना  सुपारीला !काय करू चा?" तीने आवंढा गिळला .एक म्हाताऱ्या आजी जवळ येत म्हणाल्या मक्याचा पत्ता लागलो का? वादळाचे दिशी नको जाऊ म्हणतालो . तो माळ्यावर गेला होता. "बापरे हिचा मुलगा बेपत्ता आहे? दिनेश आणखीनच गडबडला .

          दिनेशला क्षणभर वाटलं यांनी ओळखला   आपल्याला? पण आपण त्यांना पहिल्यांदाच पाहत आहोत. तो काही बोलणार इतक्यात मागून आवाज आला ,कोण हाय हापिसर !कशास्नी  आलास ?काय बी देणार नाहीस ना ! मग नुसती आकड्यांची मोडतोड करू नका. अन तो मोबाईल बी फेका तिकडे समुद्रात! आमच्या फाटक्या संसाराचे धिंडवडे सर्वाक्  दाखवून लाईक की काय ते मिळवताल ! चार दगड उचलायला कोण नाय आणि फोटो काढताव! तुमचा पैका काय कामाचा नाय! सगळं कोकण रडतय आणि त्या पाचशेच्या नोटा तांदूळ बी मिळत नाही ". 

                  दिनेश स्तब्ध होऊन पाहत होता .आपल्याच गाडी च्या हॉर्नने तो भानावर आला. नक्की कुठे जायचं ? हर्षकडे पहात त्याने हर्षला बोलावलं त्या माणसाला तो म्हणाला, तात्या मी  पत्रकार नाही की सरकारी माणूसही नाही .पण मला शाळेचा शिपाई गणू होता न त्याला भेटायचे आहे. त्यासाठी मी आलोय. त्या माणसाने विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं . गणूची झोपडी त्याला दाखवली .

.                        दिनेश च्या मागोमाग घरचे सगळेच गणूच्या झोपडीकडे गेली गणूच्या झोपडीची कौलं  उडून गेली  होती . प्लास्टिकच्या मोठ्या कापडाने एक भाग कसाबसा झाकला होता. म्हातारा गणू थरथरत्या हाताने काहितरी आवरत होता. दिनेश त्याच्याजवळ गेला तोवर घरातून कोणीतरी डोकावलं. त्याचीच सून असावी कदाचित. दिनेश म्हणाला अण्णा ओळखलं का ? किलकिल्या डोळ्याने पहात अण्णा म्हणाले ,"नाही बा, कोण हुस् ?' मी करकरेंचा दिनेश .मास्तर चा दिन्या  हू!' आबाबा किती रे मोठा झाला ! तू आला कसा ? कुठसा असतोस? ये बस! रंगे,..." 

                       अण्णांना काही समजेना नक्की काय करावं? तेवढ्यात त्यांचा मुलगा आला त्याला अण्णांनी ओळख करून दिली. मुलगा मात्र जरा सावरून बसला. दिनेश ला म्हणाला ,"मास्तरनी मळा अण्णांच्या ताब्यात दिला पण त्यापासून फार काही उत्पन्न नाही त्यात! होतं ते मोठ्या दादास घेऊन जाता कधीचा ! तुमी नाही येत कधी? यावर्सी ही महामारी ,कंबरडं मोडलं. तसं वाकून जगलो असतो पण वादळाने झोपवलं बघा .डबाभर सुपारी असेल तो नेऊचा तर न्या  तुम्ही' "

                  काही मिनिटात त्यांनं वर्षभराचा दिलेला हिशोब ऐकून दिनेश ओशाळला. पटकन म्हणाला," अरे मी सुपारी न्यायला आलो नाही. हिशोब मागायलाही नाही. मी फक्त तुम्हाला भेटायला आलोय खरं तर , फारसं सुचलं नाही .नाहीतर तुमच्या साठी धान्य मीच आणलं असतं पण आता एवढं करू शकतो असं म्हणत त्यांनी पाकिट काढलं. पाचशे ,दोन हजाराच्या नोटा मुलाच्या हातात दिल्या. स्वतःचं कार्ड त्याकडे देत  म्हणाला,' गणु आण्णांसाठी ठेव हे !त्यांना कधीही काहीही लागलं तर मला फोन कर. मला शक्य ती मदत करेन मी." इतक्यात सुनेनी चेपलेल्या दोन पेल्यात चहा आणला. बाकीच्यांना नंतर द्यायचा म्हणून हातातला गरम तांब्या झाकून ठेवला. 

                    दिनेशनी हर्षला काहीतरी सांगितलं .तोवर हेमांगिनी आणि हर्ष नी प्रवासात टाईमपास साठी घेतलेलं पॅक असलेलं जिन्नस सुनेच्या हातात दिलं .गणुआण्णांना नमस्कार करून दिनेश निघाला तेव्हा त्याच्या मनातलं वादळ शांत झालं होतं पण गणूच्या डोळ्यातून मात्र पाऊस धारा वाहत होत्या. सविता नि मुलं गाडीत बसली. तशी सविताची भुणभुण सुरू झाली." ही कोणती पद्धत तुझी ? काही कल्पना तर द्यायची .अरे किती पैसे दिलेस तू त्याला ? कोण तो ?आपल्याच मळ्यावर जगणारा न! मोठ्या काकांकडे माल जातो पण आपल्याला काही नाही कधी?"हेमांगी समजावत म्हणाली," आई त्यामुळे या एव्हढ्याश्या  सुपारीसाठी इतक्या लांब येणं परवडणार आहे का आपल्याला? "पण डॅडी हा नक्की कोण आणि आजच्या तुम्हाला आठवला कसा?"हर्ष नी विचारले. 

                    दिनेश शांतपणे सांगू लागला" गणुआण्णा आमच्याकडचा घरगडी, पण त्याला शाळेतल्या शिपायाचं कामही लावून दिलं आबांनी. जेव्हा गाव सोडावं लागलं तेव्हा घराच्या वाटण्या झाल्या पण मागची याची झोपडी तशीच ठेवली नव्या मालकानी  आणि मळा कशाचा, मळ्यातला कोसाचा तिरप्या भागात काही सुपारीची झाडं ह्याला दिली आबांनी .पण खरं सांगू ?मला जेव्हा बोर्डिंग स्कूल मध्ये  पाठवलं होतं. तेव्हा आबांबरोबर गणूही सोडवायला आला होता. बाबांनी स्वभावानुसार दहा रुपये हातात दिले होते अडल्यानडल्या साठी ! तेव्हा आबांच्या नकळत चक्क स्वतः जवळचे दोन रुपये हातात ठेवून  गणूनी सांगितलं होतं  ,आबा  भेटायला आलं नाही तर माका पत्र धाड मी घेऊन येईन तुका   घरला ! "त्याचा फार जीव माझ्यावर ! ते दोन रुपये त्याच्या कितीतरी दिवसांची बचत होती पण ती माझ्या भविष्यात गुंतवली त्यांनी ! काल टीव्हीवरल्या एका बातमीत याची पडकी झोपडी नी तो दिसला मला ,मी कसा ओळखला माहीत नाही ! मागचं सगळं आठवलं. मनातलं वादळ आपण थोपवू शकत नाही पण त्यांच्या आयुष्यातल्या इतर वादळांना तरी थांबवू शकतो ना !म्हणून आज इथे आलो .आता दिनेश शांत झाला होता पण उध्वस्त गावातलं शांत वादळ प्रत्येकाच्या मनात घोंगावत होतं.     

   
सौ.अर्चना पिसू देवगिरीकर

Post a Comment (0)
Previous Post Next Post