वस्त्रहरण (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ माधवी ठाकूरदेसाई
आज सकाळ पासून कामात लक्षच लागत नव्हत... डावा डोळा ही लवत होता... मन फार बेचैन झाल होत. कान्ह्याची काळजी लागून राहिली होती. इतका खट्याळ पणा अंगात आहे की रोज कोणी ना कोणी तक्रारी घेऊन येत असे... त्याला लाडीगोडी लावून पावा वाजवाला लावत आणि भान हरपत... आणि वर त्यालाच दटावत तुझ्या मुळे ऊशिर झाला कामांना... घरी जावून बोलणी खावी लागतिल म्हणून कुरकुरत... येवढसं माझ पोर... पण तो त्रास देतो म्हणून तक्रारी करत..दहीदूध लोणी चोरतो, पाण्याचे माठ फोडतो एक ना दोन....माझी ही चिडचिड होत असे... एकदा तर त्याला उखळाला सुध्दा बांधला होता... किती लहान होता तेंव्हा... शेजार पाजारची कार्टी नुसती हाका मारून बेजार करत होती... एक सारखा आई जातोनाची भूणभूण करत होता…. बाहेर सोप्यावरच होता... मी आत काम करत होते.... तेव्हड्यात कडकडत काहीतरी मोडल्याचा आवाज आला... बिचारं पोर बाहेर एकटच आहे किती घाबरलं असेल, अग यशोदे कशाला लोकांच ऐकून शिक्षा केलीस... असे स्वतःलाच बोल लावत बाहेर आले... पहाते तर काय उखळा सहीत स्वारी अंगणातल्या दोन झाडांच्या मधे... मला बघिल्या बरोबर भोकाड पसरलन... पटकन धावले आणी सोडवल त्याला आणि कवेत घेऊन शांत केलं... असले जिवावरचे किती प्रसंग बेतले त्याच्यावर... मनात नाना विचारांचा गोंधळ उडाला होता... तेवढ्यात बाहेर बायकांचा कलकलाट ऐकायला आला... धस्सच झाल काळजात!
"यशोदे, कसलं ग द्वाड कार्ट आहे ग तुझ" "हो ना कसलीच रीत भात नाही" "नुसत गावभर उंडारायच आणि खोड्या करत फिरायच" "जरातरी धाक हवा की नाही" "लहान नाही मोठ नाही सगळ्यांच्या खोड्या करायच्या" "आम्ही आपल्या गरीब गवळ्याच्या नारी, पाटलाच्या पोराला घाबरूनच रहाणार" "पावा बरीक गोड वाजवतो हो आणि बोलतो पण गोड गोड" "तु गप ग मालीनी....आपण गोडवे गायला नाही आलोय तक्रार करायला आलोय" कामिनी, मानिनी ने कृष्णाची बखोटं धरली होती..."मावशी सोडान पुन्हा नाही असं करणार" अस केविलवाण विनवत होता... पण त्या कुठल्या ऐकायला आठ नऊ वर्षाच माझं पोर काय एवढा गुन्हा केलाय त्यांन... मी चटकन पुढे झाले आणी कान्ह्याचा ताबा घेतला... "किती कलकल करताय ग" "असा काय मोठा गुन्हा केलाय ग कान्ह्याने"... मी कान्ह्याकडे पाहिल पार भेदरला होता म्हणजे प्रकरण गंभीरच दिसत होत "अग यशोदे आपल पोर बाहेर पडलं की काय उद्योग करत ते पहात जा जरा" "तुम्ही असताच की राखणीला त्याच्या....सारख्या कागाळ्या घेऊन येतच असता की" "आज काय केलंन याने" "काय केलंन? ऐशील तर तुही लाजशील" "अग बायांनो आधी कलकल थांबवा आणि निट एकीनी सांगा काय ते" धारीणी पुढे आली म्हणाली ऐक आपल्या लेकाचे प्रताप....
"आज माध्यानीला घरातली कामे आटोपून सगळ्याजणी यमुनेवर गेलो पाणी आणायला...आत्ताची उन्हतर बघतेस ना किती कडक आहेत ती घाट चढून जाई पर्यंत थकून.. घामेजून गेलो होतो, यमुनेच्या थंडगार पाण्याचा स्पर्श हाताला झाला तशी इतक शांत वाटल सांगू ... दुपारची निवांत वेळ षुरुष मंडळी आपापल्या कामाला गेलेली, लहान थोर पोरं गुरं वळायला गेलेली... दूरदूर वर कुणी नाही हे पाहून आम्ही साऱ्या जणींनी शीण घालवायला यमुनेच्या पाण्यात उतरायच ठरवल आणि वस्त्रे काठावर सोडली आणि उतरलो पाण्यात... झुळझुळत्या पाण्याच्या स्पर्शाने अगदी मोहरून गेलो... हास्य विनोद करत एकमेकींवर पाणी उडवत खुप वेळ पाण्यात डुंबलो मनं अगदी प्रसन्न झाली... म्हंटल उशिर नको व्हायला म्हणून पाण्या बाहेर पडणारच होतो पण पहातो तर काय आमची वस्त्रच गायब! अशी कशी हरवली कोणी नेली??? खुप घाबरून गेलो... अगदी रडवेल्या झालो ... अगदी निमिषात ब्रम्हांड आठवल बघ" "काठारच्या कदंबाच्या झाडावरून अलगद हसण्याचा आवाज आला... आम्ही चमकलो... नेत्र विस्फारून कोण आहे ते पाहू लागलो इतक्या कशा आपण वेंधळ्या, कोणी तरी एकीने काठावर थांबायला हवं होत हेही भान ऱ्हायल नाही आम्हाला इतकी पाण्याची ओढ लागली होती" "आता हताश होऊन उपयोग नव्हता... ज्यांनी कोणी वस्त्र नेली असतिल त्याची विनवणी करण आलं"
"मानिनी आमच्यात धीट तिनेच दरडावून विचारले" "कोण आहे रे तिकडे?" "बऱ्या बोलान आमची वस्त्रे परत दे" "कदंबा वरून ओळखीचा आवाज आला, आधी कबूल करा आई कडे तक्रारी करणार नाही.... रोज उगीच ओरडा खावा लागतो" "कृष्णा तू?" "आधी वस्त्रे घेऊन खाली ये पाहू... नाही करणार तक्रारी" "असं म्हंटल्या बरोबर धप्पकन स्वारीने वस्त्रांसह उडी मारली" "हं, ठेव आता काठावर आणि लांब जावून उभा रहा पलिकडे तोंड करून, आणि शहाण्या सारखा डोळे मिटून पावा वाजीव" "आम्ही हाक मारी पर्यंत थांबायच नाही, कळलं" "हो, मावशी म्हणून त्याने पावा वाजवायला सुरुवात केली" "आम्ही पटापट वस्त्रे परिधान केली" "मानिनीने झटकन जावून पकडल कृष्णाला" "आम्ही झटकन घागरी भरुन घेतल्या आणि तडक तुझ्या कडे आलो... आता तुच ठरव काय करायचं ते"
धारीणीचे बोल तप्त शिश्याच्या रसा सारखे कानात उतरत होते... लाजेने माझा चेहरा अगदी काळवंडून गेला.. मी कान्ह्या कडे क्रुध्द नजरेने पाहिले तशी तो अधिकच भेदरला मी विचारले "तु आणि राम आपली गुरं घेऊन गेला होतातना राखणीला?? मग तु तिथे कसा गेलास? बोल पटपट आज तुझी खैर नाही" "अग, आई $$$ ऐकून तर घेना" "मी आणि दादा गेलो होतोना गुंर चारायला... पण तु दिलेल्या दशम्या दादाने आधीच फस्त केल्या होत्या मला खूप भूक लागली होती म्हणून मी घरी येत होतो" "वाटेत बायकांचा खिदळण्याचा आवाज ऐकू आला, आपण आपलं लांबून जाव म्हणून दबकत निघालो तर आवाज पाण्यातून येत होता हे लक्षात आले आणि पाहिल तर काठावर वस्त्रांच्या ठीगा खेरीज कुणीच नव्हतं... म्हटलं चांगलीच अद्दल घडवूया यांना रोज रोज तक्रारी करतात काय ... तक्रार करणार नाही हे वदवून घेऊ मगच वस्त्र देऊ" "बाकी मी काहीच केल नाही, उलट वस्त्रांचा ठीग सांभाळू दमून गेलो तरी या काही बाहेर यायच नाव घेईनात" "एक तर भूक लागलेली आणि वस्त्रांच्या वजनाने हातही दुखून गेलेले, म्हणून मी वस्त्रे परत काठावर ठेवायला उतरणारच होतो" "तितक्यात यांचे घाबरट आवाज कानावर पडले आणि मला हसू आल" "नंतरच तर सगळ, मावशीने सांगितलच आहे तुला" "खरच सांगतो आई बाकी काही नाही ग केलं" कान्ह्याच्या गाला वरून अश्रू ओघळू लागले झाल्या प्रकाराचा खूपच ताण पडला होता त्याच्यावर पण सगळ्यां समोर त्याला जवळ ही घेता येईना... साऱ्या जणी आळी पाळीने दोघां कडे पहात होत्या... त्यांच्या समोर तरी कान्ह्याला रागे भरण जरूर होतं ... "चल..चल.. आत हो आधी आज बघतेच तुझ्या कडे" रडवेल तोंड घेऊन कान्हा आत गेला... "बायांनो कान्ह्याच्या वतीने मी माफी मागते तुमची परत नाही हो करणार अशी खोडी" असे सांगून गोपिकांना वाटेला लावलं आणि आत वळले...
आधीच भूकेने बेजार झालेला कान्हा झाल्या प्राकाराने भांबावून गेला होता.. "जा जावून हात पाय स्वच्छ धूवून ये" कान्हा हातपाय धूवून येई पर्यंत झटकन त्यांच्या आवडीचा दहीकाला केला... आणि लोटकं त्याच्या समोर ठेवलं.... मनात म्हटल आज याच्या बरोबर संभाषणच करायचं नाही.... लोटक हातात धरून नुसताच बसून राहीला होता .... "खा आता पटपट" "नेहमी सारखं तू नाही भरवणार?" "नाही... आता फारच मोठा झालायस ना नकोते उद्दोग करायला, चूपचाप हाताने खायचं या पुढे लाड बंद" "आणि ऊद्या पासून घरीच थांबायचं कळलं" "खरच भूक लागली असेल तर खाशील" आणि मी माझ्या कामां कडे वळले... रात्री ही कान्हा गप्प गप्प होता बलराम खोड्या करीत होता तरी हा गप्प होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ही काही खळखळ न करता सगळी आन्हिक उकलंन, नाश्त्याला दिलेली आंबिल पिवून रानात जायच्या तयारीला लागला... मी म्हंटल "कुठे निघालास काही कुठे जायचं नाही सांगितलय मा तुला" "तरी आपलं तेचं" "आई चुकलो ग परत नाही अस करणार, जावू दे ना मला" "बलरामा आज कान्हा नाही येणार तु आणि पेंद्या जा गुरं घेऊन" "का गं आई येऊ दे ना कान्ह्याला तो बरोबर असला की कसा शीण वाटत नाही गं" "तुला सांगितल आज नाही येणार तो" "बर पण उद्या तरी पाठव... त्याला बरंबीर नाही का?? काल पासून बघतोय हा आपला गप्प गप्प आहे" "हो, ऊद्याच ऊद्या बघू.... तु जा सगळी वाट बघत असतिल" बलरामाला रवाना करून मी कामांना लागले काल पासून चित्तच थाऱ्यावर नव्हतं. एकाच ही मधे आई आई चालूच होत. कान्ह्याने तिला कडे वर घेतलं होतं.... तिला खेळवता खेळवता याची भूणभूण सुरूच होती... माझा सुधा राग अनावर झाला ....."अरे गाढवा.... एकदा नाही म्हटलेल कळत नाही का तूला...😡 का धपाट्यांचा प्रसाद हवाय??" "कालच सगळ्या जणी येऊन तक्रार करून गेल्यात.... तूझा कान्हा यंव करतो त्यंव करतो.... जशी काही यांची कार्टी सुधीच आहेत.... काही कुठे जायच नाहीये.... गुपचूप घरात बसायचय कळल" "रोज तक्रारी रोज तक्रारी कंटाळले मी"... चेहरा पाडून रडवेल्या चेहऱ्याने पहाणाऱ्या कान्ह्या कडे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं..... त्याला जवळ घेत.... पापा घेत म्हणलं "ओरे माझा बाळा तो.... चिडू नको तर काय करु... रोज त्या तक्रारी करतात.... मी लक्ष देत नव्हते, पण काल हद्दच केलीस की रे.... सगळ्या यमुनेवर अंघोळीला गेल्या होत्या.. तेंव्हा त्यांची वस्त्रच पळविलीस.....काय हा अगोचर पणा.... बाकी मस्ती करतोस तेंव्हा रागावते का मी??? पण कालची गोष्ट मलाही आवडलेली नाही.... गावच्या पाटलाचा तू मुलगा आहेस.... तूच जर अस रीतभात सोडून वागलास तर चालेल का??? बिचाऱ्यांची किती केवीलवाणी अवस्था झाली होती.... मला ही लाज वाटली....माझ्या बाबतीत आपल्या एकाच्या बाबतीत अस कोणी वागल तर चालेल का तूला????" कान्हा वरमला होता.... आपण किती मोठी चूक केली होती याची जाणीव त्याला झाली..... त्याची सावळी चर्या अधिक गडद झाली..... त्याने मनोमन काहीतरी निश्चय केला.... मला गच्च मीठी मारत रडत स्फुंदत तो म्हणाला "आई तूला वचन देतो.... स्त्रीत्वाचा अपमान होईल असे मी कधी ही वागणार नाही......कोणत्याही स्त्रीचा अपमान यापुढे माझ्या कडून होणार नाही....."
आणि अखेर पर्यंत माझ्या कान्ह्याने शब्द पाळलान.... द्रौपदी वस्त्र हरणांच्या वेळी तिला वस्त्रे पुरवून तिचे लज्जा रक्षण केलेन.... लोकांनी कितीही नावे ठेवली तरी नरकासुराच्या बंदीवासातील स्त्रियांना मुक्त करून त्यांना स्वपत्नीचा दर्जा देवून प्रत्येकीची व्यवस्था लावलीन कधी कधी म्हणून स्त्रीत्वाचा अपमान होऊ नाही दिला.
#@ माधवी ठाकूरदेसाई