रात्र पावसाळी

        "रात्र पावसाळी" (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ राही लिमये 
    दुपारपासुन पाऊस जोरात कोसळत होता. रस्त्यावर भराभर पाणी साठू लागले. बस, रिक्षा, लोकल सगळं बंद झालं. नेहा ला पश्चात्ताप होत होता. दुपारीच बाहेर पडायला हवं होतं पण कामामुळे तिला शक्य नव्हतं झालं. सुदैवाने अजय तिचा नवरा घरी होता त्यामुळे मुलाची काळजी नव्हती पण घरी कसं पोहचायचं हा प्रश्न आ वासुन उभा होता .ती ऑफिस मधुन बाहेर पडली. पाऊस ही थोडा कमी झाला होता. ती भराभरा चालायला लागली.पंधरा वीस मिनीटं गेली आणि पाऊस जोरात कोसळायला लागला. आता चालणं मुश्किल झालं होतं. ती एका बिल्डींग मध्ये शिरली आणि आडोशाला उभी राहिली. त्याचवेळी लाईट गेले आणि पूर्ण अंधार झाला.
           नेहा घाबरली. आता नाईलाज होता. तिने समोरच्या फ्लॅट चे दार वाजवले. एका तरुण मुलाने दार उघडलं. 'माफ करा हं. अवेळी त्रास देतेय.' 'आलं लक्षात. या आत या. अजिबात संकोच करु नका.'नेहा आत आली. त्याने खुर्ची सरकवली. नेहा संकोचुन खुर्चीवर बसली. एका तरुण मुलासमोर आपण अशा भिजलेल्या अवस्थेत तिला फार लाज वाटत होती. तेवढ्यात तो मुलगा पंजाबी ड्रेस, टाॅवेल घेऊन आला. 'बहीणीचे आहेत. समोर बाथरूम आहे. बदलून या.' 'अहो पण '.'पाऊस कधी थांबेल सांगता येत नाही. अशा कठीण प्रसंगीच एकमेकांच्या उपयोगी पडायचं असतं. नि:संकोच जा. घाबरू नका .'
         ती कपडे बदलुन आली. त्याचे वडील चहा बिस्किट घेऊन आले.त्याने ओळख करून दिली.
'मी अनिकेत. हे माझे वडील.' तिने चहा घेतला आणि जरा तरतरी आली. डोकं काम करु लागलं आणि पहिला विचार मनात आला. हे बाप लेक दोघच घरात दिसतात. बाई माणुस कोणी दिसत नाही. आपण आगीतुन वाचण्यासाठी फुफाट्यात तर नाही येऊन पडलो?ह्या दोघांनी आपल्या ला एकदम पकडलं तर आपला विरोध किती पूरा पडणार?आता तिला वाचलेल्या बलात्काराच्या बातम्या आठवु लागल्या. सिनेमातले प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागले. तिच्या छातीतली धडधड तिला ऐकु येत होती. घाबरून चालणार नाही. ती स्वतःला बजावत होती पण तसुभरही भीती कमी होत नव्हती.
         बाबा समोर येऊन बसले आणि तिच्याशी गप्पा मारु लागले. ती सावधपणे बोलत होती. तेवढ्यात अनिकेत ताटात पोळी भाजी घेऊन आला.'घ्या एवढंच आहे पण तुमची आत्ताची भुकेची वेळ भागेल. घ्या हो. घाबरू नका. अन्नाला  नाही म्हणू नये.' तिने ताट घेतलं. खरं तर तिला गरज होतीच. ती भराभरा जेऊ लागली. ठसका लागला. त्याने पाणी दिलं. ' सावकाश जेवा. घाबरू नका.'
         तिच्या मनात शंकेचा राक्षस परत थैमान घालू लागला. हा सारखा घाबरू नका का सांगतो?काय आहे ह्याच्या मनात?तिला एक आयडिया सुचली. तिने मोबाईल बाहेर काढला. मोबाईल केव्हाच बंद पडले होते पण काहीतरी नाटक करणं भाग होतं. तिने नव-याला फोन लावायचं नाटक केलं. ती कुठे थांबलीय. तिथली माणसं कशी चांगली आहेत हे सांगितलं. अनिकेत आणि बाबा हसत होते. त्यांना माहित होतं मोबाईल चालू नाहीत पण ते काही बोलले नाहीत.
        बाबा म्हणाले 'तुम्ही त्या समोरच्या खोलीत झोपा. दाराला आतुन कडी लावुन घ्या म्हणजे तुम्हाला निर्धास्त वाटेल.' हा पर्याय नेहा ला त्यातल्या त्यात सुरक्षित वाटला. ती पटकन उठुन खोलीत गेली आणि दार लावुन कडी घातली. तरी पण मनात धास्ती होतीच. झोप तर लागणार नव्हतीच पण आडवं पडायचीही भीती वाटत होती.
         दारावर टकटक झाली. नेहा दचकली. अस्वस्थ होऊन तिने विचारलं 'काय हवय?' ' पाणी  आणलय. तुम्हाला लागेल.' ' नकोय मला पाणी. तुम्ही जाऊन झोपा.' नेहा जोरात ओरडली आणि रडायला लागली. " देवा पाऊस लवकर थांबव. ही भयानक रात्र लवकर संपू दे आणि सुंदर सकाळ लवकर ऊगवु दे." आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रसंग तिच्यावर आला होता. जीवाचा थरकाप होत होता. अचानक तिच्या डोळ्यासमोर निर्भया आणि तिच्यासारख्या अनेक पिडीता फेर धरु लागल्या. तिच्या मनात आलं आपण संकटाच्या नुसत्या चाहुलीने इतक्या घाबरलोत मग त्या सगळ्यानी हा महाभयानक अत्याचार कसा सहन केला असेल?शरीरातील रक्त उलट सुलट धावतं. श्वास कुठेय शोधावा लागतो. भूतकाळ, भविष्यकाळ डोळ्यासमोर फिरायला लागतो. नेहाचे विचार उलट सुलट धावत होते. ती जीव तोडुन सकाळ उजाडायची वाट बघत होती.
           सकाळ झाली. नेहाच्या जीवातजीव आला. ती आवरून स्वतः चे कपडे घालुन बाहेर आली. अनिकेत ने चहा आणला. नेहा गप्प होती. पाऊस थांबला होता. भीती ओसरल्याचा प्रचंड थकवा जाणवत होता. तिला कधी एकदा इथुन बाहेर पडतेय असं झालं होतं. त्यांचे आभार मानायला पाहिजेत हे ही तिच्या लक्षात नव्हतं.
            बाबा म्हणाले 'नेहा आम्हाला माहितेय तूला जायची गडबड आहे. तूझी फक्त पाच मिनिटं घेतो. तूझी कालची मनस्थिती आम्ही दोघे ही पूर्णपणे जाणतो. तू खूप घाबरली होतीस म्हणुन आम्ही काही बोललो नाही कारण काल आम्ही तूला काहीही सांगितलं असतं तरी तूझा विश्वास बसला नसता.
        हा भिंतीवर लावलेला फोटो बघ. माझी मुलगी प्रिती. दोन वर्षांपूर्वी तुझ्यासारखीच तिच्यावर  वेळ आली. तिने एका घराचं दार वाजवलं.त्यानी तिला घरात घेतलं. पन्नाशीचे दोन भाऊ त्यांच्या बायका घरात होत्या. बायका आहेत म्हटल्यावर प्रिती रिलॅक्स झाली.पण रात्री दोन वाजता त्या नराधमांनी आपापल्या बेडरूमला बाहेरुन कडी घातली आणि प्रिती च्या रूममध्ये येऊन तिच्यावर बलात्कार केला. दोघांपुढे प्रिती निर्बल पडली. सकाळी ती कशीबशी घरी आली. आम्हाला सगळं सांगितलं आणि खोलीत जाऊन गळफास लावुन आत्महत्या केली.
        आम्हाला तिला काही समजाऊन सांगायची संधी मिळाली नाही. मन पवित्र असणं महत्वाचं. ज्यांनी तिचं शरीर अपवित्र केलं शिक्षा त्यांना व्हायला हवी. आपली पारंपारिक मानसिकताच अशी आहे की स्त्री चं शील महत्वाचं जीव नाही. हा नियम फक्त स्त्रीलाच पुरुषाला नाही.
        काल रात्री तू वेगळ्या मनस्थितीत जागी होतीस आणि आम्ही आमच्या मुलीच्या वेदना जगत जागे होतो.
         नेहा त्यांच्या पायाशी बसुन रडायला लागली ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत रडत होते. अनिकेत चे डोळे वहात होते. नेहा ला कळत नव्हतं तिचे अश्रू सुटकेचे आहेत का त्यांना मिळालेल्या अंतहिन दुःखाचे आहेत का आपण त्यांचे आभार मानायला पाहिजेत त्याचे आहेत.

             राही पंढरीनाथ लिमये
                 पुणे.
       
 

Post a Comment (0)
Previous Post Next Post