मातृऋण

         "मातृऋण" (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ राही पंढरीनाथ लिमये

         अनिता देवळाच्या पाय-या चढली. देवाला नमस्कार करुन प्रदक्षिणा घालताना तिचं लक्ष गेलं
बाहेरच्या कट्ट्यावर तृप्ती बसली होती कसल्या तरी विचारात गर्क. अनिता तिच्याजवळ आली. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तृप्ती दचकली 'तू होय?मी एकदम घाबरले.''एवढ्या कसल्या गहन विचारात गर्क होतीस?' 'आईचा विषय गं नेहमीचाच.गेला आठवडा गु-हाळ सुरु आहे पण सोल्युशन निघत नाही. दिवसेंदिवस आईचा आक्रस्ताळेपणा वाढत चाललाय.' 'कौन्सिलिंग करुन बघितलं का?' ' हो पण काही उपयोग झाला नाही. अनिता माझं स्पष्ट मत असं आहे जरी ती आमची सावत्र आई असली तरी तिने नेहमीच आम्हाला सख्या आईचं प्रेम दिलं. कुठे ही तक्रारी ला जागा ठेवली नाही म्हणुनच तिच्यासाठी जीव तुटतोय.' अनिता ने तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
''तुम्ही एकत्र बसुन हा प्रश्न सोडवा. तू ताबडतोब माहेरी जा.' 'हो तसच करावं लागेल.तुला सांगते.
         माझी आई गेली तेव्हा दादा पाच वर्षांचा आणि मी तीन वर्षांची होते. घरात सगळ्यांचे हाल चालले होते. आजी ला बाबां चा संसार रेटत नव्हता. आजीने बाबांना सांगितलं 'वसंता आता मला घर सांभाळणं झेपत नाही. तू दुसरं लग्न कर.' बाबा तयार झाले. वसुधा आई बनुन आमच्या घरी आली. सावत्र असुनही तिने आम्हाला भरपूर प्रेम, माया दिली. शिस्त ही लावली. कुठे ही आम्हाला आमच्या आई ची उणीव भासली नाही. आम्ही ही आमच्या प्रेमात तिला गुरफटुन टाकलं. कधीतरी एकटी असताना ती रडताना दिसायची. विचारलं की डोळ्यात कचरा गेला सांगायची.
      आम्ही मोठे झालो. शिक्षणं संपली. दादा इंजिनिअर मी आर्किटेक्ट झाले. आमची लग्न होऊन आमचे संसार सुरू झाले. आई उत्साहाने सगळ्यात भाग घेत होती. आमचे सणवार तिने साजरे केले. आठ दिवस झाले दोघांच काहीतरी बिनसलय. दादा चा मला फोन आला. अचानक काय झालं कळत नव्हतं. दादा ला बाबा बोलताना ऐकु आलं 'मी आपल्या लग्नाच्या वेळी अट घातली होती आणि ती तू आणि तुझ्या भावांनी मान्य केली होती. 'पुढे काय ते कळलं नाही. 'हे बघ तृप्ती तू आता वेळ घालवु नकोस. माहेरी जा. तू आणि दादा मिळुन आई बाबांना काय झालय ते स्पष्ट विचारा. विषय काय आहे ते समजल्याशिवाय तिथुन हलू नकोस.' तृप्ती ने दादा ला फोन लावला.
     तृप्ती माहेरी गेली. ती,आई बाबा ,दादा सगळे एकत्र बसले. ' ' आई, बाबा मी का आलेय ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आज आम्हाला उडवाउडवीची उत्तरे नकोत. असं काय आहे तुमच्या आयुष्यात ज्यामुळे तुमचा संसार विस्कटलाय. घराचं घरपण कोमेजलय आणि जे आमच्या पासुन लपवुन ठेवलं गेलय. आज सगळं समजल्याशिवाय कोणी ही इथुन हलणार नाही.' ' 'मी तुम्हाला सगळं सांगते. आता मला सगळं असह्य झालय. मी तुमच्या बाबांशी लग्न केलं तेव्हा माझा आठ वर्षांचा मुलगा माहेरी सोडुन आले.'
          वसंता वसुधा ला बघायला गेला. दोघं एकमेकांना पसंत पडले. वसुधाला आठ वर्षांचा मुलगा होता. वसंता म्हणाला 'माझी एक अट आहे
वसुधा ला मुलाला इथेच सोडून माझ्याकडे यावं लागेल. तिच्या मुलाची जबाबदारी मी घेणार नाही.
माझी दोन मुलं आहेत. वसुधा चा मुलगा तिच्या बरोबर असेल तर माझ्या मुलांकडे तिचं दुर्लक्ष होईल.' वसुधा ताडकन उभी राहिली.'हे शक्य नाही. मी माझ्या मुलाला नाही सोडणार. मी तुम्हाला खात्री देते की तुमच्या मुलांना ही मी तेवढीच माया देईन. कोणत्याही आईचा पान्हा जेवढी ती वात्सल्याची बरसात करेल तेवढा जास्तीतजास्त दाटुन येतो. विश्वास ठेवा माझ्यावर'
'नाही जमणार. माझी अट मान्य असेल तरच आपलं लग्न होईल.' वसुधा ची आई आणि भाऊ म्हणाले 'तुम्ही काही काळजी करू नका. मुलाची जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही निश्चिंत होऊन लग्न ठरवा.'
     मी नाराज होते पण माझ्या भावानी, आई वडिलांनी माझी समजुत काढली. अंकित ला ते नीट सांभाळतील. त्याची आबाळ होऊ देणार नाहीत. मी कशीबशी तयार झाले. मला वाटलं काही महिन्यांनी मी तुमच्या बाबांच मन वळवीन आणि अंकित ला आपल्या घरी घेऊन येईन. तुम्हा दोघांबरोबर तो ही माझ्या पदराखाली वाढेल.
      'अहो ऐका ना, अंकित ला आणू या इकडे. तो ही ह्या दोघांसारखाच लहान आहे. त्याला ही आईच्या प्रेमाची गरज आहे. मी तुम्हाला वचन देते तुम्हाला वाटतोय तसा दुजाभाव माझ्याकडुन होणार नाही. प्लीज ऐका माझं.' 'वसुधा रोज कटकट नकोय मला. एकदा मी जे सांगितल तेच होणार. तुझा मुलगा इकडे येणार नाही. परत हा विषय घरात काढायचा नाही.' मी तुमच्या बाबां चं मन वळवु शकले नाही. ते त्यांच्या मतावर ठाम राहीले.
          माझं मन मात्र कायम अंकितसाठी तडफडत राहीलं. मग मी माझं वात्सल्य तुम्हा दोघांवर उधळीत राहीले. कधी माहेरी जाईन तेवढाच अंकित चा सहवास मिळायचा. मी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचे. माझे डोळे सतत पाझरत रहायचे. त्याला सोडुन येताना माझा जीव तीळ तीळ तुटायचा.
      काळ पुढे जात राहीलाआणि माझा जीव आतल्या आत जळत राहीला. तुम्ही मोठे झालात. अंकित ने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मला आणखीनच अपराधी वाटायला लागलं. मामाकडे किती वर्ष रहायचं म्हणुन तो वेगळा रहायला लागला पण मी कधी मोकळेपणाने त्याच्याकडे जाऊ शकले नाही. दूर असला तरी सुखात आहे ह्यातच मी समाधान मानायची. त्याने मात्र कधीही माझ्याबद्दल मनात आकस धरला नाही.
      सगळं सुरळीत सुरु असतांनाच नियतीची दृष्टीफिरली. एक दिवस मला अंकित चा फोन आला. मी त्याच्या घरी गेले आणि माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंकित ला ब्लड कॅन्सर झालाय.त्याच्याकडे सहा आठ महिनेच आहेत. मला आता तो आहे तोपर्यंत त्याच्या बरोबर रहायचय. मी घरी आल्यावर ह्याना अंकितविषयी सगळं सांगितलं. मला वाटलं हे ऐकल्यावर तरी ह्या दगडाचं ह्रदय पाघळेल पण नाही हा दगड स्वतःच्या म्हणण्यावर अडुन राहीला आणि माझा माझ्यावरचा ताबा सुटला.मी ह्याच्या मुलांना प्रेम, माया दिली. सगळी कर्तव्य पार पाडली. आणि हा माणुस?एखादा माणुस इतका निर्दयी असू शकतो 
मी अशा माणसाबरोबर संसार केला ज्याचा ह्रदय, कोमल भावना, प्रेम ह्या गोष्टींशी दूरान्वयानेही संबंध नाही. मी अंकितकडे जाऊन रहाते म्हटलं तर त्याला ही ह्यांचा विरोध. माझं डोकं फिरलय.'
वसुधा जोरजोरात रडायला लागली.
         तृप्ती ने तिला जवळ घेतलं. 'आई तू दोन दिवस माझ्याकडे चल. शांत हो. मग बघू. आपण
काहीतरी तोडगा काढू. बाबा मी जास्त काही बोलत नाही पण तुम्ही माझे वडील आहात ह्याची मला लाज वाटते. किंबहुना तुम्हाला माणुस का म्हणायचं हाच प्रश्न मला पडलाय.'
          तृप्ती आईला घेऊन घरी आली. रात्री तृप्ती ची आणि तिच्या नव-याची आशीष ची चर्चा झाली. दुस-या दिवशी सकाळी 'आई आम्ही बाहेर जाऊन येतो. थोडा वेळ लागेल तोपर्यंत तू छान स्वयंपाक करुन ठेव.' ती दोघं अंकित ला जिथे ॲडमिट केलं होतं तिथे आली. डाॅक्टरांशी सविस्तर चर्चा करून अंकित च्या रूममध्ये गेली. अंकित त्यांच्याकडे बघत राहिला. चेह-यावर अनोळखी भाव होते. तृप्ती त्याच्याजवळ गेली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली 'अंकित दादा मी तुझी धाकटी बहीण तृप्ती. तूला आमच्या घरी घेऊन जायला आलेय.'अंकित हात सोडवुन घ्यायला लागला. 'दादा हा हात मी घट्ट धरलाय. आता कधीच सोडणार नाही. माफ कर मला तूला उशिरा भेटतेय. पण मला माहितच नव्हतं की मला आणखी एक दादा आहे.' ' तृप्ती गप्पा घरी जाऊन होतील. त्याचं सामान घे. आपण निघुया.'
'पण आपली ओळख नाही. मी कसा येणार तुमच्या बरोबर.' ' आमच्यावर विश्वास ठेव दादा. घरी गेल्यावर सगळा उलगडा होईल.'आशीष ने अंकित ला हळुच उठवलं.त्याचा आश्वासक स्पर्श अंकित ला बरच काही सांगुन गेला.
        तृप्ती ने बेल वाजवली.'आई भाकरतुकडा घेऊन ये ओवाळून टाकायला.' वसुधा गोंधळली. ती भराभरा आली. समोर अंकित ला बघुन थक्क झाली.तृप्ती ने तिला धरून अंकितजवळ नेलं. भाकरतुकडा ओवाळून टाकला. अंकित ला घरात आणलं. आशीष ने अंकित ला त्याच्या खोलीत नेऊन झोपवलं. वसुधा पाठोपाठ आली.
        'आई आजपासून अंकित आणि तू इथेच रहाणार आहात. हा आमचा दोघांचा निर्णय आहे. आम्ही अंकित चे पालक झालोत. हाॅस्पिटलच्या फाॅर्मवर सही करून त्याला इथे घेऊन आलोत. आता तू कायम अंकित बरोबर रहा. त्याचे मनसोक्त लाड कर आणि माझे पण लाड कर.'तृप्ती ने वसुधा ला मिठी मारली. वसुधा तिच्या मिठीत थरथरत होती. तृप्ती तिच्या पाठीवरूनहात फिरवत होती. आशीष ने अंकित ला हळुच झोपवलं.
        तृप्ती, आशीष मला तुमच्याशी बोलायचय. स्पष्टच बोलतो राग मानू नका. हा आजार इतका सोपा नाही. पेशंट बरोबर तो त्याच्या जवळच्या माणसांना ही पिळवटुन टाकतो. मला नाही वाटत माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास व्हावा.' ' अंकित दादा असं बोलुन आम्हाला परकं करु नकोस. तुला माहित नाही माझ्या वडिलांच्या विचित्र स्वभावामुळे तू तुझ्या आईच्या मायेला पारखा झालास. तिच्या वात्सल्याच्या पदराखालुन बाजुला झालास. आणि तो आनंद तुझ्या आईमुळे आम्हाला भरभरून मिळाला. त्याची उतराई मला कधीच होता येणार नाही. हे आईचेच संस्कार आहेत की तू आता आमच्या बरोबर रहाणार आहेस.लहानपणी तू आईच्या वात्सल्याला मुकलास ते आईचं प्रेम तूला भरभरून मिळणार आहे. राहीला प्रश्न तुझं करण्याचा तर आशीष ने दोन ब्रदर चोवीस तास तुझ्या दिमतीला ठेवलेत. शिवाय आम्ही आहोतच. आता तू आईच्या हातचे मस्त निरनिराळे पदार्थ खा आणि मजेत रहा.'
          अंकित, वसुधा चं रूटीन सुरू झालं. वसुधा सतत त्याच्याभोवती असायची. लहानपणापासून तो तिच्या मायेला मुकला होता. त्याच्यावर वात्सल्याचा किती वर्षाव करु आणि किती नको असं तिला झालं होतं. शिवाय हे सुख फार काळ आपल्या नशिबात नाही हा विचार सतत मनात घोळत असायचा. पण वसुधा कधीही  अंकित समोर रडली नाही की हा विषय काढला नाही. असह्य झालं की ती देवासमोर हात जोडून बसायची. डोळे वहात असायचे.
         तृप्ती ही वेळात वेळ काढून त्यांच्यात सामील व्हायची. तिला ही परत आईच्या सहवासाचा आनंद मिळत होता. आशीष चे ही खाण्यापिण्याचे लाड होत होते. काही वेळा तृप्ती मुद्दाम वसुधा आणि अंकित ला एकत्र रहाण्याचा अवसर देत असे. अंकित ही आता मोकळा झाला होता. तृप्ती आणि आशीष ची निर्मळ माया त्याला भावली होती. त्याच्या शेवटच्या दिवसात का होईना त्याला आईची माया मिळत होती म्हणुन तो देवाचे आभार मानत होता.
          हळूहळू अंकित थकू लागला. तो बेडवरून उठत नसे. शेवटचा अध्याय सुरु झाला हे सगळ्यांच्या लक्षात आलं.तृप्ती घरीच थांबु लागली. वसुधा च्या जीवाची घालमेल तिला बघवत नसे पण बोलणार तरी काय?तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत असे.
       सगळे अंकित च्या खोलीत जमले होते. अंकित म्हणाला 'तृप्ती तुझे आणि आशीष चे आभार कसे मानू कळत नाही. शब्दच नाहीत माझ्याकडे.' ' दादा असं बोलुन आम्हाला परकं करु नकोस.आईमुळे आम्हाला कधी अनाथपण आलं नाही. तू मात्र तुझी आई असुन आमच्या बाबांमुळे तिच्या मायेला पारखा झालास. हे आईचेच प्रेम आणि संस्कार आहेत की तू सख्या भावाइतकाच जवळचा आहेस. माझा आहेस. ही आईच्या प्रेमाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.
            आणखी एक दादा तुझ्या मनात काय आहे हे माझ्या आणि आशीषच्या लक्षात आलय. आम्ही ते आधीच ठरवलय. आई आता कायम आमच्याबरोबर राहील. ती बाबांकडे जाणार नाही. अर्थात हा निर्णय तिला मान्य असेल तरच पण आई मला ही वाटतं आता तू घुसमटत जगू नयेस.'
वसुधा चे डोळे वहात होते. अंकित चे ही डोळे भरून आले. 'तृप्ती कुठेतरी वाचलं होतं बहीण भावावर आईसारखं प्रेम करते. तू आणि आशीष माझे आई वडील झालात.
       आयुष्याचे शेवटचे दिवस खुप आनंदात चाललेत. तृप्ती तू फक्त मलाच प्रेम आणि माया नाही दिलीस तर तू आईची ही आई झालीस. आईचं मन जाणलस. ती आयुष्यभर माझ्यासाठी झुरत राहीली. माझं जाणं हे तिच्या साठी आभाळाएवढ न संपणारं दुःख आहे. तुम्ही दोघांनी जर हे पाऊल उचललं नसतं तर आईला दुःखात ही माझ्या सहवासाचं जे सुख मिळतय ते मिळालं नसतं.'
           'खरं आहे तृप्ती अंकित जे म्हणतोय ते. खरच तुम्ही दोघं आमचे पालक झालात. मी परमेश्वराला प्रार्थना करीन पुढल्या जन्मी तू आई आणि मी तुझी मुलगी होऊन तुझ्या पोटी जन्म घेईन.अंकित बाळा तू कधीच माझ्याबद्दल मनात आकस धरला नाहीस का कशाची तक्रार केली नाहीस तरीही मला तुझी क्षमा मागु दे.'वसुधा अंकित ला मिठी मारून रडु लागली.अंकित तिच्या   डोक्यावरून हात फिरवत होता. थोड्या वेळाने अंकित ने तिला बाजुला केलं. तिने त्याच्या हातावर मान टाकली. तिघांना ही धक्का बसला. अंकित, तृप्ती एकमेकांना मिठी मारून रडु लागले आशीष अवाक होऊन वसुधाकडे बघत होता. तिचा शांत चेहरा बरच काही सांगुन गेला.

         राही पंढरीनाथ लिमये
        

1 Comments

  1. फारच रडवले तुम्ही

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post