निर्णय (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ नीता देशपांडे
पहाट झाली. चिमण्या उठल्या. मावळती पाठ फिरवू लागली. आकाशात रंगांची उधळण सुरु झाली.फटफटायला लागलं.
आंबेगाव, शे दीडशे वस्तीचे खेडेगाव. आंबेगावच्या शांतीआजीचीआज पहाटेच जरा लवकर लगबग सुरु झाली.त्याचे कारण पण तसेच होते. तिची मुलगी वसुधा आणि नातू चिन्मय आज येणार होते.पहाटेच अंगणात तिने सडा टाकला. ओसरी शेणाने सारवली. माजघर आणि स्वयंपाक घरात फरशी बसवली होती. चुलीच्या जागी गॅस आला होता. आजीची सून वनिता आणि मुलगा अप्पा सुद्धा गडबडीत होते. त्यांचा तरणा बांड मुलगा अमोल मात्र स्वतःची छबी सारखी आरशात पहात होता. उन्हापाण्यात वावरलेल्या चेहेऱ्यावर पावडर फासत होता.जसजशी ते येण्याची वेळ जवळ येत होती, तशी त्याची उत्सुकता वाढत होती.त्याच्या एकुलत्या एक लाडक्या आत्याची वाट पहाट होता.
शेवटी प्रतीक्षेची घडी संपली. एक लांबसडक 'मोटार' धुरळा उडवत आली. शांतिआजीच्या घरासमोर उभी राहिली.अजून शहराचा गंध नसलेली किंवा थोडीफार माहिती असलेली अशी सर्व छोटी मोठी मंडळी गाडीभोवती गोळा झाली होती. वृद्ध लोकांच्या डोळ्यात माहेरवाशिणीबद्दलचे प्रेम दिसत होते, तशीच चिन्मय वरची माया. तरुणांना तो आता कसा दिसत असेल त्याबद्दल उत्सुकता, आणि बच्चे कंपनीला हे सगळे नवीन होते. हळूच गाडीला हात लावून बघत होते.
चिन्मय बऱ्याच वर्षांनी गावाकडे गेला होता. लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जायचा.अमोल आणि तो जवळपास एकाच वयाचे. त्यामुळे त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. मामाचा तो चांगलाच लाडोबा. दिवसभर उनाडक्या करायचे दोघे. ट्रॅक्टरवरून मामाबरोबर शेतात जायचं. तिथे झाडावर चढणे, बोरचे पाणी काढणे, नांगरणी, भांगलणी, तोडणी कशी असते ते आवडीने पहाणे,असा त्याचा दरवर्षीचा उद्योग असायचा. रोज संध्याकाळी गाईचे दूध काढल्यानंतर सर्वांना मोठ्या पितळेच्या पेल्यातून ते ताजे, निरसे, फेसाळलेले दूध देणे हे मामीचे काम असायचे. नाही म्हणायची हिम्मत नव्हती.घरच्या गोठ्यात गाई म्हशीची खेळणे. हा आवडता छंद. एकदा दूध काढायचे मनात आले आणि गाईच्या कासेला हात लावून ओढायला लागला. तसें गाईने जोरात लाथ मारली. हा चपळाईने मागे झाला. नाहीतर जोरदार मार बसला असता. त्या आठवणीने अजूनही त्याला खूप चिडवतात.
या महिनाभरात खूप सारी एनर्जी घेऊन तो पुण्यात परतायचा.
पण दहावी नंतर त्याचे जाणे झाले नाही. नंतर तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. काही दिवसांसाठी तो भारतात आला . आणि आज एका आठवड्यासाठी या सर्वांना भेटायला आंबेगावात आला . गाडीतून दोघे उतरले.त्या उंचपुऱ्या, तरण्याबांड, तांबूस गोऱ्या चिन्मयला पाहून जमलेली जनता अवाक झाली. शांती आजीने दोघांना जवळ घेतले. आनंदाश्रुच्या भावनांचा पूर लोटला. दोघांनी आजीला वाकून नमस्कार केला. चिन्मय मामाला नमस्कार करण्यासाठी वाकला तसा मामाचा बांध कोसळला. त्याला मिठीत घेतले. अमोल आत्याजवळ गेला. तिचीही अवस्था तीच झाली. शेवटी मामी आली. दोघांना दाराबाहेर उभे केले. भाकरतुकडा दोघांवरून ओवाळून टाकला. पायावर पाणी घातले आणि दोघांना घरात घेतले. गर्दीपण पांगली.अमोलला अजून हवा तसा मोकळेपणा वाटत नव्हता. आपला हा बालमित्र आता कसा वागेल याची, कल्पना येत नव्हती. "काय रे अमोल्या, कसा आहेस? बाकी तब्येतीवरून झकासच दिसतोयस."अमोल आता सैलावला."अरे मी तर मस्तच आहे. तू कसा आहेस. बाकी अगदीच काडी पैलवान झालाय चिन्या तू"." हो रे तिथे कुठे पेल्यातून दूध मिळणार. मग असाच राहणार "असे म्हणून दोघे स्थिरावले.
आजीशी तिच्या तब्येतीविषयी बोलला.याही वयात तिची लगबग पाहून तिला मानले.त्याने आता मोर्चा मामीकडे वळवला,"मामी तुझ्या हातचा गावाकडचा सगळा मेवा खायचा आहे. तसा झणझणीत, बेत रोज मला करून घाल. मिळमिळीत खाऊन कंटाळलो "."बरं बाळा तसेच करूया,"असे म्हणून ती आत गेली. "मामा आणि अमोल्या मी रोज तुमच्या बरोबर शेतात येणार. आपल्या पूर्वीच्या मित्रांकडे पण जाऊ आपण ".ते दोघेही यासाठी तयारच होते. मग काय. रोजच ते दिवसभर नुसते उंडारायचे. आज या मित्राकडे तर उद्या दुसऱ्या. मामा मामी त्यांच्या सरबराईत. आणि मायलेकीचे गुळपीठ चालायचे.
आजी आणि मामी त्यांच्या बरोबर देण्यासाठी रोज काहीतरी वानवळा काढून ठेवायच्या. कोठीची खोली भरत आली. असे दिवस चालले. जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला. आता अगदी दोन दिवस राहिले. सगळ्यांच्या मनाला हुरहूर वाटायला लागली.
आज चिन्मय आणि अमोल त्यांच्या एका मित्राकडे जाणार होते. तो मित्र गावात रहात नव्हता. 50-60 किलोमीटर लांब होते त्याचे घर. त्यामुळे सकाळी लवकर निघून संध्याकाळी येणार होते दोघे. चिन्मयला भेटून त्या मित्राच्या आई वडिलांना पण खूप आनंद झाला. सगळ्या पूर्वीच्या गोष्टी आठवल्या. खूप छान मूड घेऊन घरी येण्यास त्यांना रात्र झाली.
गाव जसजसे जवळ येऊ लागले, तसे अमोलला काहीतरी वेगळे वाटू लागले. तो चिन्मयला म्हणाला,"काहीतरी वेगळे वाटतंय गड्या, बेचैन वाटतंय."चिन्मयला काहीच कळले नाही. तो शांत बसून राहिला.बाईकचा वेग वाढवून तडक घराकडे आला. चिन्मयची मामी वाटच पहात होती. दोघांना पाणी दिले. अमोलने कसेतरी पाणी पिऊन विचारले,"आई काय झालंय ?""मी काय सांगते आहे ते अगदी शांतपणे ऐकून घे.अरे खालच्या आळीतला तुझा परम मित्र शौर्य आज सकाळी सीमेवर शहीद झाला. उद्या सकाळी त्याला आणणार आहेत. तुझे बाबा आणि आजी तिकडेच गेले आहेत. ". हे ऐकताच अमोल तसाच धावत गेला. त्याच्या मागे चिन्मय. चिन्मयपण त्याला चांगलाच ओळखत होता. सगळं गाव लोटलं होतं. त्या रात्री गावात चूल पेटली नाही. गावाचा सुपुत्र होता शौर्य.
शौर्यचे लग्न होऊन दीड वर्ष झाले होते. त्याला चार महिन्याची गोड मुलगी होती. त्याची आई कमला बाई आणि पत्नी भारती यांच्या डोळ्यातून पाणी खळत नव्हते.छोटी ईशा काकूजवळ होती.गावात सन्नाटा पसरला होता.एक भयानक भीषण शांतता.कोणी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. फक्त वाट पाहणे एवढेच सर्वांच्या हातात होते. खूप रात्र झाली तसे बरेच लोक घरी परतले. शांती आजी आणि चिन्मय घरी आले. मामा आणि अमोल तेथेच थांबले.त्या दिवशीची रात्र संपता संपत नव्हती.चंद्राला सुद्धा मावळायचे नव्हते, सूर्याला उगवायचे नव्हते.
आजची सकाळ काही चांगली नव्हती. गावातल्या सगळ्यांची कामे कृत्रिम रित्या चालली होती. कोणाचेच कामात लक्ष नव्हते. साधारण अकरा वाजता शौर्यचे पार्थिव विमानाने येणार असे कळले. दहा वाजताच सगळा गावं त्याच्या घरी जमला. चिन्मयचा अप्पामामा आणि इतर काहीजण मनावर दगड ठेऊन पुढील तयारीला लागले होते. आता कधीही तो नकोसा क्षण येणार होता.
आणि....... वर आकाशात घरघर वाजू लागली. हेलिकॉप्टर दिसायला लागले. क्षणभर गावकऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला.हेलिकॉप्टर अलगद सपाट जमिनीवर उतरले. प्रथम मुख्यमंत्री उतरले. त्यानंतर चार सैनिक शवपेटी घेऊन उतरले. गावाचे सरपंच मुख्यमंत्र्यांना भेटले, आणि ते सगळे शौर्यच्या घराकडे निघाले.मुख्यमंत्र्यांनी शौर्याच्या आईची, पत्नीची विचारपूस केली, त्यांचे सांत्वन केले, धीर दिला.शवपेटीतून शौर्यचे कलेवर बाहेर काढण्यात आले आणि एकच आक्रोश आसमंतात घुमला.शौर्यच्या आई धावतच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवून म्हणाल्या, "किती गुणांचा माझा बाळ. नावाप्रमाणे जगलास रे माझ्या राजा. खूप त्रास झाला का रे बाळा तुला? मला खूप अभिमान वाटतो बघ तुझा.
आता माझी,भारतीची आणि ईशाची अजिबात काळजी करू नकोस. सगळा गावं आहे आपला आमच्याकडे बघायला." भारती पण शौर्यजवळ बसून मूक रुदन करत होती. सैनिकांनी तीन तोफांची सलामी दिली. राष्ट्रगीत वाजवले गेले. आणि आदरपूर्वक शौर्यचा देह गावाच्या ताब्यात दिला. इतका वेळ देहभान हरपून हा सोहळा.... हो सोहळाच गावकरी पहात होते, आपल्या सुपुत्राचा एवढा मान याची देही याची डोळा पहात होते.आता त्याच्या शेवटच्या प्रवासाची तयारी करायची होती.गाडी सजविण्यात आली. केळीचे खुंट बांधण्यात आले.अतिशय सन्मान पूर्वक त्याचा अंत्यविधी करण्यात आला.
हळूहळू सगळे घराकडे परतले. अगदी जवळचे नातेवाईक फक्त थांबले होते. चिन्मय हे सगळे प्रसंग पहात होता. या प्रसंगानंतर चिन्मय एकदम अबोल झाला. कोणाशीच बोलेना. उद्या बोलेल. आज जरा मन अस्थिर असेल. असे वाटून कोणी फार त्याच्याशी बोलले नाही. पण रात्रभर तो झोपला नाही. आणि सकाळी पण तो कोणाशीच बोलला नाही. आणि आजारी पडला. तेव्हा मात्र डॉक्टरांना बोलावले. "त्याच्या मनाला हा प्रसंग फार लागला आहे. थोडी ट्रीटमेंटची गरज आहे, त्याला पुण्याला त्याच्या घरी नेले तर उत्तम."असे त्यांनी सांगितले. एक इंजेक्शन देऊन त्याला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले.आजचा दिवस थांबून उद्या सकाळी निघायचे असे ठरले.इंजेक्शनचा परिणाम म्हणून त्याला थोडी झोप लागली. नंतर तो बऱ्यापैकी ताजातवाना झाला. सगळ्यांची काळजी जरा कमी झाली. चिन्मय आणि अमोल शौर्यच्या आठवणीत रमले. शौर्य कसा सैन्यात गेला, ते चिन्मयला सांगितले. अश्या गप्पा मारल्यामुळे चिन्मय तसेच अमोलच्या सुद्धा मनावरील ताण थोडा हलका झाला.
उद्याच निघायचे नक्की झाल्यामुळे आजीची आणि वनितामामीची चांगलीच धावपळ झाली. कोठीच्या खोलीतील तो वानवळा पाहून चिन्मय म्हणाला, "आजी हे सगळं न्यायचे आहे का?तसे असेल तर मला आणि आईला वर टपावर बसावे लागेल. कमी कर काहीतरी."त्याच्या पाठीत धपाटा घालून आजी म्हणाली."बरोबर बसवते बघ मी. तू नको काळजी करू." वसुधा म्हणाली, "गाडीवरून बरे आठवले, चिन्मय, अरे पुण्याहून ड्रायव्हर बोलवायचा का? तुला ड्राईव्ह करण्याची ताकद आहे का?"चिन्मय म्हणाला "मी आता ठीक आहे.काही प्रॉब्लेम नाही."रात्री सगळे बराच वेळ गप्पा मारत बसले.
सकाळी अंमळ थोडी उशिराच जाग आली. वसुधा चिन्मयला उठवायला आली. तो जागाच होता. आईला म्हणाला,"आई बसतेस का थोडा वेळ. मला बोलायचं तुझ्याशी.""का रे बरे वाटत नाहीये का?"तिने काळजीने विचारले."नाही आई मी बरा आहे. पण मी एक मोठा निर्णय घेतो आहे. मी अमेरिकेला जाणार नाही. इथेच भारतात राहून तन, मन आणि धनाने समाजाची जास्तीत जास्त सेवा करण्याचे ठरवले आहे. शौर्यचा चेहरा डोळ्यासमोरून हालत नाहीये . खूप अस्वस्थ वाटत आहे. काल रात्री मी बाबांशी बोललो. त्यांना आवडला माझा निर्णय. तुला काय वाटते?" वसुधाच्या डोळ्यात पाणी आले. त्याला जवळ घेतले. ती काहीच बोलू शकली नाही.तिची मूक संमती त्याच्यासाठी खूप बोलकी होती. चिन्मयचा हा निर्णय तिने सगळ्यांना सांगितलं. मामा आणि अमोल नाचायलाच लागले. आजीने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोटे मोडली. मामीने शाबासकी दिली. निघायची वेळ झाली., तशी चिन्मय अमोलला घेऊन शौर्यच्या घरी आला. त्याच्या आई आणि पत्नीचा निरोप घेतला. छोटीची गोड पापी घेतली. शौर्यच्या फोटोला वाकून नमस्कार केला.
फोटोतील हाराच्या मागून शौर्य हसल्याचा भास झाला.