स्वप्नपूर्ती

 

                      *स्वप्नपूर्ती* (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️स्मिता मुंगळे


     दिवसभर गप्पा आणि हास्य विनोदाने दणाणून गेलेलं घर रात्री बारानंतर शांत झालं.लहान मुलाने दिवसभर खेळून दमून झोपावं तसं सगळी मंडळी निद्रादेवीच्या अधीन झाली.त्यानंतर मात्र मीराने स्वयंपाकघरात जाऊन विरजण लावलं,दुसऱ्या दिवशी नाश्त्याला करायच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजवला.

खिचडी म्हणजे आभाची,तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीची एकदम फेवरीट आणि आता आभा दोन दिवसांनी  लग्न होऊन सासरी जाणार म्हणून तिच्या आवडीचे पदार्थ किती करू अन किती नको असे मीराला झाले होते.

      स्वयंपाकघरातील झाकपाक करून ती तिच्या खोलीत झोपायला जाता जाता सहज म्हणून आभाच्या रूममध्ये डोकावली.झोपलेल्या आभाचा निरागस चेहरा बघून मीराला अगदी भरून आलं.तिने थोडं पुढे जाऊन पाहिलं तर आभा तिच्या लहानपणीचा फोटोंचा अल्बम जवळ घेऊन झोपली होती,ज्यात तिचे आत्तापर्यंतचे आई बाबांसोबत काढलेले अनेक ट्रीपचे फोटो सुंदर आठवणींच्या रुपात होते.खोलीत तिथेच कोपऱ्यात आभाच्या तीन चार मोठमोठ्या बॅग भरून ठेवलेल्या होत्या.त्या बघून तर त्या बॅग्जही जड नसतील एवढं आभाचे मन जड झाले. तिला वाटलं,आभा बॅग्जमधून सगळं सामान घेऊन सासरी जाईल तशीच इथल्या सगळ्या सुंदर आठवणीही घेऊन जाईल.ती लहान असल्यापासून हे एकच तर स्वप्न आपण पहात आलो होतो.जे सुख आपल्याला मिळालं नाही आणि आपण आयुष्यभर जो सल मनात ठेवून जगतो आहोत ते आपल्या लेकीच्या वाट्याला नको एवढंच तर आपल्याला हवं होतं.म्हणूनच तर आभाने तन्मयविषयी घरात सांगितल्यावर फारसा विरोध न करता आपण तिला लग्नाला परवानगी दिली होती.त्यावेळी प्रसादने देखील आपल्या निर्णयाचे स्वागतच केले.खरेतर एक बाप म्हणून त्यालाही आभाची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. म्हणूनच आजही तिला तीस वर्षांपूर्वी प्रसादबरोबर लग्न करण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य होता हे जाणवले.

    

  मीरा झोपायला गेली खरी पण काही केल्या तिला झोप येईना.आभाच्या लग्नामुळे सगळा भूतकाळ पुन्हा जागा झाला.सगळ्या घटना डोळ्यासमोर फेर धरू लागल्या.तिच्या कूस बदलण्याने प्रसादला जाग आली.तिच्या मनातील भाव ओळखून त्याने फक्त तिला जवळ घेतले.मीराला वाटले,किती ओळखतो आपण एकमेकांना. यालाच वेवलेंथ जुळणे म्हणत असतील का?"झोप आता शांत",प्रसाद म्हणाला.तशी ती त्याला म्हणाली,"अवघड आहे रे झोप येणं. शांत,स्थिर पाण्यावर दगड मारल्यावर जसे पाण्यावर तरंग उठतात तसं झालं बघ आभाच्या भरलेल्या बॅग्ज बघून.तिच्याबरोबर मीदेखील किती तयारी केली बॅग पॅक करताना.काही विसरू नये यासाठी आठवणीने सगळं आणलं."

        भावनाविवश झाल्यामुळे तिला पुढे बोलता येईना."प्रसाद,माझ्याही आईने अशीच सगळी तयारी केली होती रे माझ्या लग्नासाठी.किती कायकाय स्वप्न पाहिली होती तिने.मी मात्र तिची सगळी स्वप्न धुळीला मिळवली.पण माझाही नाईलाज होता रे.तो एक क्षण मी स्वार्थी झाले.मला आई अण्णांच्या स्वप्नांपेक्षा माझी स्वप्न पूर्ण करणं जास्त महत्वाचं वाटलं."

      प्रसादने तिला अजिबात बोलू नकोस,शांत झोप,सकाळी लवकर उठायचे आहे अशी प्रेमळ धमकी दिल्यावर ती गप्प झाली पण मनात विचारांची अन आठवणींच्या वादळानी फेर धरला होता. तीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटना अगदी आत्ता घडल्यासारख्या डोळ्यासमोर तरळू लागल्या.

      मीराचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला स्थळं येऊ लागली.दिसायला छान,सुशिक्षित,वडील 'आदर्श शिक्षक',आणि काय हवं?पाहताक्षणी मीरा पसंत पडत असे.पण काही ना काही कारण काढून मीरा आलेल्या स्थळांना नकार देई.ही गोष्ट तिच्या आई अण्णांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. याविषयी विचारल्यावर मग मीराने घरात प्रसादविषयी सांगितले.

    

  रुबाबदार व्यक्तिमत्त्व असणारा,हुशार प्रसाद कोणालाही  आवडेल असाच होता.पण त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती.त्याच्यावर धाकट्या भावंडांची जबाबदारी असल्याने ती इतक्यात लग्न करायला तयार नव्हता तर आपल्या लेकीसाठी हा मुलगा अण्णांना योग्य वाटत नव्हता.मीराला मात्र प्रसाद त्याच्या हुशारीवर यश मिळवले आणि लवकरच परिस्थिती बदलेल याची खात्री होती. तिने तसे अण्णांना बोलूनही दाखवले पण ते समजून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हते.त्यांना आपल्या लेकीला सुखात ठेवेल असा मुलगा जावई म्हणून हवा होता.

      मीराने आईलाही खूप सांगून पाहिले.प्रसादबरोबर मी नक्की सुखी राहीन,माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, असे ती परोपरीने विनवून सांगत होती पण काही उपयोग झाला नाही.आई तिला म्हणाली,"प्रेम वगैरे मी समजू शकते मीरा.पण आम्ही दोघांनीही तुझ्यासाठी काही स्वप्न पाहिली आहेत. मला तुझ्या भावना समजतात ग पण तुझ्या अण्णांपुढे मी नाही बोलू शकणार आणि ते जे काही ठरवतील ते तुझ्या भल्यासाठीच असेल.आता यापुढे प्रसादाचा विषय तू डोक्यातून काढून टाकलेलाच बरे."एवढं बोलून आईने  मीराने प्रसादबरोबर लग्न करू नये हेच कसे योग्य असेल याविषयी खूप ऐकवले आणि आता आम्ही सांगू त्या मुलाबरोबर तुला लग्न करावे लागेल हे देखील सांगितले.

      मीराने विचार केला,दुसऱ्या मुलाशी लग्न केले तर प्रसादला कायमचे गमावून बसू.पण जर का आई अण्णांच्या मनाविरुद्ध जाऊन प्रसादशी लग्न केले तर नंतर प्रसादचे आयुष्यातील यश,स्थिरस्थावर होणं बघून अण्णांचा राग जाईल आणि ते प्रसादला जावई म्हणून स्वीकारतील.तिने प्रसादला सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न करण्याची तयारी दाखवली.खरे तर प्रसादला अगदी वाजतगाजत मीराला आपल्या घरी सन्मानपूर्वक न्यायचे होते पण परिस्थिती अशी होती की त्याला नाईलाजाने मीराबरोबर पळून जाऊन लग्न करावे लागले.तेव्हा आई अण्णांच्या नकळत अंगावरच्या कपड्यानिशी मीरा घराबाहेर पडली.आजही तिला अगदी स्पष्ट आठवत होते की आईने कितीतरी वस्तू हौसेने मीराच्या लग्नात तिला देण्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या.

      आज आभा सासरी जाताना भरलेल्या बॅग्ज पाहून तिला खूप काही दिल्याचे जे समाधान आपल्याला होतेय तो आनंद,ते समाधान आपण आपल्या आईला नाही देऊ शकलो याची खंत मनात आहे ती अजूनही कमी झाली नाही. 

      प्रसादने पुढे नवीन व्यवसाय सुरू केलंस व त्या व्यवसायात त्याने खूप प्रगती केली.त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली.समाजात प्रतिष्ठा मिळाली तरी आई अण्णांचा आपल्यावरचा राग कमी झाला नाही. आपलं माहेर कायमचे दुरावले.मात्र आपण तेव्हाच ठरवले,आभाच्या बाबतीत ही चूक आपण करायची नाही. आणि म्हणूनच आभाने जेव्हा तिला तन्मय आवडतो आणि त्या दोघांना लग्न करायचे आहे हे घरात सांगितले तेव्हा तन्मयच्या घरी ती आणि प्रसाद स्वतः जाऊन सगळी चौकशी करून त्यांनी आनंदाने या लग्नाला मनापासून परवानगी दिली होती. मात्र या लग्नामुळे तिला वेळोवेळी आई अण्णांची आठवण येत होती.

    आज ती त्यांच्या जागी होती पण काळ बराच पुढे गेल्याने परिस्थिती बदलली होती.मुलीला समजून घेतल्याचे,तिच्या भावनांचा विचार केल्याचे समाधान मात्र मीराला आज नक्की होते.

     विचारांच्या गर्तेत झोप कधी लागली हे मीराला कळाले नाही.सकाळी जरा उशिरानेच जाग आली तीच हॉलमध्ये सुरू असलेल्या हसण्याच्या आणि चेष्टा मस्करीच्या,गप्पांच्या आवाजाने.रात्रीच्या विचारांची मरगळ झटकून मीरा आनंदाने नविन दिवसाला सामोरी जायला तयार होऊन हॉलमध्ये आली खरी पण समोरचे दृष्य बघून आपण नक्की स्वप्नात आहोत की जागे आहोत हेच तिला कळेना.ती अवाक होऊन फक्त पहात राहिली.हॉलमध्ये सोफ्यावर तिचे आई आण्णा बसले होते.आभा आजीच्या कुशीत शिरली होती तर जवळच खुर्चीवर बसून प्रसाद अण्णांशी गप्पा मारत होता.हे चित्र बघण्यासाठी ती केव्हापासून आसुसली होती आणि आज अचानक?

      ती जागच्या जागी खिळून हे चित्र डोळ्यात साठवू पहात होती.पण डोळ्यातील पाण्यामुळे सगळं धूसर दिसत होतं.

    तिला पाहून आई अण्णांना देखील भावनांना बांध घालणे खूप अवघड झाले.काही क्षणात ती आईच्या कुशीत विसावली.मधली तीस वर्षे जणू दोघींच्या अश्रूंमधून वाहून गेली.अण्णांनी तिला प्रेमाने जवळ घेतले. त्यांचा स्पर्श तिला ते तिच्यावरचा राग विसरले आहेत हे सांगत होता. न बोलताच डोळे सर्व काही सांगून जात होते.

    शेवटी प्रसाद मीराला फक्त एवढंच म्हणाला,"कसं वाटलं सरप्राईज?आभाचं लग्न ठरल्यापासून तुझ्या मनाची घालमेल मी बघत होतो.तेव्हांच ठरवलं की काहीही करून तुझ्या आई अण्णांना आभाच्या लग्नावेळी आपल्या घरी आणायचं.ते सुद्धा सगळं विसरून नातीच्या लग्नासाठी लेकीकडे यायला तयार झाले."

      नंतर तो अण्णांना हात जोडून म्हणाला,"खरंच तुमचे आभार कसे मानू हे कळत नाहीये.तुम्ही आमच्यावर नाराज असल्याने सगळं काही असूनही मीरा दुःखी असायची.पण आज तुमच्या येण्याने ती खूप आनंदी आणि समाधानी आहे."

     लटकेच रागावत आणि डोळे मिचकावत आण्णा म्हणाले,"मी केवळ माझ्या नातीच्या लग्नासाठी इथे आलोय,तुम्हाला माफ केलंय असं समजू नका ह."

      अण्णांच्या या बोलण्याने संपूर्ण घर हास्याच्या कारंजात न्हाऊन निघाले.

    "आणि काय हवं? आज माझे स्वप्न पूर्ण झाले"हेच भाव प्रसादला त्यावेळी मीराच्या डोळ्यात दिसले.

     

                             सौ.स्मिता मुंगळे.

                   

     

Post a Comment (0)
Previous Post Next Post