जाणीव

     'जाणीव '  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ सीमा पांडे

      पद्मनाभ आणि नारायणी यांचे लग्न होऊन चार महिने उत्साहात आणि आनंदात कसे चुटकी सरशी निघून गेले, हे कळले देखील नाही .सासू सासऱ्यांचं अलोट  प्रेम  आणि     पद्मनाभचा समजूतदारपणा यामुळे आपण नवीन घरात साखरेसारखे कधी विरघळून गेलो, हे नारायणीला समजले देखील नाही .एकुलती एक लाडाची लेक, म्हणून आई-बाबांची ती जशी लाडकी होती ,तशी सासरी देखील एकुलती एक सून म्हणून सासू-सासर्‍यांची आवडती होती .

    लग्नानंतर राघव आणि मिथिलेला बारा वर्षांनी पद्मनाभ नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले . त्यामुळे ते दोघेही त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत .

अत्यंत लाडका पण लाडाने वाया गेलेला, असं त्याला मुळीच म्हणता येणार नाही !

आई-वडिलांचा थोरामोठ्यांचा शब्द तो कधीच खाली पडू देत नसे .

प्रत्येकाची मर्जी राखणे आणि प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करणे हा त्याचा स्थायीभाव ! 

        राघव आणि मिथिलेची सून नारायणी देखील अतिशय लाघवी आणि सुस्वभावी . त्यामुळे या लक्ष्मीनारायणाच्या जोड्याचे किती कोड कौतुक करावे ,हे नारायणीच्या सासू सासऱ्यांना सुचत नसे . तिचे सासू-सासरे अत्यंत हौशी ! सासरे प्रथितयश वकील तर सासुबाई आर्टिस्ट होत्या .तिचे घर म्हणजे एखादे देखणे शिल्पच ! 

मिथिला ताईंची कला साध्या साध्या गोष्टीतून दिसून येत असे .राघव रावांनी वयोमानाने दगदग झेपत नाही म्हणून, वकिलीचा वारसा पद्मनाभकडे सोपविला .

ते फक्त त्याला अडीअडचणीत मार्गदर्शन करत असत .नारायणी M.A. English झाली असल्याने, एका कोचिंग क्लास मध्ये शिकवायला जात असे .अधून मधून पद्मनाभला ड्राफ्टिंगला मदत करत असे .

        बघता बघता चातुर्मास सुरू झाला आणि आषाढ सरींनी सणांचा सांगावा धाडला . गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी झाली . गुरुपौर्णिमेपासून सणांची नांदी सुरू झाली . अतिशय हौशी आणि कष्टाळू नारायणी मध्येच नाराज दिसत असे .

हे पद्मनाभच्या लक्षात आले नसले तरी चाणाक्ष मिथिला ताईंच्या नजरेतून सुटले नाही.

त्या म्हणाल्या, " नारायणी माझ्या लक्षात येतंय की सणावारांवर चर्चा सुरू झाली की तू नाराज होतेस, असे का  गं? " 

" नाही आई, असं काही नाही . तुमच्यासारखे मातृ-पितृतुल्य.  सासू - सासरे मला भाग्याने मिळाले, मग मी का नाराज राहणार ?   मध्येच आई-बाबांची आठवण येते इतकचं . "

" अगं मग आता पहिली मंगळागौर जवळच आलीये .छान आठ दिवसांसाठी माहेरी जाऊन ये . तुझ्या आईचा आमंत्रणाचा फोन आला आहेच .मी तुझ्या बाबांना संध्याकाळी तुला घ्यायला बोलावले आहे .आता हस बघू,खुश ना ? "

" नाही आई ,आपण सगळेच सोमवारी जाऊया माझ्या माहेरी . तसं मी आईला फोन करून कळवते . "

" अजिबात नाही . तू आज बाबांसोबत जा . मस्त आई-बाबांच्या सहवासात दिवस घालव, आम्ही तिघे सोमवारी संध्याकाळी येऊ . "

                        नारायणीची पहिली मंगळागौर माहेरी आणि शेवटची मंगळागौर सासरी धुमधडाक्यात साजरी झाली . सासुबाईंनी संपूर्ण चाफा, गुलाब आणि तगरीच्या फुलांची सुंदर आरास करून महादेवाच्या मंदिराचा सुरेख देखावा तयार केला . नारायणीची आई सगळं बघून थक्क झाली !

" मिथिला ताई , किती सुंदर कला आहे हो, तुमच्या हातात! मला तर बाई असलं काहीच जमत नाही . "

" अहो, पण तुम्ही किती सुगरण आहात .

तुमच्या हातच्या करंज्या खाण्याआधी बघतच राहाव्याशा वाटतात . " 

" चला, तुमचं आपलं काहीतरीच ! मला तर गौरी -गणपतीची तयारी करण्याचं जाम टेन्शन आलंय . इतके दिवस बरीचशी काम, नारायणी सांभाळून घ्यायची . "

" एवढंच ना अहो आमच्याकडे, माझ्या पुतण्याकडे म्हणजे चुलत चुलत घरी    गौरी- गणपती असतात . तो आता अमेरिकेत स्थायिक झाला . पण तरीही सगळे मिळून उत्साहाने  गौरी - गणपतीचा सण साजरा करतात हो !  आठ दिवस आधीपासून, मी तुमच्याकडे नारायणीला मदतीला पाठवेन . काळजी करू नका !

  दोन दिवस आधी आम्ही तिघेही येऊ गौरीची आरास करायला आणि इतर कामात मदत करायला .

आता मला नारायणीच्या नाराजीचे कारण समजले . तिला हया  गौरी - गणपतीच्या सणाच्या तयारीचे टेन्शन होते तर ?"

" हो , आई पण तुम्हाला कसं सांगावं तेच कळेना . " 

             गौरी -गणपतीचा हा पायंडा नेहमीसाठी पडला . नारायणी आधी जाऊन आई - बाबांना मदत करत असे आणि तिचा छोटासा नीरज, आजी -आजोबा आणि बाबा सांभाळत असतं .

आणि नवरात्रात नारायणीचे आई-बाबा नारायणीकडे  येत असतं आणि मिळून मिसळून सण साजरे करत असत .

              ज्यावेळी नारायणीचे आई-बाबा खूप थकले . त्यांच्या कडून काहीच होईना तेव्हा मोठ्या मनाने, मिथिला ताईंनी, त्या थकल्या असताना देखील राघव रावांना आणि पद्मनाभ ला सांगून स्वतःकडे           गौरी -गणपती साजरे करण्यास सुरुवात केली आणि विहीण - व्याहयांना देखील स्वतःच्याच बंगल्यात कायमचे रहायला बोलावून घेतले आणि नारायणीच्या माहेरी पद्मनाभने स्वत : चे ऑफिस थाटले .

तेव्हा  नारायणी म्हणाली, " आई दुसऱ्यांच्या सुखदुःखाची, मनाची जाणीव कशी ठेवावी , हे तुमच्याकडून शिकावं . " 

तिचे आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे सासुबाईंनी हलक्या हाताने पुसले , आणि म्हणाल्या, '' यालाच म्हणतात, एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ . " 

लेखिका : सौ . सीमा संजय पांडे 

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post