हृदयस्थ

हृदयस्थ (अक्षरचाफा कथा स्पर्धा)


अपर्णा देशपांडे



             आपल्या नेहमीच्या खुर्चीतून सुधाताई उठल्या तशी एक तीव्र कळ पार मणका छेदत आरपार गेली . एक उसासा टाकून त्यांनी टेबलाचा आधार घेतला , आणि ' राऊंड ' मारण्यासाठी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या . आपलीही साठी उलटली , मग इतके वर्ष  आनंदात उपभोगलेल्या  जगण्याचे व्याज तर द्यावेच लागेल न ,   देहाचे भोग कुणाला चुकलेत म्हणत त्यांनी कुरकुरणाऱ्या गुढग्यांकडे दुर्लक्ष केले .

नुकताच पाऊस पडून गेल्याने आज बागेत पाणी घालण्याचे काम वाचले म्हणून शंकर जरा निवांत होता .

" शंकर ,  रेवती ला विचार ...बारा नंबर च्या आजोबांचे ह्या महिन्याचे औषध आले का बघ म्हणावं ."

" त्यांचे  तर  अजून पैसेच नाही आले ...वीस तारीख उलटून गेली . मागच्या महीन्याचेच तर नाही आले अजून ! "

" तुला कसं माहीत ?"

"काल रेवती ताई म्हणत होत्या , की खोली बारा आणि चार चे दोन महिन्यांचे पैसे बाकी आहेत ."

ह्या रेवतीला न , कळतच नाही कुठे काय बोलावं ते . शंकर जवळ हे बोलायची गरज नव्हती . त्यांनी पाचशे चे व्हाउचर सही करून शंकर जवळ दिले , आणि पैसे देण्यासाठी रेवतीला फोन लावला .

  " काय म्हणताय साखरे काका ?  हातांची थरथर कमी झालीय न आता ? मग आज एक चक्कर मारलीत की नाही ? बाग बघा किती सुरेख फुललीय ." आठ नंबर च्या खोलीत आजोबांशी बोलत त्यांनी खिडकी वरील पडदा बाजूला सारला .

आजोबांकडून काहीच उत्तर आलं नाही . ते डोळे मिटून शांत पडून होते . ताईने जवळ जाऊन त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला ...  श्वास थांबला होता ...त्यांना मुक्ती मिळाली होती .

ह्या महिन्यातील ""हृदयस्थ"" ची ही दुसरी मुक्ती ! सुधाताईंनी शांतपणे त्यांच्या चेहऱ्यावर पांघरून घातलं .

खाजगी कंपनीत मोठे अधिकारी म्हणून कारकीर्द गाजवलेले हे मोहन साखरे काका .

गेल्या चार वर्षांपासून इथे वास्तव्यास आले होते ...स्वतःहून . एकुलता एक मुलगा कॅलिोर्नियात स्थायीक झाल्यावर काही वर्ष ते एकटे आनंदात राहिले , आणि मग इथली माहिती मिळाल्यावर त्यांनी इथेच येऊन राहण्याचा निर्णय घेतला होता .

      काही मीनीटातच तिथे अनेक    वॉकर , चाकाच्या खुर्च्या आणि काठ्या घेऊन आलेली जिवाभावाची मंडळी गोळा झाली . सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि समाधानाची पावती होती . सगळ्यांनी मिळून त्यांची ठराविक प्रार्थना म्हटली , आणि टाळ्या वाजवल्या . उत्तम आयुष्य जागून झाल्यावर पुढे त्या देहाची परवड थांबल्या बद्दल टाळ्या . हृदयस्थ चा रीवाजच होता

तसा . ' जगणे व्हावे गाणे ' असे घोष वाक्य असणाऱ्या हृदयस्थ चे सगळे सभासद मृत्यू कडे फार सकारात्मकतेने बघत असत .

        सुधा ताईंनी त्यांचे जुने स्नेही रघुनाथ यांना कळवले . आश्रमाच्या कुठल्याही अडचणीच्या वेळी रघुनाथ पित्रे आवर्जून मदतीला धावून येत असत . अर्ध्या तासात येतो असे तिकडून उत्तर आल्यावर त्या ऑफिसकडे वळल्या .

" मॅडम ,  कॅलिफोर्नयाशी संपर्क झाला .  काकांच्या मृत्यू बद्दल सांगितलं ...नेहमीचं उत्तर आहे . आपण उरकून घेऊ सगळं.  पण पुढच्या महिन्यात येऊन प्रॉपर्टी संबंधी निर्णय घेऊ , घराच्या किल्ल्या तेवढ्या नीट ठेवा म्हणालेत . " रेवती सांगत होती .

" Hmm !  रेवती , खरं तर मुलांना कळवण्याचे कष्ट आपण का घेतो हा प्रश्न पडतो मला कधी कधी ! माणूस मुलांसाठी यातायात करतो , मागे संपत्ती ठेवून जाण्याचा कोण आटापिटा करतो ...कशासाठी ? खरंतर आपला आणि मोहन साखरेंचा

तसा काही करारच झालेला नाही . मुलांना शेवटचे दर्शन घेऊ न दिल्याची बोच नको म्हणून आपला तो फोन चा सोपस्कार ! ठीक आहे , पुढील तयारीला लागा . महानगरपालिका करून कागदपत्र आणि दाखला आणायची व्यवस्था बघा लवकर ." ताईंच्या सूचनेनुसार रेवती कामाला लागली .

त्या रघुनाथ  पित्रेंना फोन करे पर्यंत बाकी मंडळी नाश्त्यासाठी कॅन्टीन मघ्ये गेली होती . शेवटी भुकेची निकड सर्वात मोठी ! त्यांना त्या दारुण सत्याची जाणीव होऊन किंचित हसायला आलं .

            "का हसताय मॅडम ? " पाठीमागून आलेले रघुनाथ म्हणाले .

" आलात रघुनाथ ? या , नाश्ता करू .  आपल्याला न , साखरेंसाठी विद्युत दहिनी ची वेळ हवी आहे . खूप मोठी रांग असल्याने संध्याकाळ पर्यंत नंबर लागणार नाही म्हणतात . काय करायचं ? तुम्हीच मदत करू शकता . "

" मी येतांनाच  संबंधित माणसांशी बोललो आहे . चिंता करू नका . दुसरी दाहिनी पण कामात आणणार असल्याने फार काही ताटकळत रहावे लागणार नाही .  चला तुम्ही नाश्त्याला , मी आलोच !" म्हणत रघुनाथ फोन घेऊन जरा बाजूला गेले . त्यांना एक दोन फोन करायचे होते . महानगरपालिकेतूनच निवृत्त झाल्याने त्यांच्या बऱ्याच ओळखी होत्या .

              रघुनाथ सध्या  गावाबाहेर आपल्या जुन्या घरात एकटेच रहात होते . त्यांची आणि सुधा ताईंची फार जुनी कॉलेज पासुनची मैत्री ! सुधा ताईचं आजारपण असो , पतीच्या पेन्शन ची कामं असोत , किंवा अगदी हृदयस्थ ची कुठलीही अडचण असो....रघुनाथ कायम तत्पर असत .

एकदा तर शंकर रेवतीला म्हणाला देखील ..."रेवती मॅडम , रघु सर पण एकटे , मॅडम पण एकट्या , मग..."

"मग काय रे ? दोन एकटे जीव दिसले की लगेच जोड्या लावायच्या का? "

" तसं नाही ...एकदा रघु सरांचं वॉलेट टेबलावर राहिलं होतं . मी सहज बघितलं तर त्यात आतल्या कप्प्यात मॅडम चा फोटो होता ."

" काय सांगतोस शंकर ? खरं ?"

" आई शप्पथ !" शंकर म्हणाला,  आणि  मागुन सुधा ताईंची हाक आली .

" रेवती s!" तशी रेवती धावली .

"  साखरे काकांच्या इथल्या नातेवाईकांची  आपल्याकडे काही जुनी नोंद आहे का बघ !"

    साखरेचे कुणी नातेवाईक येण्याची आशा नव्हती .  नाही म्हणायला  एक  रोहिणी नावाची  त्यांची भाची   म्हणवणारी कुणी  तिथे आली होती . तिने आत खोलीत जाऊन नमस्कार केला , आणि एक फोटो त्यांच्या उशाशी ठेवला . चादर वर करून चेहराही बघितला नाही , फक्त पायाशी नमस्कार तेव्हढा केला .

" कुणाचा फोटो आहे तो ?" रघुनाथ म्हणाले .

" माझ्या आईचा आणी काकांचा...म्हणजे साखरे काकांच्या दुसऱ्या पत्नीचा ."

" दुसरी पत्नी ? त्याचं तर एकच लग्न झालय न?" सुधा ताईंना पण आश्चर्य वाटलं ऐकून .

उत्तरादाखल ती मुलगी फक्त हसली . " जन्माचं बंधन फक्त कागदावरच्या  एका सहिने राहिलं असतं तर किती सोपं झालं असतं नाही ? कायद्याने ते एकमेकांचे कुणीच नाहीत . अन्यथा एकमेकांचे सर्वस्व आहेत ."

      तिला आणखी प्रश्न विचारणार इतक्यात रघुनाथ ना फोन आला . साखरेंचा विद्युत दाहिनी साठी नंबर लागल्याने सगळे पुढील तयारीला लागले .

                  "तुम्ही इथे शेड मध्ये थांबा , थोड्या वेळात बोलवतो ." स्मशान कर्मचारी म्हणाला . एका ओट्यावर रोहिणी शांत बसली होती . सुधाताई आणि रघुनाथ तिथे येऊ बसल्यावर तीच बोलती झाली .

" साखरे काका...हो , मी त्यांना काकाच म्हणायचे ...आणि आई त्या काळात शेजारी रहात होते... वय असेल , चौदा पंधरा चे . सोबत अभ्यास , सोबत शाळेत जाणे , सगळीकडे सोबत . आई अठरा वर्षांची झाली तेव्हा साखरे आजींनी तिला मनाने  आपली सून मानून टाकली होती . फोटोग्राफर कडून दोघांचा एक छानसा फोटो ही काढून घेतला होता . आई तर खूप हरखून गेली होती ..कारण  तिच्या मनाने  केव्हाच मोहन काकांना आपल्या आयुष्याचा साथीदार मानला होता .

मोहन काका दिल्ली ला  इंजिीअरिंग साठी गेले असताना अधून मधून आईला फोन करत . आई वेड्यासारखी त्यांच्या फोनची वाट बघायची . अलवार स्वप्न बघणाऱ्या माणसाला सगळ जगच सप्नासारखं वाटतं ...सत्याशी फारकत असणारं . डोळे उघडुन उघडं वास्तव त्यांना स्वीकारायचं नसतं किंवा ते दिसतच नसतं बहुतेक !

       इंजनीअरिंग संपवून नोकरी लागली तेव्हा मोहन काका त्यांच्या आईला भेटायला येणार म्हणून सगळे खूप हरखले होते . पण  ते  आले तेच जोडीने ! त्यांनी आईला कायम बालमैत्रिणच मानलं होतं. आईचं प्रेम त्यांना कळलं नसेल असं तर नाही , पण त्यांनी त्यांच्या भावना कधी स्पष्ट पण केल्या नाहीत ....आईच  आपली वेडी...."

"म्हणजे तू साखरेंची मुलगी नाहीस ?"

"पोटची मुलगी तर मी आईची पण नाही .  काकांच्या लग्नानंतर तिने लग्न केलंच नाही ...मला दत्तक घेऊन कायम मुलीचं प्रेम दिलं . दोन वर्षांपूर्वी ती मला घेऊन साखरे काकांना भेटायला गेली होती ."

" मग ? "

" साखरे आजींनी आपल्या सुरकुतल्या हाताने अतीव मायेने आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला . म्हणाल्या , तुझं मुग्ध प्रेम मोहन ला वेळीच समजायला हवं होतं ग ...दोन रेषा एकत्र येता येता समांतर गेल्या ."

" मग साखरेंची पत्नी ? " हे सगळं ऐकून   बेचैन झालेल्या रघुनाथ चा प्रश्न .

" मुलगा सात वर्षांचा असतानाच ती  कॅलिफॉर्निया ला निघून गेली . त्यांचं कधी फारसं पटलच नाही ."

" ओs हह  ! पण आता ह्या  आईच्या फोटोचं काय ?"

"बायको निघून गेल्यावर काका आईकडे आले होते . आम्ही तेव्हा रेल्वे कॉलनीत रहायचो . आईची तिथे नोकरी होती . काकांनी आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला . मला मुलीसारखं प्रेम देतील म्हणाले...साखरे आजींनी पण विनंती केली . पण आई अत्यंत मानी . शेवटचा पर्याय म्हणून तिला काकांशी संसार नको होता . तिने स्पष्ट नकार दिला . काका निराश होऊन गेले , आणि आई पहील्यांना धाय मोकलून रडली . ज्याला आयुष्यभर आपला पती मानला , त्याला तिने मनावर दगड ठेवून नकार दिला होता .

मी तेव्हा आईला घट्ट मिठी मारली . मला खूप खूप अभिमान वाटला तिचा ."

"मग ?"

" पुढे आईची प्रकृती फारच ढासळली . तेव्हा शेवटी तिने मला हा फोटो दिला .  म्हणाली , ' मोहन ला अग्नी द्याल तेव्हा आमच्या दोघांचा हा फोटो पण अग्नीस अर्पण करशील . त्या अग्निला मनात साक्षी मानून मी आयुष्यभर त्याची पत्नी बनून राहीले ' "  रोहिणी च्या कथना नंतर तिथे स्मशान शांतता पसरली ....खरोखरच्या स्मशानातील शांतता .

        "मोहन साखरे नातेवाईक !! " तिकडून हाक आली , तशी रोहिणी पुढे गेली .

"उद्या राख न्यायला या ."

तिने मानेने होकार दिला .

         सगळे सुन्न मनाने गाडीत बसले . सुधाताई मात्र बेचैन होत्या . त्या म्हणाल्या , "साखरे गेले हे तुला कुणी कळवलं ? तू लगेच कशी आलीस ?"

" त्याची पण एक गंमतच आहे . ही रेवती आणि मी एकाच अनाथआश्रमात होतो . आई मला दत्तक घ्यायला आली तेव्हा तिलाही घेऊ जाऊ म्हणून मी हट्ट धरला होता . पण ती दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक गेली होती . तिला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे , तिनेच सकाळी मला  फोन केला होता .

      गाडी मध्ये आता एकदम शांतता पसरली . प्रत्येकाचा मुक संवाद सुरू होता . गाडी हृदयस्थ मध्ये शिरली . सगळे थकलेले जीव बाहेर येऊन त्यांच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते .

गाडीतून उतरल्यावर रोहिणी सुधा ताईंकडे गेली . रघुनाथ ही कारचे दरवाजे लाऊन तिथेच आले .

" मॅडम , आणि सर ... लहान तोंडी मोठा घास घेतेय . आयुष्य तुम्हाला पुहा पुन्हा संधी देत नाही . नाटकाची तिसरी घंटा आणि पडदा पडण्याचा मधल्या काळातच संवाद बोलावे लागतात . पुन्हा कुठल्या चीतेसोबत फोटो आणि आठवणी जाळण्याची वेळ

नको यायला . ..येते मी ." हात जोडून ती माघारी वळली .

तिच्याकडे बघत सुधाताई वळल्या , आणि आधाराला रघुनाथ नी हात पुढे केला .

अपर्णा देशपांडे

तुम्हाला ही कथा ही आवडेल.

👇

ती आणि तो


Post a Comment (0)
Previous Post Next Post