ती आणि तो

 ती आणि तो (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ परवीन कौसर 



दहा वर्षं पूर्ण झाली होती तिच्या लग्नाला.अगदी कमी वयातच तिचे लग्न झाले होते. शिक्षण म्हणजे जेमतेमच म्हणायचे. म्हणजेच लिहीण्या वाचण्यापुरते म्हटले तरी चालेल. माहेरची लोक जुन्या चालीरीती परंपरा जपणारे असलेमुळे मुलीला न्हाने आले की उजवून टाकायची अशा परंपरेत तिचे लग्न लवकरच उरकून देण्यात आले होते. लग्नानंतर ती आपल्या संसारात रममाण होऊन गेली. दिवसाची सुरुवात तिची आपल्या नवऱ्याला काय हवं नको ते देण्यापासून व्हायची. याचबरोबर आपली दोन लेकरे त्यांची सुश्रुषा करणे त्यांना शाळेत पाठवणे आणि याचबरोबर आणखीन एक मोठी जवाबदारी जी ती हसतमुखाने पार पाडायची ती म्हणजे आपल्या सासु सासऱ्यांची  सेवा. जी ती  मनःपूर्वक करत‌ होती. यामध्ये दिवस सुरू होऊन कधी रात्र व्हायची हेच तिला कळायचे नाही. सर्वांची मने जपता जपता स्वतः कडे तिचे पूर्णपणें दुर्लक्ष होत होते. ती दिवसभरात एकही क्षण आपल्यासाठी राखून ठेवत नव्हती  किंवा त्याची गरज आहे हे सुद्धा ती आपल्या मनात आणत नव्हती. तिने स्वतः ला आराशात कधी निहारले आहे हेच आठवत नसेल. पण तरीही ती आनंदात होती. 

लग्नानंतर तिने आपल्या सर्व आवडीनिवडी सवयी बदलल्या होत्या. आपल्या छंदाला तर तिने केव्हाच तिलांजली दिली होती. पण तरीदेखील ती आनंदी होती. नवरा सरकारी नोकरी करत होता. सासरे देखील निवृत शिक्षक होते. सासु देव देव करत नातवंडांचे सुख घेत होती. 





घरामध्ये तसे पाहता सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. टिव्ही पहाणे हिला आधी आवडायचे पण आता तिला वेळच मिळत नव्हता. घरात सर्वांना हवं नको ते बघण्यातच तिचा दिवस निघून जायचा. पण एकमात्र होते तिचे म्हणजे तिच्या जवळ तिला तिच्या नवऱ्याने दिवाळीमध्ये भेट दिलेला स्मार्टफोन. ती मात्र ती रात्री बिछान्यावर पहुडली की थोडा वेळ फोन मध्ये काही रेसीपी किंवा काही अभंग पाहायची. कधी कधीच ती सोशल मीडियाचा वापर करायची. असेच एकदा सोशल मीडिया वर आलेल्या एका सुंदरशा चारोळीला लाईक करुन कमेंट मध्ये छोटीशी दोनोळी लिहीली. आणि तिच्या त्या दोन ओळी त्या कवीला इतक्या आवडल्या होत्या की त्याने पुन्हा त्या ओळींचे उत्तर एका चारोळीत दिले. पण ते उत्तर पहायच्या आतच ती निद्रेच्या स्वाधीन गेली होती.

आता मुलांच्या परीक्षा होत्या. जवळजवळ आठ दहा दिवस ती यामध्ये व्यस्त होती. मुलांची परीक्षा झाली मुलांना सुट्टी मिळाली. माहेरी न्यायला आलेल्या भावाबरोबर ती सुट्टीला माहेरी गेली.

माहेरात तिचे सर्व हट्ट लाड पुरवले जायचे. पहाटे उठायची सवय असलेमुळे ती जरी लवकर उठली तरी आई तिला जा झोप जा असे म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवायची. पण तिला झोप यायचीच नाही. मग तेव्हा तिला आपल्या फोनची आठवण झाली. तिने पर्स मध्ये ठेवलेला फोन घेतला आणि फोन सुरू केला. तेव्हा तिला त्या दिवशी केलेल्या दोन ओळींचे कमेंट दिसले. ते वाचून तिला पुन्हा दोन ओळी सुचल्या. तिने पुन्हा कमेंट मध्ये दोन ओळी लिहिल्या. आणि गंमत म्हणजे तिला लगेच रिप्लाय पण आला. आलेला रिप्लाय वाचून ती खूप आनंदली होती. कारणही तसेच होते तिने केलेल्या ओळींची त्या कवीने भरभरून स्तुती केली होती. तिला हे नवीनच होते. आजपर्यंत तिने सर्वांची सेवा मनःपूर्वक केली होती पण तिच्या एकाही गोष्टीचे कोडकौतुक कोणी केले नव्हते . आज तिला तिच्या बद्दल बोललेले शब्द काही वेगळेच भासत होते. 

इतक्यात तिला त्याच कवीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने आनंदाने ती स्विकारली. इतक्यातच मेसेंजर वर हाय असा मेसेज आला. तिने लगेच रिप्लाय दिला. 

तो :: नमस्ते मॅडम

ती :: नमस्ते सर

तो :: तुम्ही छान लिहीता

ती :: छे हो मी लिहीत नाही

तो :: नाही ओ मॅडम खरंच खूप छान लिहीता तुम्ही

ती :: अहो सर खरंच मी लिहीत नाही तुम्हाला काही तरी गैरसमज होत आहे.

तो :: अच्छा...!!! पण तुम्ही मला कमेंट मध्ये दोन ओळी लिहिल्या न त्या

ती :: ते होय...!!! असेच तुमची चारोळी खुप छान होती त्याला फक्त उत्तर दिले मी. बाकी काही नाही हो.

तो :: म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने वाचक आहात आणि जो खरा वाचक असतो तोच लेखक होऊ शकतो.

ती :: काही तरी काय मी आणि लेखक

तो :: हो मॅम प्रयत्न करा जमेल तुम्हाला. हवं तर मी मदत करीन.

दोघांनाही मेसेज करत करत कधी झोप लागली हेच कळले नाही.

तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. त्याची पत्नी पण एका कंपनीत नोकरी करत होती. त्याला एक लहान मुलगा होता. घरात आईवडील आणि मुलाला सांभाळायला आया होती. याला लिहीण्याचा छंद होता. तसा लिहायचा ही खूप छान. कविता तर अशा की वाचणारे त्यामध्ये अगदी तल्लीन होऊन जायचे‌ . चारोळी,शायरी यामध्ये तर हा प्रविण होता. याचे फॉलोवर्स खूप होते. आपली नोकरी करत करत हा आपला साहित्यिक प्रवास अगदीच आनंदाने करत होता. 

ती आणि तो आपल्या चौकटीतच सामावलेली होती. ती आपल्या संसारात तर हा आपल्या कामाबरोबरच साहित्यात.

दुसऱ्या दिवशी ती रात्री मेसेंजरवर मेसेज केलेले विसरून ही गेली. दुपारी जेवण झाल्यानंतर वामकुक्षी घेण्यासाठी खोलीत गेली. तिथे तिचे लहान लहान भाचे आणि तिची मुले तिचा फोन घेऊन गेम खेळत होती ते बघून तिला रात्रीचे मेसेज आठवले. तिने पळत जाऊन आपला फोन मुलांकडून काढून घेतला. 

फोन हातात घेऊन तिने इंटरनेट आॅन केले. तोच तिला गुड मॉर्निंगचा मेसेज दिसला. तिने पटकन त्या मेसेज ला लाईक केले. परत येईल रिप्लाय हे पहात फोन हातात घेऊन बसली. तोच तिला रिप्लाय आला.  

तो :: हॅलो मॅडम

तीने फक्त स्माईली टाकली

तो :: काही लिहीले का ?

ती :: नाही न...!!!

तो :: अरे...!!! का ???

ती :: नाही जमत

तो :: प्रयत्न करा. बघा तुमच्या आसपास काय आहे ते बघून लिहा. किंवा काही तरी मनाच्या कप्प्यात असलेल्या आठवणींना लेखणीतून उतारा.

ती :: असे पटकन सुचत नाही न सर...!!!

तो :: ठिक आहे.करा प्रयत्न काही लागले तर मी आहेच.

ती :: ठिक आहे.

तिने फोन बंद केला आणि खोलीतल्या खिडकीतून बाहेर पाहू लागली. तिला समोर निसर्गाचे सौंदर्य दिसू लागले. त्या सौंदर्यामध्ये ती आपली काही पाहिलेली स्वप्ने उजाळून देऊ लागली. तिच्या मनामध्ये काही ओळी रचल्या गेल्या. तिने पटकन काही ओळी लिहिल्या आणि त्या कवीला पाठविल्या.

तो :: अरे व्वा मस्तच

ती :: खरंच

तो :: नाही तर काय.एकदम सुपर से उपर

ती :: पहिल्यांदा प्रयत्न केला आहे.

तो:: तो ही सुपर. पोस्ट करा आपल्या गृप वर.

ती :: नको नको उगाच हसे होईल .

तो :: नाही ओ. बघा कसा रिस्पॉन्स मिळतो.

ती :: नको नको

तो :: ठिक आहे. मग मीच करतो पोस्ट तुमच्या नावाने.

त्याने तिची छोटीशी कविता पोस्ट केली. बघता बघता लाईकचा पाऊस सुरू झाला. कमेंट ची बरसात सुरु झाली. तिला आश्चर्य वाटले ‌आणि तिने स्वतःला प्रश्न केला की खरंच ही मीच आहे का?? चार भिंतीत एका चौकटीत राहणारी ही मीच का ??

आपल्या पहिल्या पोस्ट चे कौतुक पाहून तिने त्या कवीचे आभार मानले. आता पुन्हा काही लिहीन आणि आपणच स्वतः पोस्ट करेन असे म्हणत पुन्हा त्याचे आभार मानले.

बघता बघता ती आता खूप कविता करु लागली. त्याचबरोबर वाचकांच्या प्रतिक्रिया तिला तिच्या लेखणीला धार देण्याचे काम करत होते.

मुलांच्या सुट्ट्या संपल्या.तिचा परतीचा प्रवास सुरू झाला. आता ती पुन्हा आपल्या चौकटीत बंदिस्त होण्यासाठी निघाली.

सासरी गेल्यानंतर घर सगळे व्यवस्थित करण्यात तिला जवळजवळ आठ दिवस लागले. इतक्यात सासऱ्यांची तब्येत बिघडली. त्यांना दवाखान्यात दाखल केले. आता हिची पुन्हा एकदा तारेवरची कसरत सुरू झाली. घरचे काम करुन दुपारी दवाखान्यात जाऊन बसायची ड्युटी लागली. दुपारी दवाखान्यात बसल्या बसल्या तिला एकदम आपल्या फोन ची आठवण झाली. तिने खूप दिवसांनी आपला फोन सुरू केला. 

'बापरे...!!! किती हे मेसेज.' तिने मनात म्हणत मेसेज वाचू लागली.

सगळेजण हिच्या लेखनाची स्तुती करत होते त्याचबरोबर नवीन काही लिखाण दिसले नाही असे पण विचारत होते.


इतक्यात मेसेंजरवर तिला  'हाय' असा मेसेज आला.

तिने तो मेसेज बघितला आणि अंगात सर्रकन वीज चमकावी तशी ती कावरीबावरी झाली. तिच्या मनावर  कोणीतरी फुंकर घालावी आणि अंगात आलेला शीण एका क्षणात नाहीसा व्हावा असं झालं.

'मला हा मेसेज बघुन इतकं का बरं वाटतंय, मला का सुखद वाटतंय' ती स्वता:शीच पुटपुटली. असो...!!! "हाय" च उत्तर तरी देऊ. 

ती : हाय


(तो जणु वाटच पहात होता)


तो : हाय ! अरे काय मॅडम कुठे गायब?


ती : काही‌नाही जरा घरच्या जबाबदारीच कर्तव्य पुर्ण करत होते. 


तो : म्हणूनच यामुळेच काही लिहीलं नाही वाटतं.लिहा मॅडम‌ काहीतरी वाचक चातकासारखी वाट पाहत आहेत आपल्या लिखाणाची.


ती : नक्की प्रयत्न करेन काहीतरी लिहीण्याचा. 


तो‌: ऑल द बेस्ट मॅडम.


ती : थॅक्यु सर.

तिने काही तरी सुचेल का आता या परिस्थितीत असा विचार करून एक दिर्घ श्वास घेतला आणि खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेरचे जग जणू काही तिला वेगळेच भासत होते.‌ मृग नक्षत्र सुरू झाले होते. पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा मध्ये तिचे मन बेधुंद होत होते. तिला येणाऱ्या पहिल्या पावसात चिंब भिजायला आवडायचे पण तिच्या नवऱ्याला पावसात भिजायला मुळीच आवडायचे नाही.तिला तिच्या लग्नानंतरचा पहिला पाऊस आठवला. बाहेर अशीच पावसाची रिमझिम सुरू होती. तिला आपल्या टेरेसवर जाऊन मनसोक्त भिजायची इच्छा झाली. हा पहिला पाऊस आपण आपल्या आणि या पावसात आपण दोघांनी भिजून घेतलेला मनसोक्त आनंद तिला तिच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवायचा होता. जेव्हा तिचे यजमान कामावरून घरी आले तेव्हा तिने आपली इच्छा व्यक्त केली. तिचे बोलणे संपते न संपते तिचा नवरा रागाने लालबुंद झाला आणि घरंदाज घरच्या सुना अशा टेरेसवर जाऊन भिजून आपले अंग प्रदर्शन करत नाहीत. हे आता बोललीस ते बोललीस परत हा विषय काढायचा नाही. असे बजावून सांगितले. तेव्हा पासून तिला हवाहवासा वाटणारा पावसावर तिने तिलांजली दिली आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तेव्हा ती स्वतः ला घराच्या खिडक्या बंद करु लागली. एकही थेंब अंगावर पडू नये याची खबरदारी घेऊ लागली. आणि एकदमच दवाखान्यातील खिडकीतून पावसाचे थेंब अचानक तिच्या अंगावर पडले तशी ती एकदम थरारली. ती आपल्या भूतकाळातून बाहेर आली. तिने पटकन आपल्या हातावर पडलेल्या पावसाच्या थेंबाना पुसण्यासाठी रुमाल घेतला आणि ती ते थेंब पुसणार इतक्यात तिला त्या थेंबावर काही ओळी सुचल्या तशी तिने पटकन आपला मोबाईल घेऊन त्यामध्ये काही ओळी लिहिल्या.दोन ओळी म्हणत म्हणत तिने चक्क सोळा ओळींची कविता लिहिली. तिलाच विश्वास बसला नाही कि ही कविता आपण लिहीली आहे. तिने पुन्हा एकदा कविता वाचली आणि पटकन मेसेंजरवर ती कविता पाठवली आपल्या कवी मित्राला. तोच तिला आपल्या सासऱ्यांच्या खोकण्याचा आवाज आला तशी ती पटकन उठून फोन तिथेच ठेऊन सासऱ्यांना काय हवं नको ते बघायला गेली. बघता बघता रात्र संध्याकाळ होत आली. तिला घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता. तिला घरी नेण्यासाठी तिचा नवरा दवाखान्यात आला. हे दोघेही घरी निघाली. 

बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती. ती आपले शरीर साडीने पूर्णपणे झाकून स्वतः ला अगदीच आकुंचित करत छत्री घेऊन हळूहळू आपल्या नवऱ्याच्या मागोमाग चालत होती. आजचा पाऊस तिला पुन्हा एकदा मनसोक्त भिजायची इच्छा करुन देत होता पण ती आपल्या इच्छेला मारत तशीच चालत होती.

रात्री सर्वांची जेवणे उरकली. दवाखान्यात तिचा नवरा डबा घेऊन गेला. हिने आपल्या मुलांना झोपविले. सासुबाई पण आपल्या खोलीत झोपायला गेल्या. ती दिवसभराच्या कामात थकलेल्या आपल्या जीवाला आराम द्यावा यासाठी मुलांजवळ जाऊन पहुडली. बाहेर पाऊस पडत होता त्या पावसाच्या आवाजाने तिला एकदम आपली कविता आठवली.तशी ती ताडकन उठून पर्समध्ये ठेवलेला फोन घेऊन फोन सुरू केला आणि पहाते ते काय तिच्या कवितेला वाहवा करत त्याने पुष्कळशी फुले, टाळ्या,मंद हास्य करणारे असे एक ना अनेक ईमोजी पाठविले होते. ते पाहून तिला काही कळेना. ती त्याला मेसेज करावा की नको या विचारात होती तोच त्याचा ' हाय ' हा मेसेज आला.

ती:: हॅलो


तो :: अहो मॅडम किती वेळ वाट पाहत आहे मी तुमची.


ती :: का सर ? काय झाले?


तो :: काय झाले नाही आता होणार आहे.


ती :: म्हणजे????


तो :: तुमची कविता तुमची ओळख झाली आहे आता तुम्ही एक प्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या जाणार आहात.


ती :: काही तरीच


तो :: अहो खरंच


ती :: कसली कवयित्री आणि कसलं काय


तो :: असे म्हणू नका मॅडम. तुम्ही खरंच खुप छान लिहीली आहे कविता. मी तुम्हाला अजून एका गृप मध्ये अॅड करतो. तिथे तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळेल. आणि बघा एक दिवस तुमचे नाव लौकीक होणार आहे ‌. तुमच्या कविता वर्तमान पत्रात छापून येणार. तुम्ही खूप प्रगती करणार .


ती :: सर झोप आली असेल तुम्हाला. झोपेच्या नादात असे विनोद करत आहात तुम्ही.


तो :: अहो नाही मॅडम मी विनोद करत नाही. खरं तेच बोलतो आहे. आताच तुम्ही मी अॅड केलेल्या गृप मध्ये ही कविता पोस्ट करा आणि बघा कसा रिस्पॉन्स येतो. लाईक कमेंटचा पाऊस कसा पडतो ते सांगालच मला.


ती :: ठिक आहे सर करते पोस्ट.

असे म्हणत तिने तिची कविता गृप वर पोस्ट केली आणि त्याने सांगितल्याप्रमाणे लाईक कमेंटचा पाऊस पडू लागला. या पावसामध्ये तीने स्वतः ला चिंब भिजवून घेतले. आज ती तीच होती पण नव्याने जन्मलेली. 

आता तिलाही एक स्वतःच‌ अस्तित्व, एक वेगळी ओळख, एक वलय मिळालं होतं. दोन‌ ओळींनी सुरूवात झालेल्या तिच्या‌ झ-याने कवितारूपी महासागरात कधी प्रवेश केला हे तिलाही कळाले नाही. 

तिने मनोमन त्याचे आभार मानले आणि बिछान्यावर अंग टाकले. उद्याच्या सुर्याच्या किरणांनी न्हाऊन एका‌ नविन कवितेला शब्द‌ देण्यासाठी आणि हे नविन जगात तिचं प्रोत्साहन बनलेल्या त्याच्या प्रतिक्रीयेसाठी. 

एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं.. 

"ती"च्या शब्दांना शब्दांनीच शब्दरुपी प्रोत्साहन देणारा "तो". 

शब्द- बंधनात बांधले गेलेले "ती" आणि "तो" .....कायमचे..! 

 📝-------समाप्त------📝

©® परवीन कौसर


बेंगलोर

हे वाचून पहा.

👇

छत्र छाया

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post