ऋणानुबंध

 ऋणानुबंध.....  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ माधवी ठाकूरदेसाई 

मुंबईच्या लोकल मधे शिरायला मिळण हे जिथे भाग्य असते तिथे आज मला बसायला चक्क विंडो सीट मिळाली होती. माझाच मला हेवा वाटत होता. हलकेच विसावत मी थोडीशी सैलावले आता बोरीवली येई पर्यंत निवांत..... हळुहळु लोकल मधली गर्दी वाढायला लागली होती.  प्लॅटफॉर्म वर ट्रेन पकडायला, आपला नेहमीचा डबा गाठण्या साठी धावपळीने वेग घेतला होता. "५ बजकर १० मिनिट की बोरीवली लोकल अभी थोडी ही देर मे प्लॅटफॉर्म नंबर ३ से रवाना हो रही है"  या अनाउन्समेंट बरोबरच लोकांच्या हालचालींना वेग आला होता. 'जरा आत सरका... आत कितीही जागा असली तरा बाहेरच लटकतील....'  या सारखे संवाद कानावर पडत होते हळुहळु लोकल ने वेग घ्यायला सुरवात केली आणि आपोआपच सगळे शांत झाले.... निदान पुढच स्टेशन येई पर्यंत तरी शांतता होती. मीही गर्दी न्यहाळत होते. बायका बसलेल्यांकडे कुठे उतरणार ची चौकशी करत होत्या तेवढच लवकर बसायला मिळाल तर बर या हिशोबा ने सीट बुक करत होत्या.

ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने सगळ्या घामाघुम झाल्या होत्या.... माझ्या सारख्या खिडकीत बसलेल्यांची चंगळ होती. उबट का म्हणा निदान वारा लागत होता.  थोड स्थिर स्थावर झाल्या वर काहींनी मोबाईल काढले... काही गर्दितही पोथी वाचत होत्या, काही असच बसल्या होत्या... बहुतेकींचे चेहरे दिसभराच्या कामाने थकले होते. घरी गेल की काम वाढलेली असणारच होती... त्यामुळे लोकल चा प्रवासच काय तो निवांत वेळ तेही बसायला मिळाल तर नाही तर तपश्चर्या करत उभ रहायच... वरवर शांत दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या मागे बरीच उलथापालथ होत असणार... उगीचच मी इकडे तिकडे पहात होते. माझी नजर एका चेहऱ्यावर स्थिरावली... दमलेला आणि म्लान चेहरा.... मला उगीचच तिची काळजी वाटली. मी माझी नजर वळवण्याचा निष्फळ प्रयत्न केला, तरी सारख लक्ष तिच्या कडेच जात होतं. काय झाल असाव??? अचानक तीचही लक्ष माझ्या कडे गेल.... नजरा नजर होताच तिचे डोळे पाणावलेले दिसले.... निकरानी ती पाणी रोखत होती.. तरी गालावर एखादा थेंब ओघळत होता. मी खुणेनेच तिला जवळ बोलावले. ती संकोचली पण आली. मी तिला म्हटल "बस इथे थोडावेळ,खुपच थकलेली दिसतेयस"  "अं हो" "पण ताई तुम्ही...." "अग थोडा वेळ मी उभी रहाते, काही हरकत नाही" "वारा लागला की बर वाटेल" "अं थँक्यु ताई.."  ती बसली... वारा लागल्या वर थोडी सावरली..  बाहेर पहात असल्या मुळे डोळ्यातल पाणी दिसत नव्हत पण डोळे भरुन येत होते हे समजत होत. 

स्टेशन येत होती जात होती.... प्रत्येक वेळी गाडीत चढण्या ऊतरणाऱ्यांचे तेच संवाद कानावर पडत होते. दादर आल आणि एका बाईने उतरतांना मला तिची जागा दिली. हुश्श आता मात्र उठायच नाही काही झाल तरी, अस मनात म्हणत टेकले.... एवढा वेळ बाहेर पहाणाऱ्या तिने मान वळवली... ओशाळुन म्हणाली..." सॉरी ताई, माझ्याच तंद्रीत हरवल्याने तुम्हाला सीट द्यायलाच विसरले..."  "ठिक आहे होत अस कधितरी" "बर वाटतय ना" "हो ताई" " कुठे रहातेस?"  "बोरिवली वेस्टला" "हो का... मी ही बोरीवली इस्टला रहाते" "नाव काय तुझ?" "काही प्रॉब्लेम आहे का?" माझी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.... "अनिता सुर्यवंशी नाव माझ" "हे बघ अनिता काही प्रॉब्लेम असेल तर निःसंकोच पणे सांग, जमल तर मदत करीन, आणि त्याने तुझ मन ही मोकळ होईल" "हुँ" तिचे डोळे परत भरुन आले... "इतक मायेन कुणीच बोलत नाही, ताई" "काय आणि कस सांगु, काहीच समजत नाहिये" "लहानपणीच वडील गेले... आईने लोकांची धुणीभांडी करुन मला लहानच मोठ केल.... स्वतः अशिक्षित होती पण मला मात्र शिकवलन! आपण नीट राहीलो वागल की जग ही नीटच वागतं, अस म्हणते... मी ही याचा अनुभव घेतलाय... शिकत असतांना तुमच्या सारख्या अनेकांनी मदत केली ..मी एका प्रायव्हेट ऑफिसात   काम करतेय.. मी खुप मोठी होईन लोक मला ओळखतील असा आई ला विश्वास आहे.  ती नेहमी म्हणते अनु तू माझा मुलगा आहेस माझ्या म्हातारपणाची काठी आहेस...  मलाही माझ्या आईला खुप सुखात ठेवायचय...  पण देवाला हे मंजुर दिसत नाहीये..."  "अनिता शांत हो बघु, नीट सांग काय झालय" "ताई बरेच दिवसा पासुन आई ला बर वाटत नव्हत... सारख पोटात दुखायच... डॉक्टर कडे चल म्हटल तर ऐकत नव्हती, परवा हट्ट करुन घेऊन गेले डॉक्टर कडे, डॉक्टरांनी प्राथमिक टेस्ट करायला सांगितल्या होत्या, त्या केल्या सोनोग्राफी केली...त्याचे आज रिपोर्ट मिळाले.... आईला पोटात ट्युमर आहे... तो ऑपरेशन करुन काढावा लागेल"  परत परत भरुन येणारे डोळे पुसत अनिता म्हणाली "खुप भिती वाटतेय मला, आई बरी होईल ना???" मी तिचा हात हातात घेऊन थोपटला... म्हटल "काळजी करु नकोस, स्वतःला सावर नक्की बरी होईल" "केंव्हा आणि कोणत्या हॉस्पिटल मधे करायच ठरलय ऑपरेशन?" "डॉक्टर कोण आहेत?" "दोन दिवसांनी करायच ठरलय... डॉ गुप्ता करणार आहेत.  सकाळी १० ला रत्ना मधे करायच आहे" "ताई आज ऑफिस मधे रजा टाकून आलिय.. महीन्या भराची" "आम्ही दोघीच आहोत एकमेकींचा आधार...." परत डोळे भरत होते.. "हे बघ अनिता, परवा मी ही असेन तुझ्या बरोबर.. अजिबात काळजी करायची नाही" "आणि असा रडवेला चेहरा घेऊन घरी गेलीस तर आई ला काय वाटेल... तु एक शूर मुलगी आहेस, पूस बघु डोळे" "मला तुझा नंबर देऊन ठेव, मी डायरेक्ट येते हॉस्पिटल मधे" "चल ऊठ आलं बोरिवली" "आता अजिबात डोळ्यात पाणी आणू नकोस... परवा मी येतेच आहे.... तूझी स्वतःची आणि आईची ही काळजी घे"  एवढ तिला समजावून मी जिन्या कडे वळले.... स्टेशन खचाखच भरले होते... डोक्यात अनिताचेच विचार होते.... 

घरी पोहचले तेंव्हा ७ वाजून गेले होते. हातपाय धुवून कामाला लागले...  सासु बाई म्हणाल्या "काय ग बर नाहीये का?" "नाही नाही मी ठीक आहे" "अहो आज ट्रेन मधे एक मुलगी भेटली होती तिचाच विचार करत होते. बाकी काही नाही"तेव्हढ्यात श्री ही घरी आला. त्याचे आवरे पर्यंत मी जेवणाची तयारी केली. जेवता जेवता अनिताची कथा सासुबाई आणि श्री ला सांगितली... म्हटल "हबकलीय रे पोर" परवा मी रजा घेतेय दिवसभर तिच्या बरोबर थांबेन. "ठिक आहे" श्री म्हणाला.. 

दुस-या दिवशी ऑफिस मधे गेल्यागेल्या रजेचा अर्ज दिला... कामात ही लक्ष लागत नव्हत सारखा अनिताचा चेहरा डोळ्या समोर येत होता.... दुपारी लंच ब्रेक मधे तिला फोन केला आणि सांगितले उद्या मी तिच्या बरोबर असेन.... आवाजा वरुन अनिता सावरल्या सारखी वाटत होती. मनात म्हटल चला हे बर झाल... शहाणी मुलगी आहे. उद्याचा दिवस नीट पार पडू दे रे बाबा ... अशी मनोमन प्रार्थना चालूच होती. देव तरी अशी परिक्षा का घेतो??? अशा विचारांच्या तंद्रीत स्टेशन गाठल... आज कशीबशी फोर्थ सीट मिळाली होती... गर्दित पिना, रबर, टिकल्या विकायला येणाऱ्यांचे पाय पायावर पडत होते... पण काही बोलावसच वाटत नव्हत... घरी पोहचले तेंव्हा सासूबाईंनी गरमागरम चहा समोर ठेवला...खरोखरच फार गरज होती त्याची... सासूबाईंनी माझी घालमेल ओळखली "अग मधु कशाला चिंता करतेस होईल हो सगळ नीट" त्यांच्या या बोलण्याने मनाला उभारी आली मी त्यांना म्हटल "खरंच सगळं नीट व्हायला हव"... रात्री सगळी आवरा आवर करून झोपायला गेले. श्री जागाच होता. म्हणाला "निश्चिंत मनाने झोप" "सकाळी लवकर जायचयना तुला" "हो" "काळजी वाटतेय रे पोरीची" "हे बघ आत्ता तू विचार करून प्रश्न सुटणारे का? नाही ना मग झोप सकाळी बघू" श्रीच्या दिलाश्याने बर वाटल... दिवस भराच्या ताणाने कधी डोळा लागला कळलच नाही...

सकाळी उठले तीच फ्रेश मुड मधे...पटापट चहा नाश्ता "श्री"चा डबा केला... माझही पटकन आवरल आणि निघाले.. निघण्या पुर्वी अनिताला फोन केला त्याही निघाल्या होत्या... मी पोहचले तो पर्यंत अनिताही आईला घेऊन पोहचली... मला  पाहून तिला थोडा धीर आला... मी माझी ओळख करून दिली "काकू मी मधुलिका आपटे" "तुमच्या अनिताची ताई आणि आता तुमची मुलगी" "काही काळजी करायची नाही सगळ नीट होईल" "काही खाल्ल नाहीत ना??" "नाही" "गुड" "मी एडमिशन प्रोसीजर पुर्ण करून घेते...तुम्ही बसा इथे" "अनिता आईचे सगळे रिपोर्ट आणेलेस ना" "हो ताई" "चल आपण जाऊन येऊ; तिथे मला तुझी गरज लागेल" "काकू तुम्ही थांबा ईथे पहिला थोडा फॉर्म भरून झाला की अनिता ला पाठवते"...मी व अनिता एडमिशन काऊंटर वर गेलो सुरुवातीची माहिती घेऊन अनिताला आई जवळ पाठवल... मग मी डिपॉझिट भरलं आणि  तिकडच्या क्लार्कला अनिताला आर्थिक सहाय्य कुठून मिळू शकेल याची चौकशी केली. त्याने सोशल वर्करना भेटायला सांगितल.

अनिता ला आईला वॉर्ड मधे न्यायला सांगितल होत... सर्व प्राथमिक तपासण्या करून झाल्या वर आईंना ऑपरेशन थेअटर मधे नेण्यात आल... डॉ गुप्तां बाहेर आले आणि अनिताला कन्सेंट फॉर्मवर सह्या करायला सांगितल्या.. फॉर्म वाचून तिला भिती वाटली... तिला समजावल हे रुटिन असत... काही काळजी करू नकोस निर्धास्त मनाने सही कर.. डॉक्टरांनीही तिला धीर दिला. सगळ नीट होईल म्हणाले...आणि ते आत गेले... 

अनिताच्या पाठीवर हात फिरवत तिला थोड शांत केल... म्हटल तू काही खाल्ल आहेस का??? तिचा चेहराच बरच काही सांगून गेला. तिला हाताला धरून कॅन्टीन मधे नेल.. ती अढेवेढे घेत होती पण तिला समजावल "तू व्यवस्थित राहिलीस तरच आईची नीट काळजी घेऊ शकशील.. नीट खाऊन घे... काही होणार नाही आईला" कँन्टीन मधून आम्ही परत ऑपरेशन थेअटर जवळ येऊन बसलो... एव्हाना हॉस्पिटल मधली गर्दी वाढायला लागली होती.. नर्सेस, मावश्या मामा यांची लगबग सुरू होती... सफाई कर्मचारी हॉस्पिटलच्या स्वच्छते वर लक्ष ठेवून होते.  ओपीडीच्या पेशंटची गर्दी वाढत होती.. वातावरणा एक ताण भरून राहिला होता... इतक्यात डॉ. गुप्ता बाहेर आले.. आम्ही चटकन त्यांच्या जवळ गेलो... त्यांचा समाधानी चेेहरा पाहून मला सगळ व्यवस्थित पार पडल असाव असे वाटत होते... मी डॉक्टरांना विचारले "doctor how is patient?" "nothing to worry, she is alright" "अनिता बेटा काही काळजी करू नकोस, operation successful झालय" "त्यांना आपण दोन दिवस ICU मधे ठेवूया स्टेबल झाल्या की दोन दिवस जनरल मधे मग तब्बेत ठिक असेल तर घरी सोडू" "आत्ता त्यांना पोस्ट ऑपरेटिव्ह मधे ठेवलय थोड्या वेळाने ICU त शिफ्ट करू तेंव्हा तुला बघता येईल आईला" "शुध्दीवर यायला थोडा वेळ लागेल, अनेस्थेशियाचा असर उतरला की जाग्या होतील" डॉक्टर असे सांगून निघून गेले.. अनिताच्या मनावरचा ताण थोडा हलका झाला होता...आईला कधी एकदा बघतोय अस झाल होत तिला.. तेव्हढ्यात एका नर्सने आवाज दिला द्वारका सुर्यवंशी पेशंटचे नातेवाईक.. आम्ही लगबगीने तिकडे गेलो... नर्स म्हणाली "आत्ताच त्यांना ICU मधे नेलय लांबून पाहू शकता तुम्ही" "आणि त्यांच गाठीच सँपल बायोप्सिला पाठवलाय दोन दिवसात रिपोर्ट मिळतिल." अनिताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटल आता काय आणखी?? मी तिला समजावल "अग तो ट्युमर कोणत्या गंभीर आजाराचा नाहीना हे तपासतील बाकी काही नाही तू काही काळजी करू नकोस" "चल आपण आईला भेटायला जाऊ" आम्ही ICU मधे जाऊन लांबूनच काकूंना पाहीलं... हळूहळू त्या शुध्दीवर येत होत्या... "अनु...अनु...अनु" "सिस्टर जाऊ का आई जवळ, ती हाका मारत्येय" "हो, जा पण आधी हात सॅनिटाईज करून घ्या" "हो, सिस्टर" आम्ही हात सॅनिटाईज केले आणि ती आई जवळ गेली. "आई..आई आहे मी इथेच" "काळजी नको करूस, डॉक्टर म्हणाले ऑपरेशन व्यवस्थित झाल आहे" अनिता आईच्या केसातून मायेने हात फिरवत होती... दोघींच निरागस प्रेम पाहून मलाही भरून आल... "अनु पाणी हवय कोरड पडलीय घश्याला" "मी विचारते सिस्टरना" अनिता सिस्टर काऊंटर कडे गेली... मी हलकेच काकूंना हाक मारली "काकू बर वाटतय का?" "दुखतय हो खुप" "हो नुकतच झालय ना ऑपरेशन म्हणून दुखेल थोड" "औषध सलाईन मधून चालू आहेत" "हळूहळू कमी होईल दुखायच" "ही बघा आली अनिता, काय म्हणाल्या सिस्टर?" "त्या थोड्या वेळाने देतिल पाणी" "आणि आता बाहेर थांबायला सांगितल आहे" "आई काही काळजी नको करूस मी आहे बाहेर" आम्ही बाहेर आलो मी अनिताला म्हंटले "मी आता घरी जाऊन येते, येतांना तुला डबा आणि काकूं साठी सूप करून  आणते" "थांबशील ना तू?" "हो ताई, या जाऊन तुम्ही"

घरी आई वाट बघत होत्या... "मधु, झाल ना सर्व नीट" "हो, ऑपरेशन व्यवस्थित झाल" "दोन दिवस ICU मध्ये ठेवणार आहेत नंतर दोन दिवस वॉर्ड मधे ठेवतिल आणि मग घरी सोडतील" "मी थोड्या वेळाने अनिताला डबा आणि काकूंना सूप करून नेते" "कोणीच मदतीला नसलेे की किती प्रॉब्लेम होता ना" "अनितालाच हॉस्पिटल मधे रहावे लागेल" "खर आहे मदतीला नसल कोणी की फारच पंचाईत होते" "आता तू आधी फ्रेश हो, आणि जेवून घे बर" "परत जायचय ना तुला" मी पटापट आवरून अनिता साठी डबा आणि काकूंना सूप तयार करून घेतल आणि हॉस्पिटल गाठलं.

मी पोहचले तेंव्हा अनिता बाहेरच होती. तिला विचारल "परत गेली होतीस का आत?" "हो दोनदा जाऊन आले, पाणी दिलं तिला" "सिस्टर म्हणाल्या आज पातळ पदार्थ द्या" "म्हणूनच सूप आणलय काकूंना सूप देऊ, मग तुही डबा खाऊन घे" आम्ही आत गेलो.. काकूंचा बेड कलता करून त्यांना बसत केलं आणि अनिताने हळूहळू सूप पाजल.... थोडस पोटात गेल्यावर त्यांना हुशारी आली... अनिताला म्हटल "मी आहे काकूं जवळ तु बाहेर जावून डबा खाऊन घे..."  काकूंना थकव्या मुळे आणि औषधां मुळे ग्लानी आली होती... मी अलगद बेड खाली केला आणि बाहेर आले... अनिताचा ही डबा खाऊन झाला होता... अनिताला म्हटल डॉक्टरांना परत भेटलीस का... ती नाही म्हणाली म्हणून मग तिला घेऊन डॉ गुप्तांच्या कॅबिन मधे गेलो... "ये, अनिता काय म्हणत्येस??" "काही नाही ताई म्हणाल्या तुम्हाला भेटून येऊ म्हणून आले" "तस खास काही नाही डॉक्टर इन जनरलच विचाराय होत... बायोप्सि रिपोर्ट बद्दल काकूंच्या डाएट बद्दल... आणि खर्चाच्या अंदाजा बद्दल" "बायोप्सि रिपोर्ट यायला वेळ लागेल, पण त्यात काही प्रॉब्लेम नसेल असा माझा अंदाज आहे.. बिनाईन ट्युमर होता तो पण रिस्क नको म्हणून टेस्ट करायची, पोटोच ऑपरेशन असल्यामुळे हा विक लिक्विड डाएट द्या ज्युस, खिर, लापशी, भाज्यांची सुप इत्यादी" "आणि बिलाच तुम्ही बिलिंग मधे विचारा" "हो तिथे विचारेनच पण अनिताला कन्सेशन मिळायला हवं त्या साठी तुम्ही काही मदत करू शकाल का विचारायच होत..." "माझ्या अंदाजाने सगळा खर्च ३ ते ४ लाखा पर्यंत होईल... त्यात तिला काही कन्सेशन देता येईल का पहातो ... तसेच तुम्ही आपल्या सोशल वर्करना भेटा त्या गाईड करतिल अजून कुठून आर्थिक मदत मिळू शकेल ते" "Ok...thanks a lot डॉक्टर" आम्ही केबिन मधून बाहेर पडलो तेंव्हा अनिताचा चेहरा चिंतित दिसला....मी तिला म्हंटल "काही काळजी करु नकोस सगळ निट होईल" "ताई, माझ्या पगाराच्या हिशोबाने मी थोड लोन घेतलय ऑफिस मधून...पण ते पुरणार नाही, पुढे ही तिची औषध योग्य आहार लागणार ना!" "अग हो म्हणूनच मी कन्सेशन च विचारलं डॉक्टरना" "आणि बऱ्याच संस्था असतात त्या आर्थिक मदत करतात फक्त आपली कागदपत्र सगळी निट हवीत आणि काही सरकारी योजना आहेत त्यात तुम्ही कदाचित बसालही" "आता आई बरी आहे... आणि ती झोपलिय तेवढ्या वेळात आपण सोशल वर्करना भेटून घेऊ म्हणजे काय कागदपत्र लागतिल कुठून मदत मिळेल हे कळेल सारे" "आणि लक्षात ठेव तू एकटी नाहीस मी आहे तुझ्या बरोबर" "हो, ताई तुझा खुप आधार वाटतोय गं" "चल जाऊ आपण" आम्ही सोशल वर्कर ना भेटलो त्यांनी आर्थिक मदत कुठून व कशी मिळेल हे समजावून सांगितले तसेच सरकारी कोणत्या योजने मधून ऑपरेशन चे किती पैसे मिळू शकतिल हे सर्व डॉक्युमेंट्स पाहून कळेल असे सांगितले व त्यासाठी काय काय कागद पत्र लागतिल तेही सांगितले... मग आम्ही परत Icu बाहेर येऊन बसलो... तितक्यात अनिताला भेटायला चार पाच बायका आल्या... अनिताशी त्या बोलत होत्या त्यांच संभाषण कानावर पडत होत या सगळ्यां कडे काकू अनेक वर्ष काम करत होत्या... मी ही त्यांच्या संभाषणात सामिल झाले... त्या अनिताला सांगत होत्या "पैशांची चिंता करू नकोस, द्वारकाताई आम्हाला घरच्या सारख्या आहेत, रात्री इथे कोण थांबणार आहे??" "मीच थांबेन कारण काही लागल तर मी हवे" "बर मग अस कर उद्या पासून आम्ही आलटून  पालटून येऊ" "तुलाही विश्रांती मिळायला हवी, उद्या सकाळी १० ला एक जण येतो, तु घरी जावून आराम कर आणि दुपारी १ ला ये" "आणि हे पैसे निट ठेव लागतिल खर्चाला" "अग, अनिता नाही म्हणायच नाही बाळा, आम्ही का परक्या आहोत इतकी वर्ष तुम्हा मायलेकींना ओळखतोय" "तुम्हीच सांगा हो ताई" "अनिता, घे ते पैसे किती प्रेमाने देतायत त्या" संकोचत अनिताने पैसे घेतले... एक एक करून त्या काकूंना भेटून आल्या... मग सकाळी येण्याच निश्चित करून गेल्या... अनिताला मी म्हंटल "बघितलस हे सगळे तुझेच आहेत... नको काळजी करूस... उद्या सकाळी घरी गेलीस की सगळी कागद पत्र जमा कर, मी उद्या हाप डे टाकते" "उद्या बाकीची प्रोसिजर पुर्ण करू" "काकूंना हॉस्पिटल डाएट लावू म्हणजे सगळ वेळच्या वेळी होईल" "आणि तु ही खाण्यापिण्याची आबाळ करायची नाही कळलं" त्या प्रमाणे त्यांची हॉस्पिटल डाएट ची व्यवस्था केली आणि आम्ही परत एकदा काकूंना भेटायला गेलो. मगाशी सगळ्या मालकिणी भेटून गेल्याने त्यांना आनंद झाला होता... थोडा वेळ बसून मी ही ऊद्या दुपारी येते सांगून निघाले.


घरी पोहचे पर्यंत रात्रीचे ८ वाजून गेले होते... मी जाई पर्यंत आईंनी स्वयंपाक करून ठेवला होता, "अहो आई मी केल असत आल्यावर, आज तुम्हाला फारच दगदग झाली" "चालत गं एखाद दिवस... आज तुझी ही खूप धावपळ झाली, कशी आहे ग तब्बेत अनिताच्या आईची?" "सुधारत्ये, अजून चार पाच दिवस लिक्विड डाएट वर ठेवतिल मग हळूहळू सगळ येईल खाता" एकी कडे हात पाय धुता धुता आम्ही बोलत होतो... आईंना मी काकूंच्या कामावरच्या मालकिणींनी अनिताला केलेली मदत सांगितली आणि रोज सकाळी आलटून पालटून त्या अनिताला सोडवायला येणार असल्याचे सांगितले... "अरे वा! किती योग्य निर्णय आहे त्यांचा" "तुझ काय ठरलय?" "उद्या ऑफिसला जाईन, हाफ डेने हॉस्पिटलला जाईन आणि पुढची आर्थिक मदती संदर्भातली कामे करून घेईन" "काकूंना हॉस्पिटल डाएट लावलय, आत्ता अनिताला कॅन्टीन मधे जेवायला सांगितलय, उद्या सकाळी ती घरी जाईल आणि जेवून थोडा आराम करून येईल हॉस्पिटलला" "हे बर झाल बघ पोरीला थोडी विश्रांती मिळेल" आम्ही बोलतोय तो पर्यंत श्री ही आला... "काय म्हणतोय पेशंट" "ऑल ओके आहे" "चल ये हात पाय धूवून, जेवतांनाच बोलू आपण" जेवता जेवता श्रीला सगळ सांगितलं "बघ जगात अशी चांगली माणसं असतात ना मधु म्हणून जग चालतय गं" मागची सगळी आवरा आवर करून मीही झोपायला गेल. काल पासूनचे ओझ मनावरून उतरल होतं... पाठ टेकताच कधी डोळा लागला कळलच नाही.

सकाळी उठल्या बरोबर अनिताला फोन केला. काकूंची चौकशी केली सगळ व्यवस्थित होत... बर वाटलं. नेहमीच्या सवयीने सकाळची काम पटापट आवरून साडे आठ ला घरून निघाले नऊ दहाची लोकल पकडायची होती नेहमीची... नेहमी प्रमाणे प्लॅटफॉर्म गर्दीने फुललेला होता... लेडीज डब्या जवळ पोहचले तेंव्हा गाडी प्लॅटफॉर्म वर शिरतच होती... नेहमी प्रमाणे उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची गडबड ढकला ढकल सुरु झाली आत चला आत चला करत गाडीत घुसले... मला चर्चगेटलाच उतरायचे असल्याने हळुहळु आत गेले.... आता अंधेरी पर्यंत तरी निवांत असणार होतं, माझ्या विरारच्या मैत्रिणींचा ग्रुप होता तिथे गेले... "काय ग मधु बरी आहे का अनिताच्या आईची तब्बेत?? काय म्हणाले डॉक्टर??" लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. त्यांना सर्व माहिती दिली. लगेच सगळ्या म्हणाल्या "काही मदत लागली तर कळव आम्ही पण कॉन्ट्रीब्युशन काढतो तेवढीच तिला मदत..." "हो चालेल मी आज हाप डे जाणारे हॉस्पिटल मधे उद्या भेटू तेंव्ह द्या" या सगळ्यात दादर कधी आल कळलं नाही... दादरला बसायला मिळालं....ग्रुप मधल्या बऱ्याच जणी उद्या भेटू गं म्हणत दादरला उतरल्या... आम्ही दोघी तिघी चर्चगेटला गेलो... स्टेशन वर उतरल्या वर प्रत्येकीने आपापली दिशा धरली आणि आम्ही पांगलो! 

ऑफिस मधे गेल्या गेल्या हाप डे साठी अर्ज केला...बॉसनी थोडी कुरकुर केली पण केली रजा सँगशन... मी ही कामाला लागले... लंच पर्यंत बरीचशी काम आटोपून घेतली... आणि निघाले.. स्टेशन वर पोहचले तेंव्हा बोरीवली लोकल लागलीच होती...दुपारची वेळ असल्याने गर्दी थोडी कमी होती... नशिबाने विंडो सिट मिळाली... खिडकीला टेकून निवांत डोळे मिटून घेतले... डोळ्या समोरून दोन दिवसाच्या घटना चित्रपटा सारख्या सरकून गेल्या... कोण कुठली अनिता आपल्याला भेटते काय आणि आपण तिच्या साठी उभं रहातो काय.... सगळंच वेगळ होतं... मनात आल आपले मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असल्या शिवाय हे होणार नाही... ट्रेन मधे अनेक जण भेटतात काहींशी मन जुळतात काहींशी नाही... तेवढ्यात बोरीवली आलं... उतरुन मी हॉस्पिटलला गेले.

मला पोहचायला २ वाजून गेले होते. मी Icu जवळ गेले अनिताच्या आईच्या मालकिणबाई आल्या होत्या... अनिता ही घरी जाऊन आली होती... "काय म्हणतोय आपला पेशंट" "बरी आहे आई, आपण इथूनच तिच्या जेवण्याची व्यवस्था केल्या मुळे बर झालं ताई" "सगळ वेळच्या वेळी होतय" "तुम्ही या भेटून आईला" मी थोड्या वेळाने मी काकूंना भेटून आले... कालच्या पेक्षा बराच फरक दिसत होता... त्यांना म्हंटल लवकर बऱ्या व्हा... म्हणजे घरी जाता येईल ... त्याही म्हणाल्या "अहो झोपून कंटाळा आलाय पण काय करणार??" थोडा वेळ थांबून मी बाहेर आले... अनिता बसली होती तिला विचारल "सगळी कागद पत्र आणलिस का?? " "हो ताई, झेरॉक्स पण आणल्या आहेत" आम्ही दोघी आर्थिक मदती साठी अर्ज करायला गेला... कागद पत्र तपासून क्लार्क म्हणाला या "फुले योजनेत यांना मदत मिळू शकेल" त्या प्रमाणे अर्जाचे काम करून घेतले आणि डॉक्टरांना भेटायला गेलो... "नमस्कार डॉक्टर, काय म्हणतोय आमचा पेशंट?" "रिकव्हरी छान आहे.. उद्या जनरल मधे शिफ्ट करूया आणि मग तेरवा डिस्चार्ज देऊ" "बायोप्सिच कळल का काही?" "ऑनलाईन रिपोर्ट आलेत... काळजी सारख काही नाही बिनाईन आहे," "थँक्यु डॉक्टर चिंताच मिटली... अनिता सगळ ओके आहे" आम्ही बाहेर आलो... पुढील दोन दिवसांची व्यवस्था लावून अनिताला म्हंटल डिस्चार्जच्या वेळेला येते... उद्या परवा "श्री" येऊन जाईल... आणि मी निघाले, घरी आल्या बरोबर माझा प्रसन्न चेहरा पाहूनच आई म्हणाल्या "सगळं ठीक ना?" "एकदम ok" "ट्युमरची गाठ ही कॅन्सरची नाही साधी आहे" "मना वरच ओझ उतरल" "हात पाय धुवून देवा जवळ साखर ठेवते"....

पुढचे दोन दिवस भुर्कन गेले... माझ्या विरारच्या मैत्रिणिंनी चांगली पाच हजाराची मदत केली, ऑफीस मधल्यांनी ही दिले पैसे आणि मुख्य म्हणजे अनिताच कुटूंब अल्प उत्पन्न गटात मोडत असल्याने ऑपरेशन चा खर्च शासना कडून मिळणार होता... अनिताच्या वरचा आर्थिक भार बराच कमी झाला आईच्या पुढच्या औषधोपचारा साठी तिच्या जवळ पैसे शिल्लक राहीले... डिस्चार्जच्या दिवशी मी रजा घेतली होती... हॉस्पिटल मधून दोघींना घरी सोडल तेंव्हा दोघींच्या चेहऱ्या वरचे आनंदी भाव पाहून फार बर वाटलं... अनिता मला म्हणाली "ताई, तुम्ही नसतात तर काय झालं असतं हो?" "तुम्ही मला धीर दिलात सगळ केलत आमच्या साठी हे सगळ कोणी आपलच करू शकत" "अग वेडे मी तुमचीच आहे... आपले मागच्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत म्हणूनच आपण भेटलो बाळा" "आता नेहमी लक्षात ठेव मी कायम तुझ्या सोबत आहे" अनिता गळ्यात पडून मुसमुसत होती... मी तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांतवत होते.


@माधवी ठाकूरदेसाई

Post a Comment (0)
Previous Post Next Post