जिवती

        जिवती  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ स्मिता मुंगळे


     "आई,अग सांगितलं ना तुला,मी ती पुरणपोळी खाणार नाही म्हणून." चिरंजीव रागाने म्हणाले खरे पण तरीही ती तेवढ्याच शांतपणे म्हणाली,"अरे राजा मीही तुला कालच सांगितलं होतं ना की उद्या श्रावण शुक्रवार आहे म्हणून.तुझ्या कॉलेजच्या वेळात आवरावे म्हणून मी तुझ्यासाठी पहाटे उठून स्वयंपाकाला लागले रे." "वा,म्हणजे आज सकाळी वॉक,प्राणायाम सगळ्याला सुट्टी दिलेली दिसते."
चिरंजीव आवाजाची पट्टी आणखी उंचावत बोलले."अग आई,डॉक्टरांनी तुला न चुकता व्यायाम करायला सांगितला आहे,लक्षात आहे ना?

उगाच दमत बसतेस आणि मग माझे हे दुखते नी ते दुखते सुरू करतेस."

      आपल्या आईच्या तब्येतीच्या हल्ली तक्रारी सुरू झाल्यात हे मुलाच्या लक्षात आहे हे ऐकूनही तिला मनातून खूप बरे वाटले.आपलं शेंडेफळ बघता बघता मोठं झालं की! तिला उगाचच हसू आलं.आपण समजतो तेवढी हल्लीची पिढी बेफिकीर नाहीये तर.

    ती लेकाची समजूत काढत म्हणाली,"वयानुसार तब्येतीच्या किरकोळ तक्रारी तर सुरू होणारच ना रे आणि मी रोज न चुकता व्यायाम करते ह.तुझा कसा आठवड्यातून एखादा दिवस खाण्यापिण्याचा,अभ्यासाचा 'चिट डे' असतो ना तसाच माझा आजचा दिवस समज."

     तरुण रक्त,ऐकेल तर शपथ.कॉलेजमध्ये जायच्या गडबडीत देखील ही मुलं आई बापाशी वाद घालणं थांबवत नाहीत.म्हणाला,"आई,पण हे असं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून,मुलांना आवडत नसताना उगाच सारखं गोडधोडच पदार्थ कशाला करायचे? रोज वेगवेगळे वार,निरनिराळ्या व्रतवैकल्याच्या नावाखाली नैवेद्य, आरत्या,पोथी वाचन हे सगळं करून नक्की काय मिळतं ग तुला यातून?"

    आता मात्र याला समजावून सांगायलाच हवं असा विचार करून ती म्हणाली,"अरे,प्रत्येक गोष्ट काहीतरी मिळवण्यासाठी किंवा काही फायदा होण्यासाठी करत नाहीत.केव्हा केव्हा एखादी गोष्ट करण्यातून मिळणार समाधान देखील लाखमोलाचे असते.तुला नाही कळणार ते.जावू दे,मी पण काय तुझ्याशी वाद घालत बसलीये.खूप काम आहे आज मला."

    शेवटी लेक न जेवताच कॉलेजला गेला.तिला खूप वाईट वाटले.खरे तर श्रावणातल्या शुक्रवारी जिवतीची पूजा,सवाष्ण जेवण असं सगळं आपल्या मुलाबाळांसाठीच तर करतो ना आपण,पण या मुलांना त्याचं काहीच कसं वाटत नाही? कसे वाटणार म्हणा,त्यासाठी कशावर तरी श्रद्धा असावी लागते. इथे परिक्षेला जाताना आपण त्याला देवाला नमस्कार कर असे सांगितले तरी त्याकडे दुर्लक्ष करून अगदी निघताना आपल्याला नमस्कार करतो हा मुलगा.वर म्हणतो कसा,माझी आईच देव आहे माझ्यासाठी. काय बोलणार याला?

      विचारांच्या नादात स्वयंपाक आवरला.सवाष्ण जेवून गेली.तिची खणानारळाने ओटी भरली,जाताना तिच्या मुलांना पुरणपोळ्या डब्यात घालून दिल्या.कामवाल्या मावशींना जेवायला वाढलं,त्यांची सुद्धा ओटी भरली.रोज घरी काम करणारी सवाष्ण होती ना ती.शेवटी ती जेवायला बसली.मात्र मुलगा काहीच न खाता कॉलेजला गेला याची रुखरुख मनाला लागली होतीच.आधीच पहाटेपासून काम करून दमल्याने आणि लेक उपाशीपोटी गेल्याने तिला जेवणच गेलं नाही.

        दिवसभर मुलाचे बोलणे आठवत राहिले."काय मिळते तुला हे सगळं करून?",या त्याच्या प्रश्नावर ती विचार करत राहिली.खरचं का करतो आपण हे?आपल्या मनात हा प्रश्न कधी आलाच नाही.लहानपणापासून आईला हे सगळं करताना बघतच मोठे झालो.आपल्या लहानपणी असे प्रश्न विचारायची तरी कुठे मुभा होती म्हणा."सांगते तेवढं कर.का,कधी,कसे असले प्रश्न आगाऊपणे विचारू नयेत लहान मुलांनी."

आईचं किंवा आजीचं उत्तर ठरलेलं असे.आता लहान मुलं प्रश्न विचारतात तर त्यांना 'चौकस बुद्धी'म्हणून कौतुक केलं जातं.आपल्या लहानपणी हा आगाऊपणा समजला जायचा.हे आठवूनही तिला हसू आलं.

      लग्नानंतर तर सासरी खूप सारे कुळधर्म, कुळाचार होते. सासूबाई करायच्याही सगळं अगदी श्रद्धेने. त्यामुळे आपणही तेच सुरू ठेवले पुढे.तशाही आपण पूर्णवेळ गृहिणीच तर होतो.त्यामुळे वेळ नाही असे म्हणायची वेळच आली नाही.उलट सगळं व्यवस्थित केलंच पाहिजे अशीच सगळ्यांची अपेक्षा असे.आपल्यालाही मग यातच आनंद वाटू लागला.मात्र सासूबाईंनी वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारल्याने घराची सूत्र आपसूक आपल्याकडे आल्यावर मात्र आपण त्यात कालानुरूप योग्य ते बदल केलेच की.जुने ते सगळेच टाकाऊ नाही आणि सगळेच बरोबरही नाही याची जाणीव आपल्यालाही वाढत्या वयानुरूप होत होती.आपण केलेले बदल सासूबाईंनी मोठ्या मनाने स्वीकारले सुद्धा.पण आपण मनापासून करत असलेले सणवार बघून त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसायचे ते बघण्यातही आपल्याला आनंद वाटायचा.

      आता मात्र ही पुढची पिढी जुन काहीच स्वीकारायला तयार नाहीये.काही सांगायला जावं तर ऐकायची देखील तयारी नसते यांची.त्यांच्याकडे वेळच नाहीये एवढं खरं.

      विचारात हरवलेल्या तिची तंद्री भंग झाली ती वाजणाऱ्या बेलमुळे.दार उघडले तर समोर लेक दोन,तीन मित्रांना घेऊन आला होता. हे मित्र मंडळ आज पहिल्यांदाच घरी आले होते.विचारल्यावर समजले की ही मुलं होस्टेलवर रहाणारी आहेत.तिच्या मनात आलं,यांना होस्टेलवर कुठली आलीये पुरणपोळी?त्यांनाही आज घराची, आईची आठवण येत असेल का?

      तिने लेकाला विचारले,"भूक लागली असेल ना रे,सकाळी जेवला पण नाहीयेस."स्वारी अजून रागावलेली दिसत होती."आम्ही पिझ्झा खायला निघालोय",एवढंच उत्तर आलं.त्याकडे लक्ष न देता ती हॉलमध्ये बसलेल्या मुलांकडे जात म्हणाली,"तुम्हाला आवडते का रे पुरणपोळी?"

"हो, आवडते ना पण होस्टेलच्या मेसमध्ये कशी मिळणार आम्हाला?"तिघेही एकदमच उत्तरले.

    तिने पटकन तवा गॅसवर ठेवला.सकाळी करून ठेवलेल्या पुरणपोळ्या तयार होत्याच.त्याच तूप लावून तव्यावर गरम केल्या आणि मुलांना खायला दिल्या.सोबत तोंडी लावायला लोणचं होतंच. मुलं खुश झाली.पोटभर जेवली.त्यांचं बघून तिचा लेकही स्वतःच आला आणि,"मलाही दे ग एक पोळी" असं हळूच म्हणाला.तिला हसूच आलं.पठठयाने नाही नाही म्हणत दोन पोळ्या आवडीने खाल्ल्या.सकाळचा नाराजीचा सूर कुठल्या कुठे पळून गेला होता.

      खाणं झाल्यावर तिने देवापुढे दिवा लावला. जिवतीच्या फोटोला दूध साखर आणि फुटण्याचा नैवेद्य दाखवून आरती केली आणि लेकाबरोबरच त्याच्या मित्रांनाही श्रावण शुक्रवार म्हणून ओवाळले.घरापासून लांब राहणाऱ्या त्या मुलांना खाऊ घातल्याने आणि आईच्या मायेने ओवाळल्याने तिला प्रचंड समाधान वाटत होते.त्या मुलांमध्ये तिला  तिची सातासमुद्रापार शिकायला गेलेली लेक दिसू लागली.लेकीच्या आठवणीने तिचा कंठ दाटून आला.मात्र तिला एका गोष्टीची खात्री  वाटत होती की आज आपल्या लेकीलाही त्या परक्या देशात कोणीतरी असेच आपुलकीने वागवत असेल.या विचारासरशी तिचा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळाला.

        मित्रांना गेटपर्यंत सोडून आल्यावर लेक काहीच बोलला नाही फक्त त्याने आईला घट्ट मिठी मारली.जणू त्याच्या मित्रांच्या वतीने तो आपल्या आईला थँक्स म्हणत होता.

    न राहून तिने त्याला विचारलेच,"काय मग,आवडली का पुरणपोळी?"तर म्हणतो कसा,"आवडते ग तशी मला पुरणपोळी.पण उगाच ती करताना तू दमतेस, खूप व्याप असतो ना त्याचा,म्हणून नको म्हणतो मी.बाकी काही नाही." मुलगा आपली एवढी काळजी घेतोय हे बघून तिला अगदी भरून आलं.तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तसे आईला म्हणाला,"तू हे सगळं करून जे समाधान मिळवतेस म्हणतेस ना ते आत्ता पटलं.माझ्या मित्रांना किती प्रेमाने आणि आग्रहाने पुरणपोळी खाऊ घातलीस,ओवाळलेस आणि त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचे समाधानी,तृप्त भाव बघून मी सकाळी उगाच तुझ्याशी वाद घातला असे वाटले.आई,रिअली सॉरी."असे म्हणून ती त्याच्या खोलीत पळाला.

      ती देवघरात गेली आणि जिवतीच्या फोटोपुढे हात जोडून उभी राहिली तेव्हा गरम पुरणपोळी खाल्य्यानंतरचे सवाष्णच्या  चेहऱ्यावरचे तृप्त भाव,लेकरांना पुरणपोळ्या घरी नेतानाचे कामवाल्या मावशींच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव आणि औक्षण केल्यानंतर मुलाच्या मित्रांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव तिला  त्या जिवतीच्या फोटोतही  दिसले.

                          सौ.स्मिता मुंगळे.

             

1 Comments

  1. स्मिता जिवतीची पूजा छानच.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post