कर्मफळ

 कर्मफळ (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ मिलिंद अष्टपुत्रे 

आज अनयसाठी तसा निवांतच दिवस होता. ऑफिसमध्ये गेलो काय किंवा नाही गेलो काय, काहीच फरक पडणार नव्हता. आयकर भरण्याची शेवटची तारीख उलटून दोन दिवस झाले होते. एकतीस जुलैची रात्र तर वैऱ्याची होती. अनय त्याच्या सहकार्‍यांसह रात्रभर क्लायंट्सचे रिटर्नस् फाईल करण्याचं काम करत होता. ऐनवेळी जागे होण्याची लोकांची सवय अनय सारख्या सी.ए. साठी मात्र झोप उडवणारी ठरली होती, पण आता डेडलाईन निघून गेल्याने सगळेच निवांत होते.  घरात बसून तरी काय करायचे असा विचार करून अनय ऑफिसकडे निघाला. जेव्हा भरपूर वेळ असे तेव्हा अनय नेहमी सिटी बसने ऑफिसला जायचा. तेवढेच आपल्या गाडीने होणारे प्रदूषण कमी आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेला हातभार !!

  बस स्टॉप वर फार गर्दी नव्हती. दोन स्त्रिया व एक म्हातारे गृहस्थ बस स्टॉप वर उभे होते. अनयचे निरीक्षण चालू झाले. म्हातारे गृहस्थ बरेच वयस्कर असावेत. नव्वदीच्या पुढचे ... अंगात साधेच पण स्वच्छ धुतलेले कपडे, डोक्याला कानटोपी, एका हातात काठी तर दुसऱ्या हातात पिशवी अशा अवतारात ते बसची वाट पाहत होते. पाचेक मिनिटात बस आली. पूर्ण भरलेली .... त्या दोन स्त्रिया बसमध्ये पटकन चढल्या. आजोबांनाही बहुतेक हीच बस हवी असावी पण त्यांनी बसमध्ये चढण्याची हालचाल सुरू करण्यापूर्वीच बस निघून गेली. अनय आजोबांजवळ जाऊन उभा राहिला.


" कुठे जायचंय आजोबा ?" त्याने आपुलकीनं विचारलं.


" बँकेत निघालोय रे पोरा ... आज माझं डिपॉझिट मॅच्युअर झालंय, त्याचं नूतनीकरण करायचे आहे." हातातील पिशवी हलवत मोठ्या आवाजात त्यांनी सांगितले.


" कुठली बँक आहे तुमची ?" आजोबांना सरळ रिक्षानेच बँकेत सोडावे असा विचार करून अनयने प्रश्न केला. दोन मिनिट आजोबा स्तब्धच उभे राहिले.


" तीच रे ती ... पानाच्या टपरी शेजारची ..." स्वतःशीच बोलल्याप्रमाणे आजोबा बोलले. 


' बापरे म्हणजे यांना बँकेचं नावही आठवत नाहीये ... कसे पोचणार हे बँकेपर्यंत ?' अनय विचार करू लागला. यांच्या घरच्यांची कमाल आहे ! या वयात हे एकटेच निघालेत बँकेत ...


" घरी कोण कोण असतं तुमच्या आजोबा ?" अनयने विचारले.


" मी मुलाच्या घरी राहतो ना ! तो, आमची सुनबाई आणि एक नातू असे सगळे राहतो आम्ही ... " कापऱ्या आवाजात ते उत्तरले.


" मग या वयात ही कामे तुम्ही का करताय ? मुलाला सांगायचे ना करायला .. " अनय म्हणाला.


" अरे मुलगा कसचा करतो माझी कामे ... त्याला तर मीच नको आहे .... माझं मलाच करावं लागणार सगळं ! ही होती तोपर्यंत आम्ही दोघे मिळून करायचो , पण दोन वर्षांपूर्वी ही गेली आणि मी एकटा पडलो. " बोलता-बोलता आजोबा थांबले. बायकोच्या आठवणीनं भावूक झाले. अनय गहिवरला !


" कुठे राहता तुम्ही आजोबा ?" अनयने विचारले.


" येथेच रे जवळच .... ती पानाची टपरी आहे ना, त्याच्या शेजारीच घर आहे आमचं ...." हातवारे करत आजोबा म्हणाले. अनयच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. ' म्हणजे घर कुठे आहे हेही त्यांना आठवत नाहीये, आता काय करायचे ?' अनय विचार करू लागला.

" शेंगदाणे .... गरम-गरम शेंगदाणे ... " शेंगदाणे विकणारा बस स्टॉप जवळून जात होता.


  " ऐ शेंगदाणेवाला ... मला दे बरं शेंगदाणे ...." कापऱ्या आवाजात आजोबा ओरडले.


" भूक लागली आहे का आजोबा ? देऊ का तुम्हाला शेंगदाणे खायला ?" अनयने काळजीने विचारले.


" होय रे पोरा ... दोन दिवसांपासून काहीच खाल्लं नाही ना रे .... पाय लटपटत आहेत माझे !" खोल आवाजात आजोबा बोलले. रागाची तीव्र सणक अनयच्या डोक्यातून गेली.


" तुम्ही येथे बसा बरं पहिल्यांदा !" आजोबांना बस स्टॉपच्या बाकावर बसवत, अनयने शेंगदाणे विकणाऱ्याकडून शेंगदाणे घेतले.


" घ्या आजोबा, खाऊन घ्या पहिल्यांदा ! आणि हे पाणी प्या बरं !" स्वतःच्या बॅगमधून पाण्याची बाटली काढत अनय म्हणाला.


शेंगदाणेवाल्याने दिलेले दाणे अधाशासारखे तोंडात भरत आजोबा बाकावर बसले. 


" थू ... थू ... " आजोबा तोंडातून शेंगदाणे थुंकू लागलेले पाहून अनय बुचकळ्यात पडला.


" माझे दात घरीच आहेत. शेंगदाणे कसे खाणार मी ?" आजोबा उद्गारले. 


" मग मऊ काही तरी आणून देऊ का खायला  ?" अनयने आस्थेनं विचारलं. 


" माझ्या टिफिन मधील पोळी भाजी खाता का ?" बॅगेतून टिफिन काढत अनय म्हणाला.


" नको पोरा एवढा त्रास घेऊ माझ्यासाठी ... उपाशी राहायची सवय आहे मला ..."  कापऱ्या आवाजातील आजोबांचे बोलणे ऐकून अनयला भडभडून आले. कधी एकदा आजोबांच्या नतद्रष्ट मुलाला भेटून त्याची कानउघडणी करतो असं त्याला झालं. तेवढ्यात रस्त्यावरून सुसाट वेगाने जाणारी पांढऱ्या रंगाची महागडी कार बस स्टॉपपाशी थांबली. ड्रायव्हर सीट शेजारील फ्रंट सीटवर बसलेला एक तरुण दार उघडून खाली उतरला.


" दादा ... तुम्ही इथं आला होय माझी नजर चुकवून ? माझी हवा टाईट केली तुम्ही तर ..."  आजोबांकडे जात तो म्हणाला. त्याच्या अंगावर सिक्युरिटीचे कपडे होते.


" चला घरी लवकर ... मालकांना कळले तर नोकरी जाईल माझी ..." आजोबांचा हात पकडत तो तरुण म्हणाला.


" कोण रे तू ? मला कशाला ओढतोयस गाडीकडे ? मला पळवून नेऊन तुला काहीच मिळणार नाही. माझा मुलगा तुला फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. जा लांब माझ्यापासून ..." कापऱ्या आवाजात आजोबांनी आरडाओरडा सुरू केला .


"असं काय करताय दादा ? चला हो लवकर घरी ..." गयावया करत तो तरुण वॉचमन म्हणाला. इतका वेळ हा सर्व प्रकार पहात असणाऱ्या अनयला आता मात्र रहावेना.


" एक मिनिट ! तुम्ही कोण आहात आणि या आजोबांना कोठे नेत आहात ? " चढ्या सुरात त्याने त्या वॉचमनला विचारले.


" अहो साहेब ... हे आमच्या मालकांचे वडील आहेत. सकाळी माझी नजर चुकवून बंगल्यातून कसे काय पळाले कोण जाणे ... मालकांना कळलं तर नोकरी जाईल माझी !" आर्जवी सुरात वॉचमन बोलला.


" कोण आहेत तुमचे मालक ?" उत्सुकतेने अनयने विचारले.


" साहेब ... प्रसिद्ध ऍडव्होकेट बोरकर  आमचे मालक आहेत. आणि हे दादा , मालकांचे वडील आहेत." वॉचमन म्हणाला, आणि अनय अवाकच झाला.  ऍडव्होकेट बोरकर म्हणजे बडे प्रस्थ होतं शहरातलं ... हायकोर्टातील इतके नावाजलेले वकील वडिलांशी असं वागत असतील असा विचार स्वप्नातही कोणी केला नसेल. हा वॉचमन खरं बोलतोय असं वाटत तरी होतं अनयला, पण हल्ली कोणावरच भरवसा ठेवता येत नाही.


" एक मिनिट थांब ..." वॉचमनला जागेवरच रोखत अनयने आजोबांकडे आपला मोर्चा वळवला.


" आजोबा, तुम्ही ओळखता का याला ? हा वॉचमन आहे का तुमच्या घरचा ? " अनय विचारता झाला.


" अरे मी नाही ओळखत याला ... आमच्या घरी कुठला वॉचमन, एका खोलीत तर राहतो आम्ही ?" झटक्यात अजोबा बोलले आणि त्या तरुण वॉचमनने


 निराशेने स्वतःच्या कपाळावर हात मारला.


" कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी दहा मिनिटे गेट सोडले ... दादांनी डाव साधला आणि पळून आले ... आज काही नोकरी टिकत नाही माझी !" उद्विग्नतेने तो स्वतःशीच पुटपुटला. हे कोडे इतक्या सहजासहजी सुटणार नाही हे अनयला आता उमगले होते. पोलिसांना फोन करावा का ? त्याच्या मनात विचार आला. पण नको ... कॉम्प्लिकेशन अजूनच वाढेल. त्यापेक्षा या वॉचमन बरोबर आजोबांना घेऊन बोरकरांच्या घरीच जावे हे उत्तम, म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल.


" मी एकटा आजोबांना तुझ्याबरोबर सोडणार नाही. मी पण येतो तुमच्या बरोबर ! मला  ऍडव्होकेट बोरकरांना भेटायचे आहे." ठामपणे अनय वॉचमनला म्हणाला.


" साहेब, मालकांना दादांनी केलेले प्रताप कळले तर पहिल्यांदा माझी नोकरी जाईल ... पण आता पर्याय नाही ... काय होईल ते होईल ! चला तुम्ही पण आमच्याबरोबर ..." निराशेने डोके हलवत तो वॉचमन पुटपुटला. 

सगळी वरात कार मधून निघाली. आजोबा गाडीतून येण्यास अनुत्सुक होते पण अनय पुढे त्यांचं काही चाललं नाही.  पाच ते सात मिनिटात कार एका प्रशस्त बंगल्यापुढे येऊन उभी राहिली. आतील माणसाने भव्य गेटचे दार उघडले आणि कार आत शिरली. कारमधून उतरून अनयने चोहीकडे नजर फिरवली. ऍडव्होकेट बोरकर यांच्या नावाला शोभेल असाच बंगला होता. बंगल्याभोवती अतिशय सुरेख झाडांची बाग निगुतीने वाढवलेली दिसत होती. बंगल्यात शिरताच पावलोपावली बोरकरांच्या ऐश्वर्याची प्रचिती येत होती. सर्वजण दिवाणखान्यात शिरले आणि एका उंची सोफ्यावर स्थानापन्न झाले. वॉचमनने दादांचा हात घट्ट धरला होता.


" राजेश, मालकांना आम्ही आलो आहोत म्हणून निरोप दे ... " तेथील फर्निचर पुसत असलेल्या पोऱ्याला वॉचमन म्हणाला. राजेश आत गेला आणि पाचच मिनिटात भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे  ऍडव्होकेट बोरकर दिवाणखान्यात आले. बोरकरांकडे बघून दादा पटकन सोफ्यावरून उठले आणि आत जाण्यासाठी निघाले.


" पुन्हा नाही जाणार एकटा कुठे सांगितल्याशिवाय, पण मारू नकोस ... मी जातो माझ्या खोलीत ...." घाबरलेल्या कापऱ्या स्वरात दादा पुटपुटत होते. बोरकरांनी आपली करडी नजर वॉचमनकडे वळवली.


" चूक झाली मालक ... पाच मिनिटासाठी मी गेटवर नव्हतो आणि दादा निसटले !" चोरट्या आवाजात वॉचमन पुटपुटला. ऍडव्होकेट बोरकरांनी हात वर करून त्याचे बोलणे थांबवले.


" नंतर बोलू आपण .. निघ तू !! " पडत्या फळाची आज्ञा घेऊन वॉचमन तेथून सटकला. आता दिवाणखान्यात फक्त अनय आणि ऍडव्होकेट बोरकर उरले.

"आपण .. ?" अनयकडे रोखून  बघत बोरकरांनी विचारले.


" मी अनय प्रधान !! व्यवसायाने सीए आहे. ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो होतो आणि बस स्टॉपवर तुमच्या वडिलांशी गाठ पडली. सॉरी टू से मिस्टर बोरकर पण तुमच्या वडिलांची अवस्था बघवली नाही मला !!" कडवट स्वरात अनय म्हणाला.


"काय सांगितलं दादांनी तुम्हाला माझ्याबद्दल ?"  खोल सुस्कारा सोडत बोरकरांनी अनयला विचारले.


" ते काही सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हते मिस्टर बोरकर ... ही इज सिक ! दोन दिवसांचे उपाशी आहे ते !! धिस इज रियली शेमफुल !!!" तीव्र स्वरात अनय म्हणाला. बोरकरांना काही बोलायची संधीही न देता त्याने आपले बोलणे पुढे रेटले.


" आपल्या सारख्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती मिस्टर बोरकर .... इतक्या उतारवयातील स्वतःच्या वडिलांशी तुम्ही इतक्या निष्ठूरतेने वागू तरी कसे शकता ? धिस इज शॉकिंग !!" 


 दोन मिनिटं पूर्ण शांतता पसरली. रुमालानं चष्मा पुसून बोरकरांनी तो पुन्हा नाकावर ठेवला. शांतपणे त्यांनी अनयकडे पाहिले.


" यू आर राईट यंग मॅन ! माय फादर इज सिक !! पण तू नाण्याची एकच बाजू बघून तुझं मत बनवतोयस्. आता थोडं मी काय सांगतो ते ऐक ... हे माझे वडील, ज्यांना आम्ही सर्व दादा म्हणतो ते शारीरिक दृष्ट्या जरी सुस्थितीत दिसत असले तरी मानसिक पातळीवर खूप आजारी आहेत. त्यांना शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे पण काहीही उपयोग अद्याप झालेला नाही. मी त्यांचा मुलगा ... त्यांचा छळ करतो .... त्यांना उपाशी ठेवतो .... त्यांना निष्ठूरपणे मारहाण करतो .... असे ते सर्वांना संधी मिळेल तेव्हा सांगत असतात. कारण त्यांच्या मनानेच ते ठरवले आहे. आणि यामागे त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ कारणीभूत आहे !! " एवढं बोलून ऍडव्होकेट बोरकर थबकले. समोरच्या टीपॉयवर ठेवलेल्या पेल्यातील पाण्याचा घोट घेऊन त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

" कर्मफळ हा शब्द तू ऐकला आहेस का कधी ? नक्कीच ऐकला असशील ... आपण केलेल्या सत्कर्म किंवा दुष्कर्माचे फळ म्हणजे कर्मफळ ... आपल्या हिंदू धर्मात कर्मसिद्धांत हा अतिशय प्रभावशाली सिद्धांत असून जवळपास सर्वजण यावर विश्वास ठेवतात. मी स्वतः आस्तिक नाही, किंबहुना मी बराचसा नास्तिक विचारांकडे झुकलेला माणूस आहे. मूर्तीरूपातील देवावर माझा विश्वास नाही, मात्र या विश्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या अलौकिक शक्तीवर मी विश्वास ठेवतो. इतकी वर्षे मी कर्मसिद्धांतावर कधीच विश्वास ठेवला नव्हता. पण गेल्या काही वर्षातील दादांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे कर्मसिद्धांतावर मी विश्वास ठेवू लागलोय.


  मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा !! दादांचा तर मी अतिशय लाडका ... त्यांचा जीव की प्राण .... माझ्या आजवरच्या आयुष्यात दादांनी कधीही माझ्यावर हात उगारलेला मला आठवत नाही .... लहानपणी मी अतिशय गरिबीत वाढलो आहे. दादा एका खाजगी कंपनीत कारकून होते. माझी आजी, आजोबा, मी आणि आई व दादा आम्ही भाड्याच्या एका खोलीत राहत होतो. दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही पाच जण राहायचो. माझी आजी त्यामानाने फारच लवकर निवर्तली. माझे आजोबा मात्र दीर्घायुषी !! निरोगी व व्यसनमुक्त जीवनशैलीमुळे त्यांना कुठलाही आजार नव्हता. परंतु हे दीर्घायुष्यच त्यांना शापासारखं भोवलं .... दादा आजोबांचा खूप दुस्वास करायचे ... त्यांना उपाशी ठेवणं, मारहाण करणं हे अगदी नित्याची बाब होती. वयाची साठी उलटली तरी कोणतीच प्रायव्हसी आयुष्यात न मिळाल्याने त्याचं खापर दादा आजोबांवर फोडायचे. आत्ता दादांची जी अवस्था तू पाहिलीस ना अगदी तशीच अवस्था माझ्या आजोबांची असायची ... दिवसभर उपाशीतापाशी भटकून रात्री उशिरा ते फक्त झोपण्यासाठी घरी यायचे .... सकाळ होताच दादा त्यांना पुन्हा घराबाहेर काढायचे. मी त्यावेळी वीस-बावीस वर्षांचा असेन. दादांच वागणं मला पटायचं नाही पण त्याविरुद्ध बोलायची हिंमत मात्र मी कधीच करू शकलो नाही. एके दिवशी आजोबा बेवारस असल्यासारखे फुटपाथवर वारल्याची बातमी आली ... सुटले बिचारे मुलाच्या तावडीतून ....


त्यानंतर इतक्या वर्षांनी दादांची अवस्था आजोबांसारखीच झाली आहे. त्यावेळी दादा आजोबांची जसे वागत होते अगदी तसचं मी त्यांच्याशी वागतोय हा पक्का ग्रह दादांनी करून घेतला आहे, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते घरातून पळून जातात आणि आजोबांनी भोगलेल्या -अपेष्टा भोगतात ... कित्येक वेळा सुग्रास अन्नाचे ताट जसेच्या तसे त्यांच्या खोलीतून परत येते ... ते जेवूच शकत नाहीत ... कर्मफळ म्हणायचे नाही तर काय म्हणायचे याला ?

 हे सगळं थांबवणं आता कोणाच्याच हातात राहिलेलं नाही. दादांबरोबरच या सर्वाचा शेवट होईल असं वाटतंय ... "

  बोरकर बोलायचे थांबले आणि दिग्मूढ होऊन हे सर्व ऐकणारा अनय भानावर आला. काय बोलावे हे त्याला सुचत नव्हते.


" सॉरी, बोरकर साहेब ... मी नकळत आपल्याला नाही नाही ते बोलून दुखावले !! " अपराधी स्वरात अनय म्हणाला.


" ते माझे कर्मफळ आहे ... " उदासपणे हसत ऍडव्होकेट बोरकर म्हणाले.


" कदाचित मी दादांना त्यावेळी विरोध करायला हवा होता, जेणेकरून माझ्या आजोबांच्या हाल-अपेष्टा कमी झाल्या असत्या ... पण होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल न बोललेलंच बरं !!" बोलणे थांबवून बोरकरांनी पुन्हा एकदा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. 


"काय घेणार तुम्ही अनय ? चहा की कॉफी ?" हलकेसे हसत ऍडव्होकेट बोरकरांनी विचारले.


" खरं सांगू सर  ... काही घ्यायची इच्छाच राहिली नाही !! पुन्हा कधीतरी नक्की येईन भेटायला ... निघतो मी आता ... "


उठून उभा राहत अनय म्हणाला.


" बाय द वे , तुमचा मुलगा म्हणजे दादांचा नातू कुठे दिसला नाही ... दादा म्हणत होते की तुम्ही चौघे एकत्र राहता म्हणून !!" अनयने सहजच विचारावे तसे विचारले.


" मी निपुत्रिक आहे अनय ! मी माझी पत्नी आणि दादा असे तिघेच या बंगल्यात राहतो." ऍडव्होकेट बोरकरांनी उभे राहात हात जोडले.

 बंगल्याबाहेर पडता-पडता अनयने नकळत मागे वळून पाहिले.


 पहिल्या मजल्याच्या खोलीतील खिडकीत उभे असलेले दादा त्याला जीभ बाहेर काढून वेडावून दाखवत होते.

©मिलिंद अष्टपुत्रे

ही कथा वाचून पहा. 👇

ठसठसणारी ठुशी

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post