गुंता
लेखिका- सविता किरनाळे
सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
“गुड ईवनिंग दिल्ली, कैसे हो आप. मैं आपकी दोस्त और होस्ट आलिया.” सुंदर, हुशार आरजे आलिया मल्होत्रा ऑन एअर होती. रात्रीचे आठ वाजले होते आणि तिचा शो नुकताच सुरू झाला होता. श्रोत्यांशी गप्पा, गाणी, त्यांच्या काही छोट्या समस्या सोडवणे असे शोचे स्वरूप होते.
निलांजन घोष ड्राइविंग करताना आलियाचा कार्यक्रम ऐकत होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ती नव्वदीच्या दशकातील गाणी लावे आणि जसाजसा वेळ पुढे सरकत जाई तसेतसे जुन्या गाण्यांच्या जादूमध्ये श्रोते हरवून जात. निलांजन इलेक्ट्रिक उपकरणं बनवणाऱ्या एका प्रतिथयश परदेशी कम्पनीचा मार्केटिंगचा झोनल हेड होता. दिल्लीच्या उच्चभ्रू भागात त्याने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. परंतु तो बहुतांश वेळा कामानिमित्त फिरतीवरच राहत असे. मग तो परत येईपर्यंत घराची नुसती अवस्था होवून जात असे. तो सध्या यावर उपाय शोधत होता. आलियाचा कार्यक्रम ऐकताना अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्याने ती सांगत असलेल्या नंबरवर कॉल केला आणि आपण एका रूममेटच्या शोधात असल्याचे सांगून घराचा एरिया सांगितला. आरजे आलियाने आपल्या श्रोत्यांना निलांजनची मदत करण्याची विनंती केली. निलांजनने फक्त एक खडा टाकून पाहिला होता पण प्रत्यक्षात त्याला प्रतिसादाची अपेक्षा नव्हती.
आपला कार्यक्रम संपल्यावर आलिया इतर दोन आरजेसोबत चॅनेलने नियुक्त केलेल्या कॅबची वाट पाहत होती. रात्रीचे अकरा वाजून गेले होते, घरी पोहचता पोहोचता तिला आरामात बारा वाजून गेले असते. आपल्या काकीचा आठ्यांनी भरलेला चेहरा आठवून आलियाला कसेसेच झाले. हरियाणाच्या एका छोट्या शहरातून आलेल्या आलियाने मास मीडिया अँड कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवून आपल्या टॅलेंटच्या जोरावर ही भरपूर पगाराची नोकरी पटकावली होती. सध्या ती दिल्लीत आपल्या काका काकूंकडे राहत होती. ती त्यांना दरमहा घरखर्चाला काही रक्कम देत असे पण जुन्या वळणाच्या काकूला तिचे उशिरा घरी येणे आवडत नसे. ‘आपण आपल्या इतर सहकाऱ्यांसारखे स्वतंत्र खोली करून किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहावे का, निदान रोज उठून ऐकावे लागणारे हे टोमणे तरी वाचतील’, आलिया विचारात बुडून गेली होती.
दुसऱ्या दिवशी स्टूडियोला जातानाही आलियाच्या मनात तोच विषय घोळत होता. तिने निर्णय घेतला होता. पोहोचताच तिने आपल्या काही सहकाऱ्यांना आपल्यासाठी घर पाहण्यास सांगितले आणि ती ऑन एअर गेली. कार्यक्रम चालू असतानाच तिला अचानक काल एका माणसाने रूममेट पाहिजे असल्याचे सांगितल्याचे आठवले. आलियाने त्याला कॉल करून पाहायचे ठरवले. जाहिराती लागताच तिने कालच्या कॉल रेकाॅर्ड्समधून निलांजनचा नंबर शोधून सेव केला. कार्यक्रम संपल्यावर बाहेर येवून तिने त्याला फोन केला.
“हॅलो, मी आलिया मल्होत्रा बोलते आहे. काल तुम्ही एफ.एम वर रूममेटच्या शोधात असल्याचे सांगितले होते. मला त्या संदर्भात बोलायचे होते.” अगदी स्पष्ट आणि मुद्देसूदपणे आपला उद्देश सांगितला.
“हाय, मी निलांजन घोष. मी दोन बेडरूमचे घर रेंटवर घेतले आहे. परंतु माझ्या नोकरीमुळे मी बरेचदा दिल्लीबाहेरच असतो. घर बंदच असते. रूममेट असेल तर निदान माणसांचा वावर राहील, थोडी स्वच्छता राहील म्हणून मी तशी जाहिरात दिली होती. तुम्हाला जर घर पाहायचे असेल तर उद्या येवू शकता कारण मी परवापासून एक आठवडा टूरवर चाललो आहे.”
आलियाने निदान घर पाहून तरी घेण्याचे ठरवले. तसे तिने निलांजनला सांगताच त्याने पत्ता एसएमएस केला.
दुसऱ्या दिवशी दुपारी आलिया निलांजनने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. तिने एक सुंदर हिरवा कुर्ता आणि पांढरी जीन पँट घातली होती. मोठ्या इअर रिंग, गळ्यात चोकर आणि हलकासा मेकअप तिचे रूप खुलवत होते. निलांजन घरचे कपडे म्हणजे टी शर्ट आणि बर्मुडा पँट घातली होती. टी शर्टमधून त्याचे बलदंड शरीर जाणवत होते. तो एक रूबाबदार बंगाली पुरूष होता. आलियाने त्याच्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष केले आणि ती घर पाहू लागली. तो एक वेल फर्निश्ड फ्लॅट होता. किचनमध्ये गरजेच्या सर्व वस्तू होत्या.
“दोन बेडरूम्स आहेत, त्यातील एक मी वापरतो. दुसरी तुम्ही घेवू शकता.” निलांजन म्हणाला.
याबाबतीत आलियाला काही अडचण नव्हती. तिला घर आवडले होते आणि तसेही निलांजन बरेचदा घराच्या बाहेरच राहायचा. तिला हवे असलेले स्वातंत्र्य इथे मिळणार होते. घरभाडे आणि इतर गोष्टींबाबत रितसर चर्चा करून आलियाने दुसऱ्यादिवशी राहायला यायचे ठरवले. निलांजनने तिला दुसरी चावी दिली. मग ती आपल्या कामाला निघून गेली.
आठवडाभराने निलांजन जेव्हा घरी आला तेव्हा आलिया घरी नव्हती पण घराचे रूप आमुलाग्र बदलले होते. लिविंग रूममधील काही वस्तूंची जागा बदलली होती, काही नव्या वस्तू दिसत होत्या. त्याची आई नेहमी म्हणायची, ज्या घरावर बाईचा हात फिरतो ते आनंदाने हसते. आज निलांजनला आपले घरही खुशीने हसत असल्यासारखे वाटले. फ्रेश होवून आपले काम आवरून तो रात्रीच्या स्वयंपाकाला लागला. आलिया जेवणार की नाही हे त्याला माहीत नव्हते आणि आता ती व्यस्त असल्याने फोन करूनही काही फायदा झाला नसता म्हणून त्याने तिच्या नावाचेही जेवण बनवण्याचे ठरवले. पौष्टिक आणि बनवायला सोपे म्हणून त्याने राजमा - भात बनवला. आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीनिमित्त बरीच वर्ष घरापासून दूर असल्याने निलांजनला उत्तम स्वयंपाक यायचा.
रात्री आलिया घरी आली तेव्हा निलांजन टीवी बघत हॉलमध्ये बसला होता. हाय हॅलो झाल्यावर त्याने तिला जेवणाबद्दल विचारले. ती जेवली नाही हे समजताच निलांजनने मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करून ती फ्रेश होवून येईपर्यंत डायनिंग टेबलवर मांडून ठेवले. आलिया ते पाहून प्रभावित झाली. निलांजनने तिला जेवून घेण्यास सांगितले. एक घास घेताच निलांजन उत्तम स्वयंपाक करत असल्याची तिला कल्पना आली. थोडावेळ जुजबी बोलून दोघे आपापल्या खोलीत गेले. सकाळी निलांजन उठला तेव्हा आलियाने नाश्ता बनवला होता. तो खातानाच त्यांनी ठरवून टाकले, की रोज सकाळचा नाश्ता आलियाने, दुपारचे जेवण दोघांनी मिळून तर रात्रीचे निलांजनने बनवायचे. कारण निलांजन सकाळी लवकर उठायचा नाही तर आलियाचा जॉब रात्रीचा होता.
दिवस भराभर पुढे सरकत होते. सततच्या सहवासाने आलिया आणि निलांजनचे नातेही हाऊसमेट वरून रूममेटपर्यंत पोहोचले होते. दिल्लीसारख्या मेट्रो सिटीमध्ये उच्चभ्रू जीवन जगणाऱ्या या दोघांना त्यात काही वावगे वाटत नव्हते. खरं सांगायचे झाले तर दोघेही मुक्त जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या तरुणाईचे प्रतीक होते. लग्नाआधी एकत्र राहणे, लिव इन रिलेशनमध्ये असणे या गोष्टी त्यांच्या वर्तुळात अगदी सामान्य होत्या. निलांजन आलियामध्ये फक्त शरीरानेच नाही तर मनानेही गुंतत चालला होता. त्याने आलियाजवळ नाते आॅफिशियल करण्याची गोष्ट काढली. आधी आलियाने उत्तर देणे टाळले पण त्याने जेव्हा गोष्ट लावून धरली तेव्हा तिने नकार दिला.
“निलांजन हो आपण तीन वर्षापासून एकत्र राहतोय पण मला इतक्यात तुझ्याशीच नाही तर कोणासोबतही कसलीच कमिटमेंट करायची नाही आहे. मला करियरमध्ये अजून खूप पुढे जायचे आहे. लग्न मग त्यानंतर होणारी मुलंबाळ हे त्यामध्ये अडथळा बनू शकतात. म्हणून I am sorry, आपण इथेच थांबूया. तू तुला हव्या त्या मार्गाने जावू शकतो आणि मलाही जावू दे.”
आलियाने इतक्या स्पष्टपणे सांगितल्यावर निलांजनकडे काही पर्याय उरला नाही. त्याने तिला जावू देणेच श्रेयस्कर समजले. दोन दिवसात आपले सामान घेवून आलिया दुसरीकडे राहायला निघून गेली. तसे करणे तिला उचित वाटले.
एकमेकांपासून वेगळं झालेल्या निलांजन आणि आलियाचे आयुष्य चाकं लावून धावत होते. आलियाने आपल्या क्षेत्रात चांगले नाव कमावले होते आणि निलांजनचीही घोडदौड चालूच होती. अशात निलांजनला एका पार्टीमध्ये उर्वशी राय भेटली. उर्वशी नावाप्रमाणेच अप्सरा होती. पार्टीमधील जवळजवळ सगळे पुरुष तिच्यावर छाप पाडायचा प्रयत्न करत होते पण उर्वशी सरळ निलांजनच्या बाजूला येवून बसली आणि त्याच्यासोबत गप्पा मारू लागली. बोलता बोलता त्यांच्या लक्षात आले, की ती निलांजनच्या एका मित्राची मावसबहीण आहे. दोघांच्या गप्पांना उधाण आले. ओळखी निघाल्या. टीपिकल बंगाली माणसांप्रमाणे संगीत, पुस्तके आणि मासे या गोष्टींची दोघांनाही आवड होती. नंबर एक्सचेंज झाले आणि दोघे एकमेकांच्या नेहमी संपर्कात राहू लागले.
उर्वशी फक्त देखणीच नाही तर बुद्धिमान, चतुर ही होती. निलांजनला उर्वशीच आपली जीवनसाथी असावी असे वाटू लागले. दुसरीकडे उर्वशीलाही हा उच्चशिक्षित, देखणा, कर्तृत्ववान तरुण आवडला होता. दोघांनी एकमेकांजवळ मन मोकळे केले आणि आपापल्या पालकांच्या कानावर ही गोष्ट घातली. नाव ठेवण्यासारखे काही नव्हतेच म्हणून लवकरच उर्वशी रायची उर्वशी घोष होणार यावर शिक्कामोर्तब झाले.
साखरपुड्याची अंगठी निवडण्यासाठी निलांजन आणि उर्वशी दिल्लीमधील एका नामांकित शोरूममध्ये गेले. योगायोगाने आलियाही आपल्या आईसाठी हार खरेदी करायला तिथे आली होती. निलांजनला पाहून तिने त्याला हाक मारली. त्याने मागे वळून पाहताच त्याला आलिया दिसली, अधिकच सुंदर दिसणारी, आत्मविश्वासाने भरलेली. आलियाही निलांजनचे निरीक्षण करत होती, तो आनंदात दिसत होता. त्या आनंदाचे प्रतिबिंब त्याच्या हसऱ्या डोळ्यात दिसत होते. नेहमीप्रमाणे आलिया निलांजनला मिठी मारणार तेवढ्यात एक सुंदरी त्याचा हात पकडून त्याला काही दाखवू लागली. निलांजनने उर्वशी आणि आलियाची ओळख करून दिली. ‘ही माझी फियान्सी, उर्वशी’, असे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरील अभिमान सहज दिसून येत होता. तो अभिमान आणि उर्वशीचे सौंदर्य पाहून आलियाला कोणीतरी आपल्या नाकावर ठोसा मारला आहे असे वाटले. काहीतरी बोलून ती तिथून निघून गेली.
जरी आलिया दुकानातून निघून घरी आली तरी तिच्या नजरेसमोरून उर्वशीने निलांजनचा हात धरल्याचे दृश्य जात नव्हते. किती आनंदात होता तो तिच्यासोबत.... अचानक उर्वशीबाबत तिच्या मनात प्रचंड असूया दाटून आली. आपल्या हक्काचे काहीतरी उर्वशीने हिरावून घेतले आहे असे तिला वाटू लागले.
‘नाही, निलांजनची पहिली पसंद मी होते. त्याने स्वतःहून माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. मी नाही म्हटलं म्हणून, नाहीतर आज तिच्या जागी मी असते. आम्ही एकत्र राहायचो, तिच्यापेक्षा मी त्याला चांगले ओळखते. मीच त्याला खूश ठेवू शकते. तो फक्त माझा आहे.’ आलियाचे मन असे बरळत होते. मत्सराग्नीने ती नुसती जळत होती. खरंतर तिनेच निलांजनसोबतचे नाते संपवले होते म्हणून तिचा आता त्याच्यावर किंवा त्याच्या आयुष्यावर काही हक्क नव्हता. पण ती हा भूतकाळ सोयीस्करपणे विसरत होती किंवा त्याकडे दुर्लक्ष करत होती.
आलियाने दुसऱ्या दिवशी निलांजनला फोन केला आणि एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. भेटायला जाताना तिने मुद्दाम वेळ घेवून चांगला मेकअप केला. क्रॉप टॉप आणि स्किन टाईट पँट घालून ती निघाली. आपले सौंदर्य उठून दिसावे आणि आपण उर्वशीपेक्षा चांगल्या आहोत हे त्याला दाखवण्याचा तिचा उद्देश होता. पण तिच्या मनासारखे घडले नाही. ती निलांजनवर आपला प्रभाव टाकू शकली नाही. कारण निलांजन उर्वशीच्या प्रेमात अखंड बुडाला असल्याने त्याच्यावर आलियाची जादू चालली नाही. हे पाहून आलियाचा नुसता जळफळाट झाला. तिने त्याला नेहमी मेसेज, कॉल करण्याचा सपाटा लावला. ‘मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते. आपण परत एकत्र येवू. मला सोडून जावू नकोस’ अशा आशयाच्या तिच्या मेसेजेसने निलांजन वैतागून गेला. त्याने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी.
आलियाचे हे निलांजन वेड वाढतच चालले होते. त्याच्याशी ब्रेकअप करताना तिने जास्त विचार केला नव्हता पण नंतर तिला तो लग्नासाठी किती परफेक्ट आहे हे समजू लागले होते. इतका योग्य मुलगा हातचा जातोय म्हटल्यावर तिचा तोल ढळला. याची दुसरी बाजू अशीही होती, की तिचे आधी खरेच त्याच्यावर प्रेम होते पण करियरच्या नादात तिने ते नाकारले होते. आता तेच दान उर्वशीच्या पदरात पडताना तिला पाहावत नव्हते. म्हणून ती निलांजनवर दबाव आणत होती.
थोड्याच दिवसात निलांजन आणि उर्वशीचा साखरपुडा संपन्न झाला. आलिया देत असलेल्या त्रासाबद्दल निलांजन कुणाला काही बोलला नव्हता. आलिया आता त्याला राजेरोसपणे धमकावत होती. स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करणार म्हणत होती. त्याने स्वतःचा नंबर बदलला, सोशल मीडियावर तिला ब्लॉक केले तर ती ईमेल करून बोलू लागली. तो निलांजनचा आॅफिशियल ईमेल आयडी असल्याने तो बदलण्याचा प्रश्नच नव्हता. आता निलांजनने आपण तिच्याविरूद्ध पोलिसात तक्रार करू असे आलियाला सांगितले. ‘तर मग त्या आधीच मी काही तरी करेन पण त्याआधी तू अडकशील याची खात्री करून घेईन.’ ती त्वेषाने बोलली.
निलांजनला काय करावे ते सूचत नव्हते. तो असाच दिशाहीनपणे आपली कार घेवून रस्त्यावर भटकत असे. एफएम वर गाणी ऐकताना त्याला आपले आणि आलियाचे पहिले संभाषण आठवत असे. का आपण तिला त्यादिवशी कॉल केला? का आपण तिच्या प्रेमात पडलो? एकदा सोडून गेल्यावर ती परत आपल्या जीवनात कशासाठी आली? अशा विचाराने त्याचे मन भंडावून जात असे. एक दिवस सहज चॅनेल बदलताना त्याच्या कानावर आवाज आला, ‘दिलसे दिलतक अपने मन की बात शेअर करो आरजे शिवन्याके साथ’. निलांजन ऐकतच राहिला. ‘हा आवाज आलियाचा आहे का? पण ती तर दुसऱ्या चॅनेलसाठी काम करते ना, कदाचित ही दुसरी असेल’, असे म्हणून तो ऐकू लागला. लोक प्रेमाच्या बाबतीतील आपल्या व्यथा, समस्या आरजेला सांगत होते आणि ती आपल्या परीने त्यांना उत्तर, सल्ले देत होती. एका हळव्या क्षणी निलांजनला वाटले, की आपली समस्या अशा घटनेने सुरू झाली तर कदाचित अशानेच सुटेल.
निलांजनने चॅनेलला कॉल केला. आरजे शिवन्या त्याचे बोलणे ऐकत होती. तो भडाभडा मनात साचलेलं बोलत होता, आपले मन मोकळं करत होता, त्याची बाजू मांडत होता. आरजे, श्रोते सगळे सुन्न होवून ऐकत होते. त्याची भावनिक घुसमट त्यांना जाणवत होती. सोशल मीडियावर चॅनेलच्या हॅंडलवर, पेजवर धडाधड सल्ले, लिव इन रिलेशनशिपबद्दल, मुलगा आणि मुलगी यांचे एकत्र राहण्यातील फायदे तोटे अशा बऱ्याच गोष्टींबाबत चर्चा, वादविवाद झडू लागले. फास्टेस्ट कम्युनिकेशनच्या या युगात अवघ्या काही मिनिटात, अजून निलांजन बोलत असतानाच, हा लाईव शो जगभर पोहोचला होता. तिकडे स्टूडियोमध्ये निलांजनची बाजू, त्याची मानसिक अवस्था पाहून शिवन्याला घटनेतील गांभीर्य समजले होते. घशात दाटून येणारा हुंदका आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावून तिने आवरला. ‘मला या गुंत्यातून कसे बाहेर यावे ते समजत नाही. माझ्या फियान्सीवर माझे जीवापाड प्रेम आहे. पण ही दुसरी मुलगी मला जगू देत नाहीये. मला जीव द्यावासा वाटतोय.’ तो बोलत होता.
आरजेने त्याला थांबवले. ती बोलू लागली, “तुम्ही एक खूप चांगली व्यक्ती आहात. आता तुम्ही अशा कोंडीत सापडला असलात तरी प्रत्येक प्रश्नाला उरते हे असतेच. तुम्ही शांत डोक्याने विचार करा. आपल्या प्रेयसीला विश्वासात घेवून सर्व काही सांगा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला कोणासोबत राहायचे आहे हा निर्णय घ्या. जर त्या मुलीचे खरेच तुमच्यावर प्रेम असेल तर ती तुम्हाला या लेवलपर्यंत ढकलणार नाही. मनाच्या कोपऱ्यात मला असे वाटत आहे, की तिला तुमची बाजू समजली असून ती यावर नक्की विचार करेल. कुणा एकासाठी आपले जीवन पणाला लावण्याइतके स्वस्त नक्कीच नाही.”
हे बोलणे ऐकून निलांजनच्या मनावरील ओझे उतरले. खूप महिन्यानंतर त्याचे दडपण कमी झाले होते.
जाहिराती चालू करून, कानावरील हेडसेट बाजूला ठेवून ती टेबलावर डोके ठेवून ती हमसाहमशी रडू लागली. आपल्यामुळे तो अशा भयानक मानसिक अवस्थेत पोहोचला। तेही काही चूक नसताना हे लक्षात आल्यावर तिला स्वतःची घृणा वाटू लागली. डोळे पुसून तिने आत्ता ज्या नंबरवरून कॉल आला त्या नंबरवर मेसेज पाठवला, ‘I am extremely sorry for pushing you so hard, henceforth will not bother you ever. Always stay happy with your girl. All the best.’
मेसेज पाठवून तो नंबर डिलीट करून आरजे शिवन्या उर्फ आलिया दुसऱ्या श्रोत्याशी बोलू लागली. नंबर बरोबरच तिने मत्सरही डिलीट केला होता.
©️Savita Kirnale
वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.