दुभंगलेल्या काचा

 दुभंगलेल्या काचा 

✍️ सौ. अमृता देशपांडे 

नव-याचा अंगावरचा पाय तिने त्वेषाने बाजूला फेकला आणि ती झटक्यात उठली. तोच तिचा निर्वस्त्र देह तिला आरश्यात दिसला, आणि तिला स्वत:चा प्रचंड राग आला. नव-याच्या पायाशी असलेले तिचे कपडे तिने पटकन उचलले आणि ती बाथरूममध्ये पळाली. अंगाला येणारा नव-याचा वास तिला नकोसा वाटू लागला म्हणून तिने शॉवर सुरू केला. डोक्यावर पडणारे थंडगार पाणी आणि गालांवरून ओघळणारे ऊष्ण पाणी यांचे एक चमत्कारीक मिश्रण तयार झाले. पाण्याने अंग-अंग स्वच्छ झाल्याने आणि रडून मनातले मळभ धुवून निघाल्याने तिला जरा बरे वाटू लागले. आपल्या लेकीच्या झोपलेल्या लोभसवाण्या चेह-याकडे बघून ती स्वयंपाकघराकडे वळली…

हल्ली हे असं अनेकदा व्हायचं... आताशा तिची वासनेची भूक कमीकमी होऊन  स्पर्शाची भूक मात्र वाढली होती. तिच्या नव-याला या दोघांतला फरक कळायचा नाही आणि ती तो समजावू शकायची नाही, त्यामुळे दोघांच्या मनातली दरी दिवसेंदिवस वाढत चालली होती. तिच्या नव-याला तिच्या मनातली ही खळबळ कधी कळायची नाही. ज्या माणसाला प्रणयाराधनेत आपला जोडीदारही आनंद उपभोगतोय कि नाही हे ओळखता येत नाही त्याला अंतर्मनातली खळबळ काय उमजणार...

तिचे आणि त्याचे अरेंज मॅरेज. दोघेही मध्यमवर्गीय घरातले. तसा तो वाईट नव्हता...  दिसायला ठीकठाक,कुठलेही व्यसन नसलेला…तसा पूर्णपणे निर्व्यसनीही नाही म्हणता येणार, कारण मित्रांबरोबर अधूनमधून पार्ट्या व्हायच्या त्याच्या. पण लग्नानंतर पूर्णपणे बंद करण्याचे वचन  दिले होते त्याने तिला... सर्वसाधारण बुद्धिमत्ता आणि खाऊन-पिऊन सुखी घरातला. तीदेखील दिसायला चारचौघींसारखीच, सर्वसाधारण  बुद्धिमत्ता असलेली मुलगी. फार काही अपेक्षा त्याच्याही नव्हत्या आणि तिच्याही. परंतु अन्न, वस्त्र, निवारा आणि मैथून यापलिकडेही माणसाची एक भावनिक गरज असते याची तिला जाणीव होती, त्यालाही असावी अशी लग्नापूर्वी तरी तिची समजूत होती.

परंतु लग्नानंतर काही दिवसांतच आपली समजूत किती खोटी होती याची तिला पावलोपावली जाणीव होऊ लागली... लग्नानंतर काही दिवसांतच तिचा नवरा मुल होऊ देण्याकरता तिच्या मागे लागला.  तिचे म्हणणे असे होते, की सुरुवातीचे काही दिवस आपण आपल्या दोघांच्या नात्याकरता, एकमेकांना समजून घेण्यासाठी द्यायला हवे. त्याचे मात्र निराळेच मत होते. त्याला प्रत्येक गोष्टींत हिशोब मांडण्याची सवय होती. आत्ता आपले वय इतके आहे, तेव्हा आत्ता एक मुल, मग पाच वर्षांनी दुसरे, म्हणजे आपल्या नोकरीतून रिटायर्मेंट्पर्यंत दोन्ही मुलांची शिक्षणं व्हायला हवीत, इथपर्यंतचे त्याचे नियोजन ठरलेले होते. फक्त त्या नियोजनात तिचा विचार केलेला नव्हता.

लग्नाच्या सुरुवातीच्या काळात शारिरीक जवळिकीलाच प्रेम समजण्याची चूक प्र्त्येक माणूस कमीअधिक प्रमाणात करतच असतो. ती तिथेच फसली. आणि त्याच्या इच्छेला शरण गेली. आणि लग्नानंतर अवघ्या दहाव्या महिन्यात एका गोंडस मुलीची आई झाली.तिने त्यातही आनंदच मानला. परंतु बाळाच्या आगमनानंतर नव-याच्या अचानक बदलेल्या वागणुकीने ती बिथरली. सगळ्यात जास्त तिला खटकलेली गोष्ट म्हणजे, नऊ महिने त्रास सहन करून, आयुष्यात पहिल्यांदाच सिझेरियनचे कठीण ऑपरेशन सहन करून आपण एका गोंडस बाळाला जन्म दिला यासाठी आपल्या पतीने निदान आपल्याला धन्यवाद द्यावे ही तिची इच्छा पूर्ण झाली नाही. त्यानंतर संध्याकाळी ऑफिसमधून आल्यापासून ते रात्री झोपतपर्यंत फक्त आणि फक्त बाळाकडेच लक्ष देणे, बायकोच्या तब्येतीची साधी चौकशीही न करणे या गोष्टी तिच्या काळजाला टोचत होत्या. तिच्या अंगाला केवळ स्पर्श करणेही त्याने सोडून दिले होते. त्यात बाळंतपणातील नवखेपणा, दिवसातून चार वेळा बाळाला स्तनपान, बाळाचे शी-सूचे कपडे बदलणे, रात्रीची जागरणे, तिची स्वत:ची तब्येत, पथ्यपाणी, हार्मोनल इम्बॅलेंस... यासगळ्यात  तिची बिचारीची एवढीच अपेक्षा असायची की, बाळाला मनसोक्त खेळवून झाल्यावर दोन क्षण नव-याने कुशीत घ्यावे, पाठीवरून हात फिरवावा, कुठे दुखतंय-खुपतंय का विचारावं, बस्स! बाकी काही नको होतं तिला... पण ते त्याला कधी समजलंच नाही... पण त्यामुळे तिची चीडचीड होऊ लागली. आणि त्याची परिणती कुठलाही राग कुठेही काढणे, कधीकधी अगदी बाळावरही... ज्याच्या अर्थ परस्पर त्याने असा काढला, की तिला आई व्हायचंच नव्हतं आणि तिचे आपल्या बाळावर प्रेमच नाही... तसे अजिबात नव्हते, परंतु एक स्त्री आई झाली म्हणजे काय तिच्या स्वत:च्या स्त्री म्हणून जाणिवा संपतात का? तिच्या भावनिक गरजा संपतात का? हे समजून न घेतल्यामुळे नव-यावर अवास्तव संशय घेणे, ऑफिसमधून उशीरा आल्यास घर डोक्यावर घेणे... चिडणे-रडणे-अबोला-माफी मागणे - दोघांमध्ये मानसिक दरी हे दुष्चक्र सुरू झाले

हे सगळे सावरते न सावरते तोच अजून एका वादळाची चाहुल लागली... त्याची त्याच्या मूळ गावी बदली... तिचा तिच्या सासरच्यांवर असा काही व्यक्तिगत राग नव्हता, परंतु तिच्या माहेरच्या लोकांच्या राहणीमानात, मानसिकतेत आणि सासरच्या लोकांच्या राहणीमानात, मानसिकतेत  प्रचंड तफावत होती. तिचे माहेर थोडे आधुनिक आणि सासर जुन्या वळणाचे. त्यांचे ते आत्यंतिक सोवळे-ओवळे, शेजा-या-पाजा-यांचे घरात अति डोकावणे, सतत तिने बांगड्या घातल्यात कि नाही, जोडवी घातलीत कि नाही याकडे लक्ष ठेवून राहणे, टिपीकल बायकी गप्पा या सगळ्यात तिचा जीव घुसमटायचा... शिवाय जुन्या पद्ध्दतीचे घर, टॉयलेट- बाथरूम घराबाहेर यासगळ्याची तिला अजिबात सवय नव्हती. आणि लहान बाळाला सांभाळत हे सगळे पहाणे म्हणजे ता-यावरची कसरत... त्यात नव-याची अलिप्तता. त्याला वाटायचं, हे तिचं सासर आहे तर तिने हे सगळं निमूटपणे स्विकारलंच पाहिजे... माहेरचे कोणीही तिची मानसिक अवस्था समजून घेणारे नाही, माहेरी सासरचे किस्से सांगितल्यावर त्यांचे हसण्यावारी नेणे, 'चालायचेच' म्हणून सोडून देणे, यामुळे बिचारीची घुसमट अधिकच वाढायची... मग अजून चीडचीड-भांडणं-अबोला... मानसिक दरीत अजूनच वाढ...

सास-यांचा स्वभाव असा, की मी म्हणेन तीच पूर्वदिशा असली पाहिजे, कोणी विरोध करता कामा नये. दिवसांतले आठ ते दहा तास टि.व्ही. बघायचा, बरं तो बघत असताना मध्ये कोणी बोलायचं नाही. थोडावेळसुद्धा नातीला खेळवायचं नाही. फक्त मी, माझी देवपूजा आणि माझा टि.व्ही... इतर दुनियेची काही फिकीर नाही. आधीच तिचं आणि त्याचं बोलणं कमी झालेलं, त्यात सास-यांसमोर बोलायची मुभा नाही, रात्री बेडरूममध्ये बाळ उठेल म्हणून बोलायचं नाही. उरला-सुरला वेळ खायला स्मार्टफोन होताच सोबतीला... मध्यंतरी रात्रीचे जेवण झाल्यावर जरा पाय मोकळे करायला जात होते, तेवढ्याच चार गप्पा होत. थोड्या दिवसांनी तेही कंटाळा करून बंद केले. आता तर घरातले कित्येक आर्थिक अथवा इतर निर्णय तिचे मत विचारात न घेता बाप-लेकात परस्पर घेतले जाऊ लागले. बायको फक्त स्वयंपाकपाणी, मुलीला सांभाळणे आणि शय्यासोबत याच्यापुरतीच उरली होती...

  बरं नवरा-बायकोत जरा काही खुट्ट झालं तर सासरे मध्ये पडणार, मग हिच्या तोंडून रागारागात एखादा वाकडा शब्द बाहेर येण्याचा अवकाश कि सासरे रागावणार, ‘तू माझ्या वडिलांना अशी का बोलली’ म्हणून नवरा अधिकच चिडणार... आधी कसा दुस-या गावी राजा-राणीचा संसार होता, कपातलं वादळ कपातच निवायचं. पण आता तसं राहिलं नाही...

प्रणय? होतो ना अजूनही... त्याला हवा तेव्हा, हवा तसा. पण त्यासाठी तिचा मूड आहे का? नसेल तर का नाही? किंवा कधीकधी तिचा मूड होईल यासाठी काही प्रयत्न करणे, तिचा मूड होईपर्यंत धीर धरणे, स्वत:बरोबरच तिलाही आनंद मिळतोय की नाही ते पाहणे यागोष्टी त्याच्या गावीही नसतात. बरं महिन्यातले ते पाच दिवस तर तिला स्पर्शही करायचा नसतो, मग कुठे दुखतंय- खुपतंय का? हे विचारणं तर दूरच राहिलं...

घरकामात मदत? हो करतो ना, त्याला वाटेल तेव्हा, त्याचा मूड असेल तेव्हा... इतरवेळी तिला गरज असेल तर अनेक विनंत्या कराव्या लागतात, त्या मान्य होतीलच याची काही खात्री नाही, मान्य झाल्या तरी इतक्या त्रासिकपणे कि त्यापेक्षा आपणच केले असते तर बरे झाले असते असे वाटावे... ऑफिसमधून घरी आल्यानंतर मात्र तिने एखादे काम न केल्यास एखाद्या अधिका-यासारखे साहेब जाब विचारणार! आणि तो विचारताना बायकोचा चेहरासुद्धा बघायची तसदी घेणार नाही, मग ती आजारी असेल, तिला ते काम करताना काही अडचण आली असेल अश्या शक्यता तर कधी स्वप्नातसुद्धा डोक्यात किंवा मनात येत नाहीत...

तिच्या नव-याचा तिच्यावर मित्रांना भेटू देत नाही हा आक्षेप आहे.  परंतु तिचा त्याला मित्रांमध्ये मिसळण्याला विरोध नव्हताच कधी, तर मित्रांसोबत दारू पिण्याला विरोध होता. आणि त्यात वावगे काय होते?... घरी मुलगी आणि सासरे सोबत, बाहेर कधी सिनेमाला जायचे तर मित्र आणि त्यांच्या बायकांच्या सोबत... तिला वाटते, नव-याशी मनाने एकरूप व्हावे, मित्रमंडळी, नातेवाईक एका ठराविक मर्यादेपर्यंतचेच सोबती, वडील देवाघरी गेल्यावर, मुलगी सासरी गेल्यावर आपण दोघेच उरू ना एकमेकांचे सोबती? मग आताच का न करावी आपल्या नात्याची वीण पक्की...  कधी आपणहून काही सांगायचे नाही, आपले मन उकलायचे नाही आणि मग त्यामुळे संशय घेतला कि चिडायचे, अश्या स्वभावाच्या माणसासोबत कसे सूर जमणार तिच्यासारख्या हळव्या मनाच्या स्त्रीचे? या सगळ्या विचारांनी डोके गरगरायला लागले, कि त्या मनाला सावरायला तीही मोबाईलचा सहारा घेते, खूप खाते. कारण या दोनच गोष्टी ती मनसोक्त करू शकते. परंतु मनाला बरे वाटले तरी शरीरावर त्याचा प्रभाव पडणारच... डायबेटिस, लठ्ठपणा हा त्याचाच परिणाम. त्यावरून परत नव-याचे, इतरांचे टोमणे येणारच, त्यामुळे परत नैराश्य, परत संशय, परत चीडचीड...  आताशी तर तिचे रडणेही त्याला सहन होत नाही. त्याचे म्हणणे कि 'तू छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेते'. ती म्हणते, 'गोष्टी छोट्याच असतात रे, पण त्यातून समोरच्याची वृत्ती आणि आपल्याबद्दलच्या भावना समजतात ना, त्याचा त्रास होतो...' मान्य आहे काळाबरोबर जबाबदा-या बदलत जातात, पण नाती तर तीच राहतात ना रे? आणि त्यावर झालेले आघात मन नावाच्या काचेला चरे पाडत जातात. मग त्या दुभंगलेल्या काचा सांभाळत आयुष्य जगावं लागतं, कधी विवाहरूपी चौकटीच्या आधारे, तर कधी मुलाबाळांच्या सुखाकडे बघत...


सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर


वरील कथा सौ. अमृता श्रीरंग देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post