ड्यू

 

'ड्यू'


लेखक - सचिन देशपांडे



पलंगावर उठून बसला तो, बाथरुमला जाण्यासाठी. आणि त्याला आपली सहा वर्षांची लेक, एकटीच दिसली खाली गादीवर झोपलेली. बायको नव्हती तिच्या बाजूला. नक्की किती वाजले न कळून... त्याने मग लगेच मान वळवून, आपल्या बाजूला आपला बारा वर्षांचा मोठा लेक आहे की नाही याची खात्री करुन घेतली. तर तो मस्त पांघरुणात, स्वतःला गळ्यापर्यंत गुंडाळून झोपला होता. त्याने बाजूच्या काॅर्नरपिसवर ठेवलेल्या, त्याच्या मोबाईलमध्ये वेळ बघितली. साडेचार वाजले होते. मग त्या मोबाईलच्या उजेडात त्याला दिसलं, बेडरुमचं दार लोटून घेतलेलं. आणि दाराच्या फटीतून येत असलेला, बाहेरच्या कुठल्याशा खोलीतला प्रकाशही दिसला त्याला. मोबाईल पुन्हा ठेऊन देत, तो पलंगावरुन उठला. बेडरुमचं दार उघडलं त्याने. टाॅयलेटला जाऊन आल्यावर तो बाहेर गेला... तर बायको दिसली त्याला हाॅलमध्ये खाली लादीवर बसलेली, तिच्या मोबाईलमध्ये कुठलासा व्हिडिओ बघत कुठल्याशा रेसिपीचा.

"काय गं?... हे काय ह्या वेळी?"

"अरे झोप चाळवली अचानकच... मग पाणी प्यायला उठले... पुन्हा पडले अंथरुणावर तर झोप कुठली लागायला... मग उठले पाचेक मिनिटांतच... पाहिलं तर चार वाजलेले... तुमची झोपमोड नको म्हणून, बाहेर येऊन बसले मग... तू का उठलायस पण?"

"अगं बाथरुमला जाण्यासाठी उठलेलो, तर तू दिसली नाहीस गादीवर... म्हणून म्हंटलं... बरं मग मी जातो झोपायला... आज तसही जरा उशिरानेच लाॅग-ईन करायचंय मला"

"हो... हो..." 

इतकं बोलून तो पुन्हा आत गेला. लेकीच्या अंगावरचं पांघरुण निट केलं त्याने, आणि जाऊन पलंगावर आडवा झाला. पण आता त्यालाही झोप लागेना. ह्या कुशीवरुन त्या कुशीवर वळता वळता, सहजच त्याच्या मनात विचार आला... आपल्या झोपायच्या जागा कशा बदलत गेल्या नाई. म्हणजे लग्न झाल्यावर मी आणि ही बेडवर. मग पहिला मुलगा होऊन तो वर्षाचा होईपर्यंत, बेडवरच माझ्या आणि हिच्या मध्ये तो. त्यानंतर एकतर तो लोळतो, आणि त्यातून झोपेत रांगत बिंगत गेला बेडच्या टोकाशी नी... छे नकोच ती रिस्क म्हणून मग, हिने लेकासोबत खाली गाद्या घालून झोपायला केलेली सुरुवात. लेक चारेक वर्षांचा झाल्यावर, त्याला बेडवर झोपण्याचं वाटू लागलेलं आकर्षण... नी तोपर्यंत बंद झालेलं त्याचं लोळणंही. पण शेजारी मात्र त्याला आईच हवी असल्याकारणाने, मग त्या दोघांच वर झोपू लागणं. आणि अर्थातच खालच्या गादीवर, माझी रवानगी होणं. पुढील वर्ष - सव्वा वर्षातच ही दुसर्‍यांदा प्रेग्नंट राहिल्यावर... रात्री झोपेत लेकाचा पाय वगैरे पोटाला लागायला नको, म्हणून मग ही खाली झोपू लागणं. नी माझं पुन्हा वर बेडवर येणं लेका शेजारी. दुसरी मुलगी झाल्यावर... मग माझं पुन्हा एकदा पलंगावरुन पायऊतार होणं... आणि मुलगा अन् हिच्यामध्ये, मुलगी झोपू लागणं. पण मुलं मोठी होऊ लागल्यावर... आणि तिघांना डबल बेड पुरेनासा झाल्यावर, आई नी मुलीचं खाली गादीवर... तर माझं आणि मुलाचं बेडवर झोपू लागणं. बापरे म्हणजे लग्न झाल्यापासून गेल्या चौदा वर्षात, किती ती स्थित्यंतरं झाली आपल्या झोपायच्या जागेबाबतीत. 

हा विचार डोक्यात येऊन, त्याचच त्याला हसू आलं. आणि अचानक त्याला जाणवलं की... लग्नानंतर फक्त दोनेक वर्षच मी आणि ही, असे आजूबाजूला झोपलोयत. म्हणजे पहिला मुलगा झाल्यापासून ते अगदी आजतागायत, फक्त आम्ही दोघेच असे पलंगावर झोपलेलोच नाही. म्हणजे तिने माझ्या कुर्त्याची सगळी बटणं मोकळी करत, माझ्या छातीवर डोकं टेकून निजणं. किंवा 'गदिमा' म्हणतात तसं... तिचा तो चांदण्यांचा हात उशाला घेऊन, मी झोपी जाणं... हे गेल्या तब्बल एका तपात, झालेलंच नाहीये. आहाहा! काय दिवस होते ते. असं रात्रभर एकमेकांच्या उबेत, विरघळवून टाकायचं स्वतःला. मग कधीतरी पहाटे... अगदी ह्याच वेळी दोघांनाही जाग यायची, पण दाखवायचं कोणीच नाही जाग आल्याचं. कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायचा मग... आणि... आणि. त्या मोरपिशी आठवणींनीच हुळहुळला तो मनापासून, आणि मनातून हळहळलाही. 

आणि अचानक त्याच्या डोक्यात आलं... मुलांची आॅनलाईन शाळा सुरु व्हायला, अजून तीनेक तास अवकाश आहे. मस्त वेळ मिळालाय आपल्याला. ही जागी आहे... अनायसे माझीही झोप उडून, मी ही टक्क जागा आहे. मग उगीच एकट्याने इथे लोळत पडण्यापेक्षा, एक गादी घेऊन बाहेरच जाऊया का? एकाच गादीवर झोपायचं म्हंटलं तर, एकमेकांना चिकटून झोपण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. करुया का पुन्हा जरा रिवाईंड, आयुष्याची कॅसेट? असं स्वतःलाच विचारत... नी स्वतःशीच हसत, तो बेडवरुन हळूच उठला. बायकोची रिकामी गादी त्याने गुंडाळून उचलली. स्वतःचं नी बायकोचं पांघरुण खांद्यावर टाकलं त्याने, नी हळू आवाजात शिळ घालतच बाहेर आला तो. त्याला ह्या एवढ्या इतमामात आलेला बघून... नी त्याच्या तोंडून त्याच्या मनातला विचार ऐकून, ती क्षणभर अवाकच झाली... पण क्षणभरच. त्यानंतर मात्र तिच्यातील गेल्या बर्‍याच वर्षांपासून जास्त जागृत असलेल्या आईवर, तेवढीच वर्ष निद्रिस्त असलेल्या बाईने लगेचच मात केली. आणि ती दोघं अगदी एकमेकांना घट्ट चिकटून निजली पुढचे दोन तास, पण झोपी मात्र नाही गेली. खूप गप्पा मारल्या दोघांनी, अगदी बर्‍याच वर्षांच्या राहून गेलेल्या. 

सात वाजले घड्याळात... आणि कोवळ्या उन्हाची एक तिरीप तिच्या चांदण्यांच्या हातावर पडली, अन् अख्खी उजळून निघाली ती सोनेरी रंगाने... हातचं न राखता. त्याच्या डोक्यावरील केसांतून हल्लीच्या दिवसांतच वाढलेला रुपेरी रंगही, मनापासून झळाळून उठला होता मग. त्याने अलगद आपले ओठ टेकवले तिच्या कानांवर, आणि काहीतरी पुटपुटला तो. तिने ते ऐकून डोळे मोठ्ठे करत, एक लाडीक चापटी मारली त्याच्या खांद्यावर... आणि लाजून मान फिरवली तिने. त्याने तिची हनुवटी धरत... तिचा चेहरा आपल्याकडे करत, डोळ्यांवाटेच तिला पुन्हा विनवणी केली. तिने आपलं बोट स्वतःच्या ओठांवर ठेवत त्याला जोरात 'श्श्शूsss' केलं, नी म्हणाली... "मुलं उठायची वेळ झालीये वेड्या". तो म्हणाला... "नको ना उठवूस त्यांना आपणहून... तासभर आहे अजून स्कूलला". ती म्हणाली... "आणि कोणी आपलं आपणच उठलं तर?". ती हे बोलायला... नी त्यांच्या लेकीने आतूनच 'आईsss' असा आवाज द्यायला, एकच गाठ पडली. "बघ... पाहिलंस"... असं म्हणत ती घाईने उठली. त्याचा चेहरा पडला... खरंतर तिचाही. दोघेही उठले मग गादीवरुन. पांघरुणांच्या घड्या घालता घालता, दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं... आणि जोराचं हसू फुटलं दोघांनाही. एकमेकांना टाळ्या देत, हसू लागले दोघे. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून, लेकच डोळे चोळत बाहेर आली. आपली भांबावलेली लेक पाहून, ती दोघं आणिक जोरात हसू लागली. हसता हसताच तिने लेकीला उचलून घेतलं, नी ती आत जाऊ लागली. हातात गादी घेऊन तिच्या मागेच असलेला तो, अगदी हळूच बोलला... "आता खूप वर्षांपुर्वीसारखी एकत्र आंघोळ 'ड्यू' आहे हा आपली". तिने चालता चालताच आपल्या डाव्या हाताचं कोपर, हलकेच घुसवलं त्याच्या पोटात. आणि मग खूप वर्षांपुर्वीसारखीच, किंचीतशी कळ उठली होती छातीतून त्याच्या.

पण आता यापुढे अशाच काही 'ड्यू' गोष्टींतून... वयाची चाळीशी ओलांडलेल्या, आणि मागील आयुष्य एकमेकांसोबत जगायचं विसरुन गेलेल्या त्या दोघांनी... पुढील आयुष्य मात्र पुरेपूर उपभोगायचं, हे एकमेकांच्या डोळ्यांतून मघाच ठरवलेलं.

---सचिन श. देशपांडे

सदर कथा सचिन देशपांडे यांची असून तिचे संपुर्ण हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत त्यावर आमचा काही अधिकार नाही. शब्दचाफा ब्लॉगवर लेखकांच्या परवानगीने  ती प्रकाशित करण्यात येत आहे.

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post