नगं लागट बोलू



नगं लागट बोलू

© सौ.सपनारवि(यवतमाळ)




     " न्हाय ओ.. वैनी.. न्हाय जमायचं.. हो.. हो.. तुमि म्हणताय त्ये बरोबर हाय . पण मागल्या वरसाला लय कर्ज झालं हुतं.. ते बी फेडायचं हाय.. सारं डाग बँकेत जमा हाय.. हो.. गहाण हाय न्हवं.. न्हायी सोडवलं आजून.. म्हणून त म्या शांतआक्काच्या रुक्मिच्या लग्नाला न्हाय आले.. हो.. हो.. म्या बघते बोलून.. सांगेन तुमास्नी.. आता ठेऊ फोन.. हो जी म्याच करते फोन.." असं बोलून जानकी ने फोन ठेवला..  आणि वळली तर पहाते काय राघव उभा मागे.. त्याचा चेहरा बघून त्याने सारं ऐकलेले दिसतेय.. आधीच काही खोटं बोलायचं म्हटलं की तिला घाबरायला होतं.. हातपाय गळतात तिचे.. राघव ला तर खोटं म्हटलं की प्रचंड तिटकारा..


      ती काही बोलणार एवढ्यात राघव काहीही न बोलता आत निघून गेला..'अरे देवा' जानकी ने जीभ चावली. आता राघवला काय नि कसं समजवावे हाच विचार करत ती त्याच्या मागे आत गेली.. न्याहारीची तयारी करून राघवला आवाज देण्यास वळली तर तो घाईत बाहेर निघालेला.. 

     

      " आवं , जरा न्याहारी तरी करून घ्या.. मी काय म्हणते..." पण पुढचं काही ऐकून न घेताच राघव खाली मान घालून निघून गेला.. बिचारी जानकी न्याहारीची बशी तशीच हातात घेऊन उभी... 


      काय दुर्बुद्धी झाली अन सुमी चं ऐकलं असं झालं जानकी ला.. 


     जानकी , तीन बहिणी.. ती सगळ्यांत थोरली.. तिच्या पेक्षा मोठा दादा.. वडिलांच्या अचानकपणे जाण्याने सारी जबाबदारी दादावर आलेली.. तिघींच शिक्षण पाणी घरदार सारं  दादाला बघायला लागायचं. जेंव्हा राघव कडील स्थळ आलं तेव्हा ऐन एकोणिसाव्या वर्षी जानकी चं लग्न करून दिल्या गेलं.. गरीबाच्या घरी मुलीचं लग्न म्हणजे एक जबाबदारी च्या ओझ्यातून मुक्ती.. जानकी ला काहीच म्हणता आलं नाही. राघवचे स्थळ तिच्या घरच्यांना योग्य वाटत होते.. 


      राघव च्या घरी राघव आणि त्यांचा धाकटा भाऊ विनीत.. राघवच्या  आई ते पंधरा वर्षाचा असतानाच कँसर ने वारल्या.. त्यांच्या पाठोपाठ दोन वर्षांत राघवचे वडील पण गेलेत.. आई वडिलांच्या माघारी राघवने फक्त लहान भावाला आई वडिलांची मायाच लावली नाही तर त्याला चांगले शिकवले.. घडविले.. 


     स्त्री विना घर फक्त मकान असतं.. घरचे शेती चे सगळे एकट्याने बघणे, स्वयंपाक करणे राघव ला त्रासदायक होत होते.. म्हणून त्यांच्या काका आणि भावकीतल्या लोकांनी त्याच्या साठी जानकी चे स्थळ आणले.. राघवला  चोवीसावे लागलेले.. काका-काकू सतत लग्नाचं म्हणत होते त्यामुळे राघव तयार झाले लग्नाला..


      देखणा, उमदा, मेहनती , निर्व्यसनी आणि मितभाषी  राघव जानकी च्या घरच्यांना पसंत पडला..राघव- जानकी ची जोडी अगदी अनुरूप.. गोड, लाघवी जानकी संसारात दुधात साखर विरघळावी तशी मिसळून गेली...

मुळातच मेहनती असलेल्या राघवाने वडिलोपार्जित दहा  एकर जमीन बागेसारखी फुलविली... शेतात विहीर बांधली.. जानकी राघवला सावली सारखी साथ देत होती.. राघवचा लहान भाऊ विनीत तर दोघांना जीव की प्राण.. घराला घरपण आलं.. पण घराचं गोकुळ मात्र झालं नाही.. 


     "आई... आ.. ई..." छोट्या परीच्या आवाजाने जानकी भानावर आली.. चल बाळ म्हणत ती परीला घेऊन आत गेली.. "आई भूक लागली आहे.. काही तरी खायला दे"

 "काय खाणार बाळ.. पोहे हाय.. तुला आवडतात तस्सेच.. दाणे घालून केलेले" "हो  आई ..दे लवकर" ...



     पंधरा वर्षाच्या संसाराची जशी पूर्ण चित्रफीतच.. जानकी च्या डोळ्यासमोरून जात होती.. एरवी राघव ओरडणे तर दूर साधा आवाज वाढवून बोलत नसे.. आजही काही बोलला नाही..पण त्याच्या डोळ्यातील नाराजगी साफ दिसत होती.. आता बोलला तर निदान समजावून तरी सांगता येईल.. सकाळपासून रानात गेलेला घरी आला तर न्याहारी न करताच परत गेला.. नाही म्हटलं तरी मनाला चुटपूट लागूनच राहिली..


      "परी बाळा तुझा बाबा श्री काका कडं हायेत का बघून येती का.. वाईच बघून ये.. खेळत नको थांबू राजा..." जानकी ने परी ला बाहेर पिटाळले.. 


      तीन दिवसांपूर्वी जानकी ला तिच्या वहिनी चा फोन आला होता... तिला पंच्याऐंशी हजार हवे होते.. राघव दाजीसनी मागून दे म्हणून राहिल्या.. पण तिच्या दादाला मात्र यातील काही सांगू नको अशाही म्हणत होत्या.. आता पंच्याऐंशी हजार म्हणजे थोडी थोडकी रक्कम तर नव्हे.. पण दादाच्या माघारी काही व्यवहार करायचं म्हणजे हिम्मतही होत नव्हती..


     काय करू काय नको अशा विचारातच असताना सुमी तिची लहान बहीण आणि धाकटी जाऊ पण ... तिचा फोन आलेला.. सुमी म्हणत होती, "आक्के तुला नाही कळत.. एवढी मोठी रक्कम दादाच्या माघारी देशील तर बघ... तिकडं दाजी बिचारे जीवाचं रान करत्यात पै पै साठी.. आजून तू पैशाने इतकी मोठी नाही झालीस की लाख भराचा व्यवहार कराया.."


     " अगं पर .. यंदा उडीद मुगाचं पीक चांगलं आलं न्हवं.. त्याचे तीनेक लाख आलेत.. वैनी बी इचारात व्हॅत्या.. आसं पटकन नाही बी कसं म्हणू..।एकदा तुझ्या दाजीसनी विचारते बघ.." 

"अक्का मी तुला बहीण म्हणून नाही तर जाऊ म्हणून सांगतेय.. इथं आमी मरमर करतोय.. काल जेव्हा रानात विहीर बांधायची म्हटली तर दिले होते की कुणी पैसे.. आणि मला सांग उडीदामुगाच्या मालाच्या रकमेची गोष्ट वहिनी ला कुणी सांगितले..?" 

"सुमे म्या नाही सांगितले अगं आईसंग बोलली होते म्या" 

" अक्का तुला कधी कळेल गं प्रत्येक गोष्ट नसते सांगायची.. तीन लाखाची गोष्ट सांगितली.. कर्जाची नाही सांगितली होय" 

" सुमे आता ग काय करू???" 

" सांग पैसे नाही म्हणून" 

" खोटं कसं गं बोलू" सुमन 

"अरे देवा!!!आक्के एक तू नि एक दाजी.. हरिश्चंद्र ची अवतार आहात... " 


     जानकी ला कालचं सुमनचं बोलणं जसाच्या तसं डोक्यात फिरून राहिलं.. लग्नाला सहा वर्षे होऊन गेली.. पण जानकी ला मूल होत नव्हतं.. तेंव्हा तालुक्याला दवाखान्यात ट्रीटमेंट करायचं ठरवलं.. तेंव्हा आधार म्हणून सुमन ला जानकी ने आणून घेतलं.. तेंव्हा सुमन बरेच दिवस जानकी कडे जाऊन येऊन असायची.. त्या दिवसांत च जानकी चा देर विनीत आणि सुमन ची मनं जुळली... तिथून जवळपास दीड वर्षानी परी च्या जन्मानंतर राघव ने विनीत साठी सुमन चा हात मागितला.. आणि दोघी बहिणी जावा झाल्यात.. विनीत शहरात शिकत होता.. सोबतच स्पर्धा परीक्षा ची तयारी करीत होता.. त्याने लग्नानंतर ही सुमनला शिकवलं.. ती बी एड झाली.. निवड मंडळाची परीक्षा पास होऊन शाळेवर लागली पण. विनितची ही ट्युशन छान चालल्या..


     दोघेही समंजस... त्यांनी वेळोवेळी राघव दादाला पैसे उभा करून दिला.. म्हणून राघव शेतीत सुधारणा करू शकला.. घर बांधू शकला.. पण विनीत आणि सुमन ला वाटायचं की राघव जानकी साधे आहेत त्यांना कुणीही फसवू शकतात.. त्यामुळे ते दोघे यांच्या व्यवहारात लक्ष देऊन असत.. तेच जर  राघव ने कधी उत्पन्न चा हिस्सा देऊ केला तर ते घेत नसत.. 


     ताईच्या कितीही सांगून  गावात न राहता  सुमन शहरात रहायला गेली.. तिच्या म्हणण्यानुसार थोडं अंतर ठेवून राहिलं की मनाची जवळीक टिकून राहते..


     आजही  वैनीचा फोन आल्या नंतर जानकी आधी सुमनला बोलली.. नंतर ती राघवला काही संगणारच तर हे अशाप्रकारे त्याच्या कानावर  पडलं.. 


    परी राघवचा हात धरून तिला फाटकातून येताना दिसली.. तसा जानकी च्या जीवात जीव आला.. " आवं कधीचं गेलासा.. सकाळपासून काही बी खाल्लं न्हयाय तुम्ही. हातपाय धुवून या पान घेते.. " 

"नको पोट भरलाय माझं.." असं बोलून राघव पडवी तल्या झोपाळ्यावरच आडवा झाला..  


     "आवं ,मी काय म्हंत्ये ते आयकून तर घ्या.. " 


"जानकी हितं थांबू की नगं.. जरा एकटं सोडशील का??? ... मला ठावं नव्हतं तू लग्नाला न जाण्याचं कारण हे हाय त्ये... बरं झालं कळलंय.." 


"मी तर तयार नव्हतो.. तू, सुमन आणि विण्या नं भाग पाडलं, आनं डाग गाहाण ठेवाया लावलं.. का तर म्हणे सावकारपरिस बँका कमी व्याज लावती... आणि आता तूच माहेरच्या समोर माझी शोभा करतीस..जाऊ दे मला काहीच बोलायचं नाही..।" असं म्हणून राघव कूस बदलून झोपळ्यावरच आडवा झाला...


      'आवं पण दोन घास खाऊन तर घ्या.. सकाळ धरणं काही बी खाल्लं न्हायी तुमि.. माजा राग असा अन्नावर तरी काढू नगसा...'' पण राघवाने उत्तर नाही दिले... थोडावेळ ताटकळत जानकी आत निघून गेली..



     रात्री परी जेवायला तयार होत नव्हती.. 'बाबा तुम्ही नाही जेवलात तर मी पण नाही जेवणार  म्हणत रुसून बसली ... तेंव्हा तिच्यासोबत राघवाने चार घास खाल्ले पण जानकी बिचारी सकाळपासून उपाशी पोटी आपल्यामुळे राघव दुखावल्या गेल्याचं मनात आणून कुढत होती... अगदीच राहवलं नाही तेव्हा तिने विनीत ला फोन करून सगळं सांगितले..



     परी गोष्ट ऐकत  झोपळ्यावरच राघवच्या मांडीवर झोपून गेली.. जानकी ने तिला उचलून घेऊन आतल्या झोपायच्या खोलीत घेऊन गेली.. तेवढ्यात राघव च्या फोन ची रिंग वाजली... 


     "बोल सुमन..”

"दाजी रागावलात ???..”

 " न्हाय.. मी कोण रागावणार ?? गरीब माणसाला कुटं रागावणं झेपतयं " 

" बापरे दाजी भारीच रागावलात वाटते.. आक्काला काही बोललात की काय.. रडत होती ती.." 

"अहो दाजी.. मीच सांगितले तिला सकाळी वहिनीला तसं बोलायला.. आपला रोहन नाही का दादाचा मुलगा .. यंदा अकरावीत गेलाय.. गावात कॉलेज असून तालुक्याला ऍडमिशन घेतली त्याने..एकतर त्याला अभ्यासात काहीच गती नाही.. आणि कॉलेजमध्ये जा या साठी बुलेट घेऊन मागतोय.. दादाला हे मान्य नाही.. म्हणून वहिनी त्याच्या माघारी पैसे मागत आहे.. आता तुम्हीच सांगा.. द्यायचं की नाही.." 

"अगं सुमन पण तसं सपष्ट सांगायचं की खोटं कशापायी बोलावं माणसानं..???"  

" दाजी तुम्हाल नाही कळायचं.. माणसं न तोडता पण व्यवहार जपता आलं पाहिजे.." 


     "आणि कशे हो दाजी तुम्ही.. रडवलात की माझ्या बहिणीला... चला आता समजूत काढा तिची मी फोन ठेवते.."


     राघव आत गेला तेंव्हा जानकी खिडकी जवळ  पाठमोरी उभी होती.. बाहेर बघत... खोलीत तसा अंधार होता पण बाहेरून चांदण्याच्या कवडसा खिडकीत पडला होता.. त्या हलणाऱ्या मंद प्रकाशात जानकी च्या गालावरचे अश्रूथेंब चमकत होते...


     राघव हळुवार पावलं टाकत तिच्या जवळ गेला.. तिला हाताला धरून आपल्याकडे वळवलं.. " मला सोनं नाणं घालायची हौस कधी होती.. तुमीच माह्या खरा दागिना हाय.. ते कुठून दुर्बुद्धी आली आनं सुमीचं आयकलं मी... " राघवाने तिला पुढचं बोलूच दिलं नाही.. तिच्या ओठांवर आपला हात ठेवला..  " जानकी माफ करशील मला...???"


      सगळे गैरसमज दूर झाले होते.. भांडण मिटले होते.. राघवाने जानकी  च्या डोळ्यातले आसू पुसले आणि आपले कान पकडले.. जानकी ने त्याचे हात हातात घेऊन हळूच त्याच्या मिठीत विसावली...


     खिडकीतून मंद वारा सुटलेला... बाहेर चांदण्यात रातराणीचा दरवळ मिसळून गेलेला.. दूरवरून आशा  दिदींच्या सुमधुर आवाजात रेडिओ वर गाणं ऐकू येत होतं...." नगं लागट बोलू... उभं आभाळ झेलू.... गाठ बांधला शालू... तुझ्याच पदरा.... तुझ्याच पदरा..."



                                                समाप्त..


   कथा कशी  वाटली नक्की कळवा.. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे.. शुद्धलेखनाच्या चुकांसाठी .🙏🙏   



                           ©✍ सौ.सपना इंद्रवार (यवतमाळ)


कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.

सदर कथा सपना इंद्रावार यांची असून त्यांनी ती स्वखुशीने शब्दचाफा ब्लाॅगवर प्रकाशित करण्यासाठी दिली आहे. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे असून त्यावर शब्दचाफा ब्लाॅगचा काहीही अधिकार नाही. आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो. शेअर करा पण लेखिकेच्या नावासकट.


     

Post a Comment (0)
Previous Post Next Post