काळजाचा ठोका चुकला

 
काळजाचा ठोका चुकला

 ©प्रांजली लेले 
ईशा ने घड्याळात पाहिले आणि तिची लगबग अजुनच वाढली. ७:५० ची लोकल पकडून तिला वेळेत ऑफिस गाठायचे होते. त्या आधी सिया ला उठवून तिची तयारी आटपायची होती. त्यामुळे तिचा दिवस पहाटे पाच ला सुरू होई. योगायोगाने  राजस आणि तिचे ऑफिस  सीएसटी लाच असल्याने दोघेही एकदमच घरातून निघत. वाटेत सियाला जवळच राहणाऱ्या काकूंच्या पाळणाघरात ते सोडत असे. पुढे शिवाजी टर्मिनसला उतरून दोघेही मग आपापल्या ऑफिसची वाट धरत असे. दोघांचे ही हे रूटीन अगदी घड्याळ्याचा  काटा फिरावा तसे अव्याहत चालू असे.

 

ईशाचे  माहेर पुण्याचे आणि राजसचे आई बाबा कोकणातले त्यामुळे  इथे मुंबईत त्यांचे अगदी जवळचे असे कुणीच नव्हते.  सिया झाली तेव्हा काही महिने ईशा बाळंतपणासाठी आईकडे होती आणि नंतर ऑफिस ला जॉईन झाल्यावर तिचे सासू सासरे येथे त्यांच्यासोबत राहायला आले होते. पण त्यांना इथले धकाधकीचे जीवन अजिबात आवडत नसे आणि त्यात मुंबईतली घरे म्हणजे विचारायलाच नको...इन मिन तीन छोट्या खोल्या..त्यामुळे त्यांना इथे घुसमटल्या सारखे होई. वरचेवर त्यांच्या तब्येती बिघडत असे.  नंतर   सिया जरा दीडेक वर्षाची झाल्यावर मात्र ईशा ने  तिला पाळणाघरी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या शिवाय त्यांना इतर पर्याय पण नव्हता. सासू सासरे पण सिया पाळणाघरात जरा रुळल्यावर  आपल्या कोकणात परतले.

 

हळूहळू वर्ष सरत होते आणि सिया पण आता शाळेत जायला लागली होती. पाळणा घरातून परस्पर ती शाळेत जाई आणि शाळे तून परत पाळणाघरात येई. ईशा तिला संध्याकाळी घरी येताना बरोबर घेऊन येत असे. राजसला मात्र ऑफिस मधून यायला बऱ्याचदा उशीर होई.

 

आजचा दिवस तसा खास होता. आज तिच्या प्रिय राजसचा वाढदिवस  असल्याने तिने लवकर उठून त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी आज त्यांचा बाहेरच डिनर ला जायचा बेत होता. राजस ऑफिस साठी तयार होऊन येताच तिने त्याला ओवाळले. त्याच्या आवडीचा गोडाचा शिरा केला. ते बघून तो आपल्या लाडक्या बायकोवर अधिकच खुश झाला. सियानेही उठल्याबरोबर आपल्या गोड आवाजात बाबांना बर्थ डे विश केलं. तिची गोड पप्पी घेऊन दोघेही ऑफिसला निघाले.

 

सीएसटीला उतरून दोघेही आपापल्या ऑफिसच्या दिशेने वळले. राजस ने तिला संध्याकाळी लवकर स्टेशन वर भेटण्याचे प्रॉमिस केले. आज ऑफिस मध्ये ईशा चे मन अजिबात लागत नव्हते. केव्हा एकदा संध्याकाळ होते असे तिला झाले होते.

 

संध्याकाळी ठीक पाच ला ती ऑफिसमधून निघाली. स्टेशन वर येऊन तिने राजसला फोन केला. पण त्याने काही फोन उचलला नाही. पंधरा मिनिटांनी त्याचा मेसेज आला की तो एका महत्वाच्या मीटिंग मध्ये अडकलाय आणि त्याला यायला उशीर होणार. तू घरी निघ आणि दोघी तयार व्हा मी येतोच..तो मेसेज बघून ती मनात जरा खट्टू झाली पण मग सिया वाट बघत असणार या विचाराने तिने पुढची लोकल पकडली.

 

घरी येता येता सिया ला पाळणाघरातून घेतले.  मग दोघीही छान तयार झाल्या. तिने खास राजसच्या आवडीची मोरपंखी रंगाची साडी आज नेसली होती.

तिने आदल्या दिवशीच राजसला गिफ्ट म्हणून एक सुंदर घड्याळ घेतले होते. आणि आज  डिनरला ती त्याला ते सरप्राइज  देणार होती.

 

घरी येऊन परत ईशा राजसला परत फोन लावणार इतक्यात त्याचाच तिला फोन आला. तो आत्ताच ऑफिस मधून निघाला होता. लोकल मध्ये बसताच मेसेज करतो असे सांगून त्याने फोन ठेवला.  तितक्यात तिच्या आईचा फोन आल्यामुळे ती आईशी बोलण्यात रमली. जवळ जवळ पाऊण एक तास आईशी बोलून तिने फोन ठेवला नी मेसेज चेक केला पण राजस चा कसलाच मेसेज नव्हता..खरतर एव्हाना त्याने यायला हवं होतं घरी असा मनाशी विचार येताच तिचा फोन वाजला.

 

फोन राजस चा असेल म्हणून तिने घाईत उचलला तर तो मात्र राजसचा नसून तिच्या ऑफिस मधील मैत्रिणीचा होता आणि तो ही अगदी तिच्या घाबरलेल्या आवाजात..ईशा घरी सुखरूप पोचली की नाही याची तिने चौकशी केली आणि लगेच तिला टीव्ही वर न्यूज पाहायला सांगितले. धडधडत्या मनाने तिने टीव्ही लावला आणि तिला ती भयानक हृदय हेलावून टाकणारी बातमी कळली.

 

शिवाजी टर्मिनस वर अज्ञात आतंकवाद्यांनी अतिरेकी हमला केला होता.  त्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला कित्येक जण बळी पडले होते. ते ऐकून तिच्या काळजाचा ठोका चुकला..आणि तिच्या पायातले सारे त्राणच गेले. तिने लगेच परत राजस ला फोन लावला..पण त्याचा फोन काही केल्या लागत नव्हता. आता मात्र तिच्या मनात नको नको ते वाईट विचार यायला लागले..नकळत डोळ्यातून अव्याहत अश्रु वाहायला लागले. तिला रडताना बघुन सिया पण रडू लागली.

 

एकापाठोपाठ एक तिला घरून फोन यायला लागले. दोघेही सुखरूप आहेत का याचीच शहानिशा करणारे ते कॉल्स होते. पण ते घ्यायची शक्ती पण तिच्यात या क्षणी नव्हती. कसेबसे पायात बळ एकवटून ती स्वयंपाक घरात देव्हाऱ्यातील देवासमोर जाऊन उभी राहिली आणि देवाला आळवू लागली. सिया तिच्या शेजारी तिचा पदर गच्च पकडून उभी होती. किती तरी वेळ ती अशीच देवासमोर उभी होत्या..

 

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने धावतच दार उघडले आणि समोर राजस ला पाहताच त्याला गच्च मिठी मारली. दोघींनाही आपल्या कवेत घेऊन तो तसाच उभा होता.

 

हळूहळू या गोष्टीला बरीच र्वष लोटली. पण त्या जीवघेण्या क्षणाची आठवण मात्र कायम हृदयी राहिली. देवाने कधी प्रसन्न होऊन तिला काही वर माग म्हंटले असते तर तो जीवघेणा क्षण आयुष्यातून नेहमीसाठी विसरायचा वर तिने मागितला असता...

 

जीवाचा थरकाप उडवणार्या त्या निर्घृण आतंकवादी हमल्याने सारा देश हादरला होता.

खरंच ज्यांनी ज्यांनी ती हृदयद्रावक घटना अनुभवली असेल त्यांना पण अजूनही हेच वाटत असेल की भूतकाळातील तो भयानक दिवस जर बदलता आला असता तर...

 

©प्रांजली लेले 


 सदर कथा प्रांजली लेले यांची असून त्यांनी ती स्वखुशीने शब्दचाफा ब्लाॅगवर प्रकाशित करण्यासाठी दिली आहे. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे असून त्यावर शब्दचाफा ब्लाॅगचा काहीही अधिकार नाही. आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो. शेअर करा पण लेखिकेच्या नावासकट.

 

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post