पहिली सकाळ

 

पहिली सकाळ  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

लेखिका : प्रीति दामले

"अभिनंदन!! मुलगी झाली आहे तुम्हाला...अगदी नक्षत्रासारखी देखणी आहे." नर्सने माधवी ला सांगितले आणि माधवी चा चेहरा आनंदाने उजळला...

माधवी.. प्रतापराव पाटील आणि सरलाबाई पाटील यांची एकुलती एक कन्या...साताऱ्याच्या पाटलांचं कुटुंब तसं खाऊन पिऊन सुखी.. आपली २५ एकर शेती प्रतापराव जातीने लक्ष घालून कसत.. आणि त्यांना सरलाबाई घर निगुतीने सांभाळून साथ देत... माधवी ...शेलाट्या बांध्याची...टपोऱ्या बोलक्या डोळ्यांची.. नृत्यामधे तर विशेष पारंगत.. तिच्या लांब सडक केसांवर तर मुली सुद्धा फिदा होत.. त्यामुळे जाईल तिथे माधवीच्या रूपाचं आणि नृत्याचं कौतुक झालं नाही असं व्हायचं नाही... आपल्या सौंदर्याचा माधवी ला प्रचंड गर्व होता आणि तो तिच्या वागण्या बोलण्यात पण हळू हळू दिसू लागला.. प्रतापराव आणि सरला बाई तिला खूप समजावत..पण माधवी एक प्रतापराव सोडले तर कुणालाच बधत नसे... आपल्या मुलीचा स्वभाव बघता सरलाबाईना तिची खूप काळजी वाटे... लग्ना नंतर ही घरातल्यांशी जुळवून घेईल ना अशी सतत त्यांना काळजी वाटे...

आपली स्वप्नं पूर्ण करायची असतील तर शहरात जायला हवं हे माधवीने ओळखलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा लग्नासाठी घरात बोलणी सुरू झाली तेव्हा मुंबई चेच स्थळ पाहावं म्हणून तिने आई बाबांना गळ घातली...आणि यथावकाश कु. माधवी चे सौ. माधवी कुणाल मोहिते म्हणून मुंबईत आगमन झाले... मुंबईच्या झगमगत्या दुनियेत माधवी पटकन रुळली... आपल्या बोलक्या स्वभावामुळे तिने भरपूर मित्र मैत्रिणी जमवले... वृत्तपत्रातील जाहिरात बघून टीव्ही वरील मालिकेत छोट्या छोट्या भूमिका करायला सुरुवात केली... या झगमगत्या दुनियेचं गणितच वेगळं होतं... आणि त्या चक्रात अडकवलेल्या माधवीचा घरात पाय ठरेना... कुणालचा या सगळ्याला जरा विरोध होता पण माधवीच्या हट्टापुढे त्याचं काही चालत नसे.. 

आता निदान आई झाल्यावर तरी माधवीचं जरा घरात मन रमेल असं कुणालला वाटलं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं...

आपली नक्षत्रासारखी पोर बघून माधवीचा आनंद गगनात मावेना... आणि नकळत आपल्याला न मिळालेलं बालपण ती मुली मध्ये शोधू लागली...म्हणता म्हणता माधवी ची लेक रेवा वर्षाची झाली.. 

आणि एक दिवस वृत्तपत्रा मधील एका जाहिरातीने माधवी चे लक्ष वेधले .. एका लहान मुलांच्या कपड्याच्या ब्रँड साठी त्यांना मॉडेल्स हवे होते...तिने ताबडतोब फोन लावून माहिती विचारली.. एकच दिवस शूटिंग करावं लागणार होतं... पण रेवा ला सिलेक्ट केलं तर तिचे पोस्टर्स अख्या मुंबापुरीत झळकणार होते..माधवी जाम खुश झाली...

"कुणाल, अरे फक्त एकच दिवस...आणि ते लोक सोय ही छान करणार आहेत रेवाची... आणि मी असेनच ना तिच्या बरोबर...एक गंमत म्हणून करू या ना.." इतक्या लहान वयात मॉडेल म्हणून आपल्या छोटूलीला पाठवावं हे कुणाल ला अजिबात पटत नव्हतं..."ही पहिली आणि शेवटची वेळ हं" कुणाल ने माधवी कडून प्रॉमिस घेतलं...

माधवी जाम खुश झाली.. अशा ऑडिशन मध्ये सिलेक्ट व्हायचं तर काय काय करावं लागेल याची तिने आधी नीट माहिती काढली...मग सर्वात आधी रेवाच्या नावे तिने सोशल मीडियावर अकाउंट्स ओपन करून तिचे आत्ता पर्यंत काढलेले छान छान फोटो टाकायला सुरुवात केली...आपल्या मित्र मैत्रिणीं मध्ये ते शेअर करून रोज किती लाईक्स आलेत, किती नवीन subscribers झालेत याचा हिशोब ठेवायला तिने सुरू केले... दिवसा गणिक किमान एक असा एक तरी update ती पोस्ट करत असे...आणि अखेर ऑडिशन च्या दिवशी आपल्या लेकीला छान तयार करून ती घेऊन गेली...

"५००० subscribers? ते पण फक्त २ आठवड्यात?" ऑडिशन घेणाऱ्या टीम चा हेड रेवा चा सोशल मीडिया प्रोफाइल बघून अचंबित झाला... टॉप to बॉटम छान तयार होऊन आलेल्या रेवाची निवड नसती झाली तर नवल!!

" कुणाल, I am so so happy... आपली रेवा आता एक celebrity होणार" माधवी चा आनंद गगनात मावेना.. रेवा चे फोटो सगळीकडे झळकले..आणि तिचं अभिनंदन करण्यासाठी येणारे फोन घेता घेता माधवी सुखावत होती...

लगोलग आणखी काही ब्रँड्स च्या टीम नी माधवी शी संपर्क साधला...त्यांना रेवाच त्यांच्या जाहिरातींमध्ये हवी होती...माधवी प्रचंड खुष होती...लवकरच रेवा च्या subscribers चा आकडा ५०००० झाला...

"माधवी, रेवा लहान आहे.. झालं एवढं बास गं..." कुणाल अजिजिने माधवी ला सांगत होता... आणि माधवी रेवा साठी वेगवेगळी स्वप्नं बघत होती...तिच्या महत्त्वाकांक्षे पुढे कुणाल चे काही चालेना... म्हणता म्हणता रेवा ५ वर्षाची झाली... शाळेत जायला लागली... एक सुपर kid model म्हणून ती आधीच प्रसिद्ध होती... त्यामुळे शाळेत पण पालक वळून वळून तिच्याकडे बघत...

"मॅडम जी, मेरे पेहचान के एक प्रोड्यूसर है...सीरियल बनाते है टीव्ही पे... उनके एक सीरियल मे एक छोटी बच्ची का रोल है... सोचीये.. रेवा के लिये", एकदा एका फोटो शूट वेळी माधवी ला नवीन माहिती मिळाली... आणि तिचे डोळे विस्फारले .. "माझी लेक आता टीव्ही वर झळकणार!" माधवी नवीन स्वप्नं पाहू लागली..

"माधवी, अगं रेवा लहान आहे.. काय गरज आहे आता या टीव्ही सीरियल ची वगैरे..." कुणाल चिडला होता..


" अरे फक्त एकच सीरियल रे.. आपली रेवा घरा घरात पोचेल...please नाही म्हणू नको" माधवी ने कुणाल चे मन वळवले... आणि एका नवीन पर्वासाठी माधवी तयार झाली...

अपेक्षेप्रमाणे रेवाची मालिके मधील बाल कलाकार म्हणून निवड झाली... आणि मग शूटिंग च्या तारखा...बाकी इतर ब्रँड्स साठीचे फोटो शूट ..शाळा .. आणि मग जमेल तसा अभ्यास हे सगळं सांभाळत माय लेकी व्यस्त झाल्या... रेवा लवकरच stardom अनुभवू लागली...ती जाईल तिथे लोक वळून वळून तिच्या कडे बघत.. शाळेमध्ये पण बाकीची मुलं तिला "काय लकी आहेस तू" म्हणत.. एखाद्या राजकन्ये सारखी तिला वागणूक देत.. बाकीच्या मुली तिचा डबा घेऊन खाली जात... सगळ्यांचे डबे उघडले की सर्व प्रथम रेवा तिच्या आवडीचे इतरांच्या डब्यातले खाणार आणि मग बाकीचे आपापला डबा खाणार..रेवा सांगेल तसच होणार...असा शिरस्ता झाला...आणि हळू हळू "मी सांगेन तेच होणार" असा आग्रह रेवा धरू लागली....

एकीकडे तिची प्रतिमा जन मानसात कायम राहावी म्हणून कधी तिच्या नाचाचे reels..तर कधी तिच्या दैनंदिन व्यवहाराचे शूट... तिचे वेग वेगळे ड्रेसेस...ती कशी जेवते ...कशी खेळते...याचे व्हिडिओज करून तिच्या सोशल मीडिया साईट वर टाकून माधवी तिच्या चॅनल चा subscribers चा आकडा आता लाखाच्या वर कसा जाईल यात दंग होती...

आणि तो दिवस उजाडला... नेहमी प्रमाणे माधवी रेवाला एका फोटो शूट साठी तयार करत होती.."आई, मला आज माझा आवडता हेअर बँड हवा ग....आलेच मी घेऊन " असं म्हणत रेवा आपल्या खालच्या रूम कडे जायला पळाली...आणि घाई घाईत कार्पेट मध्ये पाय अडकून जिन्यावरून खाली गडगडत पडली.... 

"रेवा ..अगं काय झालं?" रेवाचा आवाज ऐकून माधवी धावली..आणि तिच्या तोंडचं पाणीच पळालं... रेवा पाय धरुन कळवळत होती..डोक्याला चांगलाच मार लागला होता आणि रक्ताची धार लागली होती... माधवीने पटकन तिला हॉस्पिटल मध्ये नेलं... कुणालही लगेच पोचला...XRay काढल्यावर पायाला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं...आणि हा नवीन दागिना घेऊन रेवा घरी आली... फोटो शूट...सीरियलचं शूट सगळं काही दिवसांसाठी थांबवणं गरजेचं होतं...आपल्या लाडक्या नातीच्या काळजीने आजी आजोबा पण साताऱ्याहून मुंबईला आले...


"आई, काय करू मी नुसतं बसून...कंटाळा आलाय मला" रेवा माधवी कडे कुरकुर करत होती... 

"कंटाळा? तो ग काय असतो?" जवळच बसलेल्या आजीने विचारले ...आपल्या आजीला कंटाळा शब्द माहीत नाही बघून रेवा हसायला लागली..

"अगं, मुळात मी सतत काहीतरी करते त्यामुळे कंटाळा यायला वेळच नसतो ना मला." आजी म्हणाली.." म्हणजे बघ सकाळी उठलं की आवरून घराबाहेर छान सडा घालते..झाडांना पाणी घालते... त्यांच्याशी गप्पा मारते..त्यांना आंजारते, गोंजारते...मग ताजी फुलं आणते.. माझं आवरून झालं की देवाची छान पूजा करते...मग माझ्यासाठी आणि आजोबांसाठी जेवण बनवते... दुपारची वामकुक्षी झाली की मग रोजचं वर्तमानपत्र वाचते...मग माझ्या आवडीचं एखादं पुस्तक वाचते..संध्याकाळ झाली की कधी आजोबांबरोबर तर कधी माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जाते...आणि मग घरी आल्यावर देवा पुढे दिवा लावते... रात्रीचं जेवण झालं की निद्रा देवीच्या अधीन ! सांग बरं कुठे वेळ आहे मला कंटाळा यायला!" आजी म्हणाली...

"अगं आजी...काय बोलते आहेस तू....झाडांशी का कुणी बोलतं...आणि देव पूजा रोज करतेस तू? मी तर बाबाला कधी कधीच करताना बघितलंय...आणि बाकी हे पुस्तक वाचन..खेळणं..छे ग ..मला वेळच नसतो..सतत शूटिंग चालू असतं... त्यामुळे मला हे असं मैत्रिणी वगैरे काही माहीत नाही बाबा.. बोअरिंग आहे हे सगळं.. कधी एकदा माझं शूटिंग सुरू होतंय असं झालंय मला..नाहीतर लोक मला विसरतील गं... तुला माहिती तरी आहे का हे सोशल मीडिया वगैरे" रेवा ची कुरकुर चालूच होती...

इतक्या छोट्या कळीला अलगद बहरू देण्या ऐवजी उमलण्याची घाई करणाऱ्या आपल्या सुनेचा सरला बाईना जरा राग आला..पण परिस्थिती जरा डोक्याने हाताळायला हवी हे लक्षात घेवून त्या म्हणाल्या "अगं एवढच ना... चल एक गंमत करू... आपल्या दोघींमध्ये एक deal करू...तू मी सांगितलं मगाशी तसं वागायचं आणि मी सोशल मीडिया शिकून तुझ्यासारखे माझे फोटो बिटो पोस्ट करेन... रोल एक्सचेंज... पुढचा १ महिना... चालेल?"

"अगं पण मला कुणी मैत्रिणी वगैरे नाहीत गं... आणि मला हे तू काय सांगितलेस ते आवडतच नाही..." रेवा पुन्हा वैतागून म्हणाली...

"अगं करून तर बघ..बिल्डिंग मधल्या बाकी तुझ्या वयाच्या मुलींना मी आणते बोलावून खेळायला" आजीने आपला पॉइंट परत पुढे सरकवला ..

अखेर हो नाही करता रेवा तयार झाली.... पहिल्यांदाच आपल्या घरातील झाडांना तिने जवळून पाहिलं..त्यावर रोज बागडणाऱ्या पक्षांना बघून ती जाम खुश झाली..."अगं आजी किती गोड आहेत हे... किती सराईत पणे फुलांमधला मध पितायत.." रेवा आनंदून गेली...

संध्याकाळी बरीच मित्र मंडळी घरी येऊ लागली... सुरुवातीचे अनोळखी पणाचे बंध गळून पडले... सर्वांशी च रेवाची छान दोस्ती झाली... सेलेब्रिटी असली तरी ती पण आपल्या सारखीच मुलगी आहे हे कळल्यावर मंडळी खुश झाली...गप्पा टप्पा...पत्ते... कॅरम चे डावच्या डाव रंगू लागले...आणि हळू हळू रेवा संध्याकाळ ची आतुरतेने वाट बघू लागली....

म्हणता म्हणता प्लास्टर निघालं आणि रेवा आपल्या पायांवर पुन्हा उभी राहिली...

"चला...उद्यापासून शूटिंग सुरू हं बेटा..." माधवी ने रेवाला आठवण करून दिली .... 

"म्हणजे? अगं पण माझी झाडं...माझे पक्षी मित्र...त्यांना पाणी कोण देईल..आणि संध्याकाळी तर मला खूप खेळायचय... माझ्या नवीन मित्र मैत्रिणींबरोबर नाचायचय... पळायचय..नाही ग आई... नको ते शूटिंग वगैरे...please" रेवा अजिजीने माधवी ला विनवत होती...

माय लेकींमधला संवाद आजी ऐकत होती..आणि न राहवून अखेर म्हणाली," माधवी, अगं त्या लाखो subscribers पेक्षा रेवाच्या चेहर्या वरचा आनंद लाख मोलाचा आहे गं.. त्या शूटिंग पेक्षा आज या झाडा फुलांबरोबरचे ..मित्र मैत्रिणींबरोबर चे क्षण मनाच्या कुपीत तिने जपून ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे गं... याच आठवणींच्या हिंदोळ्यावर मोठं झाल्यावर जेव्हा ती झुलेल ना ... तेव्हा कुठल्याही संकटाला ती लीलया सामोरी जाईल....आपली ओळख ती स्वतः निर्माण करेल... तिचं बालपण हा तिचा हक्क आहे.... आणि ते हिरावून घेण्याचा आपल्याला हक्क नाही.... चला खूप रात्र झाली आहे...आपण उद्या बोलू."

" रेवा, अगं रेवा, तो बघ बुलबुल छान शीळ घालत तुला बोलवतोय गं... आणि हो हा पेरूचा तुकडा ठेव गं तुझ्या मिठू पोपटासाठी..आणि हो...संध्याकाळी कितीला जाणार आहेस तू खेळायला..वेळेत घरी यायचं गं पण.." 

माधवी काम करता करता बोलतं होती... आजीच्या चेहऱ्यावर समाधान पसरले..

आणि रेवा खिडकी मधून बाहेर बघत होती..कारण आज तिच्या नवीन आयुष्याची पहिली सकाळ होती!

प्रीती दामले

Post a Comment (0)
Previous Post Next Post